‘इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या पुस्तकासाठी २००६ मध्ये मेन्स बुकर पारितोषिक विजेत्या किरण देसाई यंदाच्या ‘जयपूर लिटफेस्ट’चे आकर्षण ठरल्या आहेत. पाच दिवस तीन-चार चर्चासत्रांमध्ये त्या सहभागी होणार असल्या तरी पहिल्याच दिवशी नंदिनी नायर यांनी घेतलेली त्यांची मुलाखत ऐकण्यासाठी त्यांच्या वाचकांनी तोबा गर्दी केली होती. किरण देसाई १५ वर्षांनंतर यंदा जयपूर लिटफेस्टमध्ये सहभागी झाल्या आहेत. ‘लोनलीनेस ऑफ सोनिया अॅण्ड सनी’ या पुस्तकाला गेल्या वर्षी बुकर नामांकन मिळाल्यानंतर प्रथमच भारतात जाहीर कार्यक्रमात सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची लेखनप्रक्रिया काय आहे, त्यांना त्यांच्या व्यक्तिरेखा कुठे आणि कशा सापडतात, त्या शब्दबद्ध करणे, त्यांचा मनोव्यापार मांडणे सोपे असते का असे विविध प्रश्न किरण देसाई यांना विचारले गेले.

लहान लहान निरीक्षणे गोळा करत जाणे आणि त्यातून हळूहळू व्यापक, सखोल मांडणी करणे ही प्रक्रिया अजिबात सोपी नसते, ती खूप वेळ घेणारी असते असं किरण देसाई यांनी सांगितलं. त्यांचं म्हणणं असं होतं की आक्रमक राजकीय पुस्तक लिहिणं एकवेळ सोपं आहे, पण दोन व्यक्तिरेखांच्या जीवनातला खासगी अवकाश रंगवणं, त्यांच्यातील संवाद उभा करणं ही अतिशय अवघड गोष्ट असते. त्या लिखाणाशी लोक नंतर स्वत:ला जोडून घेतात, म्हणून ते कादंबरीसारखा वाङ्मयप्रकार पुन्हा पुन्हा आणि आवडीने वाचतात. ‘इनहेरिटन्स’ला मिळालेल्या पुरस्कारानंतर दुसरी कादंबरी येण्यास तब्बल २० वर्षे लागली, हेदेखील त्यांनी मान्य केले. कादंबरीच्या रचनेविषयी, ८८ वर्षांच्या त्यांच्या आईविषयी- प्रसिद्ध लेखिका अनिता देसाई यांच्याविषयी ‘लोनलीनेस ऑफ सोनिया अॅण्ड सनी’च्या निमित्ताने एकटेपणाच्या विविध पैलूंविषयी त्या मोकळेपणाने बोलल्या. कृत्रिम बुद्धिमत्तेविषयीच्या एका प्रश्नाला उत्तर देताना आपणही चॅट जीपीटीला किरण देसाई यांच्या शैलीत थोडे लिखाण करून दाखव असे सांगितल्यावर जे लिखाण मिळाले ते कसे अचंबित करणारे होते, असे त्यांनी सांगितल्यावर श्रोत्यांमध्ये खसखस पिकली.

एआय, प्रकाशक आणि लेखक

‘एआय अॅण्ड द फ्युचर ऑफ बुक्स, रीडिंग अॅण्ड नॅरेटिव्ह्ज’ या सत्रात एमा हाऊस यांनी आधी प्रकाशन व्यवसायात असलेल्या आणि आता एआयसंदर्भात काम करणाऱ्या मेरू गोखले, जॉन अंतोनिओ मार्च पजोल, समीर पाटील तसेच लेखक मार्टिन पंचर आणि गुरुचरणदास यांच्याशी संवाद साधला. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणीत चॅट जीपीटीसारख्या साधनांचे स्वागतच आहे, असे या परिसंवादात सहभागी प्रकाशन व्यावसायिकांचे म्हणणे होते. मुळात प्रकाशन व्यवसायात पैसा नसल्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या साधनांच्या वापराने तो कमी होऊ शकत नाही. उलट झाला तर या साधनांचा उपयोगच आहे. आमच्याकडे ढिगाने खोळंबून पडलेल्या कामांसाठी आम्ही त्याचे स्वागतच करतो असा त्यांचा सूर होता. एआय हा काही लेखकासारखा निर्माता नाही, तो सांगितलेली कामे करून देणारा निष्काम कर्मयोगी आहे. तो केल्या कामाचे श्रेयही मागत नाही, असे त्यांचे मुद्दे होते, तर एआय हा आमचा सहकारी, भागीदार असू शकतो, आम्हाला त्याचा उपयोगच होऊ शकतो, असे लेखकांचे म्हणणे होते. त्याच्यामुळे जगातील कोणत्याही दोन भाषांमधील संवाद सहजसोपा होईल. तो लोकांची सर्जनशीलता वाढवेल. पण लेखक लिखाणादरम्यान जातो, त्या निर्मितीच्या वेदनादायी प्रक्रियेतून एआय जात नाही. त्याला जगाचा भौतिक अनुभव घेता येत नाही. त्याला नैतिक बंधनही नाही, ही त्याची मर्यादा आहे आणि ती कायम राहील, ही एआयबद्दलची लेखकांची बाजू होती. प्रत्येक माणूस वैशिष्ट्यपूर्ण आहे, तसे एआयचे नाही. तो सपाटीकरण करेल. दुसरीकडे त्यातून असमानता आणखी वाढेल, अशीही भीती व्यक्त केली गेली. एआयच्या वापरावर बंधने हवीत. एआयची निर्मितीही माणसांकडूनच होते, त्यामुळे त्याच्यासंदर्भात मूल्ये आणि पूर्वग्रह यांचा नीट विचार करावा लागेल, या मुद्द्यावर हा परिसंवाद संपला.

vaishali.chitnis@expressindia.com