‘आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक २०२६’ची अंतिम यादी जाहीर झाली आहे. यादीत समाविष्ट पुस्तकांतील समान सूत्र असे की ती कोणत्या ना कोणत्या मार्गाने गेल्या शतकभरातील घडामोडींवर प्रकाश टाकतात. यात १९३०च्या दशकातील तैवानपासून क्रांतीनंतरच्या इराणपर्यंत, अल्बेनियन आल्प्सपासून पॅरिसच्या उपनगरांपर्यंतचे संदर्भ आहेत. प्रत्येक पुस्तक अशा काळाला आणि ठिकाणांना स्पर्श करते जिथे सत्तेने आपला ठसा उमटवला आहे.
यात भारतीय वंशाच्या कॅनेडियन-अमेरिकी लेखिका आणि प्राध्यापिका पद्मा विश्वनाथन यांनी पोर्तुगीजमधून अनुवादित केलेल्या ‘ऑन अर्थ ॲज इट इज बिनीथ’ या डिस्टोपियन ब्राझिलियन कादंबरीचा समावेश आहे. मूळ कादंबरी ॲना पॉला माइया यांनी लिहिली आहे. ही लघुकादंबरी एका गुलामांच्या छळछावणीतील क्रौर्याचे चित्रण करते. यात अमानूष मारहाण आणि हत्यांचे वर्णन करण्यात आले आहे.
बुकरची दीर्घयादी जाहीर झाल्यानंतर ‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत विश्वनाथन यांनी सांगितले होते की, ‘या भाषांतराला नऊ आठवडे लागले आणि पाच खर्डे लिहिल्यानंतर अनुवाद पूर्ण झाला.’
अंतिम फेरीतील इतर पुस्तकांपैकी द नाइट्स आर क्वाएट इन तेहरान या शिदा बझियार यांच्या जर्मन भाषेतील कादंबरीचा समावेश आहे. तिचा अनुवाद रुथ मार्टीन यांनी केला आहे. ही बहुआयामी कादंबरी एका इराणी कुटुंबाचा क्रांतीपासून ते जर्मनीतील निर्वासित जीवनापर्यंतचा प्रवास रेखाटते.
‘शी हू रिमेन्स’ या रेने काराबाश यांच्या कादंबरीचा समावेश या यादीत आहे. मूळ बल्गेरियन भाषेतील कादंबरीचा इझिडोरा अँजेल यांनी अनुवाद केला आहे. आल्प्सच्या पार्श्वभूमीवर हे कथानक घडते. ठरलेल्या विवाहातून सुटका करून घेण्यासाठी आपल्या स्त्रीत्वाचा त्याग करणार्या आणि ‘स्वोर्न व्हर्जिन’ होणार्या किशोरवयीन मुलीची ही कथा आहे.
लघुयादीतील ‘द डायरेक्टर’ या डॅनियल केल्मन लिखित जर्मन कादंबरीचा रॉस बेंजामिन यांनी अनुवाद केला आहे. या नाझींच्या अत्याचारांचे उपरोधिक शैलीत वर्णन करण्यात आले आहे. हिटलरच्या जर्मनीत काम करण्यासाठी हॉलीवूड सोडून परत आलेले चित्रपट निर्माते जी. डब्ल्यू. पाब्स्ट यांच्या आयुष्यावर ही कादंबरी आधारित आहे. केल्मन आणि बेंजामिन यांना यापूर्वी २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिकासाठी नामांकन मिळाले होते.
मेरी एनडाय लिखित फ्रेंच कादंबरीचा जॉर्डन स्टम्प यांनी केलेला ‘द विच’ हा अनुवाद लघुयादीत समाविष्ट आहे. फ्रान्समध्ये ही कादंबरी सर्वप्रथम तीस वर्षांपूर्वी प्रकाशित झाली होती. यात उपनगरातील एक चेटकीण आणि तिच्या सामथ्र्याला मागे टाकणार्या जुळ्या मुलींची कथा आहे. २०१६ मध्ये एनडाय आणि स्टम्प यांची ‘आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिका’च्या दीर्घयादीत निवड करण्यात आली होती.
यांग शुआंग-झी यांच्या मँडरिन चिनी भाषेतील पुस्तकाचा ‘तैवान ट्रॅव्हलॉग’ हा लिन किंग यांनी केलेला अनुवाद यादीत समाविष्ट आहे. ही आत्मचरित्राच्या रूपात मांडलेली कादंबरी आहे. १९३०च्या दशकात एका जपानी कादंबरीकाराने तैवानमधील खाद्यसंस्कृती जाणून घेत केलेल्या प्रवासाचे वर्णन यात आहे. पुस्तकात वसाहतवाद, समलैंगिक प्रेम आणि जपानी राजवटीखालील तैवानी स्मृतींचा गुंता यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. १९ मे रोजी होणार्या सोहळ्यात विजेत्या कादंबरीचे नाव जाहीर केले जाणार आहे.
