गीतांजली श्री, बानू मुश्ताक यांना मिळालेल्या पारितोषिकानंतर आता कुठल्या भारतीय भाषेतील पुस्तकाचा अनुवाद इंटरनॅशनल बुकरच्या स्पर्धेत येतो, याचे कुतूहल इतर जगालादेखील आहे.

भारतीय प्रकाशन संस्थांच्या पुढाकाराने यंदा खूप देशी पुस्तके धडकली असली, तरी लांबोडक्या यादीतील १३ पुस्तकांत एकही भारतीय कादंबरी नाही. जर्मन, स्पॅनिश, डच, फ्रेन्च, स्वीडिश, बल्गिरिअन, इटालिअन, पर्शियन, डॅनिश आणि मँडरिन भाषांतील अनुवादांमध्ये यंदा स्पर्धा दिसते. पद्मा विश्वनाथन या कॅनडातच जन्मलेल्या आणि पोर्तुगीज भाषेतून इंग्रजीत अनुवाद करणार्या लेखिकेचे नाव अनुवादक म्हणून झळकले आहे.

ॲना पॉला माइया यांच्या पोर्तुगीज कादंबरीचा हा अनुवाद ‘ऑन अर्थ ॲज इट इज बीनीथ’ नावाने गेल्या वर्षी इंग्रजीत आला. स्पर्धेत ‘डिरेक्टर’ ही जर्मन आणि ‘तैवान ट्रॅव्हलॉग’ ही गाजत असलेली मँडरिन कादंबरीदेखील आहे. यादीत इतर कोण आहे, हे पाहण्यासाठी सविस्तर यादीचा दुवा आहेच. पण निव्वळ भारतीय नावाच्या अनुवादक पद्मा विश्वनाथन यांची एक इंग्रजीतील पारितोषिक विजेती स्वतंत्र कथा मुद्दाम इथे जोडण्यात आली आहे.

https://tinyurl.com/mrp82eyy, https://tinyurl.com/4bxmvvry

पॅरिसचा नवा संदर्भइतिहास…

जॅनेट फ्लॅनर या ‘न्यू यॉर्कर’ साप्ताहिकाच्या अधिकृतरीत्या पहिल्या परदेशी वृत्तलेखिका. दुसर्या महायुद्धाआधी हेमिंग्वे लेखनकामाठी-वाचनकामाठी आणि उमेदवारी करीत असताना तावताव भरून पॅरिसवर टोपणनावाने लेख लिहिणार्या. हेमिंग्वेच्या ‘ए मुव्हेबल फिस्ट’ या पॅरिसवरच्या ग्रंथात त्या डोकावल्या आहेतच.

महायुद्धाच्या ढगाळलेल्या वातावरणातील पॅरिसमधील सांस्कृतिक-सामाजिक घटकांना पकडत न्यूू यॉर्करची पत्रकारिता विस्तारित राहिली ती फ्लॅनर यांच्या लिखाणामुळे. त्यांच्या मुलाखती-पुस्तके- रिपोर्ताज- कथनात्मक साहित्य आदी अनेक गोष्टी उपलब्ध आहेच. मार्क ब्रॉड यांच्या ‘द टाइपरायटर ॲण्ड गिलोटिन : ॲन अमेरिकन जर्नलिस्ट, ए जर्मन सिरिअल किलर ॲण्ड पॅरिस ऑन द इव्ह ऑफ वर्ल्ड वॉर टू’ या ताज्या पुस्तकामुळे हेमिंग्वेच्या ‘ए मुव्हेबल फिस्ट’च्या वाचलेल्या संदर्भांना आणखी ठळक करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

गिलोटिनखाली मृत्युदंडाची शिक्षा दिली गेलेली शेवटची दोषी व्यक्ती आणि त्यामुळे युरोपभर उडालेल्या खळबळीला फ्लॅनर यांनी आपल्या रिपोर्ताजमधून शब्दांकित केले होते. या सगळ्या रंजक इतिहासाचा छोटा तपशील येथे वाचता येईल. https://tinyurl.com/mw8pthnt