सिद्धार्थ खांडेकर

आपण स्वत:ला क्रिकेटमधले अभिजन समजतो. पण अतोनात महत्त्व देतो ते आयपीएलला. विश्वविजेतेपद हा जणू आपला प्राधान्यक्रम राहिलेलाच नाही.

Bernd Holzenbein dead at 78
माजी फुटबॉलपटू होल्झेनबाइन यांचे निधन
Along with Wanderers Kingsmead Newlands will host 2027 World Cup matches sport news
वॉण्डरर्ससह किंग्जमीड, न्यूलॅण्ड्सला २०२७च्या विश्वचषकाचे सामने
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
India Vs Pakistan bilateral series
IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका होणार? क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयोजनासाठी व्यक्त केली इच्छा

अव्वल भारतीय पुरुष क्रिकेटपटूंचे ‘वर्कलोड मॅनेजमेंट’ किंवा कार्यबाहुल्य व्यवस्थापन हे शब्द आयपीएलच्या तोंडावर इतके परवलीचे बनले आहेत, की आयपीएलनंतर लगेचच होणारा कसोटी क्रिकेट अजिंक्यपद अंतिम सामना आणि या वर्षी ऑक्टोबर महिन्यात होत असलेला ५० षटकांचा विश्वचषक प्राधान्याच्या १५ क्रिकेटपटूंविनाच खेळावा लागेल असे वाटावे. आयपीएलच्या १६व्या पर्वाला शुक्रवारी, ३१ मार्च रोजी सुरुवात झाली. त्याच्या काही दिवस आधी ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका संपली. आयपीएलच्या आठवडय़ाभरानंतर ७ जून रोजी लंडनमध्ये जागतिक कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होईल.

आयपीएलमध्ये भारतीय तसेच  ऑस्ट्रेलियाचेही खेळाडू आहेत. कार्यबाहुल्य व्यवस्थापनाचा पेच त्यांच्यासमोरही असेल, असे काहींना वाटू शकते. परंतु आयपीएलमध्ये खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना त्यांच्या क्रिकेट बोर्डाकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळवावे लागते. त्यात अनेक अटी-शर्तीचा समावेश असतो. त्यामुळे फ्रँचायझींना वाटते त्या प्रकारे आणि कितीही प्रमाणात या खेळाडूंची पिळवणूक करता येऊ शकत नाही. ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या बाबतीत परिस्थिती जरा गुंतागुंतीची ठरते. कारण कसोटी अजिंक्यपद सामन्यानंतर काही दिवसांनी अ‍ॅशेस मालिकेला सुरुवात होत आहे. कितीही विश्वचषक जिंकले, भारताविरुद्ध कितीही रोमांचक मालिका खेळल्या तरी त्या देशाच्या क्रिकेट संस्कृतीत अ‍ॅशेसचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे भारताविरुद्ध कसोटी, एकदिवसीय मालिका, आयपीएल, कसोटी अजिंक्यपद सामना आणि अ‍ॅशेस मालिका ही परिस्थिती ऑस्ट्रेलियन मंडळींसाठी अधिक आव्हानात्मक ठरते. त्यामुळे कोणत्या खेळाडूला आयपीएलमध्ये किती वापरावे, हे ठरवण्यासाठी ऑस्ट्रेलियन मंडळ आयपीएल फ्रँचायझींच्या संपर्कात राहणारच. शिवाय फ्रँचायझी त्यांच्या मताला किंमतही देतील. तशी सोय भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात बीसीसीआयला कितपत असेल याविषयी शंका वाटते. रोहित शर्माची २३ मार्च रोजीची पत्रपरिषद (चित्रफीत सर्वत्र उपलब्ध) उद्बोधक ठरली. कार्यबाहुल्य व्यवस्थापन हे ज्याचे त्याने ठरवावे, असे तो म्हणाला. यासाठी काही सामन्यांमध्ये महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांतीचा निर्णय फ्रँचायझींनी घ्यावा, असेही तो म्हणतो. पण.. असे ते खरेच करतील का, हे रोहितचे शेवटचे शब्द.

वर्कलोड मॅनेजमेंटचा उल्लेख झाला रे झाला, की सारेच ‘अगं अगं म्हशी’सदृश सबबी गुणगुणू लागतात. बीसीसीआय म्हणते फ्रँचायझींशी बोलू. खेळाडू म्हणतात फ्रँचायझींनी ठरवावे. फ्रँचायझी काही बोलत नाहीत, पण प्रशिक्षकांकरवी काही मुद्दे उपस्थित करतात. उदा. मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक मार्क बाऊचर म्हणतो, की असा प्रश्नच उपस्थित होण्याचे कारण नाही. कारण एकदिवसीय क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटमध्ये किती तरी अधिक प्रमाणात शारीरिक कस लागतो. या विधानाला तसा काही अर्थ नाही आणि बाऊचरसारखा जुनाजाणता खेळाडू हे ओळखून असेलच. कार्यबाहुल्य व्यवस्थापन एखादा खेळाडू तिन्ही प्रकारांमध्ये सातत्याने खेळतो तेव्हाच सांभाळावे लागते. एकीकडे अतिक्रिकेट आणि दुसरीकडे तंदुरुस्तीच्या बाबतीत महागडी पण कुचकामी यंत्रणा मौजूद असणे हा मुद्दा आहे. केवळ भारतच नव्हे, तर ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका किंवा इंग्लंडमध्येही अद्ययावत वैद्यकीय सुविधा असूनही कित्येक खेळाडू वारंवार जायबंदी होतच असतात. तेव्हा क्रीडाविज्ञान आणि तज्ज्ञ फिटनेस प्रशिक्षकांचा ताफा असल्यामुळे चिंतेचे कारण नाही, असे जे सांगितले जाते त्यात तथ्य नाही. 

बंगळूरुस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमी अर्थात एनसीएतील तज्ज्ञांमार्फत आयपीएलमधील प्रमुख भारतीय क्रिकेट खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर ‘नजर’ ठेवली जाईल, असे बीसीसीआयने म्हटले आहे. या प्रस्ताववजा निर्देशाला फ्रँचायझींनी विरोध केल्याचे समजते. ते योग्यच आहे. एक तर आपल्या अनेक क्रिकेटपटूंच्या फिटनेस हाताळणीबाबतीत एनसीएचे प्रगतिपुस्तक पुरेसे आश्वासक नाही. जसप्रीत बुमरा आणि श्रेयस अय्यर ही सध्याची ठळक उदाहरणे. आणखीही बरीच आहेत. शिवाय फ्रँचायझींकडे त्यांचे प्रशिक्षक आहेत. त्यांच्या कामात बीसीसीआयची ढवळाढवळ होणे हा व्यावसायिक स्वायत्ततेचा औचित्यभंग ठरतो. अशी पोलीसशाही बाजारकेंद्री अर्थव्यवस्थेत अप्रस्तुत ठरते. शिवाय काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होतात, ते असे :

  • जसप्रीत बुमरा पूर्ण तंदुरुस्त कधी होणार?
  • श्रेयस अय्यरच्या पाठीचे दुखणे वारंवार का बळावते?
  • ज्या प्रमुख खेळाडूंना आयपीएलमध्ये फ्रँचायझींनी ‘सांभाळून वापरावे/खेळवावे’ अशी अपेक्षा आहे, त्या १५-२० जणांची यादी बीसीसीआयने निश्चित केली आहे का? तसे करणे बीसीसीआयसारख्या श्रीमंत, संसाधनसमृद्ध संघटनेसाठी इतकी कठीण बाब आहे का?

विश्वचषक किंवा कसोटी सामन्यांच्या तारखा आज ठरलेल्या नाहीत. ऑस्ट्रेलियाविरुद्धची अत्यंत महत्त्वाची कसोटी मालिकाही कार्यक्रम पत्रिकेचाच भाग होती. या सर्वाच्या मधोमध आयपीएल. तेव्हा अशा सहा-सात महिन्यांच्या कालखंडासाठी तंदुरुस्त खेळाडूंचा संच उपलब्ध राहील, हे पाहणे ही जबाबदारी बीसीसीआयची आहे. बीसीसीआय आणि आयपीएल हे परस्परावलंबी आहेत. कोणत्याही परिस्थितीत आयपीएल होऊ द्यायचीच, ही आपल्या मंडळाची वर्षांनुवर्षांची भूमिका आहे. वेळ पडल्यास दक्षिण आफ्रिका किंवा संयुक्त अरब अमिरातींमध्ये जाऊन खेळवू, पण आयपीएल होणारच याकडे बीसीसीआयचा कटाक्ष असतो. मागील खेपेस टी-२० विश्वचषक पुढे ढकलण्यापर्यंत यांची मजल गेली. तेव्हा आयपीएल महत्त्वाचे की विश्वचषक या चर्चेमध्ये फिजूल वेळ घालवायला बोर्डाच्या मंडळींना कधीच रस वाटला नाही. हे वास्तव आपल्याकडील क्रिकेटप्रेमींनी समजून घेतले पाहिजे. आयपीएल आवडो वा न आवडो, ते विद्यमान/वर्तमान आहे. मग भलेही आयपीएल सुरू झाल्यानंतर आपण एकही टी-२० विश्वचषक जिंकलेला नसेल. किंवा गेल्या दहा वर्षांत एकही महत्त्वाची ट्रॉफी जिंकलेली नसेल. याविषयीचा त्रागा-उद्वेग क्रिकेटरसिक आणि विश्लेषकांकडून कमी झालेला नाही. परंतु आपण बदलते संदर्भच समजून न घेतल्यामुळे अशी फजिती होते. आज एकाच वेळी तीन-तीन संघ मैदानात उतरवू शकतो इतकी गुणवत्ता आहे अशी बढाई मारणारे आपण मोक्याच्या सामन्यांमध्ये सर्वोत्तम ११ जणही उतरवू शकत नाही. याचे कारण मोक्याच्या स्पर्धा आणि सर्वोत्तम संघ या खुळचट संकल्पना तुम्हा-आम्हाला अस्वस्थ करतात. पण विश्वविजेतेपदे हा बीसीसीआयचा  अग्रक्रम राहिलेलाच नाही. तो मान आयपीएलचा.

बीसीसीआयच्या वाढत्या प्रभावामागे आयपीएल हे प्रमुख कारण आहे. प्रश्न असा आहे, की ही परिस्थिती आणखी किती दिवस अशीच राहणार? आपले खेळाडू आताशा मर्यादित षटकांच्या स्पर्धामध्ये अजिंक्यपद पटकावत नाहीत कारण ते आयपीएल सोडून कुठेच खेळत नाहीत. बाकीच्या देशांचे खेळाडू त्या बाबतीत सुदैवी आहेत. त्यांच्या मंडळांनी त्यांना बंदिस्त रोजगारात कोंडलेले नाही. याची फळे अनेक संघांना दिसू लागली आहेत. क्रिकेटचा प्रवास मर्यादित प्रमाणात का होईना, पण क्लब किंवा फ्रँचायझी क्रिकेटकडे सुरू झाला आहे. विविध परिस्थितींमध्ये खेळण्याचा अनुभव भारत सोडून इतर देशांच्या क्रिकेटपटूंना मुबलक मिळतो. आम्ही स्वत:ला क्रिकेटमधले अभिजन समजतो. त्यामुळे खेळण्याविषयीच्या आमच्या नियम व अटीच अधिक! म्हणून आपण आजही आयपीएललाच अतोनात महत्त्व देतो आणि विशेषत: गोऱ्या मंडळींकडून होणाऱ्या या लीगच्या मतलबी गुणगानाने सुखावतो. परंतु ऑस्ट्रेलियन बिग बॅश लीग कात टाकते आहे. इंग्लंडमध्ये व्हायटॅलिटी ब्लास्ट आणि हंड्रेड असे दोन फ्रँचायझी क्रिकेट पर्याय उपलब्ध आहेत. यूएई आणि दक्षिण आफ्रिकेतील फ्रँचायझी लीगमध्ये तर आपल्याकडील काही फ्रँचायझींची गुंतवणूक आहे. लवकरच अमेरिकन मेजर लीग क्रिकेट लीग सुरू होत आहे. यातून दोन शक्यता संभवतात. एक तर राष्ट्रीय सांघिक क्रिकेटचे महत्त्व कमी होत जाणार आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे, आयपीएलला सशक्त पर्याय उभे राहणार. यातील दुसरी बाब बीसीसीआयला खऱ्या अर्थाने अस्वस्थ करणारी ठरते. तेव्हा आयपीएलचे श्रेष्ठत्व राखणे हे बीसीसीआयचे क्रमांक एकचे प्राधान्य आहे. बाकी विश्वचषक काय येत-जात राहतात. पण आयपीएल निस्तेज झाली, तर बघायचे कुणाकडे?