प्रवीण साहनी, ज्येष्ठ संरक्षणतज्ज्ञ
पश्चिम आशियातील युद्धाचा पहिला टप्पा इराणच्या सरशीचा ठरला, हे एव्हाना स्पष्ट झालेले आहे. पण त्यामुळेच या पहिल्या टप्प्यापेक्षा निराळा असा दुसरा टप्पा कसा असेल याविषयी अंदाज बांधण्यास पुरेसा वाव आहे. पहिल्या टप्प्यात इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवले. तर दुसरा टप्पा हा भू-युद्धाशी (इराणमध्ये किंवा किमान खर्ग बेटावर अमेरिकी सैनिक उतरवण्याच्या योजनेशी) संबंधित आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ हे ‘मोठ्या प्रमाणात अमेरिकी सैनिक इराणमध्ये उतरवण्याची गरज भासणार नाही’ असे म्हणत असताना, तुलनेने कमीच अमेरिकी सैनिक (सुमारे ५,००० मरीन आणि १,५०० हवाई सैनिक) पश्चिम आशियात दाखल झाले आहेत.

त्यांचे हेतू काहीही असले तरी, एकदा भू-युद्ध सुरू झाले आणि समजा त्यातही जीवितहानी वाढू लागली की, अशा परिस्थितीत युद्धाला स्वत:ची अशी एक गती मिळते, जिथे वाढत्या संघर्षावर नियंत्रण ठेवणे कठीण होते. मात्र पुढे काय होणार आहे हे समजून घेण्यासाठी, इराणची युद्धनीती यशस्वी का होते याच्या कारणांकडे पाहणे आवश्यक आहे.

मुळात इराणला, शत्रू काय काय करेल याचा अंदाज बांधता आला होता. ‘एकदा का उच्चपदस्थ नेत्यांना मारले की इराण धार्मिक राजवटीला पाठिंबा/ विरोध आणि वांशिक वैविध्य या कारणांनी विघटित होऊ शकतो; मग राजवट उलथवून लावता येईल’ असे अमेरिकी मनसुबे आणि टिपून हल्ले करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची इस्रायली कार्यपद्धती यांची जाणीव असल्याने, तेहरानने आपल्या लष्करी अधिकार-कक्षांचे विकेंद्रीकरण केले. यातून इराणने स्वत:हून प्रतिहल्ल्याचे आदेश देण्यास सक्षम असलेल्या अनेक ‘प्रतिकार रेषा’ तयार केल्या. उदाहरणार्थ येमेनमधील हुथी, लेबनॉनमधील हिजबुल्ला, सीरिया आणि इराकमधील खासगी सशस्त्र दले (मिलिशिया) इत्यादींसारख्या प्रादेशिक प्रतिनिधींना त्याच्या युद्ध वा प्रतिकाराच्या विविध रेषा म्हणून पाहता येते. त्याचप्रमाणे खुद्द इराणच्या सेनादलांमध्ये, एकाच मुख्यालयाचे आदेश घेण्याची प्रचलित पद्धत बाजूला ठेवून अनेक प्रांतीय कमांडर नेमले गेले. हे कमांडर त्यांच्या लक्ष्यांपुरते जबाबदार असले तरी, ते स्वत:च्या लक्ष्यांच्या यादीचे पुनरावलोकन करून ती अद्ययावत करण्यासाठी इतर प्रादेशिक कमांडरशी समन्वय साधत असत. एकच प्रमुख कमांडर असणे ही सोय एखादे राष्ट्र ‘ऐच्छिक युद्ध’ लढत असताना चांगलीच ठरते हे खरे. पण २८ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च नेत्यासह त्याच्या वरिष्ठ नेतृत्वाची हत्या झाल्यानंतरही इराणने प्रभावीपणे आणि वेगाने प्रतिसाद दिला, याचा अर्थ असा की, इराणची विकेंद्रीकरणाची रणनीती उपयुक्त ठरली. इराणला याची जाणीव आधीपासूनच होती की ते अमेरिका वा इस्रायल या दोघांपैकी एकट्याशी नव्हे तर दोघांशीही लढावे लागणार आहे. अमेरिका पडद्यामागे राहणार की, २८ फेब्रुवारीपासून जसे उघडपणे अमेरिकी अध्यक्ष इराणयुद्धाची भाषा करू लागले तसे करणार, हा तपशिलाचा फरक. धोका दुहेरीच असणार, हे इराणला गृहीत धरावे लागले होते. त्यामुळे इराणसाठी हे अस्तित्वाचे युद्ध होते.
त्यामुळे इराणने महाशक्तिमान अमेरिकेशी युद्धासाठी डावपेचांचा वापर केला आणि अमेरिकेला त्रासदायक ठरतील असे दोन प्रमुख मर्मबिंदू अचूकपणे निवडले. जागतिक आर्थिक परिणाम असलेला मुख्य मर्मबिंदू म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी. या जलमार्गातून जगातील २० टक्के तेल, तसेच वायू, खते, पेट्रोरसायने इत्यादींची वाहतूक होते. याच डावपेचाचा पुढला भाग म्हणजे १२ टक्के तेलाची वाहतूक करणार्‍या बाब-अल-मंदेबची सामुद्रधुनी
हुथींकडून बंद केली जाऊ शकते. दुसरा केंद्रबिंदू म्हणजे सहा आखाती सहकार्य परिषद राष्ट्रांमधील (बहारीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती) अमेरिकेचे तळ. इराणने युद्धापूर्वीच हे स्पष्ट केले होते की, जर अमेरिकेने इराणवर हल्ला केला, तर ते योग्य प्रत्युत्तर म्हणून या प्रदेशातील त्यांच्या तळांवर हल्ला करेल.

इराणच्या युद्धनीतीचा आणखी एक घटक म्हणजे त्यांनी, युद्धक्षेत्रात क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या बाबतीत वर्चस्व मिळवणेही साध्य केले. इराण आणि इस्रायलमधील अंतर १,००० किमीपेक्षा जास्त असल्याने, तसेच अमेरिका व इस्रायलच्या लढाऊ विमानांच्या तंत्रज्ञानाशी इराण बरोबरी करू शकत नसल्याने, त्यांनी अत्याधुनिक क्षेपणास्त्रांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले. ही क्षेपणास्त्रे पृथ्वीपासून १०० किमी उंचीवर, अवकाशाजवळच्या वातावरणाच्या उच्च थरात अतिशय वेगाने प्रवास करतात. या प्रगत क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या बाबतीत इराणला चीन आणि रशियाकडून प्रचंड मदत मिळू शकली; या दोन देशांकडे अमेरिकेपेक्षा श्रेष्ठ प्रगत क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आहे.

याखेरीज इराणने गेल्या काही दशकांमध्ये भूमिगत क्षेपणास्त्र संकुले आणि नियंत्रण केंद्रे उभारली, जिथे अमेरिकेचे प्रगत ‘बंकर भेदक बॉम्ब’ पोहोचू शकत नव्हते. इराणी ड्रोनचा साठा या संकुलांत आहे आणि क्षेपणास्त्रेही भूमिगत मोबाइल लाँचरमधून डागली जातात. दीर्घकाळ चालणारे युद्ध लढण्यासाठी त्यांनी क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या भूमिगत स्वदेशी उत्पादन सुविधाही उभारल्या आहेत. नौदल युद्धाच्या बाबतीत, पर्शियन आखातातील उथळ पाणी (खोली २०० मीटर) लक्षात घेऊन इराणने पाण्याखालील युद्धावर लक्ष केंद्रित केले. यामध्ये केवळ पाणसुरुंग नव्हे, तर विविध प्रकारच्या सुरुंगांसारख्या क्षमता असलेले पाण्याखालील बोगदे, मिजेट (अतिशय लहान) पाणबुड्या, वेगवान नौका आणि समुद्राखालून डागता येणारी जहाजविरोधी क्रूझ क्षेपणास्त्रे यांचा समावेश होता.

महत्त्वाचे म्हणजे, इराणला चीनच्या बायडू-३ उपग्रह समूहाची मदत मिळते. हे चिनी तंत्रज्ञान अमेरिकेच्या ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) पेक्षा प्रगत आहे. बायडू-३ ही तीन कक्षांमधील (मध्यम पृथ्वी कक्षा, कललेली भू-संकालिक कक्षा आणि भू-संकालिक कक्षा) संकरित रचना आहे, तिला पुन्हा पृथ्वीजवळच्या कक्षेतील याओगॉन संवर्धक उपग्रह प्रणालीची जोड दिली जाते. यामुळे आशिया-पॅसिफिक प्रदेशावर लक्ष केंद्रित करून २४ तास दृश्यमानता मिळवणे आणि जमिनीवरील वा हवेतील अमेरिकन जॅमर्सकडून होणार्‍या जॅमिंगची चिंता न करता अचूक हल्ले करणे इराणलाही शक्य होत आहे.

हेच तर एकविसाव्या शतकातील युद्ध… इथे अंतराळातील क्षमता, जॅमिंग टाळण्यासाठी विद्युतचुंबकीय वर्णपटावर नियंत्रण आणि सायबर सुरक्षा यांचा समावेश असावाच लागतो. अर्थातच या जोडीने आज पाण्याखालील युद्ध आणि प्रगत क्षेपणास्त्रे; अधिक उंच (२० किमी ते १०० किमी उंचीपर्यंत) जाणारे ड्रोन तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता यांचाही वापर होतो आहेच.

अमेरिकेच्या लष्कराकडे ड्रोनऐवजी मोठमोठी विमानवाहू जहाजे, युद्धनौका, अत्याधुनिक लढाऊ विमाने आणि प्रगत क्षेपणास्त्रे यांसारखी विसाव्या शतकातील अनेक साधने आहेत. पण याऐवजी ड्रोन अथवा प्रगत क्षेपणास्त्रांचे उत्पादन कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर करता येते, अचूकपणे लांब अंतरावर मारा करता येतो. इराणच्या क्षेपणास्त्रांनी नुकसान झालेली अमेरिकेची दोन विमानवाहू जहाजे युद्धभूमीतून बाहेर पडल्याचे वृत्त यासंदर्भात लक्षवेधक आहे. इराणने या टापूत अमेरिकेने जमिनीवर उभारलेल्या बहुतेक रडार यंत्रणा नष्ट केल्या आहेत. सौदी अरेबियाच्या हवाई तळावर उभे असलेले एक हवाई रडार आणि तीन इंधन भरणारी विमानेही इराणने नष्ट केली. जमिनीवरील कारवाईसाठी रवाना होण्याची वाट पाहात कुवेतमध्ये असलेले काही अमेरिकी सैनिक (मरीन) इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यात ठार झाले आहेत.

जेव्हा अमेरिका इराणविरुद्ध आपली भू-कारवाई सुरू करेल, तेव्हा भविष्यात काय घडू शकते याचीही ही एक झलक आहे. चिनी बायडू उपग्रह समूहाकडून जर इराणच्या क्षेपणास्त्रांना आणि ड्रोनना मदत मिळते आहे, तर ती जमिनीवरील मार्‍याच्या वेळीही मिळू शकते. वस्तुस्थिती ही आहे की अमेरिकेसमोर कठीण काळ आहे. सौम्य शब्दात सांगायचे झाल्यास, अमेरिका एका संकटातून दुसर्‍या संकटात उडी घेत आहे.

pravin@forceindia.net