‘दुहेरी ‘धर्म’संकट!’ हा अग्रलेख वाचला. डोनाल्ड ट्रम्प यांनी निव्वळ राजकीय, आर्थिक आणि लष्करी ताकदीच्या जोरावर घेतलेल्या निर्णयांचे दुष्परिणाम जगभरात दिसून येत आहेत. त्यामुळे अमेरिकेतील देशांतर्गत विरोधाबरोबरच जगभरातही ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्या अभद्र युतीविरोधाला एक प्रकारे नैतिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे.

इराणने हेच ध्यानात घेऊन आखाती प्रदेशातील अमेरिकी तळ असलेल्या देशांवर जोरदार हल्लाबोल केला. इराण शियाबहुल असल्यामुळे जगभरातील सुन्नी पंथाची मुस्लीम राष्ट्रे इराणविरुद्ध तटस्थ राहताना दिसतात. तसेच इराणला थेट विरोध केल्यास देशांतर्गत बंडखोरी होण्याचा धोकाही मुस्लीमबहुल देशांना भेडसावतो.

एकंदरीत इकडे आड, तिकडे विहीर अशी परिस्थिती असताना अफगाण युद्ध आणि बलुचिस्तानातील बंडखोरीने ग्रासलेल्या पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी आधारासाठी ट्रम्प यांची तळी उचलून प्रादेशिक तिढा वाढवला आहे. त्याच जोरावर उद्या ते आपल्यावरही डोळे वटारण्यास कमी करणार नाहीत. म्हणूनच आपल्या केंद्रीय नेतृत्वालाही आता निव्वळ भावनिक वक्तव्यांपलीकडे जाऊन ठोस भूमिका घेण्याची वेळ आली आहे. या युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ‘तोकडी तटस्थता’ आता आपल्याला महागात पडू शकते. – एम. एस. नकुल

शड्डू ठोकून उभे राहणे महत्त्वाचेच!

‘दुहेरी ‘धर्म’संकट!’ हे संपादकीय (२५ मार्च) वाचले. इराणची संभावना ‘एक दरिद्री देश’ अशी करणे खटकले. अमेरिकेसारखा अजस्र सामर्थ्य असलेला देश जर शस्त्रसंधीसाठी हात पुढे करीत असेल तर तो झिडकारणे योग्य नाही, हे मतही पटले नाही. कितीही झाले तरी इराण हा एके काळचा आपला चांगला मित्र होता आणि त्याचे यथायोग्य मूल्यमापन ‘लोकसत्ता’ने याआधीही केले आहे. मुस्लीम देशांविरुद्ध जात एके काळी आपल्या बाजूने राहणारा, आपल्या चलनावर आपल्याला तेलपुरवठा करणारा आपला मित्र कंगाल झाला तरी त्याचा असा उल्लेख करणे पटत नाही.

पाकिस्तानी भूमीत शस्त्रसंधीची चर्चा होणे ही एक तर अमेरिकेची आपल्याला खिजवण्यासाठी केलेली खेळी असू शकते किंवा सध्याच्या परिस्थितीत ज्या पद्धतीने आपण आपली विदेशनीतीची उच्च मूल्ये पायदळी तुडवत चाललो आहोत त्याची परिणती असू शकते. या युद्धात कोण जिंकले, कोण हरले यापेक्षाही इराणसारखा एक देश स्वत:च्या अस्मितेसाठी कोणाच्याही उघड मदतीशिवाय, स्वतंत्रपणे अमेरिकेसारख्या देशासमोर शड्डू ठोकून उभा राहतो, हे महत्त्वाचे आहे. आपली आर्थिक स्थिती आणि अमेरिकेसमोर लाचारीचे वेगळे वर्णन करण्याची गरज नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी युद्धबंदी आपणच घडवून आणली, असे ट्रम्प आजही सांगतात आणि आपले सरकार चकार शब्दही काढत नाही. त्यापेक्षा इराणने शस्त्रसंधी फेटाळत क्षेपणास्त्र हल्ले सुरूच ठेवले हे योग्यच केले. – ॲड. एम. आर. सबनीस, अंधेरी (मुंबई).

युद्ध न थांबवताच थांबण्याची चिन्हे

‘दुहेरी ‘धर्म’संकट!’ हा अग्रलेख वाचला. लादलेल्या युद्धात गनिमी काव्याने लढण्याखेरीज इराणकडे कोणता पर्याय होता? जिथे जागतिक महासत्ता इत्यादी स्वयंघोषित विशेषणे लावणार्‍यांची तोंडे शिवली गेली होती तेथे इराणने हे युद्ध निकराने व आत्मसन्मानाने लढवले, त्याबद्दल त्यांचे कौतुक. शस्त्रसंधीच्या ज्या अटी- शर्ती समोर येत आहेत त्या कोणतीही बाजू स्वीकारेल असे वाटत नाही, कारण त्यात अंर्तभूत मानहानी. पण हे युद्ध सुरू ठेवण्यात कोणाचेही हित नाही हे ट्रम्प यांच्याही लक्षात आले ते बरेच झाले.

औपचारिक शस्त्रसंधी न होताही युद्धविराम झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. कोरिया, येमेनमधील युद्ध व इराण-इराक युद्ध अंशत: याच प्रकारात मोडतात. त्यामुळे कदाचित हे युद्धही न संपताच संपल्यात जमा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. बाजारातही तोच रोख दिसतो. राहता राहिली गोष्ट पाकिस्तानच्या लांगूलचालनाची; ‘हाऊडी मोदी’, ‘वॉर रुकवादी पापा’ इ. प्रकार किती क्षणभंगुर व निरर्थक असतात याची कल्पना आपल्याला आज आलेली आहेच. त्यामुळे त्याबद्दल फार काळजी नसावी.

पाकिस्तान यापूर्वीही अमेरिकेच्या गळ्यातला मणी होताच, पण आंतरराष्ट्रीय संबंधांत गरज सरो आणि वैद्य मरो असे नेहमीच होताना दिसते. दिल्लीतही बर्‍याच जणांनी या युद्धामुळे ओढवलेल्या संकटातून सुटका होण्याची चिन्हे दृष्टिपथात आल्याने सुटकेचा नि:श्वास टाकलाच असेल. आता विविध राज्यांत होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये छप्पन्न इंची छाती पुन्हा एकदा फुगलेली दिसेलच. – ललित अंबळकार.

ट्रम्प यांच्यावर विश्वास कोण ठेवणार?

‘दुहेरी ‘धर्म’संकट!’ हा अग्रलेख वाचला. ट्रम्प यांनी एकतर्फी युद्धविराम जाहीर करण्याच्या बरोबर १५ मिनिटे आधी अमेरिकी वायदेबाजारात तेल, जहाज कंपन्या इत्यादींशी संबंधित फ्यूचर्स या प्रकारांमध्ये मोठे व्यवहार झाल्याची वृत्ते आहेत. मागेदेखील ट्रम्प यांनी निरनिराळ्या देशांवर आयात शुल्क लादण्याची घोषणा करण्यापूर्वीच्या काही मिनिटांमध्ये असाच प्रकार घडला आहे. सत्तेत आल्यानंतर विविध देशांना अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून भेटी देताना ट्रम्प यांनी आपल्या खासगी व्यवसायाशी संबंधित व्यवहारही बिनदिक्कतपणे केल्याची वृत्ते होती. गाझा पट्टीत युद्धगुन्हेगार नेतान्याहूंचा नृशंस नरसंहार सुरू असताना लवकरच गाझा ताब्यात घेऊन आपण त्याचे खासगी नंदनवन कसे करू इच्छितो हे त्यांनी एका एआय व्हिडीओतून उघड केले होतेच.

ट्रम्प हे इतर बाबतीत अपरिपक्व असले तरी नफा-तोट्याची भाषा उत्तम जाणतात. त्यात सकाळचे बोल संध्याकाळी फिरवण्याचा त्यांचा खाक्या. त्यांच्यावर कितपत विश्वास ठेवावा या विचाराने शस्त्रसंधीला इराण प्रतिसाद देत नसेल तर ते योग्यच. पाच दिवसांच्या युद्धविरामाची मुदत पुढील तयारीसाठी वापरून ट्रम्प तिन्ही लष्करी दलांचा ‘ब्लिट्झक्रीग’ सुरू करणार नाहीत याची काय खात्री? राहता राहिला विषय पाकिस्तानचा तर तो देश चाखत असलेली फळे आपल्याच धोरणांधळेपणाच्या झाडाला लागलेली आहेत. जागतिक सुरक्षा परिषदेत तब्बल १८२ देशांची मते घेऊन त्यास मिळालेले अध्यक्षपदही त्यातलेच एक फळ. आताही आपल्याच फुशारकीत मग्न राहिलो तर पुढे मनगटे चावण्यापलीकडे आपण काहीही करू शकणार नाही यात संशय नाही. – हरिश्चंद्र भोसले.

आणखी एक मित्रपक्ष गिळण्याची तयारी?

‘सातारचा सापळा’ हा ‘अन्वयार्थ’ वाचला. ६० वर्षे जुना पक्ष चार वर्षांपूर्वी मूळ पक्षाच्या नेतृत्वाला गुंगारा देऊन भाजप नेत्यांच्या दावणीला बांधला गेला. त्या पक्षाचे नेते, आमदार, नगरसेवक स्वत:च्या कळपात आणण्यात आले. मूळ पक्षाला खिंडार पाडून त्याचे तीनतेरा वाजवले गेले. त्या पक्षाच्या नेतृत्वाला नामोहरम करण्यासाठी दिल्लीश्वरांपुढे लोटांगण घातले गेले. पक्षाला घटनात्मक पाया किंवा आधार नसताना केवळ सत्ताधारी पक्षाची पाठराखण करणारा म्हणून न्यायालयीन युक्तिवादात तारून नेले गेले.

आज हे सारे करणार्‍यांनी त्याच सत्ताधारी पक्षावर आरोप करणे हे कोणत्या तत्त्वात बसते? शिंदे गटाने केलेले आरोप निरर्थक ठरतात. जे कल्याण डोंबिवलीत केले त्याचे पुरेपूर उट्टे नवी मुंबईत व आता सातार्‍यात काढताना शिंदे गटाच्या आमदाराच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाप ओढण्याचे काम भाजप नेत्यांनी केले आहे. ॲनाकोंडा आणखीन एक मित्रपक्ष गिळण्याच्या तयारीत आहे. – नंदकिशोर भाटकर, गिरगाव (मुंबई).

सत्ता हाच धर्म मानल्याचे परिणाम

‘सातारचा सापळा!’ हा ‘अन्वयार्थ’ (लोकसत्ता- २५ मार्च) वाचला. एकदा सत्ता हाच धर्म मानल्यानंतर लोकशाही धर्म बाजूला पडतो आणि येनकेनप्रकारेण सत्ता मिळवली जाते. जवळचा कोण लांबचा कोण हा विचार मागे पडतो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला. त्यानंतर भाजपचे हिंदुत्व आणि आपले हिंदुत्व वेगळे आहे याची जाणीव त्यांना झाली. त्या वेळी शिंदे गटाला मात्र आपले आणि भाजपचे हिंदुत्व एक आहे याची जाणीव झाली आणि या गटाने भाजपची सत्ता बळकट केली.

आज तोच प्रयोग शिंदे गटावर झाल्यानंतर त्यांना काय करावे ते समजत नाही. त्यांच्याच मंत्रिमंडळातील एक मंत्री म्हणाले गेल्या ४० वर्षात मी असा अनुभव घेतला नव्हता. लोकशाही गेल्यानंतर अनेकांना अनेक अनुभव येतील. तेव्हा लोकशाही वाचवणे हेच प्रत्येक राजकीय पक्षाचे आणि प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य असले पाहिजे. धर्माच्या नावाखाली आणि जातीच्या नावाखाली लोकशाहीचा शेवट करणे योग्य ठरणार नाही. – युगानंद साळवे, पुणे</strong>.