‘जेन झी’ पिढीची सर्वाधिक वाचली जाणारी आयरिश लेखिका सॅली रूनी हिच्या सर्व खूपविक्या पुस्तक विक्रीवर ब्रिटनमध्ये निर्बंध आणण्याची शक्यता तेथील न्यायालयाने गुरुवारी वर्तवली. कारण हेच की गाझामधील हत्याकांडाला विरोध करणाऱ्या ‘पॅलेस्टाइन अॅक्शन’ संघटनेला तिचा जाहीर पाठिंबा. सप्टेंबर महिन्यात या कारणावरून एका पुरस्कार सोहळ्यात तिच्या अटकेची अटकळ बांधली गेली होती. आता पुस्तक विक्रीतून लेखिकेला मिळणारी फायद्याची रक्कम ही थेट दहशतवादाला पाठिंबा असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले. ब्रिटनमध्ये नवी कादंबरी प्रकाशित करू शकत नसल्याचेही न्यायालयाने बजावले. ‘आयरिश टाइम्स’ने तिच्या हवाल्याने दिलेले ताजे वृत्त. याशिवाय तिच्या लोकप्रियतेचा शोध वाचकांपर्यंत पोहोचविणारा थोडा जुना निबंध.
कादंबरीकाराचा ‘नवा लढा’
कार्ल ओव्ह कनौसगार्ड हा नॉर्वेमधील लेखक ‘माय स्ट्रगल’ या आत्मकथा असलेल्या कादंबऱ्यांनी गेल्या दशकात इंग्रजी अनुवादाद्वारे गाजू लागला. रोजच्या व्यवहारातील सारेच तपशील कादंबऱ्यांमध्ये ओतूनदेखील त्याच्याकडे लिहिण्याचा ऐवज पुष्कळ उरलाय. त्याचे एकविसावे पुस्तक ‘द स्कूल ऑफ नाइट’ महिन्याच्या सुरुवातीला भाषांतर होऊन इंग्रजीत दाखल झालेय. सध्या आपल्या (पुस्तकांची संपादक असलेल्या) तिसऱ्या बायकोसह लंडनमध्ये राहत असलेल्या या कादंबरीकाराचा लिहिण्याचा आणि आयुष्याचा ‘लढा’ पकडणारी ही ताजी मुुलाखत. याशिवाय अमेरिकेतील प्रवासाबद्दल ‘माय सागा’ या दशकापूर्वी गाजलेल्या प्रवासलेखाचा एक भाग.
https://tinyurl.com/4z9 xw2kp
https://tinyurl.com/ms9uhbyu
गायिका आणि मुलाखत
डुआ लिपा ही ब्रिटिश गायिका ‘सर्व्हिस नाइण्टी फाइव्ह बुक क्लब’ काढल्यानंतर तिच्या गाण्यांइतकीच पुस्तक-वाचन प्रसारात सर्वाधिक सक्रिय झालेली दिसते. याच शीर्षकाच्या संकेतस्थळावर जाऊन पाहिले, तर त्याची खात्री होईल. बुकर मिळविणाऱ्या डेव्हिड सलॉय याला पुरस्कार मिळाला दोन आठवड्यापूर्वी. त्याची मुलाखत तिने महिन्यापूर्वी घेतलेली दिसते. नव्या-जुन्या उत्तमोत्तम पुस्तकासमवेत छायाचित्रांचा तिचा सोस वाढत चालला आहे. ‘बुक क्लब’ या संकल्पनेला फॅड म्हटले तरी चालेल, पण चाहत्यांच्या एका पिढीसमोर वाचनाचे महत्त्व पटवून देण्याची कामगिरी त्यातून होतेय. ते नाकारता येत नाही. ताजी मुलाखत मार्गारेट अॅटवूड यांच्या नव्या आत्मचरित्रानिमित्ताने घेतलेली, लाखाच्या जवळपास पाहिली गेलेली. दुसरी डेव्हिड सलॉय यांची. पण यासह आणखीदेखील मुलाखती सापडतीलच.
https://tinyurl.com/4eyd7nyw https://tinyurl.com/36byfses
