राजकीय विचारधारा उजवी असो वा डावी- स्वत:चेच म्हणणे दामटणार्या दोन्हीकडील नेत्यांना, स्वत:ला हवे तेच प्रश्न विचारणार्या मुलाखती फार प्रिय. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्या मंत्रिमंडळातील बेन ग्विर यांनी ‘दररोज किमान ३० ते ४० (पॅलेस्टिनी) माणसे मारा… ते लोक जगण्याच्या लायकीचे नाहीत’ हे वक्तव्य ज्या मुलाखतीत केले, ती रोम ब्रास्लाव्हस्की यांच्या पॉडकास्टवर प्रसारित झाली. हमास’ने ऑक्टोबर २०२३ मध्ये इस्रायलवर हल्ला करून ज्या नागरिकांना ओलीस ठेवले आणि नंतरच्या काळात ज्या काहींची सुटका केली, त्यांपैकी ब्रास्लाव्हस्की हे एक. अतिउजवे ग्विर यांची स्फोटक विधाने करण्यात ख्याती आहे. ‘संपूर्ण गाझा आपलेच आहे, असे मी मानतो. प्रत्येक दहशतवाद्याला मारलेच पाहिजे,’ अशीही पुस्ती त्यांनी जोडली. बेन ग्विर हे २०२२ पासून इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री आहेत. यापूर्वीही,‘संपूर्ण लेबनॉन जळून खाक झाले पाहिजे,’ असे वक्तव्य त्यांनी जून महिन्यात केले. ‘प्रत्येक इस्रायली मातेच्या अश्रूंच्या बदल्यात लेबनॉनमधील हजारो मातांचे अश्रू गळाले पाहिजेत,’ असे ते म्हणाले. नेतान्याहू यांना खासगी बैठकीतही असेच संदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. याखेरीज, ‘अरबांच्या स्वातंत्र्यापेक्षा ‘वेस्ट बँक’मधील रस्त्यावर फिरण्याचा माझा, माझ्या पत्नीचा, माझ्या मुलांचा हक्क अधिक महत्त्वाचा ,’ असे ते ऑगस्ट २०२३ मध्ये म्हणाले. यातून इस्रायलची मानसिकता स्पष्ट होते.
ऑक्टोबर २०२३ मध्ये ‘हमास’ने हल्ला केल्यानंतर जागतिक सहानुभूती इस्रायलला मिळाली. मात्र इस्रायलने ‘हमास’वर जे नरसंहारी प्रतिहल्ले केले आणि गाझा पट्टीच नष्ट करण्याचा जो चंग बांधला, त्यामुळे मात्र इस्रायलविरोधात वातावरण तयार झाले. अमेरिकेने इस्रायलला वेळीच आवरावे, अशीही भावना अधोरेखित झाली. या आंतरराष्ट्रीय दबावानंतर दोन वर्षांनी, २०२५ मध्ये गाझामधील संघर्ष अधिकृतरीत्या थांबवण्यासाठी अमेरिकेच्या पुढाकाराने गाझा पट्टीत शस्त्रसंधी झाला. प्रत्यक्षात यानंतरही छोट्या-मोठ्या चकमकी होत आहेत. त्यातही बालके, महिलांसह अनेकांचा मृत्यू झाला आहे. ‘हमास’च्या संपूर्ण नि:शस्त्रीकरणाशिवाय गाझामधून माघार नाही, अशी इस्रायलची सध्याची भूमिका आहे. याउलट, करारात नमूद केल्याप्रमाणे इस्रायलने गाझातून माघारी जावे, मग आम्ही नि:शस्त्र होऊ, अशी ‘हमास’ची भूमिका आहे. हे होणे अशक्यच. उलट इस्रायलची आक्रमक भूमिका इराणविरोधातील लढाईतही दिसली. अमेरिका-इराणमध्ये जो शस्त्रसंधी करार झाला, त्यात इस्रायल सहभागी नाही. इस्रायलच्या हेजबोलाविरोधातील हल्ल्यांमुळे अमेरिकेबरोबर इराणने केलेल्या कराराला अर्थ राहिलेला नाही. यात अमेरिकेचीही नाचक्की झाली. मात्र, इतके होऊनही इस्रायलची जहाल आणि शत्रूसाठीची विनाशकारी युद्धनीती बेन ग्विर यांच्यासारख्या नेत्याने उधळलेल्या मुक्ताफळांतून आजही कायम असल्याचे दिसते. ही संहारक नीती कुठून येते?
‘सेकंड स्ट्राइक’ ही लष्करी संकल्पना आण्विक हल्ल्याशी संबंधित असली, तरी इस्रायलच्या गाझासंदर्भातील धोरणाने या संकल्पनेची आठवण होते. एखाद्या देशावर अणुहल्ला झाला, तर त्यातून वाचून शत्रूवर विनाशकारी हल्ला करणे म्हणजे ‘सेकंड स्ट्राइक’. ‘हमास’ने इस्रायलवर ऑक्टोबर २०२३ मध्ये केलेला हल्ला हा अणुहल्ला नसला तरी, त्यानंतर इस्रायलने गाझावर जे हल्ले चढवले आणि जो विनाश केला, तो ‘सेकंड स्ट्राइक’ या संकल्पनेशी मिळताजुळता आहे. त्यामुळेच इस्रायलच्या या विनाशकारी धोरणाबाबत अमेरिकेसह, युरोप आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतील कायम सदस्यांनी निर्णय घेणे आवश्यक आहे. अन्यथा असाच पायंडा इतरत्र पडण्याचा धोका आहे.
बेन ग्विर यांचा पक्ष नरसंहारी नेतान्याहूंना पाठिंबा देतो. त्यामुळे ग्विर यांचे जहरी वक्तव्य इस्रायलमध्ये होऊ घातलेल्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केल्यासारखे वाटू शकते. मात्र, त्यांनी अशाच प्रकारची वक्तव्ये गेल्या काही वर्षांत केली असल्याने या वक्तव्यांचा संबंध केवळ निवडणुकीशी जोडणे चुकीचे ठरेल. त्याऐवजी यामागील वृत्तीचाही शोध घ्यावा लागेल. त्यामुळे ग्विर यांच्या वक्तव्यांचा संबंध जोडायचाच तर तो ‘इस्रायलही वंशविच्छेद करू पाहाणार्यांइतकाच संहारक होऊ शकतो’ या (जन्माने ज्यू) विचारवंत हॅना आरेण्ट या १९६३ मध्येच दिलेल्या इशार्याशी- आणि त्याच ओघात आरेण्ट यांनी वापरलेल्या ‘रोजचेच वाटणारे क्रौर्य’ (बनालिटी ऑफ एव्हिल) या संकल्पनेशी जोडावा लागेल. ही दैनंदिन क्रौर्याची नरसंहारी वृत्ती कोणत्या धर्माची, हा भाग नतरचा.
