एकविसाव्या शतकाचा एकचतुर्थांश काळ सरलेला आहे, शतकाचा इतिहास लिहिण्यासाठी अजून ७४ वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. तरीही या २५-२६ वर्षांवर बरा-वाईट प्रभाव टाकणार्या घटनांची नोंद केली जाईल तेव्हा त्यात इस्रायलने गाझामध्ये घडवलेल्या नरसंहाराचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. या संहाराच्या विरोधात जगभरात निषेध, मोर्चे काढण्यात आलेच. त्याच्या जोडीला सक्रिय अभ्यासक- विचारवंतांनी विचारमंथन करून अनेक मुद्दे पुन्हा पुन्हा विविध व्यासपीठांवर, भिन्नभिन्न वाचक- श्रोत्यांसमोर मांडले. प्रा. ओमर बार्टोव्ह लिखित ‘इस्रायल – व्हॉट वेन्ट राँग’ हे पुस्तक या वैचारिक चळवळीतील महत्त्वाचा दुवा म्हणता येईल. गाझामधील इस्रायलची कारवाई वंशसंहाराच्या दिशेने जात आहे, असा इशारा देणार्या सुरुवातीच्या अभ्यासकांपैकी बार्टोव्ह हेही होते.
गाझातील भयंकर नरसंहारामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले. मनुष्यहानी रोखण्यात आधुनिक जगाला येणारे अपयश, हिंसाचाराकडे सोयीस्कर डोळेझाक करण्याची वाढती प्रवृत्ती यासारख्या विविध मुद्द्यांवर चिंतन, चर्चा होऊ लागली. त्यातूनच ‘इस्रायल – व्हॉट वेन्ट राँग’ या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. लेखक ओमर बार्टोव्ह हे ब्राऊन विद्यापीठाचे प्राध्यापक असून युद्ध, होलोकॉस्ट (ज्यूंचा वंशसंहार) आणि वंशसंहार या विषयांचे तज्ज्ञ आहेत. त्यांनी जुलै २०२५ मध्ये ‘नेव्हर अगेन – आय ॲम ए जेनोसाइड स्कॉलर. आय नो इट व्हेन आय सी इट,’ हा निबंध प्रसिद्ध केला. इस्रायलने गाझावर केलेल्या कारवाईला वंशसंहारच का म्हणायचे, याचे त्यामध्ये त्यांनी विस्तृत विवेचन केले. तो निबंध या पुस्तकाची सुरुवात म्हणता येईल. पण हे पुस्तक केवळ २०२३च्या घडामोडींचे वर्णन नाही. तर त्या मुद्द्यावर केलेले विचारमंथन, चर्चा, संभाषणे, मुलाखती, लेखन, प्रत्यक्ष भेटी या सर्वांचा परिपाक म्हणजे हे पुस्तक आहे. यानिमित्ताने केवळ सुजाणच नव्हे तर सामान्य पण सहृदय व्यक्तीलाही पडणारे प्रश्न बार्टोव्ह यांनी उपस्थित केले आहेत. युद्ध आणि नरसंहार, युरोपचा इतिहास व होलोकॉस्ट आणि इस्रायल-पॅलेस्टाइनचा इतिहास या विषयांवर अनेक दशकांपासून केलेला अभ्यास, अध्यापन आणि लेखन याच्या आधारावर हे पुस्तक लिहिल्याचे लेखक सांगतात. मुखपृष्ठावरील ‘इस्रायल’ हे नाव आडवे दुभंगले आहे. त्यातून त्यांना इस्रायलच्या उद्दिष्टांची दुफळी झाल्याचे बहुधा दर्शवायचे असावे.
यहुदी राष्ट्रवादाच्या (झिओनिझम) वैचारिक आणि क्रियात्मक स्थित्यंतराचा शोध घेणे हा या पुस्तकाचा उद्देश असल्याचे लेखकाने अगदी सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे. झिओनिझम ही यहुदींशी म्हणजेच ज्यू वंशाशी संबंधित संज्ञा आहे. ज्यूंची मूळ भूमी असलेल्या पॅलेस्टाइन प्रदेशात स्वायत्त ज्यू राष्ट्राची उभारणी करण्याच्या आणि त्याचे समर्थन करण्याच्या उद्देशाने १९व्या शतकात उदयाला आलेली राष्ट्रवादी आणि राजकीय चळवळ अशी झिओनिझमची व्याख्या केली जाते. भेदभाव, छळ आणि स्वत:चे राष्ट्रच नसल्याच्या संकटाला सामोरे जाणार्या ज्यूंसाठी ऐतिहासिक पॅलेस्टाइनमध्ये मातृभूमीची निर्मिती हे झिओनिझमचे उद्दिष्ट होते. युरोपात सतराव्या आणि अठराव्या शतकात झालेले प्रबोधन, त्यानंतर वैज्ञानिक मानसिकता वाढीला लागून झालेली औद्योगिक क्रांती व पाठोपाठ उदयाला आलेला राष्ट्रवाद यामुळे युरोपातील ज्यूंमध्ये जे परिवर्तन झाले त्याचेच झिओनिझम हे अपत्य असल्याचे विश्लेषण बार्टोव्ह यांनी केले आहे.
झिओनिझमचेही उदारमतवादी, कामगार, धार्मिक, पुराणमतवादी (रिव्हिजनिस्ट) इत्यादी प्रकार पडले आहेत. पुराणमतवादी झिओनिझममधूनच सध्याच्या सत्ताधारी उजव्या विचारसरणीच्या लिकूड पक्षाचा उदय झाला. या पक्षाच्या सध्याच्या धोरणांमुळे पॅलेस्टिनींचे अधिकार, शांतता प्रक्रिया आणि इस्रायलची उदारमतवादी लोकशाही कमकुवत होत आहे, असे टीकाकारांचे म्हणणे आहे आणि या टीकाकारांत ओमर बार्टोव्ह यांचाही समावेश आहे. त्यांच्यासह अन्य काही अभ्यासकांचे म्हणणे आहे की, इस्रायलचे विद्यमान नेतृत्व झिओनिझममधील मानवाधिकार व समानतेच्या आदर्शांपासून दूर गेले आहे. सत्ताधारी आणि त्यांच्या समर्थक विद्वानांना अर्थातच ही टीका मान्य नाही.
हिटलरने केलेल्या सामूहिक छळानंतर अनेक दशकांपासून ज्यू धर्मीय आणि पर्यायाने इस्रायलला भारतासह जगभरातून सहानुभूती मिळाली. इस्रायलकडून त्याचा गैरफायदा घेतला जात असल्याची टीकाही वारंवार होत राहिली, पण गाझा युद्ध होईपर्यंत जगभरातील सर्वसामान्य नागरिकांनी त्याची म्हणावी तशी दखल घेतली नव्हती. आता ती घेतली जात असावी असे मानण्यास जागा आहे. ज्या समुदायाने जर्मनीतच नव्हे तर नाझीवादाचा प्रादुर्भाव झालेल्या पोलंड आणि पूर्व युरोपातील अन्य देशांमध्ये अनन्वित अत्याचार सहन केले, तो इस्रायली समुदाय इतरांवर अत्याचार करण्यास का उद्युक्त झाला? इतरांवरील अत्याचाराचे समर्थन तो का करतो? अकारण हिंसा त्याला आवश्यक का वाटू लागली? की हे सर्व काही घडत आहे, याची त्यांना जाणीव होणेच थांबले आहे का, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करताना लेखक लिहितात, ‘गाझा युद्ध सुरू होण्यापूर्वी मी इस्रायलला वर्षातून किमान तीन वेळा तरी भेट देत असे. अनेक अर्थांनी ते माझे घर आणि माझी मातृभूमी आहे. पण ही जागा आता मला वेगळी, अनोळखी आणि भीतीदायक वाटते. येथील लोकांत अपरिवर्तनीय परिवर्तन झाले आहे. हा देश धक्के बसत असल्याच्या जाणिवा आणि मानसिक आघाताच्या सापळ्यात अडकला आहे. आपल्या नावावर गुन्हे केले जात आहेत हेच ते नाकारत आहेत. तसे नसते, तर आपल्याला (नागरिकांना) पुढे करून ज्या भयंकर गोष्टी केल्या जात आहेत, त्याची त्यांना जाणीव झाली असती.’ दुष्प्रचारामुळे इस्रायलींची विवेकबुद्धी दडपली जात असल्याचेही लेखकाने पुढे मांडले आहे.
महायुद्धामुळे ज्यूंनी सहन केलेल्या यातनाही लेखकाने स्वअनुभवातून व्यक्त केल्या आहेत. ते लिहितात, ‘महायुद्ध संपेपर्यंत अनेक ज्यू कुटुंबे एक तर नष्ट झाली होती किंवा कुटुंबातील अनेक सदस्य गमावल्यामुळे विखंडित अवस्थेत होती. वंशसंहारातून वाचलेल्या आणि आप्तेष्ट गमावलेल्या ज्यूंचे दु:ख अपार होते, शब्दातीत होते. या कुटुंबांमध्ये नुकसान आणि शोकाची भावना व्यापून राहिली होती. यातून वाचलेल्या आणि पुढे इस्रायलमध्ये स्थायिक होण्यासाठी गेलेल्या ज्यूंना तुम्ही तुमच्या समुदायाच्या पुनरुत्थानाची पहिली पिढी आहात, असे सांगितले गेले.’ त्यामुळे इस्रायलमधील आमचे अस्तित्व आणि भविष्य याबद्दल आम्ही कधीच प्रश्न उपस्थित केला नाही, असे बार्टोव्ह नमूद करतात. ‘तरीही, कालांतराने आमच्या सभोवतालच्या पॅलेस्टिनी संस्कृतीच्या विनाशाच्या खुणा हळूहळू नष्ट केल्या गेल्या किंवा झाकल्या गेल्या, तसतशी आमच्यापैकी काहींना अधिकाधिक जाणीव होऊ लागली की आमचे हे पुनरुत्थान दुसर्या एका समुदायाच्या विनाशाच्या किंवा महाभयंकर संकटाच्या पायावर उभे होते. यातूनच अपराधीपणाची भावना, पश्चात्ताप, वास्तव नाकारण्याची वृत्ती, भरपाई करण्याची, सलोख्याची आशा, दुसर्या संस्कृतीला समूळ नष्ट करण्याची तीव्र इच्छा अशा परस्परविरोधी भावनांनी इस्रायलचे मानसिक विश्व व्यापलेले राहिले,’ याची नोंद लेखकाने केली आहे. कदाचित हीच मानवी प्रवृत्ती असावी. पण सध्याच्या घडीला एका विशिष्ट भावनेचेच इस्रायली जनतेवरील वर्चस्व प्रकर्षाने दिसून येत असल्याचे लेखकाचे निरीक्षण आहे. हे एकांगी प्रचारामुळे घडले, असे मानण्यास जागा आहे. त्यासाठी लेखकाला आलेल्या काही अनुभवांची नोंद घेता येईल. याचबरोबर ऑक्टोबर २०२३च्या हल्ल्यानंतर इस्रायलमधील उदारमतवादी ज्यूदेखील उजवीकडे ढकलले गेले, याचेही काही दाखले आहेत. यानिव्ह कोहेन-अव्हियाड या मध्यमवयीन सुरक्षा अधिकार्याने २२ ऑक्टोबर २०२३ला फेसबुकवर पोस्ट लिहून आपल्या वेदना व्यक्त केल्या होत्या. ‘मी इतकी वर्षे चुकीच्या समजुतीखाली होते. इस्रायल- पॅलेस्टाइन वादावर नक्की मार्ग निघेल असे मला वाटत होते. त्यांची आर्थिक स्थिती सुधारल्यावर तेही आधुनिक होतील, असे मला वाटले होते. पण ७ ऑक्टोबरनंतर सगळे बदलले आहे. ते कधीच सुधारणार नाहीत. १९२९च्या दंगलींपासून त्यांच्यात काहीच बदल झालेला नाही.’ यानिव्ह आणि त्यांच्यासारख्या अन्य उदारमतवादी इस्रायलींनी व्यक्त केलेला रोष इस्रायलच्या विद्यमान राजवटीसाठी पूरकच आहे.
हमासच्या हल्ल्यानंतर काही महिन्यांनी, जून २०२४ मध्ये बार्टोव्ह बेन-गुरियन विद्यापीठात एका व्याख्यानासाठी गेले होते. त्या वेळी काही विद्यार्थी तिथे निदर्शने करण्यासाठी जमले होते. त्यांच्याशी संवाद साधताना त्यांच्यापैकी अनेक जण नुकतेच लष्कराची सेवा पूर्ण करून परत आल्याचे बार्टोव्ह यांना समजले. त्यांना गाझा पट्टीत तैनात करण्यात आले होते. हे विद्यार्थी गाझामधील हल्ल्यांचे समर्थन करत होते. इस्रायली सैन्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि मालमत्तेची हानी घडवून आणली याबद्दल त्यांना काहीही गैर वाटत नव्हते, किंबहुना त्यांच्या दृष्टीने ते समर्थनीय होते. काही महिन्यांनी इस्रायलमधील आपल्या मित्रांशी संवाद साधताना बार्टोव्ह यांना हाच अनुभव आला. अरब लोकांना मारून टाकण्यात, अरब ्त्रिरयांना जिवंत जाळण्यात काहीही गैर नाही, या प्रचाराला वर्षानुवर्षे बळी पडलेल्या जनतेची शत्रुपक्षाला समूळ नष्ट करण्याची सामूहिक इच्छा तयार झाली आहे, ही बाब लेखक लक्षात आणून देतात. हजारो लहान मुले मारली गेली तरी तो शत्रूचा दोष, इस्रायलची मुले मारली गेली तरी तो शत्रूचा दोष अशी मानसिकता निर्माण झालेला समाज धोकादायकच म्हटला पाहिजे. तुमच्या अवतीभोवती अरब लोक आहेत आणि ते कधीही येऊन तुमच्यावर हल्ला करतील आणि तुम्हाला नष्ट करतील हे दीर्घकाळ इस्रायली जनतेच्या मनावर ठसवले गेले आहे. जुन्या जखमांमधून समाजाला बाहेर पडूच द्यायचे नाही, हे इस्रायली सैन्याचे धोरण आहे. किंबहुना विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील होलोकॉस्टचा वापर आणि गैरवापर करून इतरांवर अत्याचार करण्याचे शास्त्र इस्रायल आणि त्यांच्या सैन्याने विकसित केल्याचा लेखकाचा आरोप आहे. लोकांना सातत्याने होलोकॉस्टचे उदाहरण देऊन त्यांच्या मनात भविष्याविषयी भीती आणि अनिश्चितता वाढवली जाते, असे निरीक्षण बार्टोव्ह यांनी मांडले आहे. होलोकॉस्ट एकमेवाद्वितीय होते का आणि या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असेल तर आपण त्यापासून काय शिकलो आहोत, असा प्रश्न लेखकाने विचारला आहे.
इस्रायलच्या वैचारिक आणि मानसिक जडणघडणीत ज्यूविरोध आणि झिओनिझमचा सातत्याने वापर करून घेतला गेला. त्यातून ज्यूंची स्वत:विषयी नकारात्मक भावना वाढीला लागली आणि त्यातून ते अधिक आक्रमक झाले, असे लेखक सुचवतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिका आणि युरोपीय देशांनी अनेक वर्षांपासून इस्रायलविषयक स्वीकारलेले धोरणदेखील इस्रायलच्या आक्रमकतेला कारणीभूत ठरल्याची टीका करताना लेखकाने ‘इंटरनॅशनल होलोकॉस्ट रिमेम्बरन्स अलायन्स’चे (आयएचआरए) उदाहरण दिले आहे. ‘आयएचआरए’मध्ये ज्यूविरोधाची जी व्याख्या करण्यात आली आहे, त्यामुळे इस्रायलवर होणार्या कोणत्याही टीकेला कायद्याने उत्तर देण्याची तरतूद करण्यात आल्याचे लेखकाचे म्हणणे आहे.
इस्रायलच्या राजकारणात धर्माचे महत्त्व अतोनात आहे. हे राष्ट्र मुळात धर्माच्या आधारे स्थापित झाले आहे. त्यांच्या विद्यमान धोरणांमुळे सर्वसामान्यांनाही अनेक प्रश्न पडू शकतात. समुदायाला जगण्यासाठी धर्म आवश्यक असेलही पण धार्मिक इतिहासालाच सर्वाधिक महत्त्व देऊन व्यक्तीच्या जीवनात वर्तमान आणि भविष्याचे सौंदर्यच उरू न देण्याची कोणती मानसिकता असते? जनतेवर राज्य करण्यासाठी ही सत्ताधार्यांची गरज असू शकते, पण जनतेसाठी ही गरज का निर्माण होते? जगभरातील समाजशास्त्रज्ञ, मनोवैज्ञानिक, राजकीय विश्लेषक याचा सातत्याने अभ्यास करतात, आपापला निष्कर्षही काढतात. पण समाज त्यातून शिकत का नाही, हा प्रश्न छळतोच.
इस्रायल : व्हॉट वेन्ट राँग
लेखक : ओमर बार्टोव्ह
प्रकाशक : फर्न प्रेस
पृष्ठसंख्या : २२० किंमत : ९९९ रु.
