इराण युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेशी सुरू झालेल्या शांतता चर्चेत महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या इराणच्या मध्यस्थांना ठार करण्याचा इस्रायलचा कट होता नि आहे. पण इस्रायली नेतृत्व पक्के निर्ढावलेले असल्यामुळे, हे वृत्त उघड होताच ते  ‘फेकन्यूज’ असल्याचे त्यांच्याकडून जाहीर झाले. त्या दाव्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही हेही खरेच. अमेरिकेकडून पहिल्यांदा या कथित कटाबाबत वाच्यता झाली, त्याच्या आधीपासूनच इस्रायलच्या हालचालींविषयी चर्चा सुरू होती. एक-एक करून इराणचे शीर्षस्थ नेते आणि लष्करी कमांडर संपवायचे ही इस्रायलची जुनी रणनीती आहे. त्यानुसारच इराणवरील लष्करी कारवाईला अमेरिकेच्या मदतीने सुरुवात झाली. तेव्हा अमेरिकेचे आणि इस्रायलचे उद्दिष्ट वेगवेगळे दिसून आले. एकाहून एका नेत्याला जिवे मारत इराणची संपूर्ण नेतृत्वफळी (चेन ऑफ कमांड) नष्ट करण्याची इस्रायलची योजना होती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीस या योजनेला पाठिंबा दिला. इस्रायलचे गुप्तवार्ता अधिग्रहण कौशल्य आणि अमेरिकेची प्रहारक्षमता यांचा मेळ जमून आला नि पहिल्याच दिवशी दोघांच्या संयुक्त कारवाईस मोठे यश आल्याचा भास झाला. पण ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान नरसंहारी बिन्यामिन नेतान्याहू या दोघांनाही इराणच्या प्रतिसाद क्षमतेचा अजिबात अंदाज आला नाही. इराण म्हणजे व्हेनेझुएला किंवा लेबनॉन नाही याची प्रचीती संघर्षाच्या दुसर्‍या दिवसापासूनच येऊ लागली. ‘इराणचे नौदल, हवाई दल नेस्तनाबूत झाले तेव्हा त्यांचा प्रतिकार संपुष्टात येईल’ इतकेच नव्हे, तर ‘धर्मसत्तेला विटलेली जनता उठाव करेल’ हे अमेरिकेचे अंदाज सपशेल चुकले. इराणचा प्रतिकार सुरू झालाच, पण इराणने टापूतील अमेरिकाधार्जिण्या तेलसमृद्ध अरब देशांवर हल्ले सुरू केले. लवकरच होर्मुझ सामुद्रधुनीचीही नाकेबंदी केली. या मार्गाचे नाक दाबल्यामुळे अध्र्याहून अधिक जगाची घुसमट होऊ लागली आणि इराणवरील कारवाई म्हणजे बॉम्बवर्षावाचा खेळ नाही याचे भान ट्रम्प यांना अखेर आले. नेतान्याहू तुलनेने अधिक युद्धखोर निघाले.

त्यामुळेच पाकिस्तान, इजिप्त, तुर्कीये आणि कतार या देशांच्या पुढाकाराने एप्रिल महिन्यात इराण-अमेरिका तात्पुरता शस्त्रसंधी घडून आला त्यावेळी आणि नंतर कायमस्वरूपी युद्धसमाप्तीसाठी जून महिन्यात दुसर्‍यांदा शस्त्रविरामावर मतैक्य झाले त्याही वेळी हेझबोलावरील हल्ल्यांच्या निमित्ताने इस्रायलकडून लेबनॉनवर अग्निवर्षाव सुरूच राहिला. तेवढ्या एका कारणासाठी इराणनने शांतता वाटाघाटींमधून अंग काढून घेण्याची धमकी दिली होती. या वाटाघाटींपासून हेतुपुरस्सर दूर ठेवल्या गेलेल्या इस्रायलला त्यातून चेवच चढला. आपल्या कुरापतींमुळे वाटाघाटी फिस्कटू शकतात याची चाहूल लागताच इस्रायलने वारंवार हेझबोला आणि लेबनॉनवर हल्ले आरंभले. इतकेच करून इस्रायल थांबला नव्हता. इराणचे दोन तुलनेने नेमस्त नेते अली लारिजानी आणि कमाल खराझी हे दोघेही इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये मारले गेले. लारिजानी हे इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख होते, तर खराझी हे एके काळी इराणचे परराष्ट्रमंत्री होते. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, दोघेही अमेरिकेशी वाटाघाटींमध्ये सक्रिय सहभागी होते. त्यांचे अस्तित्व इराणला युद्धाकडून वाटाघाटींकडे नेणारे होते हे समजताच इस्रायलने त्यांना संपवले.

सध्याचे इराणचे चर्चादूत म्हणजे विद्यमान परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची आणि तेथील कायदेमंडळाचे सभापती मोहम्मद बघेर घालिबाफ यांनाही संपवण्याचा इस्रायलचा इरादा असावा असे अमेरिकी यंत्रणेला वाटते ते रास्तच. तसा इशारा त्यांनी, अराघची आणि घालिबाफ हे वाटाघाटींसाठी ज्या देशांमध्ये जातात तेथील सरकारांनाही दिला आहे. हे जरा चमत्कारिकच. इशारा इतर कोणत्याही देशांपेक्षा इस्रायललाच द्यायला हवा ना! ट्रम्प अलीकडे नेतान्याहू यांना जाहीरपणे शिवीगाळ करू लागले आहेत. पण नेतान्याहूंचे हात बांधून ठेवण्याची त्यांची हिंमत दिसत नाही. निवडणुकीच्या धामधुमीत इस्रायलला दुखावण्यापेक्षा पॅलेस्टिनी, लेबनीज आणि इराणींचे जीव गेलेले परवडतील असा त्यांचा निष्ठुर हिशेब. इस्रायली हेरगिरीचे ‘भिंग’ आता अमेरिकी नेते आणि लष्करापर्यंत पोहोचल्याची शक्यता पेंटॅगॉन या तेथील संरक्षण यंत्रणेच्या अहवालातच व्यक्त करण्यात आलेली आहे. इस्रायलला आवरले जात नाही तोवर इराण युद्ध संपवण्याविषयी चर्चा निष्फळच ठरणार. पश्चिम आशिया आणि जगाची शांतता इस्रायलच्या मुसक्या आवळण्यानेच सुनिश्चित होईल. कारण या देशाचे उपद्रवमूल्य सध्या सर्वाधिक विध्वंसक आहे.