भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’च्या ‘पीएसएलव्ही-सी ६२’ प्रकारातील प्रक्षेपकाचे भरकटणे हे या संस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरते. प्रक्षेपक भरकटल्यामुळे त्याच्या माध्यमातून सोडलेले १६ उपग्रह ईप्सित कक्षेत स्थिरावू शकले नाहीत. यांतील सात हे बाहेरील देशांचे – ब्राझील, इंग्लंड, नेपाळ – होते. त्यांच्यासह नऊ भारतीय उपग्रहही नष्ट झाले. त्यामुळे हे अपयश विशेष नामुष्कीजनक ठरते. अनेक महत्त्वाच्या उपग्रहांचे किफायती आणि यशस्वी प्रक्षेपण करणारा देश ही भारताची जगभर ओळख. यामागे अर्थातच इस्रोतील शास्त्रज्ञ, अभियंत्यांचे संशोधन, परिश्रम आहेत हे निःसंशय मान्य करावे लागेल. तरीदेखील विद्यमान अपयश नजरेआड करता येत नाही. कारण ते वर्षभराच्या आत दुसऱ्यांदा घडले. त्यामुळे त्याची चिकित्सा आवश्यक.पीएसएलव्ही अर्थात ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहक मोहिमा हा इस्रो आणि भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ कार्यक्रमाचा अविभाज्य घटक आहे. राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे उपग्रह, परदेशी उपग्रह, तसेच चंद्रयानसारख्या आंतरग्रहीय मोहिमांसाठी पीएसएलव्ही तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे ठरते. पीएसएलव्ही हा चार स्तरीय प्रक्षेपक असतो. प्रत्येक टप्प्याची जबाबदारी निरनिराळी असते. यांतही पहिला आणि तिसरा टप्पा सर्वाधिक नाजूक. पहिल्या टप्प्यात गुरुत्वबलाच्या विरुद्ध झेपावायचे असते, तिसऱ्या टप्प्यात वेग झपाट्याने वाढवणे गरजेचे असते. पीएसएलव्ही-सी ६२मध्ये याच टप्प्यात बिघाड निर्माण झाला असावा असा अंदाज आहे. यापुढील चौथ्या टप्प्यात संबंधित उपग्रह कक्षेत सोडण्याचे आव्हान पार पाडावे लागते. पण तशी वेळच आली नाही. कारण तिसऱ्या टप्प्यातच प्रक्षेपक भरकटला. गेल्या वर्षी मे महिन्यात पीएसएलव्ही-सी ६१ या प्रक्षेपकाच्या बाबतीतही हाच अनुभव आला होता. विश्लेषकांच्या मते, या टप्प्यात प्रक्षेपकातील घनरूप इंधनाचे ज्वलन पुरेशा प्रमाणात झाले नाही तर ऊर्जा व्यय होऊन पृथ्वीच्या गुरुत्वबलाचा प्रभाव वाढू शकतो. थोडक्यात, ईप्सित कक्षेत प्रक्षेपकाला संचार करता येऊ शकत नाही.
अंतराळ मोहिमांमध्ये काही प्रमाणात अपयश हे गृहीत धरले जाते. अमेरिका, पूर्वीचा सोव्हिएत रशिया, ब्रिटन, फ्रान्स या अंतराळ संशोधन क्षेत्रातील आद्य महासत्तांनी असे अपयश अनुभवले आहे. चीन आणि जपानबाबतही हे म्हणता येईल. या वास्तवाला भारत अपवाद ठरू शकत नाही. पीएसएलव्ही मोहिमांच्या यशाची टक्केवारी गेल्या वर्षी मे महिन्यापर्यंत अत्यंत उत्कृष्ट होती. इस्रोच्या १०५ मोहिमांपैकी ६५ मोहिमा पीएसएलव्हीशी संबंधित होत्या. यांतील केवळ चार मोहिमा अपयशी ठरल्या. पहिल्याच मोहिमेत म्हणजे १९९३ मध्ये इस्रोला अपयश आले होते. त्यानंतर २०१७ मध्ये मोहीम पूर्ण होऊ शकली नाही. हा आलेख कौतुकास्पद खराच. पण गेल्या दहा महिन्यांत दोन वेळा आलेले अपयश आधीच्या यशाची पाटी पुसून टाकते. इस्रोने आजवर ३४ देशांचे ४३० उपग्रह अवकाशात सोडले आहेत. पण या अपयशामुळे भविष्यात ही संस्था अशाच प्रकारे मोहिमा पार पाडू शकते का, याविषयी संदेह निर्माण होतो. गतवर्षीच्या अपयशाविषयी सविस्तर अहवाल प्रसिद्ध झालेला नाही. पण ज्वलन कक्षात वायूगळती झाल्यामुळे पुरेसे प्रेरक बल निर्माण होऊ शकले नाही. ही त्रुटी निर्मितीच्या वेळची असू शकते. दुसरे असे, की आपण अधिकृतपणे काहीही जाहीर केले नसले तरी आपले मित्र आणि शत्रू या घडामोडींकडे बारकाईने पाहात असतातच. अशा वेळी कोणताही संशय दूर करण्यासाठी आवश्यक पारदर्शिता आणि अपयश स्वीकारण्यासाठी आवश्यक खुलेपणा विद्यमान व्यवस्थेमध्ये नाही. त्यामुळेच राफेल किती पडली याविषयी माहिती मिळत नाही, तसेच पीएसएलव्हीच्या मोहिमा पाठोपाठ का अपयशी ठरल्या याविषयी स्पष्टीकरण मिळण्याची अपेक्षा पुरी होत नाही.
वैज्ञानिक दृष्टिकोन केवळ संशोधकांमध्ये असणे पुरेसे नाही. वैज्ञानिक प्रयोगांचे यशापयश अध्याहृत असते. अपयशातून शिकूनच पुढे यशाची हमी मिळत जाते हा परिपक्वपणा आणि शहाणपणही वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्राप्त होते. आपण प्रत्येक मोहिमेकडे – वैज्ञानिक, लष्करी, क्रीडाविषयक, मुत्सद्देगिरी – युद्धभूमीवरील मर्दुमकीच्या नजरेतून पाहतो. म्हणून यश मिरवतो नि अपयश झाकण्याचा प्रयत्न करतो! यातून हसे आपलेच होते. भविष्यात अंतराळ ही नवी युद्धभूमी आणि कर्मभूमी बनणार आहे. चंद्रयान, गगनयान, मंगलयान अशा महत्त्वाकांक्षी मोहिमांची आपली यादी मोठी आहे. अमेरिका, चीन, रशिया या क्षेत्रात उत्तरोत्तर प्रगती करत आहेत. त्यांच्याशी – विशेषतः अमेरिका आणि चीनशी बरोबरी करायची असेल तर फार मूलभूत बदल करण्याची गरज नाही. थोडा दृष्टिकोन बदलावा लागेल. अन्यथा आज प्रक्षेपक भरकटला, उद्या संपूर्ण कार्यक्रमच भरकटू शकेल.
