वडिलांनी शेतीचा तुकडा विकून परदेशात पाठवलेल्या पुढल्या पिढीने देशातील कुटुंबीयांशी संबंधच ठेवले नाहीत, इतके की या दुरावलेल्या पिढीचा ठावठिकाणाही इथल्यांना माहीत नसावा, असे प्रकार चार-पाच दशकांपूर्वी कानी पडत. ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवाव्यात अशांनी संपर्कातही न राहणे हे नेहमीच दु:खद असते. तशीच गत, भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’च्या ‘एसएसएलव्ही’ या नव्या लघुउपग्रह प्रक्षेपक यानासह अंतराळात झेपावलेल्या दोन लघुउपग्रहांबाबत झालेली आहे. या दोन्ही उपग्रहांना घेऊन जाणाऱ्या ‘एसएसएलव्ही’ अर्थात ‘स्मॉल सॅटेलाइट लाँच व्हेइकल’ या प्रक्षेपण यानाने ७ ऑगस्टच्या रविवारी, पृथ्वीची कक्षा ओलांडेपर्यंतचे आपले काम अगदी चोख केले. हे दोन  उपग्रह यानापासून विलगही यशस्वीरीत्याच झाले, परंतु पुढले महत्त्वाचे काम उपग्रहांना त्यांच्या कक्षेत सोडून स्थिर करण्याचे. ते होण्याआधी या दोन्ही उपग्रहांचा संपर्कच  तुटला, त्यामुळे वृत्तीय (सक्र्युलर) कक्षेऐवजी ते विवृत्तीय (एलिप्टिकल) कक्षेपर्यंत गेले आणि पुढे काय करायचे याच्या ‘इस्रो’च्या वैज्ञानिकांनी दिलेल्या आज्ञा ‘ऐकेनासे’ झाले. अखेर, ‘विदा-संपर्क तुटलेला असल्याने या उपग्रहांना कक्षेत सोडता आलेले नाही. आता ते अंतराळात असले, तरी निरुपयोगी आहेत’ असा त्रोटक का होईना, पण तातडीचा खुलासा इस्रोला करावा लागला. नेमका काय तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा संपर्क तुटला, हे समजण्यास वेळ लागेल- कारण सर्वच संभाव्य कारणांची छाननी करून, ‘हेही नीट आहे/ तेही ठीकच होते/ पण बिघाड इथे असू शकेल’ असा उणे पद्धतीचा तर्क वापरून हा निष्कर्ष काढावा लागतो. हे निष्कर्ष काढणे फार महत्त्वाचे, कारण नेमका दोष काय होता ते कळले तर तो दूर करून पुढे जाता येते. हाच विज्ञानाचा मार्ग. चुका आर्थिकदृष्टय़ा महागात पडणार असतात म्हणून त्या मुळापासूनच टाळायच्या, ही ‘इस्रो’ची जुनी शिस्त. त्यामुळेच तर, १० ऑगस्ट १९७९ रोजी ‘रोहिणी’ उपग्रहाचे उड्डाण ज्या भारतीय  ‘एसएलव्ही’ उपग्रह प्रक्षेपक यानामधून झाले तेव्हापासून या संस्थेने आवर्धित (ऑग्मेंटेड), ध्रुवीय (पोलर), भूसंकालिक (जिओसिंक्रॉनस) ही उपग्रह प्रक्षेपक याने तयार करण्याचे टप्पे यशस्वी केले. आजवर आपण ११५ प्रकारचे उपग्रह याच चार प्रक्षेपकांतून सोडले, त्यांत केवळ ११ वेळा यानाकडून आणि अवघ्या तीनदाच कक्षेआधी उपग्रहाचा संपर्क तुटून अपयश आले. त्या सर्वापेक्षा २०१८ पासून ज्यासाठी प्रयत्न सुरू आहेत ते लघु (स्मॉल) उपग्रह प्रक्षेपक यान निराळे. ते यशस्वी झाल्यावर कदाचित, संरक्षणाप्रमाणे अंतराळ क्षेत्रातही खासगीकरणाला प्रोत्साहन देण्याच्या नव्या धोरणांनुसार, इस्रो ही संशोधन संस्थादेखील ‘अँट्रिक्स’ या आपल्या व्यावसायिक कंपनीमार्फत उद्योगांच्या गरजांनुसार ३०० किलोपर्यंतचे उपग्रह सोडण्याचा व्यवसाय वाढवू शकली असती. हे सारे पुढल्या काळात शक्य होईलच. कारण एक ‘चांद्रयान’ संपर्काबाहेर जाऊन चंद्रावर दिमाखात उतरण्याऐवजी कुठेतरी भरकटले, म्हणून दुसरे उतरणारच नसते असे नाही, ते यशस्वीही होऊ ेशकते. तसेच ‘एसएसएलव्ही’चेही होईल. विज्ञान दोषांकडे मागे वळून पाहाते, ते पुढे जाण्यासाठीच! पण ‘एसएसएलव्ही’वर ‘ईओएस-२’ या १४५ किलो वजनाच्या उपग्रहाखेरीज, ‘आझादीसॅट’ हा- देशभरच्या सरकारी शाळांतल्या ७५० विद्यार्थिनींच्या सूचनांनुसार बनलेला अतिलघु (८ किलो) उपग्रह होता, त्यावर पंतप्रधान नरेंद मोदी यांचे चित्र होते, त्यामध्ये ‘देश की मिट्टी’सुद्धा होती.. या साऱ्या प्रतीकात्मकतेमागील भावनांना बसलेला धक्का मात्र सांत्वनापलीकडचा असणार, हेही समजून घ्यायला हवे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isro successfully launches small satellite launch zws
First published on: 09-08-2022 at 04:07 IST