इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची अनेक राजकीय धोरणे उदारमतवादी युरोप आणि जगाला पटण्यासारखी नाहीत. पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या वात्रटपणाला त्यांनी सलग दोन दिवस ज्या तात्काळ आणि सडेतोडपणे उत्तर दिले, त्यामुळे मेलोनी यांच्या विरोधकांमध्येही त्यांच्याविषयी आदरभाव उत्पन्न झाला असेल हे नक्की. कारण ट्रम्प यांचे वर्तन शाळेतील दांडगट पोरागत असते. ते शाळेपुरते ठीक. पण अमेरिकेसारख्या विशाल देशाच्या अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर असले उद्योग केल्यास त्यातून आपल्यापेक्षा आपल्या देशाची शोभा अधिक होते हे आकळण्याइतका परिपक्वपणा ट्रम्प यांच्यात ऐंशीव्या वर्षीही आलेला नाही.

उर्वरित आयुष्यात येण्याची शक्यता नाही. त्यामुळे व्हाइट हाऊसमधून किंवा फ्लोरिडातील त्यांच्या प्रासादातून किंवा इतर कुठेही आंतरराष्ट्रीय परिषदांमधून इतर राष्ट्रप्रमुखांची खिल्ली उडवणे, त्यांच्या खासगी आयुष्याविषयी वाह्यात टिप्पणी करणे किंवा त्यांना विखारी शब्दांत दूषणे देणे, उबगवाण्या बढाया मारणे असले उद्योग सतत सुरू असतात नि ते चावे-बोचकारे सहन करण्यापलीकडे बहुतांकडे फार पर्याय नसतात. त्यातही काही राष्ट्रप्रमुख – उदा. फ्रान्सचे अध्यक्ष इमान्युएल माक्राँ, ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर, जर्मनीचे चान्सेलर फ्रीडरीश मेर्झ, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी – आंतरराष्ट्रीय संबंध आणि मुत्सद्देगिरीचा आब राखून ट्रम्प यांचा प्रतिवाद करत असतात.

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या वाट्याला ट्रम्प सहसा जात नाहीत. इंधन, सुरक्षा, संरक्षण सामग्री, तंत्रज्ञान अशा कोणत्याही स्वरूपात ट्रम्प किंवा अमेरिकेचा अवाजवी कृपाप्रसाद स्वीकारण्याची वेळ चीनवर येत नाही. त्यामुळे अमेरिकेकडे डोळे वटारून पाहण्याची क्षमता सध्या केवळ चीनची आहे याची जाण ट्रम्प यांना आहे. इतरांची मात्र ते पत्रास ठेवत नाहीत. मनात आले की एखाद्याची एखादे दिवशी तोंड फाटेस्तोवर स्तुती करायची आणि मर्जी फिरली की अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन पाणउतारा करायचा हीच ट्रम्प यांची रीत. नुकत्याच झालेल्या जी-सेव्हन समूहाच्या शिखर परिषदेत ट्रम्प यांनी या सद्गुणांचे प्रदर्शन मांडलेच. पण त्यांच्यावर प्रतिहल्ला करण्याची धमक पंतप्रधान मेलोनी यांनीच दाखवली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

जॉर्जिया मेलोनी या परिषदेच्या व्यासपीठावर आपल्या समवेत छायाचित्र काढून घेण्यासाठी किती उतावीळ होत्या किंवा तशी याचना करत्या झाल्या, असा सपशेल खोटा दावा ट्रम्प यांनी एका इटालियन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. मला त्यांची कीव येते, असेही ते म्हणाले. ट्रम्प यांचा हा दावा खोडून काढताना मेलोनी म्हणाल्या, ‘सहकार्‍यांविषयी ट्रम्प अशा प्रकारची विधाने वारंवार का करतात हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे. मी किंवा इटली कधीही भीक मागत नाही हे त्यांनी ध्यानात ठेवलेले बरे’! मेलोनी यांच्या या फटक्यामुळे बिथरलेले ट्रम्प दुसर्‍या दिवशीही त्यांच्याबद्दल वाट्टेल ते बरळले.

मेलोनी यांची लोकप्रियता इटलीत घसरणीला लागली आहे, इराण युद्धादरम्यान इटलीने आम्हाला अपेक्षित मदत केली नाही वगैरे. मेलोनींनी याही विधानांचा समाचार घेताना, माझ्या लोकप्रियतेपेक्षा ट्रम्प यांनी त्यांच्या देशातील स्वत:च्या लोकप्रियतेची चिंता करावी, असा जिव्हारी लागणारा प्रतिटोला लगावला. ही लोकप्रियता इराण युद्धादरम्यान किंवा नंतर किती घटत आहे ते जगजाहीर आहे. ट्रम्प शत्रूंविषयी आक्षेपार्ह बोलतातच, पण मित्रांबद्दलही अपशब्द किंवा धादांत असत्य बोलतात.

भारत-पाकिस्तान संघर्ष थांबवल्याविषयीचे त्यांचे दावे असेच तथ्यहीन होते. त्याचा प्रतिवाद आपल्याकडे सर्वोच्च पातळीवरून कधीही झाला नाही. जी-सेव्हन परिषदेदरम्यानही, भारताच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही उचलू असे ट्रम्प बोलते झाले. आमच्या रक्षणास आम्ही समर्थ आहोत असे तेथे उपस्थित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या क्षणी ऐकवायला हवे होते.

ट्रम्प यांची खुनशी शेरेबाजी जे दोन नेते अव्यक्तपणे ऐकून घेतात त्यांपैकी एक इस्रायली पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू आणि दुसरे आपले पंतप्रधान मोदी. नेतान्याहूंकडे प्रतिवादासाठी नैतिक अधिष्ठान अनेकदा नसते, आपली तशी परिस्थिती नाही. त्यामुळेच ट्रम्प यांच्यासारख्या ‘मुजोर शेरा’स तितक्याच मोठ्या डरकाळीने प्रत्युत्तर देणारी मेलोनी यांच्यासारखी ‘सव्वाशेरनी’ आदरणीय वाटून जाते.