‘अद्याप जग, बाल्यावस्थेत कसले, शैशवावस्थेतच आहे’- असे विधान इतिहासाचार्य राजवाडे करतात! या निष्कर्षातील ठामपणा कुठून आला? ज्या ‘विचारविकार प्रदर्शनाच्या साधनांची ( इतिहासपूर्व व इतिहासोत्तर) उत्क्रांती’ या निबंधात अखेरून दुसर्‍या पानावर हे विधान येते, त्या निबंधात तर मानवी अभिव्यक्ती/ निर्मिती / कलाकृती यांच्या लाखो वर्षांच्या इतिहासाचा मागोवा राजवाडे घेतात, म्हणजे ‘शैशवावस्थे’चे त्यांनी केलेले निदान काळाविषयी नव्हे. मग ते अन्य कशावर अवलंबून आहे?

राजवाडे सांगतात – ‘मनुष्यामात्राच्या या दीर्घकालीन म्हणजे लाखो वर्षांच्या शैशवावस्थेचा मंद इतिहास विचारविकारप्रदर्शनाच्या वरील शुद्ध व शबल चाळीस साधनांच्या स्थितिगतीवरून अल्पस्वल्प अनुमानता येतो. या इतिहासावरून असे दिसते की ईश्वर, आत्मा, परमात्मा, काल, दिक्, कारण इत्यादी शुद्ध किंवा शबल कल्पना स्वयंभू नसून मनुष्याने शुद्ध किंवा भ्रांत अनुमानाने बनविलेल्या आहेत. अनुभवाच्या अन्वयव्यतिरेकाने शुद्धाचे काही कण मनुष्याला गावले आहेत, बाकी सर्व साम्राज्य येथून-तेथून शबलाचे आहे. शबलांतून शुद्धाकडे गती होत आहे हे त्यातल्या त्यात समाधान. चमत्कार असा की, उत्क्रांतीकडे म्हणजे इतिहासाकडे अवर्णनीय दुर्लक्ष असलेले दिसते. नीतिकल्पना, ईश्वरकल्पना, कार्यकारणभावकल्पना, दिक्कल्पना, कालकल्पना, या सर्व कल्पना लाखो वर्षांच्या उत्क्रांतीने बनत आलेल्या आहेत हे बहुतेक कोणताच तत्त्वज्ञ लक्षात घेत नाही. जो उठतो तो स्वयंभुत्वाकडे म्हणजे ईश्वरदत्तत्वाकडे ऊर्फ उपजतस्वभावाकडे धाव घेतो’. हॉब्ज/ लॉक/ रूसो आदी तत्कालीन पाश्चात्त्य तत्त्वज्ञही आधी उपजतस्वभावाची कल्पना करत होते, त्यावरील ही टीका खरीच, पण राजवाड्यांना विवेकवादी, अनुभवनिष्ठ विचारविकार हे जगाच्या प्रौढत्वाचे लक्षण वाटत होते, असेही अनुमान काढता येते.

याचा अर्थ ‘शबल साधने’ – म्हणजे देवादिकांच्या वा राक्षसांच्या कल्पना, देव अंगात येऊन केलेले नर्तन, स्वर्ग/ नरक कल्पना, पूजा/ उपासनेच्या पद्धती आदी – त्याज्यच, असाही नव्हे. ‘या चाळीस साधनांच्या साहाय्याने कोणत्याही देशाचा व तेथील भूत व वर्तमान लोकांचा इतिहास जाणावयाचा असतो. आपल्या महाराष्ट्रात व या भूमीतील भूत व वर्तमान लोकांचा इतिहास याच साधनांच्या साहाय्याने लिहिला जावयाचा आहे. अलीकडील पन्नास वर्षांत या चाळीस साधनांतून फक्त अक्षरसाधने जी कागदपत्रे व ग्रंथ, त्याकडे आपले विशेष लक्ष वेधून गेले. अल्पद्रव्यात अल्पश्रमाने सहजोपलब्धी याच साधनांची प्रथम होणे शक्य होते. तेव्हा झाले ते ठीकच झाले. परंतु या एका अक्षरसाधनाच्या उपलब्धीने सर्वच कार्यभाग आटपत नाही. अक्षर हे विचाराचे एक साधन झाले. अक्षराव्यतिरिक्त आणिक एकोणचाळीस साधने राहिली त्यांची वाट काय? अक्षराने सर्वच विचार प्रगट होतात असे नाही. अक्षराला साध्य नाहीत असे शुद्ध व शबल विचार गान, चित्र, मूर्ती, स्थापत्य साधतात, तेव्हा, याही साधनांचा यथायोग्य समाचार आपण घेतला पाहिजे.

अक्षरसाधनसंशोधनातून हे संशोधन द्रव्यदृष्ट्या सापेक्षत: किंचित जड आहे. तत्रापि जड असो वा हलके असो, या संशोधनाविना महाराष्ट्रेतिहासाचे चित्र फारच फार कोते राहिले ते काही नाकबूल करता येत नाही. शिवाय अक्षरसाधन सर्वकाळी सारखेच उपलब्ध असते असे नाही. पाच-चारशे वर्षे सोडली म्हणजे कागदपत्रांचे साहाय्य बंद होते; फक्त ग्रंथ राहतात. त्यांना पुष्टी, मूर्ती, चित्रे, स्थापत्य यांची द्यावी लागते. कित्येक कालाचा इतिहास तर अल्पस्वल्प अवशेषांवरून तर्काने अनुमानावयाचा असतो. अशा अडचणी आहेत. त्या टाळण्यास उपरिनिर्दिष्ट चाळीसही साधनांचे साहाय्य आवश्यक असल्यामुळे, त्यांच्यासंबंधाने वरील सोळा कलमात किंचित् प्रपंच करणें अगत्याचे भासले.’

राजवाड्यांनी आयुष्यभर कागदपत्रांच्या साहाय्याने महाराष्ट्राच्या इतिहासाचा मागोवा घेतला. पण त्याच्या मर्यादा त्यांना माहीत होत्या. गान, मूर्ती स्थापत्य अशी इतर अनेक भ्रांत आणि शुद्ध साधने आहेत ज्यांच्या मदतीने आपण इतिहासाचा शोध घेतला पाहिजे- कारण कठीण, खर्चीक असला तरीही अखेर तोच रस्ता आपल्याला आणखी दूरवर घेऊन जाईल याची खात्री त्यांना होती. विशेष हे की, अक्षरी साधनांच्या पलीकडेही स्थापत्य, भांडी, गाणी आदी सर्व मानवी निर्मिती ही इतिहासाचे साधनच असते, याची जाणीव त्यांना होती!