– आनंद हर्डीकर
वि. का. राजवाडे यांचे ‘भाषांतर’ हे मासिक पुण्याच्या ‘सत्यप्रकाश’ छापखान्यात छापले जात असे आणि त्याची वार्षिक वर्गणी (टपालहशिलासह) सहा रुपये होती, अशी नोंद ‘समग्र राजवाडे साहित्या’च्या ‘इतिहासाचार्य वि. का. राजवाडे मंडळा’ने प्रकाशित केलेल्या बाराव्या खंडातल्या एक तळटिपेत आढळते. (त्याच खंडाच्या अनुक्रमणिकेच्या पानावर मात्र ‘समर्थ छापखाना’ असे नमूद केलेले आढळते.) त्याचप्रमाणे ते मासिक ३७ महिने चालून फेब्रुवारी १८९७ मध्ये बंद पडले, ही माहिती त्यांच्याविषयीच्या बहुतेक सर्व पुस्तकांमध्ये आढळते.
प्लेगच्या साथीचा पुण्यात प्रादुर्भाव झाला होता. हाँगकाँगहून माल घेऊन मुंबई बंदरात आलेल्या बोटींवरच्या धान्याच्या पोत्यांमधून बाहेर पडलेल्या उंदरांनी पुणे शहरात सर्वाधिक धुमाकूळ घातला होता. माणसे पटापट मरत होती आणि मागे उरलेले लोक जिवाच्या भीतीने इतस्तत: पांगत होते. टिळकांनी त्या घबराटीचे वर्णन करताना म्हटले होते, ‘(यशवंतराव) होळकराच्या (पुण्यावरच्या सूडघेण्या) हल्ल्याच्या वेळीही गेले नसतील, एवढे लोक पुण्याबाहेर मिळेल त्या मार्गाने पळत सुटले आहेत’. सगळे पुणे भकास झाले असताना राजवाड्यांना मासिकाचा गाशा गुंडाळणे भाग पडले, हे आपण समजू शकतो.
दुर्दैवाने राजवाडे समग्र साहित्याच्या ज्या बाराव्या खंडामध्ये ‘भाषांतर’ मासिकातले ‘उपोद्घात’, ‘गतवर्ष’ आणि इतर काही निवडक लेख समाविष्ट केले आहेत, त्यात शेवटच्या अंकातले राजवाड्यांचे मनोगत समाविष्ट झालेले नाही. एवढेच नव्हे, तर संपादकीय निवेदनात ज्या छापून समाप्त झालेल्या व छापत असलेल्या ग्रंथांची राजवाड्यांनीच दिलेली सूची उल्लेखिली आहे, त्या सूचीमधले सगळेच्या सगळे साहित्य समाविष्ट होऊ शकलेले नाही. ती नोंद मात्र ऐतिहासिक महत्त्वाची आहे.
‘(१) प्लेटोकृत फीडो अथवा आत्म्याचे अमरत्व, (२) प्लेटोकृत क्रीटो अथवा कर्तव्यकर्म, (३) तर्कभाषा, (४) बर्ककृत वसाहतींशी सख्य, (५) बिशप बहलराची नीती व्याख्याने, (६) पेनकृत सारासार विचार, (७) झेनोफनकृत हीरो अथवा राजाची दैन्यवस्था, (८) युरोपातील गुप्त मंडळ्या, (९) प्लुटार्ककृत लायकर्गसाचे चरित्र, (१०) मिल्लकृत जनहितवाद’…. हे ग्रंथ छापून झाले होते, तर (१) ‘शांकरभाष्य, (२) मानवी बुद्धी, (३) इंग्लंडची राजनीती, (४) आरिस्टॉटलची राजनीती, (५) माधवचा सर्वदर्शनसंग्रह, (६) रोमन पादशाहीचा र्हास, (७) प्लेटोकृत साक्रेटिसाचे स्वमतसमर्थन, (८) प्लुटार्ककृत चरित्रे, (९) अरिस्टोफिनिसाची लिसिस्ट्रेसा या ग्रंथांची छपाई सुरू असल्याचे’ नमूद केले होते… शिवाय प्लेटोचे ‘रिपब्लिक’, आरिस्टॉटलचे ‘एथिक्स’, बर्कलेचे ‘थिअरी ऑफ व्हिजन’, मिल्लचे ‘लॉजिक’, ह्यमूचे ‘एसेज’ इत्यादी ग्रंथांची भाषांतरे होत असल्याचीही माहिती दिलेली होती.
या खंडाला प्राचार्य राम शेवाळकर यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतल्या संक्षिप्त उल्लेखावरून हे समजू शकते की, टामस पेनकृत ‘सारासारविचार’, प्लेटोकृत क्रीटो अथवा ‘कर्तव्यकर्म’, फीडो अथवा ‘आत्म्याचे अमरत्व’, ‘साक्रेटिसाचे स्वमतसमर्थन’ ही सर्व भाषांतरे स्वत: राजवाड्यांनी केली होती. सुदैवाने ती या खंडामध्ये उपलब्ध आहेत.
तथापि अन्य ग्रंथांचा व मासिकाच्या अंकांचा शोध इतिहासप्रेमी घेत राहिले पाहिजे. कुणी सांगावे, मासिक बंद करतानाचे राजवाड्यांचे मनोगत अशा शोधमोहिमेत आपल्या हाती गवसेलदेखील. मासिक बंद पडल्यावर राजवाड्यांसमोर ‘पुढे काय?’ हा प्रश्न पुन्हा उभा राहिला. त्या संदर्भात त्यांचे एक चरित्रकार, प्रा. अ. श. पुराणिक यांनी केलेले वर्णन अगदी चपखल आहे. ‘जगणेच जेथे संशयात सापडले होते, तेथे इतर कामाचा विचारसुद्धा करणे शक्य नव्हते. पण आयुष्यात अनेकदा असे होते की, सर्व संपले असे वाटते, त्याच वेळी नेमकी नवी पहाट उमलते. अंधार्या भुयारात चाचपडणार्या माणसाच्या हातून अकस्मात गुप्त कळ फिरवली जाते आणि एवढा वेळ बंद असलेला दरवाजा उघडतो आणि पलीकडे पसरलेल्या प्रकाशाने उजळलेला अफाट आणि विस्तीर्ण प्रदेश पाहून त्याच्या डोळ्यांचे पारणे फिटते. भवितव्यतेचे किलकिले दार सताड उघडले जाते! असाच प्रकार राजवाड्यांच्या बाबतीत झाला.’
राजवाड्यांच्या संपूर्ण आयुष्याला ती निर्णायक कलाटणी कशामुळे मिळाली, ते पुढील लेखात…
