‘जी राष्ट्रे आज स्वतंत्र आहेत, त्यांतील इतिहासकारांनी (आणि पर्यायाने राज्यकर्त्यांनीही) हे पक्के ध्यानात ठेवले पाहिजे की, आजमितीस जी राष्ट्रे परतंत्र दिसतात, त्यांच्या चरित्रांत स्वतंत्र राष्ट्रांच्याही चरित्रांत दिसून येणार नाहीत, अशी प्रगतीची प्रौढ रूपे विद्यमान असण्याचा बळकट संभव आहे’, असे सांगून राजवाड्यांनी युरोपीय लोकांच्याच समजुतीतील एका फेरबदलाचे चांगले उदाहरण पुढे केले.
त्यांनी लिहिले, ‘शंभर दीडशे वर्षांपूर्वी सर्व भाषांचा उगम हिब्रू भाषेत असावा व पश्चिम युरोपातील इंग्रजी व फ्रेंच भाषा फारच प्रौढ दशेप्रत पोचलेल्या आहेत, असा समज युरोपामध्ये प्रचलित होता. परंतु संस्कृत भाषेशी जसजसा युरोपीय इतिहासकारांचा जास्त परिचय होत गेला, तसतसा हिब्रू भाषेशी आंग्ल, फ्रेंच वगैरे भाषांचा काहीएक संबंध नाही, आपले मूळ आर्यभाषेच्या जवळपास कोठेतरी आहे व आपल्या भाषांपेक्षाही प्रौढतर भाषा आहेत, असा त्यांचा ग्रह झाला. हा समज कितपत खराखोटा आहे, हा प्रश्न अलाहिदा; परंतु मानवसमाजाच्या भाषाविषयक इतिहासात युरोपीय लोकांची समजूत ही अशी फिरली, हे निर्विवाद आहे. असाच फेरबदल राजकीय, धार्मिक व सामाजिक बाबतींतही होण्याचा फार संभव आहे’.
युरोपीय इतिहासकारांमधली आणखी एक विलक्षण खोड राजवाड्यांनी या निमित्ताने उघडकीस आणली. त्यांनी लिहिले ‘ती खोड ही की, पुरातन किंवा उत्तम असे जे काही आढळेल, त्याच्याशी आपल्या समाजाचा काहीतरी बादरायण संबंध लावण्याची ते हाव धरतात. ग्रीस देशाच्या इतिहासापलीकडे जोपर्यंत त्यांची माहिती गेली नव्हती, तोपर्यंत ट्रॉट शहराशी आपला संबंध लावून, हेलन नामक स्त्रीचे आपण वंशज आहोत, असे प्रतिपादन करण्यात त्यांना फुशारकी वाटे. काही काळपर्यंत यहुदी लोकांना ते आपले पूर्वज मानीत आणि अलीकडे संस्कृत भाषेशी परिचय झाल्यापासून ते आपली गणना आर्यकुळात करू लागले आहेत… या बादरायण पद्धतीचा परिणाम असा होतो की, दर दहा वर्षांनी त्यांचे ऐतिहासिक सिद्धान्त बदलत असतात… सारांश, सत्यापेक्षा, स्वजातिगौरवाकडे या लोकांचे लक्ष विशेष असते. हा दोष कोणत्याही देशातील निर्लेप इतिहासकारांनी टाळला पाहिजे’.
याबरोबरच इतिहासाच्या वास्तव रूपाबद्दलचे विवेचन सुरू करता करता राजवाड्यांनी अगदी थोडक्यात मांडलेले इतर काही मुद्देसुद्धा दखलपात्र होते. ‘वर्तमानक्षणाच्या पाठीमागील गतकाळी पृथ्वीवरील नव्या व जुन्या सर्व समाजांच्या सर्व तर्हांच्या उलाढालींची जी साद्यन्त आणि विश्वसनीय हकिकत, ती इतिहास होय. असला साद्यन्त व विश्वसनीय इतिहास पृथ्वीवरील कोणत्याही भाषेत अद्यापपर्यंत लिहिला गेलेला नाही. समाजाच्या साद्यन्त चरित्राचा हर्डर, हेल्मोल्ट, क्लेअर, रिडपाथ वगैरे लोकांनी असला इतिहास लिहिण्याचा यत्न केला आहे; परंतु यांच्यापैकी प्रत्येकाचा इतिहास त्याच्या त्याच्या स्वदेशाभिमानाच्या रंगाने चितारला गेल्यामुळे, इतर देशांतल्या इतिहासज्ञांच्या पसंतीस सहजच उतरत नाही. जो तो आपापला देश त्रिभुवनाचे केंद्र समजून सकल जगाचा इतिहास रंगवण्याचा प्रयत्न करीत असतो. शिवाय प्रत्येकाचे स्वदेशाभिमानाखेरीज काहीतरी वैयक्तिक खूळ असतेच. कोणी केवळ भूगोलदृष्ट्या, कोणी केवळ काळदृष्ट्या, कोणी शास्त्रदृष्ट्या, कोणी निव्वळ व्यापारदृष्ट्या तर कोणी स्वदेशसंस्कृतिदृष्ट्या जगाच्या इतिहासाची अजमावणी करीत असतात. अशी नाना प्रकारची व्यंगे या इतिहासकारांच्या ग्रंथांत दृष्टीस पडतात; त्यामुळे विविध प्रश्नांचा समाधानकारक निकाल लागत नाही… तेव्हा वैयक्तिक मते एकीकडे सारून आणि स्वदेशाभिमानाचा दर्प बाजूला ठेवून… हेल्मोल्ट म्हणतो त्याप्रमाणे निर्लेप आणि निरहंकारी होऊन इतिहासाचा विचार करावयाला लागणे ही इतिहासाचे खरे स्वरूप जाणण्याच्या मार्गाला लागण्याची पहिली पायरी आहे.’
ही पहिली पायरी गाठणे किंवा गाठता येणे खूप कठीण आहे, भल्याभल्यांना ते जमलेले नाही, हेसुद्धा राजवाड्यांनी आपल्या विवेचनात पुरेसे स्पष्ट केले आणि पुढील पायरी म्हणजे सर्व प्रकारचे अर्धवट ग्रह सोडून देण्याची पायरी किती महत्त्वाची आहे, याबद्दलचे सोदाहरण स्पष्टीकरण देण्यास प्रारंभ केला.
– आनंद हर्डीकर
anand47.hardikar@gmail.com
