वैष्णवांच्या भक्ती-परंपरेचा पूर्व भारतातला भूगोल मणिपूर ते ओडिशा असा विस्तारलेला आहे. मणिपुरी संकीर्तन किंवा नटसंकीर्तन, आसामातले ‘नाम-प्रसंग’ कीर्तन, बंगालमधले ‘पदावली’ कीर्तन आणि आता बांगलादेशात गेलेल्या पूर्व बंगालात ‘अरिबा पाला’, बिहारात ‘पंडवानी’ अशा कीर्तन- परंपरा सातव्या-आठव्या (इसवी) शतकापासून ते तेराव्या शतकापर्यंत विकसित होत गेल्या, त्यापैकी ओडिशातले कीर्तन म्हणजे ‘पाला’. आज ओडिशात २० हजारांहून अधिक पाला- कीर्तनकार आहेत; पण ७०/८० वर्षांपूर्वी स्थानिक स्वरूपाच्या या भक्तिपरंपराधारित सादरीकरणाला देशभर ओळखल्या जाणार्या कलाप्रकाराचा दर्जा देण्यात जगन्नाथ बेहेरा यांचा मोठा वाटा होता. ‘पंडित’ आणि ‘पालासम्राट’ म्हणून ओळखले जाणारे जगन्नाथ बेहेरा रविवारी (२ ऑगस्ट) निवर्तले, तेव्हा त्यांनी १०१ व्या वर्षात प्रवेश केला होता. मात्र २०२० नंतर बराच काळ ते आजारीच होते.
प्रदीर्घ आयुष्यात त्यांनी ‘पाला’बाबत जो ध्यास घेतला, तो अभ्यसकला साजेसाच होता. अगदी किशोरवयातच ते ‘पाला’कडे आकृष्ट झाले. आधी हरेकृष्ण नाथ, मग भगवान सिंह आणि त्यानंतर हरेकृष्ण स्वैन यांच्या पाला-पथकांमध्ये ‘पालियां’च्या – म्हणजे नर्तनही करणार्या सहगायकांच्या- समूहात काम करता-करता शिकले. पण ‘पाला’मधली पदे ओडियाच नव्हे तर संस्कृतही असतात. जयदेवाच्या अष्टपदींचा, गीतगोविंद या महाकाव्यातील काही रचनांचा, पुराणांतील कथानकांचा आणि महाभारतातील प्रसंगांचा त्यांत समावेश असतो. हे सारे समजून घेण्याच्या ईर्षेने, तरुणपणी संस्कृ़त शिकलेले जगन्नाथ बेहेरा पुढे भाषेबद्दल सजग झाले आणि प्रयत्नपूर्वक बंगाली, हिंदी आणि इंग्लिशसुद्धा बोलू-वाचू लागले! औपचारिक शालेय शिक्षण मॅट्रिकच्या आधीच सुटले तेव्हाच, यापुढला अभ्यास ‘पाला’ या कलाप्रकारासाठीच आहे, हे त्यांनी पक्के ठरवले होते. ‘पाला’मध्येही दोन उपप्रकार असतात- बैठे आणि उभे कीर्तन. जगन्नाथ बेहेरा हे यापैकी उभे कीर्तनकार. डोईस फेटा, हालचालीगणिक डोलणारे लांब उपरणे, एका हातात चिपळ्या आणि दुसर्या हातात (वीणा नव्हे, तर) देवाला वारा घालण्याचे चामर घेऊन बेहेरा साधारण १९५० च्या दशकापासून स्वत: मुख्य गायक झाले. ‘पाला’मध्ये या गायकाचा तालवाद्यावरला साथीदार म्हणजे बायक, तर समूहसाथ (कोरस) देणारे पालिया, यांचे पथक त्यांनी तयार केले आणि ओडिया पालाची चमक दाखवण्याच्या ईर्षेने कोलकात्यापर्यंतचा दौरा त्यांनी केला. यानंतरच्या काळात अन्य राज्यांतही त्यांची पाला कीर्तने झाली. कीर्तनाची भाषा ओडिया व संस्कृत असली तरी, तुलसीदास व कबीर काय म्हणतात, गुरुदेव टागोरांनी या ऋतूचे वर्णन कसे केले आहे किंवा शेक्सपिअरने काय म्हटले आहे असे दाखले पेरत खुमारी वाढवणे, हे त्यांचे वैशिष्ट्य होते. वयाच्या ८० व्या वर्षानंतर, २००७ मध्ये त्यांना ओडिशा संगीत नाटक अकादमीने गौरवले; तर त्यानंतर दोन वर्षांनी अखिल भारतीय (केंद्रीय) संगीत नाटक अकादमीचाही पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना देण्यात आला. ‘पद्मश्री’ मिळाली नाही; पण आपल्यापेक्षा २० वर्षांनी लहान असलेले गुरुबंधू (हरेकृष्ण स्वैन यांचे शिष्य) उत्सवचरण दास यांना अखेर २०२० साली पद्मश्री जाहीर झाल्याचा आनंद त्यांना होता. दोन पुस्तके जगन्नाथ बेहेरा यांनी लिहिली, पण आजवर ती ओडिया भाषेतच राहिली आहेत. पाला कीर्तनकारांची संघटना त्यांनी बांधली. पाला या कलाप्रकाराला संघटित करण्याचे श्रेय त्यांच्याकडेच जाते.
