जम्मू आणि काश्मीर विधानसभेत शुक्रवारी झालेल्या प्रकारावरून या केंद्रशासित प्रदेशाला लवकर स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळण्याची शक्यता फारच कमी दिसते. ऑगस्ट २०१९ मध्ये घटनेतील ‘अनुच्छेद ३७०’ निष्प्रभ करतानाच जम्मू- काश्मीर व लडाख या दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली. यापैकी जम्मू-काश्मीरला ‘योग्य वेळी पूर्ण राज्याचा दर्जा बहाल केला जाईल’, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी दिले. सर्वोच्च न्यायालयानेही, अनुच्छेद ३७० बाबतचा सरकारचा निर्णय वैध ठरवताना ‘राज्याचा दर्जा विनाविलंब द्यावा’ असे म्हटले होते आणि केंद्र सरकारनेही न्यायालयात तसे मान्य केले होते. ‘मतदारसंघांची पुनर्रचना, निवडणुका झाल्यावर राज्याचा दर्जा बहाल करू’, असे आश्वासन केंद्र सरकारने दिले होते. यापैकी मतदारसंघांची पुनर्रचना झाली, निवडणुका पार पाडून दोन वर्षे लोटली तरी राज्याचा दर्जा बहाल करण्याचे नाव केंद्र सरकार काढत नाही. यामुळेच जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राज्याचा दर्जा बहाल करण्याचा ठराव मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मांडला. तेव्हा भाजपच्या आमदारांनी या ठरावाच्या प्रती फाडल्या, अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजी केली. यापुढे जाऊन ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील सरकार बरखास्त करून नायब राज्यपालांकडे सर्व अधिकार सोपवावे, अशी मागणी या गोंधळी आमदारांनी केली. आमदारांच्या या आकांडतांडवाने भाजपचा खरा चेहरा उघड झाला.
केंद्रशासित प्रदेशात पोलीस यंत्रणा, नोकरशहा हे सारे नायब राज्यपालांच्या आदेशाने काम करतात. मुख्यमंत्र्यांना फार मर्यादित अधिकार असतात. या केंद्रीकरणाचा फायदा सध्या भाजपलाच होतो. जम्मू आणि काश्मीरमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत राज्याचा दर्जा मिळणे कठीण, असे उघडपणे बोलले जाते. भाजप आमदारांच्या पवित्र्यावरून यात तथ्यही वाटते. पण मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मांडलेल्या ताज्या ठरावात यापूर्वीच्या २६ जून २००० आणि ६ नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या ठरावांचा उल्लेख होता, हे भाजपच्या विरोधाचे तांत्रिक कारण. यापैकी जून २००० मधला ठराव संपूर्ण राज्याचा दर्जा असताना तेव्हाचे मुख्यमंत्री डॉ. फारुक अब्दुल्ला यांनी मंजूर करवून घेतला, तो वादग्रस्त ठरला होता. कारण त्यात ‘जम्मू आणि काश्मीरमध्ये १९५३ पूर्वीची परिस्थिती पूर्ववत करावी,’ अशी मागणी होती. वर, जम्मू व काश्मीरसाठी ‘वझीर – ए- आझम’ म्हणजे पंतप्रधान तसेच ‘सद्र – ए- रियासत’ म्हणजेच राष्ट्रप्रमुख या पदांची पुन्हा निर्मिती करावी, अशीही तरतूद ओमर यांचे वडील फारुख यांनी मांडलेल्या त्या ठरावात होती. तत्कालीन वाजपेयी सरकारने तो ठराव फेटाळला होता. मग, जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीनंतर पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याचा ठराव नोव्हेंबर २०२४ मध्ये करण्यात आला. तेव्हाही भाजपने विरोधी भूमिका घेतली होती. जम्मू-काश्मीरच्या स्वायत्ततेवर आम्ही मागे हटलो अशी टीका करण्याची संधी अन्य पक्षांना- विशेषत: पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांना- मिळू नये म्हणूनच २०००च्या ठरावाचा उल्लेख केल्याचे ओमर यांनी नमूद केले.
स्वायत्ततेची मागणी जम्मू- काश्मीर तसेच लडाख या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांतून वारंवार केली जाते. जम्मू- काश्मीरमध्ये किमान विधानसभा अस्तित्वात आहे. लडाखमध्ये तीही नाही. लडाखलाही संपूर्ण राज्याचा दर्जा तसेच सहाव्या परिशिष्टात समावेश होण्याच्या मागण्या केल्या जातात. केंद्र सरकार दोन्ही केंद्रशासित प्रदेशांच्या मागण्यांकडे साफ दुर्लक्ष करत असल्यानेच लडाखमध्ये गेल्या वर्षी हिंसक आंदोलन झाले. त्यात चौघांचा मृत्यू झाला. अलीकडेच लडाखसाठी लोकप्रतिनिधींची राजवट आणण्याची तयारी केंद्राने दाखवली असली तरी सारे अधिकार नायब राज्यपालांच्या हातीच राहतील.
वास्तविक पहलगामचा हल्ला वगळता २०१९ पासून जम्मू -काश्मीर हा प्रदेश तसा शांत आहे. मतदारसंघाची पुनर्रचना व निवडणुका पार पडल्यावर राज्याचा दर्जा हे केंद्राने आश्वासन खरे तर आता पाळायला हवे. तसे न करण्यातून भाजपची आमूलाग्र सत्ताकांक्षाच दिसते. आरोग्य, वीजपुरवठा यांचेही अधिकार जम्मू-काश्मीरला नसल्याचे ओमर म्हणतात, यातून भाजपला काय हवे आहे? भाजप आमदारांचा थयथयाट पाहाता,काश्मीरमधील राजकारण्यांनी कितीही ओरड केली तरी स्वायत्तता आणि राज्याचा दर्जा हे लवकर अमलात येण्याची शक्यता धूसरच दिसते.
