केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागण्यासाठी ‘कॉक्रोच जनता पक्षा’च्या हाकेनुसार जंतर-मंतरवर जमलेले तरुण सर्व समाजगटांतले होते. ‘जय भीम’ आणि ‘भारतमाता की जय’ सारख्या घोषणाही देत होते. ‘गो प्रधान गो’चा गजर करत होते. हे आंदोलन सध्या शिक्षण क्षेत्रापुरते राहील; नंतर ते कुठे जाईल?

जंतर-मंतरवर आंदोलक थाळी-चमचे घेऊन आलेले होते आणि ते जोरजोरात वाजवत होते. पहिल्यांदा काहीच कळले नाही की आंदोलक थाळी-चमचे का वाजवत आहेत. त्यांनी अचानक करोनाची आठवण करून दिली. करोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केले होते, त्यांनी जनतेला आवाहन केले होते की, जोरजोरात थाळी-चमचे वाजवा. टाळ्या वाजवा वगैरे. अशा अशास्त्रीय गोष्टीतून नेमके काय साधायचे होते हे अजूनही कळलेले नाही. लोकांनी मोदींची सूचना अमलात आणली होती.

रात्री दिवे बंद करून करोनाविरोधातील कथित लढाई तीव्र केली. त्यांनी थाळी वाजवली, टाळ्या वाजवल्या. घंटी वाजवली. हे सगळे प्रकार होत राहिले. मग, कोणीतरी कविता केली. ते म्हणाले, ‘गो करोना गो!’ मग, लोकांनी त्यांचेही अनुकरण केले आणि ‘गो करोना गो’ असे म्हणायला सुरुवात केली. जंतर-मंतरवर थाळी चमचे, टाळ्या वाजवल्या जाऊ लागल्यावर अचानक करोनाकाळ परत आला की काय असे वाटू लागले. जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पक्षाचे (सीजेपी) आंदोलन सुरू आहे.

शनिवारी या सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी दिल्लीकरांना आंदोलनाची हाक दिली होती. तरुण-तरुणी मोठ्या संख्येने जंतर-मंतरवर पोहोचले होते. सीजेपीने आंदोलकांना येताना थाळी-चमचे घेऊन येण्याचे आवाहन केले होते, त्यानुसार अनेकांनी ते आणलेले होते. करोनाच्या विरोधात लोकांनी ‘गो करोना गो’ अशा घोषणा दिल्या तशाच ‘गो प्रधान गो’च्या घोषणा आंदोलकांनी जंतर-मंतरवर दिल्या.

‘सीजेपी’ हा राजकीय पक्ष नव्हे. ते देशातील शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवहार, भ्रष्टाचार यांच्याविरोधातील नवे आंदोलन आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याचे ठरवले आहे. त्यांनी तरुण-तरुणींना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. दिपकेंच्या आंदोलनाचा एकमेव उद्देश शिक्षण क्षेत्र सुधारणे हाच आहे. त्यापलीकडे ते आत्तातरी बघायला तयार नाहीत. ते बघणार नाहीत. आमचे आंदोलन, आमची चळवळ नवी आहे, आम्ही आत्ता एकच प्रश्न हाती घेतलेला आहे.

आम्ही शिक्षण क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे. या क्षेत्रात सुधारणा केल्यानंतर आम्ही दुसर्‍या मुद्द्याकडे वळू. आम्ही थांबणार नाही. आमचे आंदोलन सुरूच राहील, असेही दिपकेंचे म्हणणे आहे. देशाच्या शिक्षण क्षेत्राची जबाबदारी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे आहे. त्यांच्या कारकीर्दीत शिक्षण क्षेत्रामध्ये गोंधळ-घोटाळे वाढलेले आहेत. ‘नीट’च्या परीक्षेतील गोंधळानंतर एक-दोन महिन्यांत १२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. ही गंभीर बाब आहे.

रविवारी ‘नीट’ची परीक्षा पुन्हा घेताना युद्धपातळीवर सरकारने तयारी केली. पण त्यातून प्रश्न सुटणार नाहीत हे लोकांना कळते. केंद्र सरकारविरोधात आंदोलन केले पाहिजे असे तरुणांना वाटले असेल. सीजेपीने दिल्लीत पहिल्यांदा आंदोलन केले आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. सुमारे २० दिवस झाले तरी केंद्र सरकार ढिम्म हलले नाही. मग सीजेपीने देशात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करून पुन्हा दिल्ली गाठली आणि शनिवारी जंतर-मंतरवर ठिय्या दिला. आता सीजेपीचे आंदोलक प्रधानांचा राजीनामा घेतल्याशिवाय दिल्लीतील आंदोलन थांबणार नाही असे म्हणत आहेत.

व्यंगात्मक कृती

सीजेपीचे आंदोलन किती मोठे आहे, किती मोठे होईल वगैरे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. त्याबद्दल आत्ता बोलण्याची गरज नाही. शनिवारी जंमत-मंतरवर काय झाले हे महत्त्वाचे. सीजेपीने दुपारी एक वाजता जंतर-मंतरवर आंदोलन सुरू करण्याची हाक दिली होती. तरुण-तरुणी जमले. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे लोक होते. आंदोलनस्थळी दिपकेंनी भाषण केले. त्यांच्या हातात डॉ. आंबेडकरांचे छायाचित्र होते आणि त्यांनी जय भीमच्या घोषणा दिल्या. दिपकेंच्या पाठोपाठ आंदोलकांनीही दिल्या.

या आंदोलकांमध्ये फक्त दलित समाजातील तरुण-तरुण नव्हते तर वेगवेगळ्या समाजातील होते, त्या सगळ्यांनी आंबेडकरांचा जयजयकार केला. भारत माता की जयच्याही घोषणा दिल्या. मग, दिपकेंनी थाळी-चमच्या मागील उद्देश स्पष्ट केला. मी तुम्हाला इथे थाळी-चमचे वाजवायला सांगतोय म्हणजे मी विज्ञानवादी नाही असे नव्हे. करोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थाळी वाजवायला सांगितली होती, त्यांनी सांगितले म्हणून लोकांनी थाळी वाजवल्या, त्यातून खरोखर करोना जाणार होता तर आम्हीही इथे थाळी वाजवतो, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान कदाचित पायउतार होतील.

टाळ्या वाजवून कंपने निर्माण होतात आणि त्यातून करोना दूर पळणार असेल, आम्हीही टाळ्या वाजवतो, त्या कंपनातून प्रधानही दूर पळतील… दिपकेंचा हा थाळी-चमचा प्रयोग ही व्यंगात्मक कृती (सटायर) होती. त्यांचा सीजेपीचा प्रयोग हादेखील व्यंगातूनच जन्माला आलेला आहे. या व्यंगात्मक कृतीतून शनिवारी दिवसभर जंतर-मंतरवर गो प्रधान गोच्या घोषणा दिल्या जात होत्या.

जंतर-मंतरवर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आलेली होती. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना हाकलण्यास सुरुवात केली होती, पण आंदोलकांनी ठिय्या दिला. प्रधानांचा राजीनामा घेतल्याशिवाय जंतर-मंतरवरून जाणार नाही. हवे असेल तर पोलिसांनी अटक करावी, असे आंदोलकांचे म्हणणे होते. आपल्याला अटक होऊ शकते याची जाणीव अभिजित दिपके यांना होती, पण दिल्लीतील दुसरे आंदोलन अधिक तीव्र करणे आणि राजीनाम्याच्या मागणीवर ठाम राहणे या उद्देशाने ते जंतर-मंतरवर आले होते. आंदोलकांनी रात्र जंतर-मंतरवर काढली. सीजेपीच्या आंदोलनाला आता खरे आंदोलनाचे स्वरूप आले असे म्हणता येईल. आंदोलनाला शिस्त लावण्याचाही प्रयत्न झालेला दिसला. गेल्या वेळी आंदोलन कव्हर करायला आलेल्या माध्यमप्रतिनिधींना घेरले गेले होते, त्यांना विरोध केला गेला होता.

माध्यम प्रतिनिधींविरोधात काही करू नका, ते आपले काम करत आहेत, असे सांगून दिपके यांनी ‘अंदर की ये बात है, मीडिया हमारे साथ है’ अशा घोषणा दिल्या. आपले आंदोलन शांततेने होत आहे, ते शांततेनेच झाले पाहिजे. कोणताही अनुचित प्रकार होऊ देऊ नका. पोलिसांना सहकार्य करा, पोलिसांनीही आम्हाला सहकार्य करावे. तुमच्या मुलाबाळांसाठीही आम्ही लढत आहोत. आंदोलनामध्ये मुली आलेल्या आहेत, मुलींना इथे सुरक्षित वाटले पाहिजे. दिल्ली मुलींसाठी असुरक्षित मानली जाते; पण आपले आंदोलन त्यांच्यासाठी सुरक्षित असले पाहिजे अशा अनेक सूचना दिपके यांनी दिल्या. प्रामुख्याने समाजमाध्यमे आंदोलन कव्हर करत आहेत, त्यातून ते लोकांपर्यंत पोहोचत आहे.

भाजपच्या ताब्यात?

सीजेपी हे विद्यार्थी आंदोलन आहे, ते प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. आत्ता तरी या आंदोलनाची व्याप्ती छोटी आहे. हे आंदोलन एका मुद्द्यापुरते सीमित आहे. मोदींनी प्रधानांचा राजीनामा घेतला तर ते आंदोलन यशस्वी झाले असे म्हणता येईल. पण असेही होऊ शकते की, प्रधानांकडून शिक्षण मंत्रालय काढून घेतले जाईल आणि त्यांना अन्य खाते दिले जाईल. त्यातून केंद्र सरकारसाठी प्रश्न संपेल. मग काय करणार, असा प्रश्न दिपकेंना विचारला गेला. त्यांचे म्हणणे होते की, प्रधानांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. आणि ही आंदोलनाची सुरुवात आहे.

शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक प्रश्न आम्हाला सोडवायचे आहेत. ते सोडवल्याशिवाय आम्ही थांबवणार नाही… असे असेल तर सीजेपीला प्रदीर्घ काळ आंदोलन करावे लागेल. दिपके दलित समाजातून आलेले आहेत. ते डॉ. आंबेडकरांना मानतात, संविधानाला मानतात. पण त्यांचे आंदोलन भाजपवाल्यांच्या वा संघाच्या ताब्यात जाईल. ही मंडळीच आंदोलन चालवतील अशी शंका वारंवार व्यक्त होते. या शंकांना दिपके यांनी थेट उत्तर दिलेले नाही. त्यांचे म्हणणे आहे की, आमचे आंदोलन शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात आहे, त्यात सुधारणा झाली पाहिजे. हा खरा मुद्दा आहे. आंदोलनाबाबत वेगवेगळ्या शंका घेतल्या जातात कारण आम्ही जे करत आहोत त्यापासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवायचे आहे.

शंका महत्त्वाच्या नाहीत, विद्यार्थ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. ज्यांना विद्यार्थ्यांचे म्हणणे पटते, शिक्षण व्यवस्थेत सुधारणा झाली पाहिजे असे वाटते त्या प्रत्येक राजकीय नेत्याने-पक्षाने आम्हाला पाठिंबा द्यावा. विरोधी पक्ष असो वा अन्य कोणी. भाजप नेत्यांच्या मुलांनीही नीटची परीक्षा दिली असेल. आता त्यांना दुसर्‍यांदा द्यावी लागली आहे. या मुलांनाही शिक्षण क्षेत्रातील प्रश्न भेडसावत असतील, असेही दिपकेंचे म्हणणे होते. दिपकेंचे सगळे लक्ष शिक्षण क्षेत्रावर केंद्रित झालेले आहे. त्यापलीकडे जाऊन मोठे राजकीय आंदोलन ते आत्ता तरी उभे करतील असे नाही. त्यांचे आंदोलन कुठल्या दिशेने जाते हे बघायचे. जंतर-मंतरवरून ते रामलीला मैदानावर गेले तर देशाला त्याची अधिक गांभीर्याने दखल घ्यावी लागेल.

mahesh.sarlashkar@expressindia.com