‘जंतर-मंतर-अंतर!’ हा अग्रलेख (१२ ऑक्टोबर) वाचला. सीजेपीचे आंदोलन दडपण्यासाठी जे प्रयत्न करण्यात आले, ते पाहता सीजेपीच्या तीन नेत्यांना विमानातून अटक केली जाणे कायदेशीर आहे का, हे तपासून पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पोलीस प्रशासन असे अचानक विमानात घुसू शकते का? या वेळीदेखील पोलिसांनी महिला आणि मुलींवर अत्याचार केले आहेत. त्यांचा विनयभंग केला आहे. दिल्ली पोलीस आंदोलकांवर अत्याचार करण्यासाठी टपूनच बसलेले असतात काय? नेतेमंडळी पकडली गेली तरी बाकीच्या आंदोलकांनी शक्य तिथे आंदोलन करून निषेध व्यक्त केला, ज्यामुळे ठिकठिकाणी जंतर-मंतर तयार झाले आहेत. याचा एवढा धसका दिल्ली प्रशासनाने घेतला आहे की आंदोलनस्थळांच्या यादीतूनच जंतर-मंतरला वगळण्यात आले. एकंदर देशभरात असंख्य जंतर-मंतर तयार होऊ लागल्यामुळे सरकार आणि आंदोलक यांच्यातील अंतर मात्र प्रचंड वाढले आहे.
शुभदा गोवर्धन, ठाणे</strong>
हे भित्यापाठी ब्रह्मराक्षस लागल्यासारखेच
‘जंतर-मंतर-अंतर!’ हा अग्रलेख वाचला. शांततापूर्ण आंदोलनास परवानगीची गरजच काय? या सरकारने देशात ‘स्वकीय’ शेतकरी आंदोलन करत असताना सीमेवर असते तसे काटेरी कुंपण लावले. विद्यार्थ्यांनी जंतर-मंतरवर महिनाभर शांततापूर्ण आंदोलन केले हे सरकार जाणते, तरीही पुन्हा विद्यार्थ्यांचेच आंदोलन रोखण्यासाठी ४० हजार सैनिकांचा फौजफाटा उभा करण्याची गरज का भासली? याही उपर, विचारधारेशी संलग्न बेलगाम पाळीव गुंडांची फौज आहेच दिमतीला. ही फौज भरदिवसा, कॅमेर्यासमोर, पोलिसांच्या उपस्थितीत लहान लहान मुलांवर हल्ला करत आहे, ही वस्तुस्थिती आपल्या कायदा व्यवस्थेबाबत काय सांगते? माकडाच्या हातात कोलीत दिल्यास काय परिणाम होतात याचा प्रत्यय देश आज घेतोय. एकेकाळचे तडीपार कायदा सुव्यवस्थेचे चालक-मालक होतात तेव्हा ते आपल्या अधिकारांचा निरंकुश वरवंटा फिरवण्यासाठी न्यायालयाची तमा बाळगतील अशी अपेक्षा अनाठायी नाही तर काय? म्हणतात ना भित्यापाठी ब्रह्मराक्षस, त्यामुळे जंतर-मंतर १.० ने घाबरलेल्या सरकारला दिपके व त्यांच्या कॉक्रोच साथीदारांमध्ये राक्षस दिसल्यास नवल ते काय!
ओवी भावे, पुणे
सोनारानेच कान टोचले ते बरे झाले
‘जंतर-मंतर-अंतर’ हे संपादकीय वाचले. ‘सीजेपी’ने जंतर-मंतर येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला आणि मग काय, सरकारने ते आंदोलन मोडून काढण्यासाठी आधी परवानगी नाकारली, मग विमानात घुसून नेत्यांना ताब्यात घेतले. मेट्रो स्थानके, इंटरनेट सेवा, रेल्वे, रस्ते बंद केले. सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. कोणालाही विनाकारण ताब्यात घेता येणार नाही, अशीही तंबी दिली. म्हणजे सरकारच्या अनिर्बंध हुकूमशाहीवर अंकुश ठेवण्याची सर्वोच्च न्यायालयालाही गरज वाटू लागली. इतकेच नव्हे तर ‘संयुक्त राष्ट्र मानवी हक्क रक्षण आयोगा’सही मध्यस्थी करणे भाग पडले. सोनारानेच कान टोचले ते बरे झाले. निरंकुश, मदमस्त सत्ताधीश अन्याय, अत्याचार करीत राहिले तरी आंदोलनाची व्याप्ती कमी न होता अजून वाढत राहील हे निश्चित. घटनात्मक मार्गाने आंदोलन करणार्या तरुणांना डांबून ठेवणे हे भारतासारख्या ‘लोकशाहीच्या जननी’स अत्यंत लांच्छनास्पद आहे.
उर्मिला पाटील, कल्याण</strong>
असे होणार आपण महासत्ता?
‘राम तेरी गंगा’ हा ‘नदीकारण’ या सदरातील लेख (१२ ऑक्टोबर) वाचला. आज बोटावर मोजण्याइतकेच लोक पर्यावरणाचा प्रामाणिकपणे विचार करताना दिसतात. ज्यांच्यावर पर्यावरण रक्षणाची जबाबदारी आहे, असे मोठमोठ्या पदांवर विराजमान लोक ‘जास्तीत-जास्त कसे मिळवता येईल’ याचाच विचार करतात. वाळू माफिया सारे नियम धाब्यावर बसवून त्याचा धंदा चालवतो आणि पुढे एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश करून आपल्या नियमबाह्य कृत्यांना संरक्षण मिळवून देतो. आज धर्माचा वापर मते मिळवण्यासाठी होत आहे, मात्र धर्माचा वापर करून नदी राखावी, असे धोरणकर्त्यांना वाटत नाही. भारत महासत्ता होईल की नाही, माहीत नाही, पण जर झालाच आणि या मूलभूत गोष्टीही सुधारलेल्या नसतील, तर अशा बिरुदांचा काय उपयोग?
प्रथमेश वाघ, अंबड (जालना)
संविधानाच्या चौकटीचा विसर
‘कुठले सरन्यायाधीश आंदोलकांना भेटतात?’ ही बातमी वाचली. यानिमित्ताने काही प्रश्न उद्भवतात ते म्हणजे – कोणते पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी त्यांच्या वैयक्तिक धार्मिक समारंभाला आणि आरतीला हजेरी लावतात? – संविधान आणि संस्कृतीच्या गप्पा मारणारे… पण लोकशाहीच्या पवित्र चौकटीला सोयीस्करपणे विसरणारे! कोणते माजी मुख्यमंत्री वेशांतर करून, हुडी घालून रात्री-अपरात्री विरोधी नेत्यांच्या भेटी घेतात? – दिवसा नैतिकतेची आणि उघड राजकारणाची भाषा करणारे… पण रात्रीच्या अंधारात सत्तेसाठी वेशांतर करणारे! कोणते मुख्यमंत्री सकाळी उजाडायच्या आधी छुप्या पद्धतीने आपल्या पदाची शपथ घेतात? – पारदर्शक कारभाराचा डांगोरा पिटणारे.
कालिदास भाटे, कोल्हापूर</strong>
वैज्ञानिक दृष्टिकोन कसा विकसित होणार?
संविधानाच्या अनुच्छेद २५ नुसार उपासना स्वातंत्र्याचा अधिकार वैयक्तिक आहे. पण उपासनेचा बाजार सार्वजनिक करणे हे संविधानविरोधी नाही काय? व्यक्तीच्या धार्मिक श्रद्धेचा आदर राखणे आणि त्या श्रद्धेचे सार्वजनिक प्रदर्शन यांना अवाजवी प्रसिद्धी देणे, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. माहूर गडावरील घटस्थापना, तुळजापुरात दाखल झाले हजारो भाविक, अंबाबाई किंवा विठ्ठलाच्या मूर्तीला वज्रलेप लावण्याची प्रक्रिया सुरू, अशा बातम्यांना ‘लोकसत्ता’सारख्या वर्तमानपत्राने पहिल्या पानावर स्थान द्यावे का? अशा घटनांचे वृत्तांकन करणे गैर नाही; परंतु त्यांना दिले जाणारे प्राधान्य आणि त्यामागील दृष्टिकोन तपासणे आवश्यक आहे. धार्मिक विधींची छायाचित्रे आणि बातम्या पहिल्या पानावर प्रसिद्ध करून लोकसत्ता वाचकांना कोणता दृष्टिकोन देऊ इच्छिते? संविधानाच्या अनुच्छेद ५१अ(ह) नुसार वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक वृत्ती विकसित करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे. समाजाचे वैचारिक विश्व घडवणार्या प्रसारमाध्यमांनीही या मूल्यांना पूरक भूमिका घ्यावी, ही अपेक्षा असताना लोकसत्ता दृष्टिकोन देतो सांगत असेल, तर तो दृष्टिकोन चिकित्सक विचारांना चालना देणारा आहे की धार्मिक श्रद्धेच्या सार्वजनिक प्रदर्शनाला प्रतिष्ठा देणारा, हा प्रश्न विचारायलाच हवा.
जगदीश काबरे, सांगली
आयोगाच्या ‘बुद्धिमत्ते’चा जळजळीत प्रत्यय
‘मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीतील विनोद’ हा अमलेश कणेकर यांचा लेख (११ ऑक्टोबर) वाचला. आणि काही तासांतच हा केवळ विनोद नसून क्रूर विनोद असल्याचा आणि निवडणूक आयोगाच्या ‘दिव्य बुद्धिमत्ते’चा जळजळीत प्रत्यय आला. चुकांची दुरुस्ती करवून घेण्यासाठी फॉर्म ६ भरून, विहित कागदपत्रांसहित ८ सप्टेंबर रोजी दिल्यानंतर, त्या चुकांची दुरुस्ती पडताळण्यासाठी घरी आलेल्या गृहस्थांनी दुरुस्तीचा कागद पुढे केला आणि त्यात नवी गंभीर चूक करून ठेवल्याचे आढळले.
आमच्या सोसायटीतील अनेक रहिवाशांचे पत्ते चुकीचे नोंदलेले होते, ते दुरुस्त करून घेण्यासाठी प्रत्येकाने एसआयआरच्या कार्यालयात जाऊन फॉर्म ६ व विहित कागदपत्रे दिली होती. माझाही पत्ता चुकीचा नोंदलेला होता, तसेच वडिलांचे नाव हे नवर्याचे नाव म्हणून नोंदले होते आणि आडनावाच्या स्पेलिंगमध्ये चूक केलेली होती. ‘देशपांडे’ या आडनावाचे इंग्रजी स्पेलिंग डी ई एस एच पी ए एन डी ई वाय – ‘देशपांडेय’ असे केले होते. मी पासपोर्ट व आधार कार्डाच्या प्रतींबरोबरच एका कोर्या कागदावर मोठ्या आणि सुस्पष्ट अक्षरात सगळी माहिती देवनागरी आणि रोमन लिपीत लिहून फॉर्म ६ सहित ८ सप्टेंबर रोजी कार्यालयात नेऊन दिली. त्याची त्यांनी मला पावतीही दिली. परंतु आज पडताळणीसाठी त्यांचा माणूस आला तेव्हा त्या पेपरवर दुरुस्ती केलेल्या ठिकाणी माझ्या आणि माझ्या वडिलांच्या देशपांडे या आडनावाऐवजी ‘दुबे’ असे आडनाव आढळले. ही गंभीर चूक निदर्शनाला आणून दिल्यावर हे गृहस्थ विचारतात, ‘मग हे दुबे कोण?’ हा वर्तमान व्यवस्थेचा क्रूर विनोद म्हणायचे नाही तर काय म्हणावे? रेखा देशपांडे, ठाणे
