मागे न्यू यॉर्करच्या संगीत समीक्षकाने आपल्या एका लेखात दावा केला होता, की जगातील सर्वाधिक जॅझ संगीताचे संग्राहक हे जपानमध्ये आहेत. या दाव्याची खात्री पटवून देण्यासाठी तिने जपानमध्ये जाऊन तेथील ‘रेकॉर्ड’ (तबकड्या) संग्राहकांबद्दल दीर्घ लेखही लिहिला होता. या चिमुकल्या राष्ट्राचा संग्रहसोस केवळ संगीतापुरता मर्यादित नाही. पुस्तकांच्या दुकानांचे एक ‘बुक टाउन’ जपानमध्ये सापडते. जुन्या पुस्तकांच्या दुकानांसाठी आणि इथल्या प्रकाशन संस्थांसाठी ‘जिंबोचो’ हा भाग ‘बुक टाउन’ (पुस्तकांचे शहर) म्हणून ओळखला जातो. ‘डेज अॅट द मोरिसाकी बुकशॉप’ या कादंबरी आपल्याकडे हल्ली मुराकामीच्या पुस्तकांइतकीच सहजपणे कुठेही मिळू लागलीय. त्यातले पुस्तकप्रेम ‘जिंबोचो’ या टोकियोमधल्या भागात सापडेल. आपल्यासारखा ‘पुस्तकांचा गाव’ वगैरे पर्यटन-विकासाचा थाट नसताना पुस्तकांची ऐट पाहण्यासाठी फक्त हा १८ मिनिटांचा व्हिडीओ.

https://tinyurl.com/mupk59xt

पुस्तकप्रेमी कथा…

स्टीव्ह एलट हा विनोदी आणि विचित्र विडंबन करणारा लेखक. कॉमिक आर्टिस्टसुद्धा. गेल्या वर्षअखेरीस त्याची ‘बुक लव्हर’ नावाची कादंबरी प्रकाशित झाली. त्या कादंबरीतील ‘हिडन इंक’ हे प्रकरण बार्सिलोना रिव्ह्यूच्या संकेतस्थळावर मोफत वाचायला मिळेल.

https://tinyurl.com/5n7hsrxm

पुलित्झर विजेता लेख…

‘एस्क्वायर’ या अमेरिकेतून १९३३ सालापासून निघणाऱ्या मासिकाचा आरंभीचा काळ हा लगदा मासिकांशी स्पर्धा करण्यात गेला. पुढे १९६० च्या दशकात गे तलिसच्या ‘फ्रँक सिनात्रा हॅज कोल्ड’ या लेखानंतर नव्या अमेरिकी पत्रकारितेचा पायंडा या मासिकाने पाडला. मासिकाच्या सत्तरीच्या निमित्ताने ‘एस्क्वायर्स बिग बुक ऑफ फिक्शन’ आणि ‘एस्क्वायर्स बिग बुक ऑफ ग्रेट रायटिंग’ असे उत्तम लेखनाचे खंड मासिकाने काढलेच. पण या मासिकाच्या संकेतस्थळावर अनेक गाजलेल्या लेखांचे वाचन मोफत करता येते. गेल्या आठवड्यात वृत्तलेखासाठी पुलित्झर पारितोषिकाने गौरविले गेलेला, मार्क वॉरन या पत्रकाराने केलेला शोध-लेखही येथे वाचता येईल.

https://tinyurl.com/3vmxskpf