भारतीय क्रीडारसिकांना जसपाल राणा हे नाव युवा पिस्तूल नेमबाज म्हणून पहिल्यांदा कळाले, तो काळ मोठा कठीण होता. बीजिंग येथे १९९०मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धांत यजमान चीनने १८३ सुवर्णपदकांचे शिखर गाठून दाखवले, तेथे भारताच्या नावावर होते अवघे एक सुवर्णपदक, तेही त्या स्पर्धेत प्रथमच खेळवल्या गेलेल्या पुरुष कबड्डीत! अगदी पाकिस्ताननेही चार सुवर्णपदकांसह आपल्या पुढील स्थान पटकावले होते. एरवी त्या काळी त्यांची आपल्यासमोर मातबरी केवळ हॉकीत असायची. त्या परिस्थितीविषयी उद्वेग व्यक्त करणारा ‘आकाश फाटले, आता ठिगळे लावायला (पी. टी.) उषाही नव्हती’ अशा मथळ्याखालील बहुचर्चित लेख त्या वेळी विख्यात क्रीडा पत्रकार, संपादक वि. वि. करमरकर यांनी लिहिला होता. या रखरखीत पार्श्वभूमीवर पुढील आशियाई स्पर्धेत म्हणजे हिरोशिमा १९९४ मध्ये जसपाल राणाने नेमबाजीत जिंकलेले सुवर्णपदक अवघ्या देशाला वाळवंटातील दुर्मीळ हिरव्या पालवीगत भासले यात नवल नाही. जसपाल राणा त्यावेळी अवघा १७ वर्षांचा होता. त्याच्या आधी काही वर्षे एकामागोमाग प्रकाशझोतात आलेले सचिन तेंडुलकर, विश्वनाथन आनंद आणि लिअँडर पेस या तत्कालीन युवा क्रीडारत्नांच्या मांदियाळीत आणखी एक नाव जोडले गेले, अशीच सार्वत्रिक भावना होती. जसपालने त्याच वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेतही दोन सुवर्णपदकांची कमाई केली. हॉकी, पी. टी. उषा आणि काही प्रमाणात कुस्ती व ॲथलेटिक्स यांच्यापलीकडे जाऊन नेमबाजीसारख्या खेळात जसपालने बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये निव्वळ सहभाग किंवा एखादे पदक नव्हे तर खणखणीत सुवर्णपदके जिंकण्यास सुरुवात केली. यातून भारताच्या क्रीडा मानसिकतेवर झालेला परिणाम सचिन- आनंद- लिअँडर या त्रिकुटाने घडवून आणलेल्या परिणामांपेक्षा कमी नव्हता. परवा त्याच्या अकाली जाण्याने त्या पिढीतला सर्वांत तरुण शिलेदार गवसल्याची शोकभावना त्यामुळेच सार्वत्रिक होती.

जसपाल राणाने वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि एका प्रदीर्घ कारकीर्दीची सुरुवात झाली. जसपालच्या आवडीचा क्रीडाप्रकार होता २५ मीटर सेंटर फायर पिस्तूल. पण त्याचा ऑलिम्पिकमध्ये समावेश नव्हता. इतर प्रकारांत जसपालला ऑलिम्पिकमध्ये एशियाड-राष्ट्रकुल दर्जाचे यश कधीच मिळू शकले नाही. परंतु याने त्याच्या कारकीर्दीची झळाळी कमी होत नाही. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये तो भारताचा सर्वाधिक यशस्वी खेळाडू ठरतो. एकूण १५ पदके, त्यांतील नऊ सुवर्णपदके ही कामगिरी अत्यंत कौतुकास्पद. हिरोशिमा आशियाई स्पर्धांमध्ये त्याने सुवर्ण कामगिरी केली. त्याहीपेक्षा उत्तम कामगिरी जसपालने २००६मधील दोहा आशियाई स्पर्धेत करून दाखवली. तिथे त्याने तीन सुवर्णपदके लुटली. त्या स्पर्धेदरम्यान प्रचंड ज्वर आणि निर्जलन असे स्वतंत्र दुहेरी आव्हान होते. विश्वनाथन आनंदमुळे भारतीय बुद्धिबळ विश्वात जे घडून आले, ते जसपालमुळे नेमबाजी क्षेत्रात दिसून आले. अंजली भागवत, राज्यवर्धन राठोड, सुमा शिरूर, राही सरनौबत, अभिनव बिंद्रा, गगन नारंग, समरेश जंग, विजय कुमार, जितू राय असे प्रत्येक दशकात पदकविजेते मिळाले. नवीन पिढीत मनू भाकर, रुद्रांक्ष पाटील, स्वप्निल कुसाळे ही परंपरा दिमाखात सुरूच आहे. आज निव्वळ राष्ट्रकुल-एशियाड नाही, तर ऑलिम्पिकमध्ये नेमबाजांकडून एकापेक्षा अधिक पदकांची अपेक्षा बाळगली जाते, त्यांची भूक लागण्याची आणि वाढण्याची सवय जसपाल राणामुळेच लागली.

तो फक्त खेळाडू नव्हता. वेगळ्या धाटणीचा प्रशिक्षकही होता. रोखठोक आणि परखड मतप्रदर्शन करणारा होता.  पिस्तूल-बंदुकांवरील जीएसटी सरकारने वाढवला, त्यावेळी त्या निर्णयावर कठोर टीका करणारा जसपालच होता. टोक्यो २०२० ऑलिम्पिकमध्ये नेमबाजांची, विशेषत: मनू भाकरची कामगिरी अतिशय खराब झाली. त्याचा ठपका तिच्यासकट नेमबाजी संघटना व माध्यमांनीही जसपालवर ठेवला. कालांतराने त्याच मनूला जसपालचीच मदत घ्यावीशी वाटली. जसपालने कटुता बाजूला ठेवून तिला मदत केली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनूला दोन पदके मिळाली. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती एकमेव भारतीय. ही जसपाल राणाची जादू होती. त्याच्या पश्चातही तिचा प्रभाव पुढील कित्येक वर्षे दिसून येईल.