With Voltaire it will be the old world that ends, while with Rousseau it is a new world that begins. – Goethe
‘डिस्कोर्स ऑन द आर्ट्स अॅण्ड सायन्सेस’ या १७५० मध्ये प्रकाशित झालेल्या निबंधामुळे पाश्चात्त्य वैचारिक जगतात ऐतिहासिक खळबळ माजते. या निबंधाच्या एकूणच प्रक्षोभक आणि स्फोटक आशयामुळे ३८ वर्षांचा अनामिक लेखक अचानक प्रकाशझोतात येतो. या निबंधाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील आशय फक्त प्रतिगामी छावणीच्या विरोधातच जात नसून पुरोगामी छावणीलाही सुरुंग लावणारा ठरतो. दोन्ही टोकांच्या छावण्यांना अंगावर घेण्याचं कौशल्य दाखवणारा हा लेखक म्हणजे जिनेव्हात जन्मलेला आणि दाहीदिशा भटकून पॅरिसमध्ये आलेला जाँ जॅक रूसो (१७१२- १७७८). स्वयंशिक्षित, सर्वार्थानं ‘बाहेरचा’ मानल्या जाणाऱ्या रूसोच्या लिखाणात व्होल्तेर, दिदरो, कांट, ह्यूमसारख्या उच्चशिक्षित तत्त्वज्ञांची अभिजात शिस्त नसली तरी त्याच्या विचारांत कमालीचं सामर्थ्य आढळतं. त्याच्या लिखाणाची दखल प्रबोधनपर्वाच्या धुरिणांना घ्यावी लागते.
याआधी आपण पाहिलं की १८व्या शतकातल्या प्रबोधनपर्वाच्या पूर्वार्धात अभिजनांमध्ये वावरणाऱ्या व्होल्तेरची छाप आणि दबदबा होता. मात्र १७५० मध्ये रूसो अभिजन वर्ग म्हणजे कृत्रिम, भ्रष्ट, विकृत, चलाख, लबाड, दुर्गुणी, स्वार्थी, अन्यायी लोकांचा पतित समूह असं चित्र रेखाटून दीनदुबळ्या, खचलेल्या आणि पिचलेल्या सर्वसामान्य लोकांचा कैवार घेणारा लोकप्रिय तत्त्वज्ञ म्हणून विराजमान होतो. प्रबोधनपर्वाच्या उत्तरार्धातील रूसोच्या क्रांतिकारक विचारांची लोकप्रियता आणि त्याचा साहित्य, कला आणि समाज राजकारणावरील वाढता प्रभाव पाहता प्रसिद्ध जर्मन लेखक ग्योयथं लिहितो की व्होल्तेरसह एका जगाचा शेवट तर रूसोसह दुसऱ्या जगाची सुरुवात झाली. इथे, ग्योयथं प्रबोधनपर्वातल्या बुद्धिवाद (rationalism) नि भावनावाद (sensibility) यांच्यातलं द्वंद्व अधोरेखित करतो. ‘प्रबोधनपर्वाचा तत्त्वज्ञ’ वा ‘फ्रेंच राज्यक्रांतीचा प्रमुख शिल्पकार’ असा रूसोचा उल्लेख केला जात असला तरी त्यानं प्रबोधनपर्वावर आतून चढवलेल्या हल्ल्यामुळे त्याला ‘प्रबोधनपर्वाचा प्रमुख टीकाकार’ म्हणून विशेष स्थान आहे. त्यामुळे लुई अल्तुसर रूसोचा उल्लेख Enemy from within असा करतो. एकूणच रूसोच्या लिखाणाकडे प्रबोधनपर्वाची आत्मटीका ( autocritique) म्हणून पाहिलं जातं. ते कसं, याच्या प्राथमिक चर्चेसाठी या लेखात १७५० मधल्या रूसोच्या Discourse on the Arts and Sciences या निबंधाचा परामर्श घेऊ.
महत्त्वाच्या प्रश्नांवर सार्वजनिक अवकाशात चिकित्सक चर्चा घडवून जनमत घडवण्याचं काम १८ व्या शतकात वर्तमानपत्रं आणि विविध अकादम्या नियमितपणे करत. अशाच बौद्धिक प्रथेचा भाग म्हणून दिजोंच्या ( Dijon) प्रतिष्ठित अकादमीनं Mercure de France या वर्तमानपत्रात ऑक्टोबर १७४९ मध्ये निबंध स्पर्धेची जाहिरात दिली. ‘रनेसॉन्सच्या चळवळीनंतर पुनरुत्थित झालेल्या ज्ञान, विज्ञान, कला साहित्य क्षेत्रात मनुष्याने साधलेली प्रगती उपकारक की अपकारक ठरली आहे,’ या आशयाच्या प्रश्नाभोवती या स्पर्धेत निबंध अपेक्षित होते. त्या दरम्यान पॅरिसमध्ये वास्तव्यास असणारा रूसो दिदरो या प्रसिद्ध विचारवंतांच्या L’ Encyclopé die या महत्त्वाकांक्षी ज्ञानप्रकल्पासाठी लिखाण करत होता. भौतिकवादी आणि नास्तिक दिदरोला त्याच्या धर्मनिंदक लिखाणामुळे कैदेची शिक्षा होऊन व्हॅन्सेन तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. दिदरो रूसोचा जवळचा मित्र असल्यानं रूसो नियमितपणे पॅरिस नजीकच्या जंगलातून पाच-सहा किलोमीटर पायी चालत, व्हॅन्सेन तुरुंगात त्याला भेटत असे. अशाच एका तुरुंग-भेटीपूर्वी त्या निबंध स्पर्धेविषयी रूसोनं वाचून, हातात ते वर्तमानपत्र घेऊनच तो नेहमीप्रमाणे चालत जातो. वाटेत थकवा जाणवल्यानं एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबतो; तो ‘विज्ञान आणि कलेचं पुनरुत्थान मानवतेसाठी उपकारक की अपकारक?’ या निबंध स्पर्धेच्या प्रश्नाभोवती निर्माण झालेलं विचारांचं वादळ डोक्यात घेऊनच. त्याला अचानक साक्षात्कार होतो. डोक्यात विचारांचा स्फोट होऊन जणू मानवतेचा इतिहासपूर्व आणि इतिहासातला समग्र प्रवास डोळ्यांसमोरून विजेसारखा कडाडून जातो. रूसोनं स्वत: हा सगळा प्रसंग त्याच्या भावनाप्रधान शैलीत उतार वयात लिहिलेल्या Confessions या आत्मकथनपर पुस्तकात लिहून ठेवला आहे. जणू वयाच्या ३८ व्या वर्षी एखाद्या प्रेषितासारखं रूसोला ‘हृदयाचं धर्मशास्त्र’ हाती लागतं, जे तो अकादमी ऑफ दिजोंने जाहीर केलेल्या स्पर्धेसाठी निबंधस्वरूपात लिहितो.
प्रबोधनपर्वाची आत्मटीका
रूसोचा Discourse on the Arts and Sciences हा निबंध वाचताना प्रकर्षानं जाणवतं की, रूसो प्रबोधनपर्वाचं शीर्षस्थ नेतेपदी पोहोचलेल्या व्होल्तेरच्या Le mondain या दीर्घ कवितेला उत्तर देत आहे. मागच्याच लेखात आपण पाहिलं की व्होल्तेर ज्ञान, विज्ञान, कला, साहित्यातील प्रगतीइतकाच समृद्ध नागरी सभ्यतेचा गौरव करतो. व्होल्तेरसाठी १८ व्या शतकातला उच्चविद्याविभूषित, कलासक्त, समृद्ध नागरी मनुष्य म्हणजे इतिहासाच्या प्रगतिशीलतेचा साक्षात पुरावा आहे. रूसो मात्र ‘प्रगती’ या आधुनिकतेच्या मध्यवर्ती संकल्पनेलाच सुरुंग लावून सरळ व्होल्तेरच्याच विरोधात उभा ठाकतो. रूसोला जाणीव असते की त्याची वादग्रस्त भूमिका एकाच वेळी परंपरावाद्यांची कोंडी आणि प्रबोधनपर्वाच्या मूलभूत धारणांवर प्रहार करणारी आहे. रूसो निबंधाच्या सुरुवातीलाच नमूद करतो, ‘विज्ञान, कला, साहित्याचं पुनरुत्थान व प्रगती मनुष्यासाठी उपकारक की अपकारक, या प्रश्नाची चिकित्सक चर्चा करताना माझ्याकडून कुठल्या भूमिकेचं समर्थन अपेक्षित आहे? ज्ञानाचं प्रतीक समजल्या जाणाऱ्या एका महत्त्वाच्या युरोपीय अकादमीसमोर ज्ञानालाच दोषी ठरवून अज्ञानाचा गौरव करण्याचं धाडस कसं काय कुणी करू शकेल? खरं तर, या निबंधात माझा हेतू ज्ञानाचा दुस्वास करणं नसून सद्गुणाचं रक्षण आणि समर्थन करणं आहे. कारण कुठल्याही सद्गुणी माणसासाठी विद्वतेपेक्षा सचोटी आणि प्रामाणिकपणा प्रिय असतो. त्यामुळे माझ्या नैसर्गिक बुद्धीच्या प्रकाशात मला जे सत्य दिसतंय ते मी कुठल्याही मानसन्मानाचा विचार न करता मांडेन. तसंही, माझा खरा मानसन्मान मला माझ्या अंत:करणाच्या गाभाऱ्यातच लाभणार आहे.
चहुबाजूंनी जखडून ठेवणारा काळोख भेदून, स्व-बुद्धीच्या प्रकाशाच्या मदतीनं निसर्गावस्थेतल्या मनुष्याचं बाहेर पडणं, त्याच्या क्षमतांचा सतत उत्कर्ष होत जाणं, बुद्धीच्या बळावर त्याचं आकाशात भरारी घेणं, अख्खं जग पालथं घालणं, हे सगळं स्तिमित करणारं आहे. मनुष्याला स्वत:च्या प्रयत्नांनी असं शून्यातून बाहेर पडताना पाहणं हे एक अद्भुत, सुंदर दृश्य आहे. त्याहीपेक्षा अवघड आणि अद्भुत बाब म्हणजे स्वत:च्या अंतरंगात प्रवेश करून मनुष्यानं एकूणच मानवी प्रकृतीचा अभ्यास करण्याचा केलेला प्रयत्न. खरं तर, काही शतकांपूर्वीच आजच्या जगाच्या प्रबुद्ध भागातले लोक अज्ञानापेक्षा भयंकर परिस्थितीत जगत होते. कॉन्स्टंटटिनोपलच्या पाडावामुळे त्यांच्यापर्यंत प्राचीनांचं ज्ञान पोहोचलं. फ्रान्ससुद्धा समृद्ध झाला. वैचारिक प्रगतीसह वैज्ञानिक प्रगती झाली. लिहिण्याच्या कलेपाठोपाठ विचार करण्याची कला अवगत झाली.’
अतिशय प्रभावीपणे पूर्वपक्षाची मांडणी करताना रूसो जणूकाही दिजोंच्या अकादमीने उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या समर्थनार्थ भूमिका मांडत आहे असं वाटतं. पण नंतर दीर्घ विवेचनात त्याचा सिद्धांत पक्ष अभिव्यक्त होतो. रूसो स्पष्टपणे उच्चविद्याविभूषित बुद्धिवादी, नागरी, वैभवशाली, समाजशील अर्थात ‘अनैसर्गिक’ माणूस आणि साधाभोळा, प्रांजळ, ग्राम्य, सद्गुणी अर्थात ‘नैसर्गिक’ माणूस यांतला अंतर्विरोध अधोरेखित करून नैसर्गिक माणसाची बाजू घेतो. रूसो नमूद करतो की प्रगत समाजशील नागरी माणसांना एकमेकांना रुचेल, पचेल आणि भावेल अशी कृत्रिम समाजशीलता विकसित करावी लागते; म्हणून त्याची वागणूक नैसर्गिक, पारदर्शक आणि प्रामाणिक नसते. युक्तिवाद करताना रूसो अनेक ऐतिहासिक उदाहरणं देतो. एकीकडे, प्राचीन काळातल्या कलासंपन्न, वैभवशाली, विलासी नागरी सभ्यतेचं प्रतीक अथेन्स म्हणजे रूसोच्या ‘मानवी विकृतीचं ऐतिहासिक उदाहरण’ ठरतं. दुसरीकडे ग्राम्य, शारीरिक कष्टांना प्राधान्य देणारं, साधं राहणीमान असलेलं स्पार्टा हे ‘नैसर्गिक आदर्शवत जीवनाचं प्रतीक’. त्या काळातला – १८व्या शतकाचाच विचार करायचा झाला तर रूसोला पॅरिस म्हणजे ‘मानवी पतनाचं द्याोतक’ आणि त्याची मायभूमी जिनेव्हा म्हणजे ‘निसर्गाच्या कुशीतल्या नैसर्गिक जीवनाची शक्यता जिवंत असलेलं रिपब्लिक’!
निबंधाच्या शेवटी रूसो लिहितो, ‘सद्गुण म्हणजे साध्या माणसांचं सर्वोच्च विज्ञान असतं! ते जाणून घेण्यासाठी फार कष्टांची आणि पूर्वतयारीची आवश्यकता आहे का? ही सदाचाराची नैतिक तत्त्व सगळ्यांच्याच अंतकरणात कोरलेली नसतात का? त्यांना जाणून घेण्यासाठी फक्त स्वत:च्या अंतकरणात शिरून शांतचित्त ठेवून अंतरात्म्याचा आवाज ऐकणं पुरेसं नाही का? खरं तर, हेच खरं तत्त्वज्ञान आहे ज्याच्यात आपण समाधान मानलं पाहिजे. त्यासाठी, ‘रिपब्लिक ऑफ लेटर्स’च्या अजरामर विद्वानांच्या कीर्तीचा हेवा वाटण्याची काहीही आवश्यकता नाही. … कारण हे समाजशील नागरी विद्वान नेहमी स्वत:च्या बाहेर अर्थात इतरांच्या नजरेत जगत असतात. हळूहळू त्यांचा साधेपणा, सचोटी, प्रांजळपणा, पारदर्शकता विसरून ते सामाजिक स्वीकृती आणि मान्यता मिळवण्यासाठी इतरांना रूचेल, पचेल आणि भावेल असे मुखवटे बदलत जातात. थोडक्यात, त्यांना त्यांच्या भावविश्वाचा खून करून चलाख, भ्रष्ट, लबाड, विकृत दुर्गुणी व्हावं लागतं. आधुनिकतेच्या प्रक्रियेत रनेसॉन्स, विज्ञानवाद, अभिजातवाद आणि विवेकवादी प्रबोधनपर्वामुळे मनुष्याची काही बाबतीत सुटका झाली असली तरी त्याच्या भावविश्वाचं दमन होऊन त्याला मोठी किंमत मोजावी लागली आहे.
आधुनिकतेची ‘किंमत’?
भावनांना आवर घालणं किंवा भावनांचं अवमूल्यन करणं विज्ञानवाद आणि अभिजातवादात अभिप्रेत असल्यानं मानवी भावनांची ऐतिहासिक गळचेपी झाली आहे. भावनाशून्य आधुनिक माणूस अनुभूती घेण्याची क्षमता गमावून कोरडी तार्किकता विकसित करताना दिसतो. त्यामुळे माणसाची नैसर्गिक प्रकृती जणूकाही नजरेआड झाली आहे. मानवी प्रकृतीच्या पुनर्वसनासाठी निसर्गावस्थेतला साधाभोळा, प्रांजळ, पारदर्शक अर्थात नैसर्गिक मनुष्याचा शोध घेणं अनिवार्य आहे. थोडक्यात, रूसोचा हा ऐतिहासिक निबंध म्हणजे प्रबोधनपर्वाच्या दमनकारी बुद्धिवादाच्या विरोधात शक्तिशाली भावनावादी ( Sensibilité) उद्रेक आहे. त्यामुळे या निबंधाकडे रोमॅन्टिसिझ्म या भावनाप्रधान सौंदर्यशास्त्राचा जाहीरनामा म्हणूनही पाहिलं जातं. रूसोला या निबंधासाठी प्रथम पारितोषिक मिळालंच; पण ज्या नागरी समाजावर तो प्रहार करतो त्या समाजातूनच प्रसिद्धी, मानसन्मान मिळाले. पुढल्या लेखात रूसोच्या अंतर्विरोधात्म विचारविश्वाची सविस्तर चर्चा करू.
