‘‘प्रिन्स (आता राजे) चार्ल्स आणि डायना यांच्या घटस्फोटाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर डायनाला मी तिच्या कारपर्यंत सोडले. दोनेक दिवसांनी ती म्हणाली- ‘त्या दिवशी घरी गेले आणि नुसती टीव्हीसमोर बसले कैक तास…’! तेव्हा मला जाणीव झाली, मी त्या दिवशी तिच्या घरापर्यंत जायला हवं होतं…’’ हे जेफ्री आर्चर यांनी मृत्यूपूर्वीच्या कदाचित अखेरच्या मुलाखतीत, ‘डायनाच्या भावानं लिहिलेल्या पुस्तकातला मजकूर तुम्हाला पटतो का?’ हा थेट प्रश्न टाळण्यासाठी दिलेले उत्तर! समोरच्याला गुंगवून टाकणारी कथानके रचणारे आणि सुमारे ३३ कोटी प्रती इतका खप असलेली ४० पुस्तके लिहिणारे हेच ते आर्चर. लेखक म्हणून यशस्वीच, पण यश आणि प्रामाणिकपणा यांचा संबंध असलाच तर तो कामापुरता असतो, याची ग्वाहीच त्यांच्या ८६ वर्षांच्या आयुष्यातून मिळावी असे. ब्रिटनमधल्या डायना, मार्गारेट थॅचर, जॉन मेजर अशा बड्या व्यक्तींशी आपली कशी जवळीक होती हे सांगण्याची- आणि त्याद्वारे आपले महत्त्व वाढवण्याची एकही संधी न सोडणारे आर्चर. ते गेल्यानंतर त्यांची काळी बाजूसुद्धा उगाळणे, हीच त्यांच्या लेखनप्रपंचाला खरी आदरांजली ठरेल; असे कसे?
याचे उत्तर त्यांची पुस्तके वाचलेल्यांना माहीत असेल. त्यांच्या कादंबर्यांचे नायक (किंवा खरे तर प्रतिनायकच) बहुतेकदा सामान्य कुटुंबांतून किंवा प्रतिकूल परिस्थितीतून आलेले, पण महत्त्वाकांक्षी. आकांक्षा पूर्ण करायच्या तर बुद्धी हवी. संधी हेरून ती टिपण्याइतका चटपटीतपणा हवा आणि परिणामांचा विचार न करण्याचा बेदरकारपणासुद्धा. हे सारे आर्चर यांच्याकडेही होते. त्यांच्या कादंबर्यांतील मध्यवर्ती पात्रांच्या वाटचालीत सापशिडीच्या खेळातल्यासारखे कधी खाली/ कधी वर असे प्रसंग कसकसे घडत जातात, हा भाग वाचकांना गुंगवून ठेवणारा. त्यांच्या पहिल्याच ‘नॉट अ पेनी मोअर, नॉट अ पेनी लेस’मध्ये ‘आमच्या कंपनीला भूगर्भात तेलसाठा सापडला’ अशी खोटी माहिती देऊन कंपनीचा प्रवर्तकच चौघा गुंतवणूकदारांना बुडवतो, पण हे चौघे त्याचा वचपा काढतात. किंवा ‘केन ॲण्ड अबेल’मध्ये पोलंडहून निर्वासित म्हणून अमेरिकेपर्यंंत पोहोचलेला अबेल हा गर्भश्रीमंत केनपेक्षाही अधिक कमाई करण्याच्या स्वप्नाचा यशस्वी पाठलाग करतो. पुढे ‘द प्रॉडिगल डॉटर’मध्ये या अबेलची मुलगी केनच्या मुलाशी लग्न करून, अमेरिकेची पहिली महिला राष्ट्राध्यक्ष होण्याचे स्वप्न पाहते. खुद्द आर्चर यांनाही २९ व्या वर्षीच ब्रिटिश पार्लमेंटची निवडणूक जिंकल्यावर, ब्रिटनचे पंतप्रधान होण्याची आकांक्षा होती म्हणतात. पण ती खासदारकीच ऊटपटांग आर्थिक उद्योगांमुळे सोडणे त्यांना भाग पडले. दिवाळखोर आर्चर मग कादंबरीलेखनाकडे वळले. वयाच्या पन्नाशीनंतर, ओळखींमुळे उमरावकी मिळवून पार्लमेंटच्या हाउस ऑफ लॉर्ड्समध्ये त्यांनी प्रवेश केलाच; पण दहा वर्षांपूर्वी कुणा देहविक्रेतीला तब्बल २० हजार पौंड दिल्याच्या खटल्यातून स्वत:ची सोडवणूक करून घेण्यासाठी आर्चर यांनी मित्राकरवी खोटी साक्ष देववल्याचे तेव्हाच उघड झाले आणि त्यांना चार वर्षांची कैद झाली. तुरुंगातून दोन वर्षांनी चांगल्या वर्तणुकीपायी ते सुटले, त्यावर ‘प्रिझन डायरीज’चे तीन खंड- तेही दान्ते या महाकवीची शीर्षके वापरून- त्यांनी लिहिले.
‘मी गोष्ट सांगणारा माणूस (स्टोरीटेलर) आहे’ असे आर्चर नेहमी म्हणत. त्यांचे टीकाकार- विशेषत: वाङ्मयसमीक्षक मंडळी या तथाकथित बढाईचे वाभाडे काढत. आर्चर हे पात्रांची व्यक्तिमत्त्वे शब्दांतून साकारण्यात नेहमीच कसे कमी पडतात, शैलीचा दुष्काळच या लिखाणात कसा जाणवतो वगैरे मुद्दे समीक्षकांनी मांडलेले आहेत. आणि तरीसुद्धा वाचकांना जेफ्री आर्चर कधी ना कधी आवडलेले असतात. ‘पुढे काय होणार’ ही उत्कंठा कायम ठेवणारे, वर्णने किंवा चर्चा यांपेक्षा एकापाठोपाठ घडणार्या घटनांवर भर देणारे लिखाण आर्चर यांनी केले, त्यात संवाद होते तेही घटना उलगडण्यापुरतेच. ही लेखनयुक्ती त्यांना पाच ते नऊ वर्षांच्या मुलांसाठी तीन गोष्टींची मालिका लिहितानाही उपयोगी पडली असावी. लिखाण दररोज किमान चार तास करणार्या आणि ब्रिटिश सभ्यपणा पाळूनही अगत्य, पाहुणचार यांत कुठेही कमी न पडणार्या आर्चर यांनी नसत्या लटपटी केल्याच कशाला, हा प्रश्न त्यांच्या चरित्रकारांनाच नव्हे तर समाजशास्त्रज्ञ आणि मनोवैज्ञानिकांनाही पडावा. ट्रम्प यांच्याबद्दल, ‘तीन चतुर्थांश अमेरिकन मूढच असल्याने ते जिंकतील’ असे आर्चर म्हणाले होते… हेच समीकरण या लटपट्या लेखकाच्या लोकप्रियतेला लागू पडते किंवा कसे, याचे गूढही कुणी तरी उकलावेच!
