जेनिफर पेस यांची ओळख केवळ लिएंडर पेसच्या आई एवढी मर्यादित कधीच नव्हती. सत्तरच्या दशकात जेव्हा महिलांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान तुलनेने नगण्य होते, तेव्हा त्यांनी राष्ट्रीय स्तरावर खेळाडू म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. तीदेखील अशा खेळात जो आजही भारतात क्रिकेट, फुटबॉल, हॉकीएवढा सर्रास खेळला जात नाही. १९७० मध्ये त्या भारतीय महिला बास्केटबॉल संघाच्या कप्तान झाल्या. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांत भारताचे नेतृत्व केले.
त्या मूळच्या जेनिफर डुटन. विख्यात बंगाली कवी मायकेल मधुसूदन डुटन हे त्यांचे खापरपणजोबा. पण जेनिफरने वसा घेतला तो मामा गार्नी निस यांचा. हॉकी, क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस, स्पीड स्केटिंग, ॲथलेटिक्स अशा अनेक खेळांत गार्नी यांनी प्रावीण्य संपादन केले होते. पुढे जेनिफरचा विवाह हॉकीपटू वेस पेस यांच्याशी झाला. मूळचे गोव्याचे असलेले वेस हे उच्च शिक्षणासाठी कोलकाता येथे होते. तिथेच त्यांच्या हॉकी क्षेत्रातील कारकीर्दीला सुरुवात झाली.
जेनिफर यांच्या अंगभूत क्रीडा कौशल्यांना पोषक वातावरणही लाभले. त्यांनी कोलकाता येथे स्थानिक पातळीवर बास्केटबॉल खेळण्यास सुरुवात केली. शिस्त आणि कठोर परिश्रमांच्या बळावर खेळात प्रावीण्य संपादन करत त्या भारताच्या राष्ट्रीय महिला बास्केटबॉल संघाच्या कप्तान झाल्या. भारतात महिला व्यावसायिक बास्केटबॉल खेळू लागल्या १९७०च्या सुमारास. जेनिफर यांनी पदार्पण केले तेव्हा हा खेळ महिलांसाठी नवाच होता. त्यामुळे देशात महिलांसाठी बास्केटबॉलची पायाभरणी करणार्यांपैकी त्या एक होत्या, असे म्हणता येईल. भारतीय महिला बास्केटबॉल संघाने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले ते १९८२च्या आशियाई क्रीडा स्पर्धांतून. या संघाचे नेतृत्व जेनिफर यांनी केले.
ज्या काळात महिला खेळाडूंची कारकीर्द अल्पजीवी ठरत असे, विवाह, तंदुरुस्तीचा अभाव, मुलांचे पालन-पोषण अशा या ना त्या कारणाने क्रीडा कारकीर्दीला अकाली पूर्णविराम मिळत असे, अशा काळात जेनिफर मात्र प्रदीर्घ काळ राष्ट्रीय स्तरावर बास्केटबॉल खेळत राहिल्या. लिएंडर, जॅकी आणि मारिया या तीन अपत्यांच्या जन्मानंतरही त्यांनी खेळात खंड पडू दिला नाही. भारतीय महिला बास्केटबॉलच्या आधारस्तंभ ठरल्या. पश्चिम बंगाल बास्केटबॉल असोसिएशनलाही (डब्ल्यूबीबीए) मार्गदर्शन करत राहिल्या.
जेनिफर यांनी १९७२ मध्ये भारतीय महिला बास्केटबॉल संघाचे ऑलिम्पिक्समध्ये नेतृत्व केल्याचे दावे केले जातात, मात्र प्रत्यक्षात भारतीय महिला बास्केटबॉल संघ काधीही ऑलिम्पिक्ससाठी पात्र ठरलेला नाही. मात्र ज्या १९७२च्या म्युनिक ऑलिम्पिक्समध्ये जेनिफर यांचे पती वेस पेस यांनी कांस्य पदक पटकावले होते, त्या स्पर्धेवेळी जेनिफर त्यांच्याबरोबर गेल्या असाव्यात आणि त्यामुळे असा गैरसमज पसरला असावा, असे क्रीडा क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात ऑलिम्पिक्समध्ये महिला बास्केटबॉलचा समावेश १९७६ मध्ये झाला. त्यामुळे १९७२ मध्ये जेनिफर यांनी त्या स्पर्धेत भारताचे नेतृत्व केले असण्याची शक्यता नाही.
कर्करोगाने १८ मे रोजी त्यांचे निधन झाले. एक उत्तम बास्केटबॉलपटू आणि एका ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूची आई म्हणून त्यांचे योगदान प्रेरणादायी ठरले.
