‘अमेरिकी जातिव्यवस्था’ अशा शब्दांत ज्येष्ठ पत्रकार इसाबेल विल्कर्सन यांच्यासह अनेक अभ्यासकांनी जिचे वर्णन केले आहे, ती वर्णभेदी समाजव्यवस्था बदलण्यासाठी जेसी जॅक्सन लढले. तेही अशा काळात, जेव्हा या व्यवस्थेचे तोटे सहन करणार्या समाजघटकाला साधा मतदानाचा अधिकारसुद्धा नव्हता. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर यांनी मोठा अहिंसक लढा उभारून हा अधिकार मिळवून दिला, त्या चळवळीत किंग यांच्यासह होतकरू मदतनीस म्हणून जॅक्सन यांनी काम केले होते. मताधिकार अखेर १९६५ च्या कायद्याने दिला; पण भेदाची ‘व्यवस्था’ बदलली नाही, गरिबी विषमता आणखी तीव्र होत असताना या अख्ख्या समाजघटकाला बोल लावण्याचे प्रकार सुरूच होते. ‘सर्वच काळे गुन्हेगार नसतील, पण सर्व गुन्हेगार काळेच कसे असतात’ वगैरे अंतिमत: समाजविरोधीच ठरणारे युक्तिवाद केले जात होते आणि मार्टिन ल्यूथर किंग यांची भ्याड हत्या करून जणू ‘वधा’चे समाधान मिळवले जात होते.
संपूर्ण वेळ समाजासाठीच द्यायचा ठरवून चर्चच्या कामात जेसी जॅक्सन सहभागी झाले, किंग यांच्यासारखा मार्गदर्शक आता नाही या जाणिवेनेही असेल पण बायबलमधील एकोपा आणि समतेच्या शिकवणींनाच आदर्श मानू लागले आणि ख्रिस्ती रेव्हरंड झाले. त्याआधी मात्र, विशीदेखील गाठली नसलेल्या जेसीने ‘तुम्ही तुमच्या देवाला तुमच्या चळवळीतून प्रसन्न करेस्तोवर अनंतकाळ उलटेल’- असे खरमरीत पत्र थेट किंग यांनाच लिहिले होते! किंबहुना त्यामुळेच किंग यांनी या पोराच्या विद्रोहाला विधायक वाटेवर नेले. ती वाट जेसी जॅक्सन यांनी कधीही सोडली नाही- उलट रुंद केली आणि राजकीय समतेपर्यंत नेऊन भिडवली.
या वाटचालीत अनेक वस्त्यांमध्ये चर्चच्या वतीने भूकनिवारण आणि स्वयंरोजगार-संधी शोधण्याचे काम, मग डेट्रॉइटच्या कारखान्यांत काळ्या कामगारांनाही गोर्यांप्रमाणेच कौशल्याधारित रोजगार व अन्य हक्क मिळवण्यासाठी संघटना बांधणी, इथपासून ते १९८८ मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी दुसरी पसंती (प्रत्यक्ष उमेदवारी मिळाली नाही, तरी राजकीय प्रभाव) असे चढते टप्पे आले. डेमोक्रॅटिक पक्षासाठी मोठ्या प्रमाणावर मतदारांची नोंदणी जॅक्सन यांनी १९८३ पासून सुरू केली. मग या पक्षातर्फे राष्ट्राध्यक्षपद उमेदवारीच्या शर्यतीत १९८४ मध्ये ते उतरले. तेव्हा तिसर्या क्रमांकावर गेले, पण त्या वेळच्या त्यांच्या भाषणांनी समतेचा संदेश सर्वदूर नेला. ‘इंद्रधनुष्याच्या रंगांप्रमाणे निराळे दिसूनही एक राहू’ हे त्यांचे आवाहन भिडणारे होते. तर १९८८ मध्ये पुन्हा संधी हुकली तेव्हा पक्षांतर्गत पराभव स्वीकारतानाचे त्यांचे ‘कीप होप अलाइव्ह’ हे शब्द जणू मंत्रासारखे घुमत राहिले… पुढे ओबामांचा विजय होईपर्यंत!
हीनत्वदर्शक ‘निग्रो’ हा शब्द बाद करून आम्हाला ‘ब्लॅक’ म्हणा, ही मागणी अमेरिकेत रुजली होतीच आणि त्यातून १९६६ सालची ‘ब्लॅक पँथर’ चळवळही कॅलिफोर्नियातून सुरू झाली होती. पण ब्लॅक/ व्हाइट हे भेदत्वदर्शक शब्द नकोत, यासाठी अमेरिकी कृष्णवर्णीयांना ‘आफ्रिकन अमेरिकन’ हे संबोधन जॅक्सन यांनी रुजवले. त्यासाठी ७५ ‘ब्लॅक’ संघटना/ संस्थांची सभाच जॅक्सन यांनी बोलावली. या १९९० सालच्या बदलाचा, पुढल्या दशकभरात भारतीयांनाही मिळालेला लाभ म्हणजे, ‘ब्राउन’ किंवा ‘पीपल ऑफ कलर’ असा उल्लेख न होता भारतीय वंशाच्या अमेरिकनांना ‘पीआयओ’ (पीपल ऑफ इंडियन ओरिजिन) म्हणणेही सहज रुळले. समाजव्यवस्था बदलणे ही अव्याहत प्रक्रिया आहे, म्हणून आशा – आणि आकांक्षासुद्धा- नेहमीच तेवती असायला हवी हा संदेश जीवनातून देऊन, वयाच्या ८४ व्या वर्षी रे. जॅक्सन निवर्तले.
