जेम्स क्लीव्हलँड ओवेन्स. जन्म १२ सप्टेंबर, १९१३. आज त्यांची १२३ वी जयंती. या अमेरिकी धावपटूचे पराक्रम केवळ क्रीडा क्षेत्रापुरते मर्यादित नाहीत. त्यांच्या मैदानावरील कामगिरीने जागतिक पातळीवर सामाजिक इतिहास घडवला, म्हणून त्यांचे संस्मरण औचित्याचे.

कृत्रिम प्रज्ञेने सध्या ऐंशीच्या दशकात शिरण्याची टूम काढली आहे. आपल्या आत्ताच्या प्रतिमांचे बॉलिवूडी संस्मरण. पण, ते कृत्रिमच. बनवलेले. खरे नाही. त्या दशकातील खर्‍या स्मरणीय दृश्यांच्या मालिकेत काही ठळक दृश्ये असतील, तर ती कृष्णधवल दूरचित्रवाणी संचावरची. त्या दशकातील प्रतिमांचा नैसर्गिक आठव प्रामुख्याने दूरदर्शनचा. त्यावरच्या खेळाडूंवरील मालिकांत जशी नादिया कोमानीचवरील मालिका आठवते, तशी आणखी एक ठळकपणे आठवणारी जेसी ओवेन्सवरची. जेम्स क्लीव्हलँड ओवेन्स. जन्म १२ सप्टेंबर, १९१३. म्हणजे आज त्यांची १२३ वी जयंती. या अमेरिकी धावपटूने जे पराक्रम केले, ते केवळ क्रीडा क्षेत्रापुरते मर्यादित राहिले नाहीत. त्यांच्या मैदानावरील कामगिरीने जागतिक पातळीवर सामाजिक इतिहास घडवला, म्हणून त्यांचे संस्मरण औचित्याचे.

जेम्स ज्या कुटुंबात जन्मला, ते ओवेन्स कुटुंब श्वेतवर्णीयांचे गुलाम म्हणून अमेरिकेत आलेले. हेन्री आणि एमा यांचा हा दहावा मुलगा. अलाबामातील जन्म, पण कुटुंबाने ‘जगण्या’साठी ओहायो राज्यात क्लीव्हलँडमध्ये स्थलांतर केले. तेथेच जेम्सचा जेसी झाला. जे. सी. (जेम्स क्लीव्हलँड) ही अद्याक्षरे नसून, ‘जेसी’ असेच त्याचे नाव असल्याचे त्याच्या शाळेतील शिक्षकांना वाटले, आणि तेच रुढ झाले. अधिकृतपणे त्याचे ॲथलेटिक्समधील करिअर सुरू झाले १५व्या वर्षी. पण, त्याच्या पायांना मैदानाचा लळा त्या आधीच लागला होता. ओवेन्स यांनी एकदा असे नमूद केले होते, की त्यांना लहानपणापासून धावायला आवडायचे, ते त्यात ते निपुण होते म्हणून नाही, तर धावणे ही कृती तुमची तुम्हाला तुमच्या स्वत:च्या ताकदीवर करता येते म्हणून. क्षमतेची अशी एखादी स्पष्ट स्व-जाणीव आयुष्याला दिशा देते. जेसीबाबत तसेच झाले.

शाळा, महाविद्यालय त्याने गाजवून सोडले. शंभर मीटर धावण्याची शर्यत, लांब उंडी, उंच उडी अशा प्रकारांत तो विक्रमच रचत गेला. आणि, ते रचताना ‘जगण्या’साठी तो लिफ्ट चालक, वेटर, ग्रंथालयातील मदतनीस, पंपावर पेट्रोल भरणारा अशी कामे करत होता. अपार मेहनतीनंतर त्याला ऑलिम्पिकचे दार उघडण्यास कारणीभूत ठरली, ती अमेरिकेतील मिशिगन राज्यातील ॲन अर्बरमधील बिग टेन चॅम्पियनशिप. सन १९३५ मध्ये या स्पर्धेत त्याने तीन विश्वविक्रम रचले आणि एकाशी बरोबरी केली, तेही अवघ्या पाऊण तासात या तिन्ही क्रीडा प्रकारांत भाग घेऊन.

मग आली बर्लिनची १९३६ ची ऑलिम्पिक स्पर्धा. अनेकार्थांनी ऐतिहासिक. नाझी हुकुमशहा ॲडॉल्फ हिटलरची जर्मनीवरील पकड मजबूत झाली होती, तो हा काळ. इतर देशांतील खेळाडूंपेक्षा जर्मनीचे आर्यवंशीय खेळाडू कसे श्रेष्ठ आहेत, हे ऑलिम्पिकद्वारे दाखवून देऊन त्याचा वंशवर्चस्वाचा सिद्धान्त कसा बिनतोड आहे, याचे प्रदर्शन त्याला जगाला करायचे होते. एकीकडे फॅसिझम श्रेष्ठ असल्याचे सिद्ध करण्याची हिटलरची धडपड आणि त्याला शह देण्यासाठी लोकशाही राष्ट्रांतील खेळाडूही काही कमी नाहीत, हे दाखविण्याची त्या देशांची ईष्र्या, असा हा संघर्ष.

या ऑलिम्पिककडे जगाचे लक्ष असणार होते. त्यामुळे या काळात ज्यूंच्या शिक्षांना स्थगिती होती. तसेच, जर्मनीतील प्रसार माध्यमे नाझी पक्षाच्या ताब्यात असली, तरी जर्मनांना इतर देशांच्या खेळाडूंची ओळख करून देणारी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांची खिडकी खुली होती. त्यामुळे जर्मनीतील एकतर्फी प्रसिद्धीला आपसूक शह मिळत होता. या प्रसिद्धीत सर्वांत वरचे नाव होते, जेसी ओवेन्स. त्याची माहिती, त्याच्या क्रीडा प्रकारात, त्याच्या असलेल्या दबदब्यासह प्रसिद्ध होत होती. हिटलरला मानणार्‍या कट्टर जर्मनांना ते खुपणे स्वाभाविक. कारण, जेसी एक तर अमेरिकेचा आणि त्यातून कृष्णवर्णीय. बर्लिनमध्ये तो लक्ष्यही होता आणि नायकही.

स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी काही जर्मन खेळाडूंनी पदके जिंकून खाते उघडले. हिटलर खूश होता. त्याने सर्व खेळाडूंशी हस्तांदोलन केले. त्यात जर्मनांबरोबर फिनिश खेळाडूंचाही समावेश होता. दुसरा दिवस मात्र वेगळा होता. उंच उडीची स्पर्धा. दोन कृष्णवर्णीय आफ्रिकन-अमेरिकन जोशात. इतर खेळाडूंना संधीच नाही. कॉर्नेलियस जॉन्सन आणि डेव्ह अ्ब्रिरटनने अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पटकावले. हिटलरची पंचाईत झाली. दुसरा कार्यक्रम आहे, अशी बतावणी करून तो हळूच स्टेडियममधून निसटला. मात्र, आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रात याची बातमी झालीच, तीही, ‘हिटलरचे जागतिक विक्रमवीर कृष्णवर्णीयांकडे दुर्लक्ष’ अशा मथळ्याने. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनेही हस्तक्षेप केला. जर्मन सरकारला सांगण्यात आले, की हिटलरने एक तर सर्व खेळाडूंचे अभिनंदन करावे, किंवा कोणाचेच करू नये. हिटलरने दुसरा पर्याय निवडला.

नंतरच्या दिवसांत जर्मन खेळाडूंनी चांगले यश मिळविलेही, परंतु इतर देशांचे खेळाडूही चांगले चमकत होते. लांब उडीची (त्याला आधी ‘लाँग’ऐवजी ‘ब्रॉड जम्प’ म्हटले जाई) स्पर्धा सुरू होईपर्यंत संभाव्य विजेता म्हणून जर्मनीच्या लुझ लाँगचे नाव चर्चेत होते. त्याने काही वर्षे केवळ याच क्रीडा प्रकाराचा सराव पूर्ण वेळ केला होता. तो जिंकेल, ही हिटलरलाही खात्री होती. त्याचा स्पर्धक म्हणून उतरला होता जेसी ओवेन्स. प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीतील पात्रतेसाठी २३.५ फूट उडी मारण्याचे लक्ष्य होते. लुझने ते सहज पार केले. जेसीने केवळ उडी कधी मारायची, याचा अंदाज घेण्यासाठी सराव म्हणून धावपट्टीवर धाव घेतली, तर तो त्याचा पहिला प्रयत्न आहे, असा निर्णय देऊन तो बाद (फाउल) ठरविण्यात आला. आता दोन प्रयत्न राहिले होते. दुसर्‍या प्रयत्नातही फाउल झाला. जेसीवर प्रचंड दडपण आले. तो धाव घेण्यासाठी सज्ज होताना त्याच्या खांद्यावर चक्क लुझने हात ठेवला. जणू स्वत:वर विश्वास ठेव, असेच तो सांगत होता. जेसीने तिसर्‍या उडीत थेट २६ फूट अंतर गाठले. ऑलिम्पिक विक्रमाशी बरोबरी करणारे.

अंतिम फेरीही चुरशीची झाली. लुझची पहिली उडी ७.५४ मीटर, जेसीची ७.७४. लुझचा दुसरा प्रयत्न ७.८२, तर जेसीची उडी ७.८७ मीटरवर. अंतिम प्रयत्नात लुझने जीव पणाला लावला. पण, उडी मारल्यावर मागे बघितले, तेव्हा कळले, की तो फाउल होता. जेसीचे सुवर्णपदक निश्चित झाले. पण, एक प्रयत्न बाकी होता. जेसी जीव तोडून धावला, पाय हवेत फेकून उंच उडला आणि त्याने पाय जमिनीवर टेकले, तेव्हा उडीचे अंतर भरले ८.४६ मीटर. जागतिक विक्रम!

विशेष म्हणजे जेसीची गळाभेट घेऊन त्याचे सर्वप्रथम अभिनंदन केले लुझने. एका पक्क्या जर्मनाने कृष्णवर्णीय अमेरिकी खेळाडूच्या गळ्यात हात टाकलेले छायाचित्र त्या वेळच्या जर्मनीतील परिस्थितीला छेद देणारे, म्हणूनच ऐतिहासिक होते. या लुझशी नंतर जेसीची गट्टी जमली. इतकी, की पुढील काही वर्षे ते एकमेकांना पत्र लिहित राहिले. दुसर्‍या महायुद्धात लुझ मारला गेला. पण, त्याने त्या आधीच जेसीला लिहिलेल्या पत्रात उल्लेखल्यानुसार जेसीने युद्धानंतर लुझच्या मुलाला शोधून काढून त्याची भेट घेतली. ऑलिम्पिक पदकविजेत्या उडीपेक्षा ही झेप किती तरी अंतरे पार करणारी. खेळ अशी माणसे जोडतो.

जेसी ओवेन्सने १९३६ च्या ऑलिम्पिकमध्ये १००, २०० मीटर आणि ४ बाय १०० मीटरमध्येही सुवर्णपदक जिंकले. ४ बाय १०० मीटरमध्ये तर त्याला आयत्या वेळी सहभागी व्हावे लागले. कारण काय, तर यजमान जर्मनी दुखावली जाऊ नये, म्हणून अमेरिकन संघातील दोन ज्यू धावपटूंना आयत्या वेळी वगळण्याचा झालेला निर्णय. हे एका वेगळ्याच विरोधाभासातील यश. पण, अशाच विसंगती चित्र देखणे करत असतात. एका ऑलिम्पिकमध्ये चार सुवर्णपदके मिळविण्याचा जेसीचा विक्रम १९८४ मध्ये अमेरिकेच्याच कार्ल लुइसने बरोबरी करेपर्यंत अबाधित होता. त्यानंतर हा विक्रम मोडलाही. पण, जेसीची सुवर्णपदके केवळ एका खेळाडूचे यश यापुरती मर्यादित नव्हती. जग वाटले, विभागले जात असताना, वंशवर्चस्वाच्या खुळ्या कल्पना वृद्धिंगत होत असताना त्याला दिलेली सणसणीत चपराक म्हणून ती लक्षात राहिली.

जेसीलाही त्याचा हा विक्रम असाच प्रतीत झाला होता का? त्याने त्याच्या १०० मीटर शर्यतीबाबत एके ठिकाणी म्हटले, ‘धावायला उभा राहिलो, तेव्हा एक दिवस मी इथे असावे, यासाठी घडलेल्या गोष्टींचा मी विचार करू लागलो. प्रेक्षागारात हजारो लोक होते. लक्ष विचलित होऊ शकत होते. पण, लगेच स्वत:ला बजावले, की इथे जे करायला आला आहेस, त्यावर लक्ष केंद्रित कर. मग आजूबाजूला माझे सात स्पर्धक सोडता कुणीच नव्हते. या सातही जणांत शर्यत जिंकायची क्षमता होती, त्यातल्या प्रत्येकाला ती जिंकायचीही होती. मलाही. मी जिंकलो आणि मला पृथ्वीवरचा सर्वांत वेगवान माणूस म्हटले गेले…’ जेसी ही शर्यत ३ ऑगस्ट १९३६ रोजी जिंकला. म्हणजे, ९० वर्षे झाली. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी गेले. आता प्रश्न पडतो, सध्याच्या अमेरिकेने त्याच्याकडे कसे पाहिले असते? स्वीकारासाठी त्याला त्याच्याच देशात परत लढावे लागले असते? खांद्यावर हात ठेवणारा एखादा लुझ लाँग त्याला भेटला असता का?… भेटेल का?

जेसीच्या शर्यत विजयाच्या घटनेला शतक होईल, तेव्हा भरणार्‍या ऑलिम्पिकचे यजमान कदाचित आपण असू. त्या वेळी आपल्याला सर्वार्थाने इतिहास घडविण्याची संधी असेल.

siddharth.kelkar @expressindia.com