एका अस्वलाची लाल टोपी हरवली आहे. ती शोधण्यासाठी ते संपूर्ण जंगल चाळून काढते. वाटेत भेटणार्‍या प्राण्यापक्ष्यांना त्याविषयी विचारते. शेवटी त्याला आपली टोपी मिळते, पण ज्याने टोपी घेतली, त्या सशाला तो खाऊन टाकतो. टोपी हरवणे, त्यामुळे खट्टू होणे, ती मिळेल की नाही ही हुरहुर, जंगलात भेडसावणारा एकाकीपणा, टोपी मिळाल्याचा आनंद, चोरल्याचा राग, त्या रागाच्या भरात हातून घडलेला गुन्हा आणि त्या गुन्ह्याचा पश्चात्ताप… बालकांच्या सगळ्याच गोष्टी राजा-राणीच्या नसतात. परीकथा आणि बोधकथांपलीकडेही बालकांचे भावविश्व आहे, याची जाणीव करून देणारे हे चित्रमय पुस्तक म्हणजे ‘आय वॉन्ट माय हॅट बॅक’. ज्यांनी ते लिहिले आणि चितारले त्या जॉन क्लासेन यांना नुकतेच बालसाहित्यातील प्रतिष्ठितेच्या ‘ॲस्ट्रिड लिंडग्रेन मेमोरियल अवॉर्ड’ने गौरवण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले कॅनेडियन ठरले आहेत.

बालवयातल्या कोणत्या भावना आणि कथांच्या कोणत्या संकल्पना देशांच्या सीमा ओलांडू शकतात आणि कोणत्याही संस्कृतीत सहज विरघळून जाऊ शकतात, याचा लेखाजोखा घेऊन हा पुरस्कार दिला जातो. सर्वच वयोगटातील वाचकांचा बराच वेळ कोणत्या न कोणत्या स्क्रीनसमोर जात असल्याच्या आजच्या काळात चित्रमय पुस्तकाला पुरस्कार मिळाणे कालसुसंगतच. कथा आणि चित्रांची सांगड घातलेली पुस्तके सर्वच काळांतील मुलांना आकर्षित करत आली आहेत, पण आज अशा पुस्तकांविषयीचा दृष्टिकोन बदलू लागला आहे. ती केवळ अंथरुणावर पडून आजीकडून ऐकल्या जाणार्‍या गोष्टींना पर्याय वा हसत खेळत शिक्षणाची साधने राहिलेली नाहीत. तर बालकांच्या मनातील अनिश्चितता, त्यांच्या चिंता, त्यांचे विनोद, मोठ्यांच्या व्यवहारी आणि दुटप्पी जगात वावरताना नैतिक संदर्भांविषयी त्यांच्या मनात उडणारा गोंधळ यांसारख्या भावना हाताळण्यास सक्षम कलाकृती म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले आहे.

सुरुवातीपासूनच, जगभरात बाल आणि किशोरवयीन साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित एक आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून ‘ॲ्ट्रिरड लिंडग्रेन मेमोरियल अवॉर्ड’कडे पाहिले जाते. तो लेखकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देतो आणि स्कँडिनेव्हियाच्या पलीकडे जाऊन अनुवाद बाजारपेठा व शैक्षणिक चर्चांवर प्रभाव टाकतो. क्लासेन यांच्या कलाकृती विशेष ठरतात कारण त्या, लिखित आशय आणि प्रतिमा यांच्यात एक विलक्षण बंध निर्माण करतात. त्यांची साधी सुटसुटीत चित्रे आणि तेवढ्याच सोप्या कथा जे शब्दांत म्हटलेले नाही वा चित्रातही दाखवलेले नाही, ते वाचण्यास पुरेसा अवकाश सोडतात. उपदेशामृत देण्याऐवजी मौन, चित्रांची पुनरावृत्ती आणि भावनिक तणावाच्या सूक्ष्म जागांतून विनोद निर्माण करतात.

‘आय वॉन्ट माय हॅट बॅक’ आणि ‘धिस इज नॉट माय हॅट’सारखी पुस्तके बालसाहित्यात गणली गेली असली, तरीही त्यांत प्रौढांशी संवाद साधण्याची क्षमता आहे. मुलांचे लक्ष विनोदावर आणि चित्रांवर केंद्रित होते, मात्र त्याच वेळी प्रौढ वाचक त्यातील अपराधीपणा, सत्ता गाजवण्याची वृत्ती, भीती किंवा सामाजिक अवघडलेपणा यांसारख्या गडद छटा ओळखू शकतात. कथांचा अर्थ लावण्याची मुलांची पद्धत मोठ्यांपेक्षा वेगळी असते, हे क्लासेन यांनी ओळखले आहे. केवळ शब्दांनी स्पष्ट न करता येणार्‍या भावना चित्रांमधून व्यक्त करण्याचे कौशल्य त्यांनी अवगत केले आहे.

क्लासेन यांना मिळालेल्या पुरस्काराच्या निमित्ताने जागतिक स्तरावर कॅनडातील बालसाहित्याविषयी कुतूहल आणि आकर्षण निर्माण होत असल्याचे दिसते. तेथील अनेक पुस्तकांत बालकांचे साहित्य आणि प्रौढांचे साहित्य यातील सीमा रेषा धूसर होताना दिसते.