युद्ध वार्तांकन तंतोतंत करणे अवघड आहे. कारण अनेक घटना समांतररीत्या घडत असतात. त्यात हे वार्तांकन निष्पक्षपाती असणे तर जवळपास अशक्यच. महाभारत- युद्धातील संजयाचे वर्तांकनदेखील पांडवांच्या बाजूला झुकलेले आहे. मराठी मनाला जवळ असलेली भाऊसाहेबाची बखर लिहिणारा प्रत्यक्ष रणभूमीवर उपस्थित होता का नाही याबद्दल काही सांगता येत नाही. पण १८५७ च्या बंडाविषयी गालिबचे ‘दस्तांबू’ आणि दुसरे गोडसे भटजींचे ‘माझा प्रवास’ या दोन्ही पुस्तकांतले अनुभव प्रत्यक्ष आहेत. गालिब दिल्लीबद्दल आणि स्वत:बद्दल लिहितो तर गोडसे भटजी मध्य भारतात ठिकठिकाणी जातात. जिवाची भीती या दोघांनाही आहे. युद्धाचे वर्णन करताना ते आकर्षक होईल असे लिहिणे हे त्याच सुमारास पश्चिमेत सुरू झाले. पूर्ण क्रिमियन युद्धाचे वार्तांकन विल्यम रसेल या वार्ताहराने केले. त्यातील बलाक्लावा इथल्या लढाईचे वार्तांकन विशेष गाजले. ते ‘द चार्ज ऑफ लाइट ब्रिगेड’ म्हणून १४ नोव्हेंबर १८५४ च्या लंडनच्या ‘द टाइम्स’मध्ये छापून आले. पुढे ते टेनिसनने वाचले आणि त्याच शीर्षकाची कविता लिहिली जी वाचल्यावर कुसुमाग्रजांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात…’ या कवितेची आपल्याला आठवण येते. त्यात असलेल्या साहित्यिक मूल्यामुळे व आवेगामुळे मूलत: ते रिपोर्टिंग आहे याकडे आपले लक्ष जात नाही. युद्धाबद्दलच्या लिखाणात व्यक्तिनिष्ठता, लघुदृष्टी, अभिनिवेश अशा अनेक कारणांमुळे खोटेपणा येणारच, याची पुरेपूर कल्पना देणारी दोन पुस्तके- ‘फॉल्सहूड इन वॉरटाइम’ हे आर्थर पॉन्सनबीचे ( Arthur Ponsonby) आणि ‘द फर्स्ट कॅज्युअल्टी’ हे फिलिप नाईटली (Knightly) यांचे – सध्याच्या वातावरणात क्रमाने वाचल्यास उद्बोधक व एकमेकाला पूरक ठरतील!
सामान्य माणूस मनाने युद्धात गुंतलेला असला तरीही रणांगणावरील डावपेचांबाबत अनभिज्ञ असतो. जबाबरदार व्यक्तींना त्याला मानसिकदृष्ट्या लढवत ठेवावे लागते. ‘फॉल्सहूड इन वॉरटाइम’ हे पुस्तक युद्धकाळातील खोटेपणाचे व्याकरण स्पष्ट करते. असत्य गोष्टीलाही युद्धकाळात किंमत असते. त्याचा उपयोग केवळ शत्रूला फसवण्यासाठीच नव्हे तर स्वत:च्या जनतेला सावरण्यासाठीदेखील असतो. मनुष्य हा काही सत्यप्रेमी प्राणी नाही. असत्य फोफावते कारण विश्वास ठेवण्याची मनुष्याची क्षमता अमर्याद आहे. अर्थात ते अल्पायुषी असते पण युद्धकाळात तेवढे पुरेसे ठरते. ‘हत्ती का माणूस माहीत नाही,’ या साध्या वाक्याने शत्रूचा एक महान योद्धा बाजूला काढला जाऊ शकतो. शरण गेलेल्या सैनिकांचे शत्रू कसे हाल करत आहे याचे टोकाचे खोटे वर्णन करावे लागते कारण आपल्या सैनिकांची शरणागती आपल्याला रोखून धरायची असते.
खोटेपणाचे काही स्तर असतात. सामान्य जनतेला खोटी पण भावनिक बातमी चालून जाते. बुद्धिजीवी लोकांसाठी मात्र बुद्धिप्रधान खोट्या बातम्या पेराव्या लागतात- पण हे फार काळजीपूर्वक करावे लागते कारण सामान्य जनतेत पसरवण्यात येणाऱ्या बातम्या फारच बटबटीत खोट्या असतील तर बुद्धिजीवींनादेखील त्यांच्यासाठीच्या बातम्यांविषयी संशय येऊ लागतो. जर्मन सेना स्वत:च्या सैनिकांची प्रेते उकळवून त्यातील चरबी साबण बनवण्यासाठी वापरत आहे, असे ब्रिटनमधील वर्तमानपत्रांनी छापले. ते खोटे होते हे नंतर युद्ध संपल्यावर त्यांनी मान्य केले. लेखकाने पहिल्या महायुद्धातील अशी बरीच उदाहरणे मांडली आहेत. बुद्धिजीवी लोक कायम वाद घालत बसतील असा एक प्रश्न म्हणजे पहिले महायुद्ध सुरू कोणी केले? ज्या राजपुत्राच्या खुनाने ते महायुद्ध सुरू झाले त्याला सार्बियन अतिरेकी गट जबाबदार होता आणि त्यांना लष्करातील लोकांनी प्रशिक्षण दिले होते. हे सगळे बाजूला पडले व युद्धाबद्दल जर्मनीला जबाबदार धरण्यात आले, असे पॉन्सनबी लिहितात.
‘फॉल्सहूड इन वॉरटाइम’मधील उदाहरणे पहिल्या महायुद्धाची असली तरी, ‘ठरवून खोट्या बातम्या पसरवून त्याचा एक शस्त्र म्हणून वापर करणे’ हाच त्याचा विषय. हे करताना मुळात खरी बातमी काय हे माहीत असायला हवे. खरी बातमी मिळवणे सोपे नसते. युद्ध वार्ताहर हा व्यवसाय म्हणून १९व्या शतकात ऊर्जितावस्थेला आला. ‘द फर्स्ट कॅज्युअल्टी’ हे पुस्तक (मूळच्या आवृत्तीत) १८५४ ते १९७५ या काळातील लढायांचा मागोवा घेते. युद्धात पहिला बळी सत्याचा जातो अशा अर्थाचे हे शीर्षक आहे. वाचताना लक्षात येते की युद्धकाळात वार्ताहर, लष्कर आणि सरकार यांच्यातील नाते गुंतागुंतीचे असते. तिघांना एकमेकांचा उपयोगही असतो तसेच अडचणही असते.
ब्रिटिश पत्रकार विल्यम रसेलने १८५० पासून प्रत्यक्ष युद्धभूमीवर उपस्थित राहून केलेले युद्धवार्तांकन थोडे निराळे होते. युद्ध फक्त सेनापतींच्या व सैनिकांच्या हातात नसते, तर सामान्य माणसालाही त्याबद्दल काही मत असू शकते हे त्याच्या वार्तांकनातून सुरू झाले. त्याच्या टीका ब्रिटिश पंतप्रधानांनी वाचल्या होत्या. एका मेजवानीत भेट झाली असता त्याला पंतप्रधानांनी विचारले, ‘‘तू सेनापती असतास तर काय केले असतेस?’’ या प्रश्नावर त्याच्याकडे उत्तर नव्हते. पुढे भारतातील १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाबद्दलचे त्याचे निरीक्षण महत्त्वाचे होते- ‘‘ब्रिटिशांचे या देशातील दिवस फार नाहीत. त्यांनी या काळ्या लोकांच्या प्रती असलेला हीन भाव सोडावा… किंवा त्यांचा राग टोकाला जाऊन ब्रिटिशांची सत्ता म्हणजे चैन ठरेल अशा दिवसाची वाट पाहावी.’’
अमेरिकन यादवी युद्धात पीटर अलेक्झांडर या वार्ताहराची वार्तांकने प्रभावी होती. त्यांचा उपयोग जनमत झुकवण्यासाठी होत आहे हे नेत्यांच्या लक्षात आले. अब्राहम लिंकनने इंग्लंडमध्ये जनमत तयार करण्यासाठी माणसे पाठवली आणि नंतर मँचेस्टरच्या कामगारांना उद्देशून पत्रही लिहिले जे नंतर सर्व वर्तमानपत्रांनी छापले. दक्षिणेने मात्र व्हिस्की आणि सिगार देऊन आपले काम होईल असे पाहिले. यात त्यांना यशही मिळाले.
पहिल्या महायुद्धापर्यंत तारायंत्राचा शोध लागला होता. नेमका मजकूर वेगाने वर्तमानपत्राकडे पाठवणे शक्य झाले. जनता मोठ्या संख्येने साक्षर झाली. वाचणाऱ्यांची संख्या वाढली. त्या लढाया जेव्हा कुठल्यातरी दूर देशात, ज्याच्याशी आपल्या देशाचा संबंध नाही अशा ठिकाणी लढल्या जात होत्या तोवर सारे छान आणि आकर्षक होते. पण जेव्हा स्वत:चा देश त्यात गुंतलेला असे तेव्हा चित्र वेगळे होऊ लागले. वार्तांकनाला केवळ देशभक्तीची नाही तर उदात्त हेतूची झिलई चढू लागली. ब्रिटनमध्ये पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीस एच जी वेल्स नामक प्रतिभावंताने तर, ‘हे साधे युद्ध नसून, शेवटचे युद्ध आहे’ अशी आरोळी ठोकली. त्याला काही युद्धावर जायचे नव्हते. पण याच युद्धात हेमिंग्वे वार्ताहर होता. तो लिहितो, ‘‘बेधुंद नरसंहार’ यापलीकडे जाऊन जो या युद्धाचे वर्णन करेल तो खोटे लिहीत आहे.’
या वार्ताहरांना प्रथम सैन्याचा, विशेषत: हर्बर्ट किचनेर या ब्रिटिश सेनपतीचा विरोध होता. पूर्वी स्वत: युद्धवार्ताहर म्हणून काम केलेल्या आणि पहिल्या महायुद्धात नौदल सांभाळणाऱ्या चर्चिलनेही युद्धवार्ताहरांना थारा दिला नाही. ‘डेली मेल’ या वर्तमापत्राचा क्रीडा विभाग बघणाऱ्या संपादकला एक घोडा विकत घेऊन सैन्याच्या युद्ध कचेरीत हजर व्हायला सांगितले गेले. पण तिथे तो आल्यावर त्याला युद्धवार्ताहर म्हणून सामावून घेण्याविषयी कुठलीही योजना सैन्याकडे नव्हती. तेव्हा त्याला हाइडपार्कमध्ये घोड्याला पळवून आणायला सांगितले. तिथे आणखी तसे बरेच वार्ताहर आपापले घोडे पळवत होते! पण नंतर युद्धात होत असलेल्या अपरिमित नरसंहाराने सैनिकांची गरज राजकीय नेत्यांना आणि सैन्याला वाटू लागली. वृत्तपत्रांच्या मालकांनाही युद्ध ही उत्तम व्यवसायसंधी होती. सामान्य लोकांच्या भाषेत युद्ध आकर्षकपणे कसे मांडावे हे त्यांना माहीत होते. त्यांना हे माहीत होते की लोकांवर तर्काचा प्रभाव पडत नसतो. लोकांना कथा हव्या असतात… मग शौर्य, देशभक्ती, त्याग असलेल्या कथांचा मारा दोन्ही बाजूंकडून सुरू झाला. शेवटी अमेरिकेतील जर्मन राजदूताला विनवणी करावी लागली की, ‘‘मित्रहो, बातम्या पाठवा, युक्तिवाद नको.’’
नुकसानीची वाच्यताच नाही!
ऑगस्ट १४ ते २५ १९१४ च्या दरम्यान, ‘केवळ अकरा दिवसांत जर्मन सेनेने तीन लाख फ्रेंच सैनिक ध्वस्त करून टाकले’ तेव्हा जेराल्ड कॅम्पबेल फ्रेंच सैन्यासह टाइम्सचा वार्ताहर होता. त्याने पाठवलेल्या वार्तापत्रात या मोठ्या घटनेचा एका शब्दानेही उल्लेख नव्हता. यानंतर सलग नऊ दिवस फ्रेंच वृत्तपत्रातही कुठलीच बातमी आली नाही. नंतर अफवा सोडण्यात आल्या की, जर्मनीत युद्धविरोधी दंगे आणि संप सुरू झाले आहेत; जर्मन सैनिकांना पिस्तुलाच्या धाकाने सीमेवर पाठवले जात आहे; एका फ्रेंच सैनिकाने पन्नास घाबरलेल्या जर्मन सैनिकांची शरणागती घेतली… वगैरे. या गोष्टी खोट्या होत्या पण एका बाजूला पॅरिस सोडण्याची तयारी करताना फ्रेंच सरकारने या अफवांमुळे तेथल्या जनतेचे मनोधैर्य टिकवून ठेवले.
स्पॅनिश युद्धात आंद्रे मालरॉ, आर्थर कोस्लर यांच्यासारखे अनेक विद्वान, कलाकार, लेखक गुंतले होते. यातील जॉर्ज ऑर्वेल याला नेमके काय घडते आहे हे दिसत होते. ‘स्टॅलिनला फ्रँकोच्या सैन्याशी लढणाऱ्यांना मदत करण्यापेक्षा स्वतंत्र विचार करणाऱ्या डाव्या लोकांना संपवण्यात रस होता’ असे वार्तांकन त्याने ‘न्यू स्टेट्समन’ला पाठवले पण त्यांनी ते छापले नाही. नंतर ‘होमेज टू कॅटालोनिया’ या पुस्तकात ऑर्वेल लिहितो : ‘‘देशभक्तीच्या गर्जना, खोटारडेपणा, जाहिरातबाजी हे सर्व जे लोक प्रत्यक्ष लढत नसतात त्यांच्याकडून होत असते आणि बऱ्याच प्रसंगी या असल्या लोकांनी, लढण्याऐवजी १०० मैल लांब पळून जाणे पसंत केले असते.’’ हे त्याचे पुस्तक कोणीही छापयला तयार झाले नाही. नंतर छापले गेले, पण ऑर्वेलच्या हयातीत त्याच्या फक्त ६०० प्रती संपल्या.
दुसऱ्या महायुद्धाच्या आधी दोन वर्षे ब्रिटनच्या मंत्रिमंडळात ‘माहिती खाते’ निर्माण करण्यात आले. या खात्याने सर्व ब्रिटिश वृत्तपत्रांना आपापले प्रतिनिधी पाठवण्याचे आवाहन केले. त्यातील काहीजण फ्रेंच सैन्यासह असणार होते. यातील कोणाचेच रिपोर्टिंग सेन्सॉरपासून मुक्त असणार नव्हते. नंतर लक्षात असे आले की सेन्सॉरच्या अनेक टप्प्यांतून जात बातमी वर्तमानपत्रापर्यंत पोहोचायला ४८ तास लागत. तोवर बातमीचा जीव गेलेला असे. ‘‘आय विटनेस’चे रूपांतर ‘आयवॉश’मध्ये झालेले असे’. डंकर्कच्या पराभवाचे हाऊस ऑफ कॉमन्समधील चर्चिलकृत पहिले वर्णन, ‘एक विशाल लष्करी पराभव’ असे होते. पण वृत्तपत्रांनी खेळ पालटवला. वृत्तपत्रांनी छापले, ‘‘समुद्र शांत राहून आपल्या सैन्याला मदत करत आहे, धुके आपल्या बोटींचे रक्षण करत आहे.’’ मग माघारी परतणाऱ्या ब्रिटनच्या सैनिकांच्यासाठी देशभर प्रार्थना झाल्या. न्यू यॉर्क टाइम्सने कौतुकाने लिहिले, जोवर इंग्रजी भाषा राहील तोवर डंकर्कचे हे वर्णन अभिमानाने वाचले जाईल. वृत्तपत्रांनी बातमीचे परिवर्तन दृष्टिकोनात केले. काहींनी ‘माघारीला विजय म्हणणे हास्यास्पद आहे’ असे त्याही वेळी म्हटले; पण त्यांचे कोणी ऐकले नाही.
सारेच सरकारी प्रचारात!
हिटलरच्या फौजांच्या वेगाने गणित बदलले आणि वृत्तपत्रांऐवजी रेडिओवरील रिपोर्टिंगला महत्त्व आले. सीबीएसच्या विल्यम शिररने (ज्याने पुढे ‘राइज अॅण्ड फॉल ऑफ थर्ड राइश’ – नाझी भस्मासुराचा उदयास्त- लिहिले), फ्रेंचांच्या शरणागतीचे जिवंत वर्णन रेडिओवरून साऱ्या जगाला ऐकवले. हिटलर आला कसा, त्याने सॅल्यूट कसा केला, फ्रेंच त्याच्यासमोर थिजलेल्या स्थितीत कसे बसले होते, हेसुद्धा त्याने टिपले. त्याच सुमारास ब्रिटनवर हवाई हल्ले सुरू झाले आणि बीबीसीच्या चार्ल्स गार्डनरने त्या हल्ल्याचे गच्चीवर जाऊन एखाद्या फुटबॉलच्या सामन्यासारखे समालोचन करायला सुरुवात केली, त्यामागे ब्रिटिश सत्ताधाऱ्यांचा हेतू अमेरिकेवर प्रभाव टाकून त्या देशाला युद्धात आणण्याचा होता. काही पत्रकारांना हे दिसत होते आणि तसे ते कळवतही होते. ड्रेयू मिडलटाउन याने कळवले ‘युद्ध संपेपर्यंत चर्चिलवर ब्रिटन विश्वास ठेवेल पण त्याला शक्य तेवढ्या लवकर घालवले पाहिजे या मतांचे अनेकजण त्यांच्याच पक्षात आहेत.’ पण हे सगळे सरकारी प्रचारात बुडून गेले. अमेरिकन जनतेला भवनाप्रधान रिपोर्टिंग हवे होते. माल्कम मगरीज यांनी नंतर म्हटले, ‘‘ते सारे वीरोचित आणि अविस्मरणीय होते पण त्याचबरोबर ते खोटे, ओंगळ आणि विसरण्याजोगे होते.’’
… अपवादही आहेत!
युद्धात केवळ हिंसा, देशभक्ती, शौर्य यांचे रिपोर्टिंग होत नसते. अमेरिकन यादवी युद्धात पीटर अलेक्झांडरने अनवाणी लढणाऱ्या सैनिकांबद्दल लिहिलेच, पण दारुडे अधिकारी आणि झिंगलेल्या स्थितीत सैनिकाचा पाय आणि चाकाची लाकडी आरी यांतला फरक न ओळखणारे डॉक्टर यांच्याविरुद्ध त्याने वर्तमानपत्रातून मोहीम उघडली. त्याचप्रमाणे दुसऱ्या महायुद्धात अर्नी पाइल( Ernie Pyle) यांनी सैनिकांच्या अवस्थेचा मुद्दा लावून धरला. त्याच्या लिखाणामुळे परदेशात लढणाऱ्या अमेरिकन सैनिकांना १० डॉलरचा भत्ता सुरू झाला. एकदा त्याने सैनिकांच्या पायाला लावायच्या मलमाच्या रंगाबद्दलही लिहिले. सामान्य सैनिकाच्या अगदी लहानसहान अडचणींवर लिहायला त्याला कमीपणा वाटत नसे. एकाच वेळी ३०० वर्तमानपत्रांत व साप्ताहिकांत त्याचे लिखाण येत असे. लष्करी अधिकाऱ्यांवर त्याच्या लिखाणाचा प्रचंड दबाव होता आणि सैनिकांचा तो लाडका होता. युद्धभूमीवर त्याच्या संरक्षणाची जबाबदारी सैनिकांनी एक पाऊल पुढे जाऊन घेतली होती. अणुबॉम्ब पडल्यावर जॉन हर्से या वार्ताहराला न्यू यॉर्करने हिरोशिमाला पाठवले. त्याचा ३०,००० शब्दांचा रिपोर्ट त्यांनी छापला. त्यात त्याने सहा माणसे निवडून त्या दिवशी त्यांच्या आयुष्यात काय घडले हे सांगितले. या वार्तांकनाला साहित्यिक दर्जा आहे.
व्हिएतनामच्या युद्धभूमीवर वार्ताहरांना बऱ्यापैकी स्वातंत्र्य होते. ते फ्रेंच आणि अमेरिकी सैनिकी तुकड्यांबरोबर असत. त्यात बर्नार्ड फॉलसारखे विद्वान पत्रकार मारले गेले. सततच्या हिंसाचाराने तिथले सैनिक हळूहळू संवेदनाहीन होत गेले. चित्रवाणी आणि छायापत्रकार (फोटो जर्नालिस्ट) यांनी व्हिएतनाम हे युद्ध गाजवले म्हणायला हवे. त्यांनी काढलेली छायाचित्रे अस्वस्थ करणारी होती. जीव धोक्यात घालून काढलेले हे फोटो विकून काहींनी पैसेही कमावले. लाइफ मासिकाने एका फोटोसाठी एक लाख डॉलर्स मोजल्याचे फिलिप नाइटली यांनी लिहिले आहे. आय. एफ. स्टोन या पत्रकाराचा त्यांच्यातील अनेकांच्यावर प्रभाव होता. प्रत्येक सरकार खोटारडे असते… अधिकृत बातम्या, सरकारी घोषणा आणि अहवाल यांतूनच खोटेपणा उघड कसा करायचा हे त्याला नेमके साधले होते. ‘सत्य हे लपलेले नसते तर ते केवळ दुर्लक्षित असते. फक्त त्याच्याकडे लक्ष वेधण्याची गरज असते,’ असे स्टोन म्हणे. अशा वार्तांकनांनी अमेरिकन व्हिएतनाम युद्धविरोधी जनमत घडत गेले.
युद्ध जेव्हा संपते त्या वेळी, विशेषत: जिंकलेल्या पक्षाच्या लक्षात येते की आपल्याला ज्या गोष्टी सांगितल्या जात होत्या त्या तशा नव्हत्या. पहिले महायुद्ध ब्रिटनने जिंकले होते. पण त्याच्या पुढच्या पिढ्यांनी ते लक्षात कसे ठेवले याविषयी The Great War and Modern Memory या पुस्तकात पॉल फुसेलने (Paul Fussell) लिहिले आहे त्याविषयी परत कधीतरी. पण अशा गोष्टी वाचल्यावर यापुढे तरी आपण आपले डोके ताळ्यावर ठेवून बातम्या पाहू अशी आशा करायला हरकत नसावी.
Kravindrar@gmail.com