सई केसकर
‘डिपार्चर्स’ ही ज्युलियन बार्न्सची शेवटची कादंबरी. यातलं मृत्यूबद्दलचं त्याचं लेखन त्याच्या आधीच्या सगळ्या लेखनकौशल्याच्या पलीकडे जाणारं आहे, कारण ते अत्यंत प्रामाणिक आहे…
‘द सेन्स ऑफ ॲन एंडिंग’ ही ज्युलियन बार्न्सची ‘बुकर विजेती’ कादंबरी २०१२च्या जुलैमध्ये वाचायला घेतली. ती निवडण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे मी प्रवासात होते आणि ती कादंबरी अवघ्या दीडशे पानांची होती. लवकरच लक्षात आलं की प्रवासाच्या विविध टप्प्यांतून जाताना, रांगेत उभी राहूनही मी ती कादंबरी वाचत होते. तिचा शेवट येण्याआधी मात्र वाचनात केवळ काही तासांचा खंड पडला. पण शेवट वाचून असा काही धक्का बसला, की कदाचित आपलीच वाचण्यात काहीतरी चूक झाली असावी म्हणून मी ५० पानं मागे जाऊन पुन्हा माझं आकलन तपासून बघू लागले.

कादंबरीच्या नायकाच्या दृष्टिकोनातून लिहिता लिहिता बार्न्स वाचकाला त्या नायकाच्या मुठीत असा काही पकडून ठेवतो की त्याच्या जगाच्या आकलनापेक्षा वेगळं असं काही असू शकेल यावर आपला विश्वासच बसत नाही. त्यानंतर त्या कादंबरीबद्दल ‘आपण असे कसे फसलो’ असा विचार मी अनेकदा केला. पण त्या कादंबरीनं मला बार्न्सची चाहतीही करून टाकलं.

जुलिअन बार्न्स खूप चांगला कादंबरीकार आहे, यावर अनेक जणांचा आक्षेप असू शकतो. कादंबरी म्हणून वाचकांना आणि समीक्षकांना जे काही अपेक्षित असतं तशी बार्न्सची कादंबरी क्वचितच असते. त्याला काहीतरी वेगळंच सांगायचं असतं जे सांगायला तो एखादी गोष्ट निवडतो. त्याला फ्रेंच साहित्यात रुची आहे आणि प्रूस्त त्याचा आवडता लेखक (हे तो बर्‍याचदा नाकारतो, पण त्याच्या लेखनात प्रूस्त सतत डोकावत असतो). त्याचा फ्रेंच साहित्याचा व्यासंग त्याच्या लेखनातून नेहमीच दिसत राहतो.

कधीकधी मूळ गोष्ट बाजूला ठेवून तो अशा एखाद्या फ्रेंच रस्त्यानं चालत सुटतो. त्यामुळे कदाचित त्याच्या लेखनाला एक विस्कळीतपणा येत असावा. पण हे सगळं मान्य करूनही मी त्याची चाहतीच आहे. याचं कारण मला त्याच्या कादंबर्‍यांमध्ये आणि स्वयंपाकाबद्दलच्या एका अतिशय विनोदी पुस्तकामध्ये (पेडांट इन द किचन) मिळालं. तो मानवी भावनांना आणि बुद्धिमत्तेला त्याच्या निरीक्षणशक्तीनं सहज चिमटीत पकडतो. त्याला काय म्हणायचं आहे हे कधीच संदिग्ध असत नाही आणि पाल्हाळीकही असत नाही.

नेमक्या शब्दांत एखाद्या भावनेचं मर्म थंडपणे सांगू शकणारे जे कोणी लेखक आहेत त्यांच्यापैकी एक बार्न्स आहे. शिवाय, गोष्ट, निरीक्षणं काहीही असलं तरी त्याबरोबर सावलीसारखा येणारा त्याचा तितकाच थंड, ब्रिटिश विनोद असतो. माणसाच्या लहानपणातल्या, तारुण्य आणि प्रणयातल्या, वार्धक्यातल्या काही एकसमान गोष्टी असतात- ज्या स्थळकाळापलीकडे असतात- त्या वाचकांना दाखवून देत असताना एकीकडे तो स्वत:वरही विनोद करत जातो. नुकतीच प्रकाशित झालेली ‘डिपार्चर्स’ ही त्याची शेवटची कादंबरी असल्याचं त्याने जाहीर केलं आहे. त्याच्या पहिल्या बायकोचा मृत्यू आणि त्याला स्वत:ला कर्करोग झाल्याचं निदान, या दोन्हींचा या निर्णयावर प्रभाव आहे असं जाणवतं.

या लेखनाला कादंबरी म्हणायचंच असेल तर ती बार्न्सच्या एका मित्राची (स्टीव्हन) आणि एका मैत्रिणीची (जीन) गोष्ट म्हणता येईल. ऑक्सफर्डमध्ये एकत्र शिकत असताना हे दोघे बार्न्सच्या मध्यस्थीने भेटतात आणि प्रेमात पडतात. शिक्षण संपल्यावर आपलं नातं तोडून दोघेही (बार्न्सचा जराही विचार न करता) आपापल्या दिशेने निघून जातात. तोही त्यांना ‘गेलात उडत’ (कादंबरीत थोडा अधिक प्रक्षोभक शब्द वापरला आहे) असं म्हणून आपल्या आयुष्याला सुरुवात करतो.

४० वर्षांनी, आपल्याला त्या मैत्रिणीला पुन्हा भेटायची इच्छा आहे आणि तू ती घडवून आणावीस असा निरोप त्याचा मित्र त्याला पाठवतो. आणि काहीशा अविश्वसनीय पद्धतीनं ते दोघे भेटतात आणि लग्नही करतात. पण ‘तू आमच्याबद्दल कधीही लिहिणार नाहीस’, अशी त्या दोघांनी त्याला (बायबलवर हात ठेवून) शपथ घ्यायला लावलेली असते. जी तो अर्थातच (कदाचित नास्तिक असल्यामुळे) मोडतो आणि ही कादंबरी तयार होते. दुसर्‍या वेळीदेखील काही काळातच ते पुन्हा वेगळे होतात. त्यांना एकत्र आणण्याचा आनंद वाटून घेणार्‍या लेखकाला मग आपण हे उगाच केलं का असे प्रश्न पडू लागतात. या प्रश्नांमध्ये प्रेमावर, स्वातंत्र्यावर, मैत्रीवर आणि मरणावर बार्न्सनं मुक्तपणे लिहिलं आहे. मुळात ही गोष्ट हे एक निमित्त आहे.

माणसाची स्मरणशक्ती आणि तिचे खेळ हा बार्न्सचा लाडका विषय आहे. त्याच्या शैलीचं गणिती वर्णन करायचं असेल तर एका अक्षावर काळ आणि दुसर्‍या अक्षावर मानवी स्मरणशक्ती असं त्याच्या पात्रांबद्दल मांडायला त्याला खूप आवडतं. त्याच्या अनेक कादंबर्‍यांमधून आणि कथांतून ही संकल्पना तो खेळवत आला आहे. आपली स्मरणशक्ती म्हणजेच आपण असं तो या कादंबरीतून वेगवेगळ्या प्रकारे सांगतो.

सुरुवातीच्या भागात समरणशक्ती कशी बिघडू शकते आणि त्यामुळे काय काय घडू शकतं याची थेट वैद्यकीय उदाहरणं त्यानं दिली आहेत. त्या उदाहरणांतून तो त्याबद्दल त्याच्या खास विनोदी शैलीत लिहितो. आपल्याला जर आयुष्यात घडलेली प्रत्येक गोष्ट तशीच्या तशी आठवली तर तीही एक व्याधी ठरू शकते. किंवा आपल्याला सगळ्याचं विस्मरण होऊ लागतं त्याकडेही आपण व्याधी म्हणूनच बघतो. एखाद्याला एखादी गोष्ट ठळकपणे का आठवते? ती वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आठवताना त्या आठवणीत मेंदूकडून बदलही केले जात असतात.

आपल्याला एखादी गोष्ट जशी आठवते तशीच ती त्या वेळी उपस्थित असलेल्या एखाद्याला आठवत नाही. किंवा ती व्यक्ती ती साफ विसरलेली असू शकते. आपल्याला काय आठवतं आणि आपण त्याकडे वर्तमानकाळात कशा प्रकारे बघतो हीच ‘आपली गोष्ट’ असते. आपली स्वप्रतिमा कशी आहे त्याप्रमाणे मग आपण ती इतरांना सांगतो. त्यामुळे कधीकधी बाहेरून आनंदी वाटणारी आयुष्यं, ती प्रत्यक्ष जगणार्‍या व्यक्तींच्या निवेदनातून कमालीची दुखरी भासतात.

कादंबरीतल्या जीनच्याच शब्दांत ‘हॅपिनेस डझन्ट मेक मी हॅपी’.  जेव्हा स्टीव्हन आणि जीनमध्ये पुन्हा एकदा बेबनाव सुरू होतो तेव्हा ते दोघेही बार्न्सकडे येऊन एकमेकांच्या तक्रारी सांगू लागतात. यानिमित्ताने त्याला एकाच प्रसंगाची दोन कथनं मिळू लागतात. एखाद्या लेखकासाठी यापेक्षा जास्त चमचमीत असं अजून काय मिळू शकतं? त्या दोघांमध्ये कोणताही समेट घडवून आणायचा, किंवा एकाची बाजू घेऊन आगीत तेल ओतायचा प्रयत्न बार्न्स करत नाही. तो त्यांना काय वाटतं आहे आणि ते त्यांना का वाटतं आहे याचं विश्लेषण करत जातो. त्यामुळे, माणूस काय लक्षात ठेवतो, का लक्षात ठेवतो, कोणत्या भावनेशी जोडून लक्षात ठेवतो आणि त्याच्या मनावर त्याचा कसा परिणाम होतो याची अनेक उदाहरणं त्याच्या खास शैलीत आपल्यासमोर येतात. एक प्रकारे हा एकाच गोष्टीकडे दोन, नव्हे, तीन बाजूंनी बघण्याचा प्रयोग आहे.

शेवटाकडे, कादंबरीपेक्षा हे तत्त्वज्ञानाच्या जवळ जाणारं लेखन वाटू लागतं. परंतु, सर्वसामान्य वाचक जे समजून आपल्या आयुष्यात त्याच्याशी साधर्म्य असलेली एखादी घटना शोधू शकेल, असं, जगण्याच्या जवळ असलेलं तत्त्वज्ञान. या चिंतनात आजच्या जगातले अनेक प्रश्न हळूहळू येऊ लागतात. वाढती आयुर्मर्यादा आणि त्यामुळे अकारण सोसाव्या लागणार्‍या व्याधी, उतारवयातील एकटेपणा, विस्मरण किंवा दुखर्‍या प्रसंगांची आवर्जून होणारी आठवण, प्रेम आणि समोर ठाकलेलं मरण! आधी मरून गेलेले अनेक थोर लेखक मरणाला कसे सामोरे गेले याबद्दलही बार्न्स विनोदानं लिहू शकतो आणि तशाच दृष्टीनं स्वत:च्या मरणाकडे बघू शकतो त्यामुळे या लेखनाचा कधीच कंटाळा येत नाही. उलट, आयुष्यात पुढे येऊ घातलेल्या विविध स्थितींना कसं सामोरं जाता येऊ शकेल याबद्दल काही नोंदीही काढून ठेवता याव्यात!

त्यातली एक महत्त्वाची नोंद म्हणजे विनोदबुद्धी टिकवून ठेवावी. कादंबरीचं नावच ‘प्रस्थानं’ आहे. तारुण्यात आयुष्यात आलेले मित्रं शिक्षण संपल्यावर निघून जातात. त्यांच्या आठवणी आधी तीव्र असल्या तरी कालांतराने कमी होतात. मग अगदी मरणाच्या दारात असताना याच मित्रांचं आयुष्यात पुनरागमन होतं आणि त्याचाही शेवट सोडून जाण्यात होतो. या वेगवेगळ्या निघून जाण्यांमध्ये फरक आहेत. तरुण असताना स्मरणशक्तीच्या जोडीला आपली स्वप्नं असतात, महत्त्वाकांक्षा असतात. पण वयाच्या एका टप्प्यावर माणसाकडे केवळ आठवणी उरतात. आणि अशी वेळ आली की प्रस्थानाकडे डोळे लागतात. एरव्ही, विमानतळांवर, रेल्वेस्थानकांवर प्रस्थानाच्या जोडीला आगमनही असतं. पण हे शेवटचं जाणं कधीही परत न येण्यासाठी असतं म्हणून त्याबद्दल आपापल्या दृष्टिकोनाप्रमाणे भीती, कुतूहल किंवा शांत स्वीकृती असं काहीही वाटत असावं.

आता ‘द सेन्स ऑफ ॲन एंडिंग’च्या धक्क्याचं मूळ कारण लक्षात आलं. त्या कादंबरीत बार्न्स खरंतर वाचकाच्या स्मरणशक्तीशीच खेळ करत असतो. त्यामुळे आपण आपली बुद्धी बाजूला ठेवून निवेदकाच्या मनात शिरतो हे लक्षातच येत नाही. असं व्हावं यासाठी बार्न्सनं कादंबरीभर वाचकांसाठी काही तुकडे टाकून ठेवले आहेत. ते उचलत उचलत शेवटाकडे गेल्याचा तो धक्का होता. हे आपल्या कसं लक्षात आलं नाही याचा रागही आला आणि हे लेखकानं दीड-दोनशे पानांत कसं काय साधलं याबद्दल आदर वाटला. ‘डिपार्चर्स’ वाचताना त्यानं हे कसं साधलं असावं याची उत्तरं मिळतात. कारण या कादंबरीतून त्यानं लेखक म्हणून त्याचं जे सर्वांत प्रभावी अस्त्र होतं तेच आपल्यासमोर शांतपणे ठेवलं आहे.

बार्न्सचं मृत्यूबद्दलचं लेखन हे काही अंशी स्वत:साठी आणि काही अंशी त्याच्या वाचकांसाठी आहे असं वाटतं. त्याच्या एकूण वैचारिक नीटनेटकेपणावरून कदाचित त्याला काही अर्धवट सोडून जायचं नसावं. त्याचा कधी धारदार, कधी हळुवार असलेला शांत विनोद मला नेहमीच आवडला आहे. पण या कादंबरीतील मृत्यूबद्दलचं त्याचं लेखन त्याच्या आधीच्या सगळ्या लेखनकौशल्याच्या पलीकडे जाणारं आहे, कारण ते अत्यंत प्रामाणिक आहे. असं काही वाचलं की समोरच्याच्या प्रामाणिकपणाचाही राग येऊ लागतो. तसं काहीसं शेवटची काही पानं वाचताना होतं. लाडक्या लेखकाची शेवटची कादंबरी वाचून संपली तसं वाईट वाटलं. पण लाडके लेखक कधीच मरत नाहीत हेही खरंच!

डिपार्चर्स

लेखक – ज्युलियन बार्न्स

प्रकाशक – जोनाथन केप

किंमत- ९९९ रु.,  पृष्ठे- १५५

saeekeskar@gmail.com