विश्राम ढोले, माध्यम, तंत्रज्ञान आणि संस्कृतीचे अभ्यासक
पश्चिम आशियातील युद्ध आणि त्यासंबंधीच्या चिथावणीखोर विधानांच्या बातम्यांनी माध्यमांचे अवकाश भरून गेले असताना गेल्या आठवड्यात एक छोटी बातमी प्रसिद्ध झाली. जर्मन तत्त्वज्ञ आणि विचारवंत युर्गन हाबरमास (खौ १ॠील्ल ऌंुी१ें२- जर्मन उच्चार हाबमास) यांच्या निधनाची ती बातमी होती. आपल्याकडच्या बर्‍याच माध्यमसंस्थांनी तर तिची दखलही घेतली नाही. तसेही अकादमिक विचारवंत, तत्त्वज्ञ वगैरे मंडळी हा आपल्या माध्यमांसाठी बरेचदा ऑप्शनला टाकायचा विषय. त्यात युद्धाची धामधूम. त्यामुळे ‘संवाद, चर्चा आणि लोकशाही’ या व्यापक मुद्द्यांभोवती सुमारे सहा दशके चिंतनशील काम करणार्‍या, इतर अनेकांच्या कामांना वैचारिक खाद्य आणि ता्त्विवक अधिष्ठान पुरविणार्‍या हाबरमास यांच्या निधनाला ना पुरेशी प्रसिद्धी मिळाली ना त्यावर पुरेशी चर्चा झाली.

खरंतर त्यांच्या निधनाच्या बातमीला ट्रम्प यांच्या बेताल विधानांनी भरलेल्या बातम्यांचा शेजार मिळावा, हाच एक दुर्दैवी विरोधाभास. एका अर्थाने ज्याच्या विवेक आणि शुचितेविषयी त्यांनी आयुष्यभर काम केले त्या सार्वजनिक चर्चाविश्वाकडून (पब्लिक स्फिअर) शेवटाकडे त्यांच्या वाट्याला उपेक्षाच आली. अर्थात, त्यामुळे त्यांच्या मांडणीचे महत्त्व कमी होत नाही. किंबहुना, नव्या माध्यमांच्या व्यवस्थेत महत्त्वाच्या विषयांची चर्चा कमी होत जाणार आणि होणार्‍या चर्चेचा पोत घसरत जाणार, हे त्यांनी व्यक्त केलेले भयसूचन आज प्रत्यक्षात येतेय. एका अर्थाने हे त्यांचे द्रष्टेपण. दुसर्‍या महायुद्धानंतर युरोपात घडलेल्या ता्त्विवक मंथनातून, चिकित्सक ज्ञानपरंपरेतून त्यांचे हे द्रष्टेपण साकारत गेले. महायुद्धोत्तर युरोपची पुनर्बांधणी ते आत्ताची डिजिटल माध्यमे या प्रदीर्घ इतिहासातील अनेक टप्प्यांचे हाबरमास जसे साक्षीदार तसेच भाष्यकारही. ‘दी स्ट्रक्चरल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ पब्लिक स्फिअर’ (१९६२), ‘दी थिअरी ऑफ कम्युनिकेटीव्ह ॲक्शन’ (१९८१), ‘दी फिलोसॉफिकल डिस्कोर्स ऑफ मॉडर्निटी’ (१९८५) आणि ‘ए न्यू स्ट्रक्चरल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ दी पब्लिक स्फिअर अँड डेलिबरेटीव्ह पॉलिटिक्स’ (२०२३) या चार प्रमुख ग्रंथासह अनेक पुस्तके, निबंध आणि लेखांमधून त्यांनी समकालीन विचारांचा एक व्यापक पट उभा केला.

त्यांच्या या व्यापक मांडणीत मुद्द्यांचे, पद्धतशास्त्राचे, दृष्टिकोनांचे वैविध्य तसे बरेच आहे. पण या सर्वांना कवेत घेणारा व्यापक प्रश्न तसा एकच आहे- हिंसा, सक्ती किंवा परंपरांचे दडपण याऐवजी विवेकपूर्ण संवाद आणि चर्चांमधून लोकशाही खर्‍या अर्थाने टिकायची असेल तर आधुनिक समाजामध्ये काय घडले पाहिजे? प्रश्न वरकरणी साधा वाटतो. कुठल्याही लोकशाहीवादी देशाच्या संदर्भात विचारता येईल, असा वाटतो. पण त्यातील संकल्पना अर्थगर्भ आहेत. आणि अध्याहृत संदर्भांना विशिष्ट स्थळ-काळाचे कोंदण आहे.

हाबरमास यांची मांडणीही युरोपीय अकादमिक शैलीप्रमाणे खूपशी ता्त्विवक, चिकित्सक, सघन आणि गुंतागुंतीची आहे. बैठक मारून, जोर लावून प्रयत्न केल्याखेरीज त्यातील मर्म उमगत नाही. पण एवढी गुंतवणूक केली की, हाती लागणारे विचारांचे अवकाश विस्तीर्ण असते. त्यात हाबरमास यांच्या विचारांची सयुक्तिकता जशी पटते तशाच त्यातील त्रुटीही दिसू लागतात. त्यांनी नकळत गृहीत धरलेल्या संदर्भांच्या मर्यादा जशा कळतात तशाच मांडणीतील काही वैश्विक शक्यताही दिसू लागतात. म्हणूनच आधुनिकता, लोकशाही, राजकीय संज्ञापन, सार्वजनिक संवाद व चर्चाविश्व, संवादविवेक, लोकशाहीतील माध्यमांची भूमिका वगैरे विषयांच्या छेदबिंदूंवर काम करू पाहणार्‍या कोणालाही हाबरमास यांच्या कामाचा संदर्भ घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. गेल्या सहा दशकांमध्ये अशा अनेकांच्या कामाची सुरुवात हाबरमास यांच्या मांडणीच्या स्वीकार-नकारातून झालेली आहे. फक्त भारताच्याच संदर्भात सांगायचे तर ही मांडणी केंद्रस्थानी ठेवणारी अंदाजे वीसेक तर थोडाफार संदर्भ घेऊन पुढे जाणारी अंदाजे पन्नासेक अकादमिक पुस्तके असावीत. म्हणूनच विसाव्या शतकात भरीव योगदान देऊन एकविसाव्या शतकातही सुसंगत राहिलेल्या मोजक्या विचारवंतांमध्ये हाबरमास यांचा समावेश करता येतो.

हाबरमास यांच्या या प्रदीर्घ कारकीर्दीमागील बौद्धिक प्रेरणांची मुळे त्यांच्या तरुणपणीच्या अनुभवांमध्ये दिसतात. त्यांचा जन्म १९२९ चा. शिक्षण जर्मनीतच. घरचे वातावरण धार्मिक. आणि नाझीवादाकडे झुकलेले. ते वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत नाझींच्या स्थानिक बालकुमार गटाचे सदस्य होते. पण नंतर त्यांना नाझी विचार आणि कृतींमधील खोलवरचे दोष आणि क्रौर्य जाणवू लागले. तेव्हापासून पापक्षालन करावे अशा काहीशा भूमिकेतून त्यांनी नाझी विचारांचा आयुष्यभर विरोध केला. अगदी १९८० च्या दशकात जर्मनीमध्ये काही इतिहासकारांनी नाझी अत्याचाराच्या भीषणतेला जरा बोथट करायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी आक्रमक प्रतिकारातून तो हाणून पाडला. नरसंहाराचे लांच्छन लागलेल्या समाजात जन्म घेऊनही त्यांनी ना कधी ते डाग लपविण्याचा प्रयत्न केला ना कधी चिकित्सक विचारांना लकवा येऊ दिला. हे करण्यासाठी एक प्रकारचा प्रामाणिकपणा आणि बौद्धिक धैर्य लागते. या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे मुबलक होत्या.

त्यांची अशी बौद्धिक जडणघडण होण्यामध्ये फ्रँकफर्ट स्कूल नावाने ओळखल्या जाणार्‍या चिकित्सक विचारकुलाचे महत्त्वाचे योगदान होते. मार्क्सवाद, सायकोअनॅलिसिस आणि अनुभववादी समाजशास्त्रांच्या एकत्रित दृष्टिकोनातून त्यांनी त्या परिस्थितीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. हाबरमास यांची सुरुवातीची जडणघडण या संस्कारातून झाली असली तरी त्यांचे फ्रँकफर्ट विचारकुलाशी असलेले नाते बरेच चढउताराचे राहिले. एरवी या विचारकुलामध्ये दिसते तशी वर्तमान आणि भविष्य याविषयीची एक निराशावादी, नकारात्मक भावना हाबरमास यांच्या विचारामध्ये दिसली नाही. पुरेसे चिकित्सक राहूनही अगदी प्रसंगी स्वप्नाळू वाटावा असा एक आशावाद त्यांच्या मांडणीत सतत दिसे. पण हाबरमास यांनी हा आदर्शवाद आणि आशावाद एक जाणती निवड म्हणून स्वीकारला होता.

मानवी संवादातील विवेक (कम्युनिकेटिव्ह रॅशनॅलिटी), समाजाच्या सामायिक धारणांमधून उमगणारी जीवनदृष्टी (लाइफवर्ल्ड), खुल्या व निर्भय चर्चांमधून निर्माण होणारी समज, त्यातून साकारणारे सार्वजनिक चर्चाविश्व (पब्लिक स्फिअर), सहमतीतून आकाराला येणारे सत्य आणि त्यातून निर्माण होणारी सहभागकेंद्री, चर्चाकेंद्री लोकशाही (डेलिबरेटिव्ह डेमकॉक्रसी) या हबमास यांच्या मांडणीतील प्रमुख संकल्पना. त्यांना ते सखोल विश्लेषणाचे आणि ऐतिहासिक संदर्भांचे भरपूर वजन देतात. त्यांच्या आधारे ते इतिहास आणि वर्तमानाचे मूल्यमापन करतात. त्यातील समस्यांचे निदान करतात आणि भविष्याबद्दलच्या शक्यता वर्तवितात. त्यातून मग ते अठराव्या शतकात पश्चिम युरोपामध्ये निर्माण झालेल्या नव्या सार्वजनिक चर्चाविश्वाची आणि त्यातून साकारलेल्या लोकशाही व्यवस्थांची मांडणी करतात.

युरोपामध्ये त्या काळात सार्वजनिक बगिचे, सलोन, कॅफे अशा ठिकाणी मध्यमवर्गीय लोक एकत्र येऊन, पुरेशा निर्भय वातावरणात आणि विवेकी पद्धतीने सार्वजनिक हिताच्या मुद्द्यांवर चर्चा करत. त्याकाळातील वर्तमानपत्रांमधून मोकळेपणे व्यक्त होत. त्यातून लोकशाहीपूरक सार्वजनिक चर्चाविश्व साकारले आणि त्याने आधीच्या शतकातील दिखावू, अधिकारवादी चर्चाविश्व बदलले. ते एक व्यवस्थात्मक स्थित्यंतर होते, अशी त्यांनी मांडणी केली. कळत न कळत त्यांनी या चर्चाविश्वाला आदर्श चर्चाविश्वाचे स्थान दिले. पण ते काही फार योग्य नव्हते. कारण स्त्रिया, गरीब, समाजातील परिघावरील लोक अशा अनेकांना या आदर्श युरोपीय चर्चाविश्वामध्ये फारसे स्थानच नव्हते.

आपल्याकडील पारंपरिक पंचायत चर्चा, पारावरच्या चर्चा, वासाहतिक काळात निर्माण झालेल्या विविध सभा आणि समाज ही त्याच्याशी काहीसे साधर्म्य सांगणारी भारतीय उदाहरणे. अर्थातच हे साधर्म्य मर्यादितच म्हणावे लागेल. कारण संवाद विवेक, वादपरंपरा, जीवनदृष्टी, सहमतीमागील राजकीयता, सामाजिक उतरंडीतील आणि संवादप्रक्रियेतील विधिनिषेध अशा अनेक बाबतीत भारतीय संदर्भ फार वेगळे आहेत. जगभरातील इतर ठिकाणीही ते वेगवेगळे आहेत. त्यामुळे हाबरमास यांच्या विचारांची सरसकट आयात करता येत नाही. ते खूप घासूनपुसून घ्यावे लागतात. असे असूनही हाबरमास यांचे वैचारिक औचित्य आजही आहे कारण ते सार्वजनिक चर्चाविश्वाच्या मूल्यमापनासाठी ते निकषांचा नकाशा तयार करतात. किंबहुना डिजिटल माध्यमांच्या युगामध्ये आज या संकल्पनांचा जो अत्यंत रोगट अनुभव येत आहे त्याच्या निदानासाठी हाबरमास यांची आदर्शवादी मांडणी उपयुक्त ठरते.

त्याचा काहीसा अंदाज स्वत: हाबरमास यांनाही होता. ‘दी न्यू स्ट्रक्चरल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ पब्लिक स्फिअर’ या त्यांच्या २०२३ सालच्या पुस्तकात त्यांनी त्याचाही आढावा घेतला होता. एकविसाव्या शतकात डिजिटल व्यवस्था, अल्गोरिदमने नियंत्रित होणारी समाजमाध्यमे, अल्पाक्षरी आणि भावनाकेंद्री संवादव्यवहार, संवादखोरांचे ट्रोलहल्ले, एंगेजमेन्टच्या संख्यात्मक दावणीला बांधली गेलेली अभिव्यक्ती यामधून संवादविश्वाचे जे नवे आणि भयावह रूप पुढे येत आहे त्याचाही त्यांनी आढावा घेतला. व्यापारी प्रसारमाध्यमांमुळे सार्वजनिक चर्चाविश्वाचे दुसरे स्थित्यंतर घडून आले आणि डिजिटल माध्यमांमुळे तिसरे अशी मांडणी त्यांनी केली. या प्रत्येक बदलासरशी आपण सहभागकेंद्री लोकशाहीपासून दूर जाऊ लागलो अशी टीकाही त्यांनी केली.

पण या दोन्ही बदलांचे खोलवरचे मर्म त्यांच्या मांडणीतून काहीसे निसटले. कारण त्यांनी संवादातील आशयावर भर दिला. पण सार्वजनिक संवाद ज्या माध्यमांमधून घडतो त्या माध्यमांच्या अंगभूत वैशिष्ट्यांकडे त्यांचे पुरेसे लक्ष गेले नाही. मार्शल मॅक्ल्हुन यांच्या शब्द उसने घ्यायचे तर ‘मिडियम इज दी मेसेज’ याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. खरतर मॅक्ल्हुन त्यांचे समकालीन. पण हाबरमास यांची जर्मन भाषेतील मांडणी इंग्रजी भाषकांपर्यंत पोहचण्यास ऐंशीचे दशक उजाडले. तोपर्यंत मॅक्ल्हुन हयात नव्हते. मॅक्ल्हुन, हेराल्ड इनिस यांचे माध्यमकेंद्री सामाजिक विश्लेषण हाबरमास यांच्यापर्यंत बहुधा पोहचले नसावे. त्यामुळे चर्चेतून सत्याचा शोध घेण्याचा आग्रह धरणार्‍या हाबरमास यांची या दोन विचारवंताशी पुरेशी चर्चाच होऊ शकली नाही. ती झाली असती तर कदाचित दोघांच्याही मांडणीतील त्रुटी व मर्यादा कमी होऊ शकल्या असत्या. कदाचित नव्या सार्वजनिक चर्चाविश्वाचे अंतरंग समजून घेण्यासाठी अधिक अर्थगर्भ मांडणी मिळू शकली असती.

दुर्दैवाने ते झाले नसले तरी हाबरमास कालबाह्य ठरत नाहीत. उलट, नव्या संभ्रमकाळाचे विश्लेषण करण्यासाठीची पुरेशी संकल्पनात्मक आयुधे आणि एक आशावादी दृष्टिकोन देऊन ते आजच्या काळातही आपले वैचारिक औचित्य राखतात. म्हणूनच, त्यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आवडत्या माध्यमामध्ये म्हणजे वर्तमानपत्रामध्ये, त्यांच्या आवडत्या भाषिक मांडणीच्या रूपात त्यांच्या कार्याची दखल घेणे हे सार्वजनिक चर्चाविश्वामध्ये हित गुंतलेल्या कोणाचेही कर्तव्य ठरते.