सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायाधीश अभय ओक ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ कार्यक्रमात (आणि त्यावर आधारलेल्या संकलित लेखात) म्हणतात की, ‘सत्तेविरोधी वक्तव्येदेखील लोकशाहीचा गाभा’. याला लोकशाही मानणार्‍या सामान्य जनतेचा विरोध असण्याचे कारणच नाही. त्याचप्रमाणे पाटणा शहरात शनिवारी, राजेन्द्रप्रसाद स्मृती व्याख्यानात विद्यमान न्यायाधीश बी. नागरत्ना म्हणतात की, ‘निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य अत्यावश्यक’ – तेही लोकशाहीप्रेमी जनतेला केवळ मान्यच नसते तर हवेसेच वाटते. पण मग हे बोल कोणाला उद्देशून आहेत असे मानावे? याचा अर्थ असाच नाही का, की वर्तमानात सत्तेविरोधी वक्तव्ये लोकशाहीचा गाभा मानली जात नाहीत आणि निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य अबाधित राखले जात नाही? अशी ‘शाळा’ कोणाची घेण्याची गरज तूर्तास आहे? अर्थात हे जास्त उलगडून सांगण्याची गरज नाही.

श्रीकृष्ण साठे, नाशिक

अभिव्यक्तिस्वातंत्र्याची जबाबदारी!

‘सत्ताधारीविरोधी वक्तव्यदेखील लोकशाहीचा गाभा!’हा निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांनी ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ कार्यक्रमात केलेल्या प्रमुख भाषणावर आधारित लेख (रविवार विशेष- ५ एप्रिल) वाचला. अभिव्यक्तिस्वातंत्र्याबद्दल आपण नेहमीच बोलतो असतो; पण ते आपल्या विचारांसाठी- इतरांच्या नाही, अशी दुहेरी भूमिका समाजात वाढताना दिसते. स्वत:च्या मताला विरोध झाला की संताप, तक्रारी आणि गुन्हे दाखल करण्याची घाई होते. ही प्रवृत्ती लोकशाहीसाठी धोक्याची घंटा नाही का?

घटनेत कलम १९ द्वारे दिलेले अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे फक्त अधिकार नसून त्यांचे संरक्षण करणे ही नागरिकांची जबाबदारीही आहे. मतभेद असतील तर त्याला उत्तर विचारांनीच द्यायला हवे, दडपशाहीने नाही. प्रत्येक वेळी न्यायालयांनी हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा ठेवणेही चुकीचे आहे. समाजानेही सहिष्णुता दाखवणे आवश्यक आहे- ही एक प्रकारे अभिव्यक्तिस्वातंत्र्याची जबाबदारीच.

लोकशाही टिकवायची असेल तर विरोधी मतांचा आदर करावा लागेल अन्यथा अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा विषय केवळ कागदावरच राहील.

सचिन रामचंद्र निवडंगे, (परभणी)

योजना बंद होईपर्यंत कोण थांबले?

‘समग्र शिक्षा योजना बंद, ३८०० कर्मचारी बेरोजगार’ ही बातमी (लोकसत्ता- ४ एप्रिल) वाचली. युडायस प्लस, शाळा गुणवत्ता व मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा, ‘निपुण महाराष्ट्र’, मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश वितरण, संच मान्यता, शाळाबाह्य् विद्यार्थ्यांचा शोध, ‘पट वाढवा’ अभियान  यांसारखी महत्त्वाची कामे करीत असताना केंद्र शासनाकडून ही योजना कशी आणि का थांबवली गेली आहे? या योजनेला २ एप्रिलपासून पुनर्नियुक्ती देणे अपेक्षित असतानाही केंद्र सरकारने ही योजना थांबवली आहे. यावरून असे दिसते की, केंद्र सरकारच्या संबंधित खात्याचे महाराष्ट्र राज्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्याहीपेक्षा राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांना जर माहिती आहे की या योजनेला केंद्र सरकारकडून पुनर्नियुक्ती देणे अपेक्षित आहे, तर त्यासाठी आधीच का नाही हालचाल केली? आता ‘केंद्र सरकारकडे मार्गदर्शन मागितले आहे’ – हे तर शासकीय साचेबंद उत्तर झाले.

नीता शेरे, दहिसर पूर्व (मुंबई)

प्रभावशाली व्यक्तींचे दुर्लक्ष घातक

‘साध्या वेशातल्यांचं सामर्थ्य!’ हा लेख वाचताना यहुदी अमेरिकेत किती प्रभावशाली आहेत याची कल्पना आली. हे सर्व अमेरिकेतील ज्युईश लॉबीचा भाग असतील वा नसतीलही कदाचित. पण ज्या ‘ज्यू’ समुदायाने नाझी जर्मनीच्या काळात ‘गॅस चेंबर्स’ आणि छळछावण्यांचा अमानवी अनुभव घेतला, आज त्याच समुदायाचे राष्ट्र (इस्रायल) गाझा व इराणमध्ये सामान्य नागरिकांवर तशाच अमानुष पद्धतीचे अत्याचार कसे करू शकते? ही एक ऐतिहासिक विडंबनाच म्हणावी लागेेल. यहुदींची याबाबतची मानवी संवेदना इतरांपेक्षा उच्च दर्जाची असणे अपेक्षित नाही का? राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली ‘सामूहिक शिक्षा’ देताना निष्पाप मुले, महिला, वृद्ध यांनाही सर्रास लक्ष करावे? हमासच्या हल्ल्याच्या बदल्याचीही काही ‘प्रमाणबद्धता’ असावी का नाही? प्रभावशाली व्यक्ती अत्याचारांकडे जेव्हा जाणीवपूर्वक डोळेझाक करतात, पाठ फिरवतात तेव्हा तो मानवतेविरुद्धचा गुन्हाच ठरत नाही का?

प्राजक्ता वाढोणकर, पुणे</strong>

यहुदी ‘लॉबी’च्या आहारी जाऊन…

‘साध्या वेशातल्यांचं सामर्थ्य!’ हा ‘अन्यथा’ सदरातील गिरीश कुबेर यांचा लेख (४ एप्रिल) वाचला. अमेरिकेतील ज्यू लॉबी प्रभावी आहे ही बाब सर्वश्रुत आहे. ती दृश्य वा अदृश्य स्वरूपात इस्रायलच्या हितासाठी  कार्यरत असते असे लेखावरून दिसून येते. मात्र या लॉबीच्या किती, कितपत आणि कुठवर आहारी जायचे याचे तारतत्म्य अमेरिकी अध्यक्षांना असणे आवश्यक असते. ते सुटले की आखाती युद्धासारखे संकट सार्‍या जगावर लादले जाते. इराणचा धोका इस्रायलला होता हे एकवेळ गृहीत धरले तरी तो थेट अमेरिकेला नव्हता. त्यामुळे अमेरिकेने हे युद्ध स्वत:वर व पर्यायाने जगावर ओढवून घेतले. या युद्धात झालाच तर इस्रायलचा फायदा आहे. अमेरिकेचा शक्तिपात चीन आणि रशियाच्या पथ्यावर पडत आहे. त्यामुळे यहुदी लॉबीच्या आहारी जाऊन ट्रम्प अमेरिकेचे आणि उर्वरित जगाचे नुकसानच करत आहेत.

डॉ. वि. हे. इनामदार, पुणे

कोडॅक, नोकिया यांचे काय झाले?

‘पन्नाशीतील पालवी’ हे ॲपल कंपनीच्या ५० वर्षांच्या वाटचालीबाबतचे संपादकीय वाचले. ॲपलसारख्या कंपनीची निव्वळ आर्थिक उलाढाल ही जगातील चौथ्या मोठ्या अर्थव्यवस्थेएवढी असेल तर भांडवलशाही महाशक्ती किती अवाढव्य आहे याचा अंदाज येतो. चीनसारख्या देशात सरकार पुरस्कृत भांडवलशाहीचा आवाकाही असाच व्यापक आहे. ‘जो जीता वही सिकंदर’ या न्यायाने जगभरात त्यांचे साम्राज्य पसरते आहे.  परंतु एखाद्या उत्पादनाची नक्कल करणे आणि नवोन्मेष करणे यांतील फरक ओळखून जो वाटचाल करेल तोच भविष्यातील सिकंदर असणार आहे. अन्यथा ‘कोडॅक’ अथवा ‘नोकिया’सारख्या जगविख्यात कंपन्यांची धोरणात्मक उदाहरणे धोकाही दाखवून देतात.

एम. एस. नकुल, जोगेश्वरी (मुंबई)

ओळख ही स्वीकारण्याचीच बाब

‘आमची ओळख ठरवणारे तुम्ही कोण?’ या जामिनी बाविस्कर यांच्या लेखात (३ एप्रिल) समाजातील एक मूलभूत प्रश्न पुन्हा अधोरेखित केला आहे की एखाद्याची ओळख ठरवण्याचा अधिकार नेमका कोणाचा? ‘ट्रान्सजेण्डर पर्सन्स (प्रोटेक्शन ऑफ राइट्स) ॲक्ट’ या २०१९ च्या कायद्याने खरे तर, न्यायालयीन निर्णयांना कायदेशीर रूप दिले होते. त्यात काही त्रुटी असूनही, तो एक प्रगतिशील पाऊल मानला गेला. मात्र, २०२६ च्या दुरुस्ती विधेयकाने किमान तीन समस्या निर्माण केल्या आहेत : (१) ओळखीची पुनव्र्याख्या : ‘ट्रान्सजेण्डर’ कोणाला म्हणायचे हे पुन्हा सरकार ठरवणार आहे. ही बाब व्यक्तीच्या स्वभावाच्या अधिकारावर गदा आणते. (२) कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी वैद्यकीय तपासणी वा प्रशासकीय अडथळे वाढवणे : हे मानवी हक्कांच्या विरोधात आहे.

(३) अधोगतीला बळ : ‘नाल्सा निकाल’ म्हणून ओळखला जाणारा २०१४ चा जो ऐतिहासिक निर्णय भारतातील पारलिंगी व्यक्तींच्या हक्कांसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला होता, त्यातील गाभ्यालाच आता २०२६ चे विधेयक विरोध करते आहे- पुढे पडलेले पाऊल यातून मागे जाते आहे, असे जाणवते. आजच्या शहरी समाजात भेदभाव उघडपणे दिसत नसला तरी तो सूक्ष्म स्वरूपात अजूनही अस्तित्वात आहे. त्यामुळे केवळ कायदे न करता, प्रत्यक्ष व्यवहारात समानता आणि स्वीकार यांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. शेवटी, समानता ही केवळ शब्दांत किंवा धोरणांत नसून ती प्रत्येक व्यक्तीच्या सन्मानात आणि स्वायत्ततेत दिसली पाहिजे. ओळख ही व्यक्तीची स्वत:ची असते ती सिद्ध करण्याची नव्हे, तर स्वीकारण्याची गोष्ट आहे. मयूर कोठावळे, पवई (मुंबई)