भर उन्हात दौरे करताना मी वाहनातला एसी वापरत नाही तर कांदा जवळ ठेवतो या वक्तव्यामुळे देशभर चर्चेत आलेले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे ग्वाल्हेरच्या वातानुकूलित राजप्रसादातून बाहेर पडताना पडवीत जरा वेळ थांबले. अचानक होणारा तापमान बदल अंगाशी येऊ शकतो याची जाणीव त्यांना होतीच. मग वाहनात बसल्यावर त्यांनी एसी बंद व खिडक्या खुल्या असा आदेश दिला. ताफा शहरातून बाहेर पडेपर्यंत ते हातात कांदा घेऊन पादचारी तसेच सामान्यांचे नमस्कार स्वीकारत होते. शहर मागे पडल्यावर त्यांनी खिडक्या बंद, एसी सुरू असा आदेश देताच सोबतच्या सहकार्‍यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. एका कांद्याच्या माध्यमातून आपण सर्वसामान्यांना मंत्रीपदाशी जोडून घेतले. याचा फायदा नक्कीच पक्षाला होईल. विश्वगुरू आपली पाठ थोपटतील. तेही अशा लहानसहान कृतीतून स्वत:ला सर्वसामान्यातला एक असल्याचे दाखवत असतात. शेवटी काटकसरी सरकार अशी प्रतिमा महत्त्वाची असा विचार करत असतानाच समोर त्यांना काही कार्यकर्ते रस्ता अडवून उभे असलेले दिसले.

ताफा जवळ जाताच ते काँग्रेसचे आहेत हे लक्षात आले आणि चालकाने मोठ्या शिताफीने गाडी पुढे काढली. लबाडी पकडली गेल्याने चिडलेल्या शिंदेंनी ‘रस्ता अडवलाच कसा? तुम्हाला ठाऊक नव्हते का’ असे म्हणत अधिकार्‍यांना झापणे सुरू केले. तेवढ्यात मागच्या सीटवरचा साहाय्यक म्हणाला. ‘‘कांद्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसने राज्यभर ‘पाळत आंदोलन’ सुरू केले आहे. त्याची बातमीही आज आली, पण मीही एसी वापरणे बंद केल्याने सकाळी वाचलेल्या पेपरचा वापर हवा घालण्यासाठी केला. त्यात तो पार फाटून गेला. या गडबडीत मी सांगायचे विसरलो.’’ हे ऐकून शिंदेंनी कपाळावर हात मारला. त्याला चांगली शिवी हासडत ते कार्यक्रमस्थळी उतरले तोवर त्यांच्या ‘काचबंद’ प्रवासाची चित्रफीत माध्यमावर प्रसारित झाली होती.
कार्यक्रमस्थळी खुद्द जीतू पटवारी हायहायच्या घोषणा देत होते. पोलिसांनी त्यांना बाजूला सारल्यावर शिंदे भाषणासाठी उभे राहिले. ‘माझ्या वाहनाच्या खिडक्या बंद होत्या त्या केवळ बाहेरची धूळ आत येऊ नये म्हणून. एसी बंदच होता.’ यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवल्यावर त्यांना जरा हायसे वाटले. मग दौर्‍यात ते जिथे जातील तिथे हातात कांद्याच्या माळा घेऊन काँग्रेस कार्यकर्ते व त्यांना अडवणारे पोलीस असेच चित्र होते. प्रत्येक ठिकाणी शिंदे कांदा हा उष्माघात कमी करण्यासाठी उपयुक्त आहे, माझ्या या मोहिमेमुळे कांद्याच्या दरात कशी वाढ झाली हे सांगत राहिले. दुसरीकडे काँग्रेसचे नेते शिंदेंना रंगेहाथ एसीत पकडल्याची चित्रफीत दाखवत राहिले. यामुळे वृत्तवाहिन्यांवर कांदा व शिंदेच चर्चेचा विषय होता.

रात्री परतल्यावर शिंदेंना अंगात कणकण जाणवू लागताच राजघराण्याच्या वैद्यकाला पाचारण करण्यात आले. त्यांनी निदान केले. ‘यांना ऊन लागले. प्रवास बंद.’ दुसरीकडे सार्‍या राज्यात ‘राजपुत्राने केली फसवणूक’ असा आरोप करत काँग्रेसने आंदोलन सुरू केले. यामुळे अस्वस्थ झालेल्या शिंदेंनी दिवसभराच्या विश्रांतीनंतर जाहीर केले. ‘मी साध्या तिकिटावर ग्वाल्हेर ते दिल्ली असा रेल्वे प्रवास करणार. तोही दिवसा.’ ठरल्याप्रमाणे ते गाडीत शिरले. प्रचंड उकाडा, त्यात गर्दी यामुळे दिल्ली येईपर्यंत त्यांची प्रकृती चांगलीच खालावली. तिथे पोहचताच त्यांना एम्समध्येच भरती करण्यात आले. सायंकाळी थेट विश्वगुरूच त्यांना भेटायला आले व म्हणाले. ‘कांदा हा भाजपला कधीच लाभत नव्हता व लाभणार नाही. तेव्हा नाद सोडा.’ हे ऐकून शिंदेंना आजीसोबत लहानपणी बघितलेला ‘कथा अकलेच्या कांद्याची’ हा वग आठवला.