पुण्याच्या ‘एफटीआयआय’मधून अडूर गोपालकृष्णन यांच्यानंतर तीन वर्षांनी के. जी. जॉर्ज पदविकाधारक झाले. पण त्या वेळी अनेकांनी निवडलेल्या ‘आर्ट फिल्म’च्या मार्गापासून दूर राहिले. प्रायोगिक किंवा सार्थक चित्रपट करायचे म्हणून मी लोकांपासून दुरावणार नाही, उलट लोकांसाठीच प्रयोग करेन, हा निश्चय त्यांनी कारकीर्दीच्या अखेपर्यंत पाळला. मल्याळम चित्रपटांना दर्जेदार आणि लोकाभिमुख करण्यात वाटा असलेल्या या जॉर्ज यांचे निधन रविवारी, २४ सप्टेंबर रोजी झाले.
‘एफटीआयआय’मधील शिक्षणानंतर १९७२ पासून जॉर्ज यांनी ‘चेम्मीन’(१९६५) या चित्रपटाच्या राष्ट्रीय पुरस्कारामुळे गाजलेले रामू करिआत यांचे सहदिग्दर्शक व पटकथालेखक म्हणून कामाला सुरुवात केली. अशा दोन चित्रपटांनंतर स्वत:चा ‘स्वप्नदानम्’ (१९७६) त्यांनी घडवला. डॉक्टर होण्यासाठी श्रीमंत मामाच्या लाडावलेल्या मुलीशी लग्न करणाऱ्या गोपी या नायकाला, वडिलांपश्चात आपल्याला वाढवताना आईने जपलेली मूल्ये काय होती, आपण आता कुठे आहोत, असे प्रश्न पडून तो आधी एका मुलीत गुंततो, मग आयुष्यातच अर्थ काय उरला, अशा काहुराने भ्रमिष्ट होतो. त्याची ही कथा मानसोपचार केंद्रातूनच उलगडू लागते. तत्कालीन तरुणांना मूल्यभान देऊ पाहणाऱ्या या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. केरळचे राज्य पुरस्कार तर नऊ वेळा मिळाले आणि केरळ सरकारतर्फे देण्यात येणारा ‘सी जे डॅनियल पुरस्कार’ हा कारकीर्द-गौरवही २०१५ मध्ये झाला. तोवरचे १८ चित्रपट आणि दोन चित्रवाणीपट यांच्या दिग्दर्शनाचा, अनेक चित्रपटांची पटकथाही स्वत:च लिहिण्याचा खटाटोप त्यांनी पुरस्कारांसाठी अर्थातच केला नव्हता. ‘मीच आधी केलेल्या कामासारखे काम मला करायचे नाही’ हा बाणा त्यांनी प्रत्येक चित्रपटात जपला होता. जॉर्ज यांचे सर्व चित्रपट वेगवेगळय़ा भौगोलिक आणि भावनिक प्रदेशात घडतात, त्यामागे हे महत्त्वाचे कारण.




‘रप्पदिकालुदे गाथा’ची (१९७८) मूळ कथा दिग्गज लेखक-दिग्दर्शक पी पद्मराजन यांनी लिहिलेली. ड्रग्जच्या आहारी गेलेल्या मुलीचे जग आणि हिप्पी संस्कृती तपासणारा हा चित्रपट होता. त्याच वर्षी ‘उलक्कड’ आला. ती प्रेमकथाच असली तरी नायक संवेदनशील कवी होता आणि मुख्य म्हणजे, हा कवी सामाजिक प्रश्नांनी अस्वस्थ होणारा होता! मेला (१९८०) मधला नायक सर्कशीतला बुटका विदूषक. याचे लग्न गावातील सुंदर मुलीशी होते, पण समाजाकडून होणाऱ्या अवहेलनेला तोंड देण्याऐवजी तो जीवनाचा निरोप घेतो. कोलंगल (१९८१) ग्रामीण जीवनावरला शांत आणि निष्पापपणाचा बुरखा टराटरा फाडून, आतल्या भेसूर सामाजिक विणीचे दर्शन घडवतो.
या सर्वानंतर आलेला ‘यावनिका’ (१९८२) हा रहस्यपटांच्या परंपरागत संकल्पना मोडून काढणारा. तो आजही चित्रपट-तंत्राच्या विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी महत्त्वाचा ठरतो. विख्यात मल्याळम अभिनेत्री शोभा हिच्या आत्महत्येचा वेध घेणारा ‘लेखायुदे मरणम- ओरु फ्लॅशबॅक’ (१९८३) हा त्यांचा चित्रपट वादग्रस्त ठरला खरा, पण त्याच वर्षी आलेल्या ‘अडामिन्ते वारियेलु’ (आदमची बरगडी) या चित्रपटाने, आदल्या चित्रपटाचा हेतू स्वच्छच होता, हे जणू सिद्ध केले. ‘अडामिन्ते वारियेलु’ हा महत्त्वाचा स्त्रीवादी चित्रपट मानला जातो. असा खजिनाच देणाऱ्या जॉर्ज यांना २०१५ नंतर प्रकृतिअस्वास्थ्याने ग्रासले, स्मृतीनेही दगा दिला आणि त्यांचे अखेर सन्मानानेच, पण एर्नाकुलमच्या एका वृद्धाश्रमात झाली.