‘गोष्टी घराकडील मी वदता गड्या रे, झाले पहा कितिक हे विपरीत सारे…’ म्हणणार्या किंवा घराच्याच खिडकीतून बाहेर पाहताना ‘झपूर्झा‘ स्थितीत जाणार्या कवी केशवसुतांचे घर कोकणात मालगुंड येथे बांधून महाराष्ट्राने त्यांचे स्मारक केले; पण कन्नड भाषेत केशवसुतांइतकेच महत्त्वाचे मानले जाणारे कवी ‘कुवेम्पु’ हे तर ‘मी अनिकेत आहे- कवीला घर नसते’ असे म्हणून गेले… त्यांचे स्मारक कसे करायचे? कुवेम्पुंचे कादंबरीकार सुपुत्र पूर्णचंद्र तेजस्वी यांचा आग्रह होता- स्मारक चार भिंतींआड नको… मग? तेजस्वीनी चित्रकार मित्र के. टी. शिवप्रसादांना गळ घातली, तूच लढव काही निराळी कल्पना. शिवप्रसाद यांनी स्मारकाच्या मध्यावर, आठेक कवींचे संमेलन होऊ शकेल असा चौथरा उभारला आणि त्याभोवती कर्नाटकातल्या कातळी शिळा फक्त एकमेकांवर ठेवून उघड्या दरवाजांसारखी रचना केली… स्कॉटलंडमधल्या ‘स्टोनहेन्ज’ची आठवण देणारी… कुवेम्पुंचे एकेकाळचे प्रेरणास्थान असलेले वर्डस्वर्थ, शेली, कीट्स हे सारे कवी स्कॉटलंडच्या निसर्गाशी जुळलेले, त्या निसर्गाला मानवाने दिलेल्या वंदनेची ‘स्टोनहेन्ज’ ही आद्य खूण. ती शिवप्रसादांनी कर्नाटकी संदर्भात आणली… कर्नाटकात मंगलोर- शिमोगा (आताचे शिवमोगा) महामार्गावर कुप्पळ्ळी येथे असलेले हे स्मारक आता केवळ कुवेम्पुंची नव्हे; तर परवाच (१ जुलै) निधन झालेल्या शिवप्रसादांचीही आठवण देईल.
शिवप्रसाद हे चित्रकार. कर्नाटकात इंजिनीअरिंगला प्रवेश मिळूनसुद्धा हट्टाने मुंबईच्या ‘जे जे स्कूल ऑफ आर्ट’मध्ये शिकले. पुढे मुंबई/ बेंगळूरु/ दिल्लीत त्यांची प्रदर्शनेही झाली; पण शहरांत राहाणे टाळून ते हासन जिल्ह्यातल्या एका गावात राहात. शेतीकडेही लक्ष पुरवत. त्यांच्या चित्रांमध्ये माणसे आणि माणसांनीच तयार केलेल्या मिथकांचा खेळ दिसे. मोहरमच्या वाघांपासून यल्लम्माच्या ‘जग्गा’पर्यंतची ही अनेक मिथके- त्यांचा आजच्या समाजाशी संबंध केवळ प्रेक्षणीयच मानावा की काय, असा प्रश्न त्यांची चित्रे विचारत. या चित्रांचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे, इम्पास्टो पद्धतीचे रंगकाम. कॅन्व्हासपासून सेंटिमीटरभर बाहेर आलेले रंगांचे फटकारे! तेही फक्त काही आकारांपुरते नव्हे… चित्रभर! चित्रातले आकार विसरून त्या फटकार्यांची लय पाहाताना जणू वार्यावर डोलणारे शेत आठवायचे.
शेतीशी, कर्नाटकाच्या मातीशी जुळलेले शिवप्रसाद वयाच्या पन्नाशीनंतर, म्हणजे १९९७ नंतर शेतकरी चळवळीत रमू लागले. कर्नाटकातील ‘राज्य रयतु संघा’चे संस्थापक एम. डी. नंजुन्दस्वामी हे शिवप्रसाद यांच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठे, पण मित्रतुल्य. पण २००४ मध्ये नंजुन्दस्वामी गेले, त्यानंतरही शिवप्रसाद रयतु संघात राहिले. उलट शेतकर्यांची चळवळ फक्त जमीनजुमला असलेल्यांपुरती नसून, सत्ताधार्यांकडून ज्यांच्या-ज्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत त्या सर्वांशी शेतकरी चळवळीचे संधान असले पाहिजे, हे त्यांनी ओळखले. म्हैसूर दसर्यात कर्नाटक सरकारतर्फे (२००१ मध्ये) दिले गेलेले ‘राज्योत्सव पुरस्कारा’चे प्रतिष्ठेचे सुवर्णपदक विकून, त्या पैशातून त्यांनी म्हैसूरमधल्याच वेश्यांच्या मुलांसाठी काम करणार्या संस्थेला देणगी दिली. गेल्या १५- २० वर्षांत समता आणि न्यायाच्या आंबेडकरी जाणिवेतून ते दलित चळवळीलाही पाठिंबा देऊ लागले. चित्रकार म्हणून झालेल्या ओळखी, मिळालेली प्रतिष्ठा, यांचा वापर ते समाजासाठी करू लागले. कर्नाटकात शेती आणि समाजाशी जुळलेले बाबू ईश्वर प्रसाद, अरुणकुमार एच.जी. असे चित्रकार आज पन्नाशीत आहेत, त्यांचे अग्रणी ठरण्याचा इतिहास घडवून शिवकुमार वयाच्या ७९ व्या वर्षी वारले.
