ताजं युद्ध सुरू झाल्यापासून ऊर्जाविषयक कार्यक्रम, परिसंवाद वगैरेंची एकदमच चलती सुरू झाली. अशाच एका कार्यक्रमानंतरच्या अनौपचारिक गप्पांत एकानं ताज्या बातमीचा विषय काढला.
ती बातमी होती कल्पक्कम इथं आपली थोरियम आधारित अणुभट्टी कार्यान्वित झाल्याची. या गृहस्थांची तक्रार होती या घटनेला पुरेशी प्रसिद्धी आपल्या माध्यमांनी दिली नाही… इराण युद्धामुळे होणार्‍या आर्थिक नुकसानीच्या बातम्या तुम्ही देता… सकारात्मक घटनांना तितकी पुरेशी प्रसिद्धी मिळत नाही वगैरे वगैरे. या अशा ‘‘माध्यमं नकारात्मक कशी आहेत’’, या तक्रारी ऐकायची आता सवय झालीये. काँग्रेसच्या सत्ताकाळात माध्यमांनी दाखवलेल्या नकारात्मकतेचं कौतुक ज्यांना होतं, जिचं वर्णन निष्पक्ष पत्रकारिता वगैरे केलं गेलं त्यांना आता त्याच माध्यमांची नकारात्मकता राष्ट्रद्रोह वगैरे वाटू लागलीये हे सत्य लक्षात येऊनही बराच काळ लोटला.

तर याकडे दुर्लक्ष करून सदर गृहस्थांची गंमत करू या म्हणून त्यांना म्हटलं ‘‘…यासाठी तुम्हाला मनमोहन सिंग यांचे आभार मानावे लागतील.. त्यांनी अमेरिकेशी केलेल्या अणुकरारामुळे या सगळ्याचा वेग वाढला… पण त्यावेळी काही पक्ष फार नकारात्मक होते; त्यांनी या कराराला विरोध केला… अमेरिकेसमोरची शरणागती ठरवलं… आणि तशी भूमिका घेणार्‍यांनी सत्ता मिळाल्यावर त्याच कराराचा पाठपुरावा केला आणि आता कल्पक्कमचंही श्रेय घेऊ पाहतायत…’’ असं काही मी सुनावलं.

गंमत अशी की असं तार्किक प्रत्युत्तर द्यायला गेलं की समोरच्याचं जे होतं तेच यांचंही झालं. मोबाइल फोन आल्याचा अभिनय करत ‘‘एक्स्क्युज मी…’’ म्हणत ते निघून गेले. खात्री होती परत काही ते येणार नाहीत. नाहीच आले. पण आता या निमित्तानं कल्पक्कमला नक्की काय घडलं त्याचा आढावा घ्यायला हरकत नाही. तिथं पुढच्या काही वर्षांत काय होणार आहे हे एपीजे अब्दुल कलाम, डॉ. अनिल काकोडकर यांच्यासारख्यांच्या कडून समजून घेण्याची संधी—एकदा नाही तर अनेकदा—ज्यांना मिळाली त्यातला एक मी असल्यामुळे तर हे प्रकरण समजून सांगायला हवंच.

झालंय असं की तिथला ‘प्रोटोटाइल फास्ट ब्रीडर रिॲक्टर’ कार्यान्वित करण्यात आपल्याला यश आलंय. ही घटना खूप महत्त्वाची. ती समजून घेण्याआधी नेहमीच्या अणुभट्ट्या आणि ‘फास्ट ब्रीडर’ अणुभट्ट्या यांतला फरक लक्षात घ्यायला हवा. नेहमीच्या अणुभट्ट्यांत इंधन जळतं—बहुधा युरेनियम २३८—आणि ऊर्जा तयार होते. तर फास्ट ब्रीडर रिॲक्टरमधे इंधन जळून त्यातून अधिक इंधन पैदा होतं (म्हणून ब्रीडर) आणि मग ते पुन्हा इंधन म्हणून वापरता येतं. कल्पक्कम इथलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात थोरियमचा वापर झालाय.

तो तसा करता यावा हे थेट होमी भाभा यांच्यापासून अनेकांचं स्वप्न होतं. हेच स्वप्न या सगळ्यांनी पाहिलं कारण आपल्याकडे खनिज तेल नाही, युरेनियम नाही, चांगल्या दर्जाचा कोळसा नाही… पण आपल्याकडे थोरियम आहे. अगदी मुबलक. रामेश्वर, कन्याकुमारी, आंध्र प्रदेशचे काही किनार्‍यांवरच्या वाळूत थोरियम असतं. जगातल्या एकूण साठ्यांपैकी २५ टक्के थोरियम एकट्या भारतात आहे. जाता जाता. जगातल्या एखाद्या दहशतवादी संघटनेला अणुबॉम्ब तयार करायला यश समजा आलंच असतं, तर ती संघटना श्रीलंकेतली ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ इलम’, म्हणजे एलटीटीई असली असती. कुख्यात प्रभाकरनच्या नेतृत्वाखालची ही संघटना शेजारच्या तमिळनाडूतली वाळू चोरून नेत होती. कारण अर्थातच त्यातलं थोरियम.

पण हे थोरियम नुसतं घेतलं तर त्यात काही इंधनयोग्य घटक वरवर आढळत नाही. म्हणजे युरेनियम (२३८) कसं जमिनीच्या पोटातनं येतं तेच मुळी किरणोत्सर्ग घेऊन. ते नैसर्गिक इंधन. थोरियमचं तसं नाही. बिचार्‍यात काही किरणोत्सर्ग नसतो. तो बाहेर काढण्यासाठी मोठी प्रक्रिया करावी लागते. युरेनियम (२३८) कसं तयार असतं… वीज निर्माण करा किंवा बॉम्ब. पण ते आपल्या जमिनीत नाही. कसंबसं वर्षाला चारेकशे किलो निघत असेल-नसेल ते आपल्याकडे. पण जगभरात साठेक हजार किलो युरेनियम निघतं वर्षाला. त्यामानानं त्यात आपल्याकडचा वाटा खारीचाही म्हणता येणार नाही, इतकाच. युरेनियम उत्पादनात आघाडीवर असलेल्या देशाचं नाव आहे कझाकस्तान. (‘तिथल्या’ आणि ‘त्यांच्या’च देशात हे इतके इंधनसाठे का असा प्रश्न पडेल काहींना. पण त्याला काही उत्तर नाही. असो.) तर या थोरियमच्या प्रक्रियेत दुसर्‍या एका प्रकारचं युरेनियम तयार होतं आणि मग तेही पुन्हा इंधन म्हणून वापरता येतं. हे युरेनियम २३२. त्याची ‘अडचण’ अशी की ते वापरावंचं लागतं पुन्हा. कारण त्यातून प्रचंड प्रमाणावर गामा किरणांचा उत्सर्ग होत असतो आणि परत त्यात थॅलियमसारखे अन्य घातक किरणोत्सारी घटकही असतात. म्हणजे त्याची सहज विल्हेवाट लावता येत नाही. मग या युरेनियम-२३२ वर प्रक्रिया करून त्यातनं वीजनिर्मिती होते.

असा हा थोरियमाधारित प्रकल्प म्हणून त्याचं महत्त्व. कल्पक्कम इथं तयार झालेल्या या अणुभट्टीला थंड राखण्यासाठी द्रवरूप सोडियम वापरतात हाही आणखी एक वेगळेपणा. हे असं करणं फक्त अन्य दोघांनाच जमलंय. आता आपण, त्याआधी रशिया आणि चीन. असा हा आपला आगळा प्रकल्प ५०० मेगॅवॅट वीजनिर्मिती करेल. घरांचा हिशेब केला तर साधारण तीनेक लाख घरं यातल्या विजेनं उजळतील.

‘त्या’ गृहस्थाची तक्रार हीच की ‘इतक्या’ मोठ्या बातमीला मोठी प्रसिद्धी दिली गेली नाही. खरं आहे ते. कारण ही बातमीच मुळात त्याला जितकी वाटतीये तितकी मोठी नाही. खरा मोठेपणा ठाऊक नसला की लहान लहान लोकं, गोष्टीही मोठ्या वाटू लागतात. तसंच हेही.

असं मानायचं कारण कल्पक्कममधे जी अणुभट्टी सुरू झाली ती केवळ ‘प्रोटोटाइप’ आहे. म्हणजे फक्त नमुना. हा ‘नमुना’ या टप्प्यापर्यंत येण्यासाठीची प्रक्रिया यशस्वी व्हावी यासाठी जवळपास ४० वर्ष आपले प्रयत्न सुरू होते. या एकट्या नमुन्यामागे सुमारे २२ वर्षांची प्रतीक्षा आहे. आणि हा नमुना कार्यान्वित झाला याचा अर्थ त्यातल्या अणुभट्टीतली प्रक्रिया सुरू झाली इतकाच आहे. ही प्रक्रिया स्थिर व्हायला आणखी किमान १२-१३ महिने लागतील. म्हणजे प्रत्यक्ष वीजनिर्मिती सुरू व्हायला किमान इतकी वाट पहावी लागेल. किमान म्हणायचं कारण या काळात काही वेगळं घडलं नाही, अडचणी आल्या नाहीत तर. या अशा अणुभट्ट्या आणखी काही स्थापायच्या तर काही तज्ज्ञांच्या मते त्यासाठी तीन ते चार दशकांचा कालावधी हवा. म्हणजे आणखी ४० वर्षे गेली.

याचा अर्थ प्रयत्नच करू नयेत यासाठी असा अजिबातच नाही. हे लक्षात घेऊनच मनमोहन सिंग यांच्यासारख्यानं आपलं पंतप्रधानपद पणाला लावलं आणि हा अणुकरार केला. या करारात आपलं थोरियम संशोधन आंतरराष्ट्रीय यंत्रणांच्या तपासणी यंत्रणेबाहेर राहील याची खबरदारी घेण्याचा ठामपणा सिंग यांनी दाखवला. म्हणून हा प्रकल्प सुरू झाला.

अशक्त म्हणून हिणवले गेलेलेच अधिक सशक्त निघतात बर्‍याचदा.