‘हाय कंगू आंटी, हाऊ आर यू? वुई थिंक यू आर नॉट फाईन! गटर जनरेशन? ठीक आहे पण हा टेक थोडा आऊटडेटेड वाटतो. आम्ही गटार नाही, गूगल जनरेशन आहोत. एका क्लिकमध्ये जग शिकतो, स्टार्टअप उभे करतो, कंटेंट बनवतो आणि चुकीचे वाटले तर प्रश्नही विचारतो. आधी तूही प्रश्न विचारायचीस, फिल्मी माफियांना. आवडायचे आम्हाला. मग तू कुणाच्या तरी वतीने प्रश्न विचारू लागलीस व आमच्या ‘बॅडलिस्ट’मध्ये ढकलली गेलीस. लोकशाहीत शिक्षण व्यवस्थेविषयी प्रश्न विचारणे गुन्हा आहे का? तू शिकलेली नाहीस, हे सर्च केल्यावर समजले. म्हणून कदाचित तुला हा गुन्हा वाटत असेल. आम्ही शिकतोय म्हणून विचारतो. त्याचा तुला एवढा त्रास का होतो आंटी? हो आहेत आमच्यात फ्लॉज. प्रत्येक जनरेशनमध्ये असतातच ना! म्हणून काय होल जनरेशनला तू एकाच लेबलमध्ये टाकशील? हे लो की अनफेअर आहे असे वाटत नाही तुला? आम्ही वर्तमानात जगणारे तरुण आहोत. पूर्वायुष्यात काय घडले याचा विचारही करत नाही. त्यामुळे तुझ्याही पूर्वायुष्यावर सर्च मारण्याच्या भानगडीत आम्ही कधी पडलो नाही व पडणार नाही. आमच्या आधीची पिढी तुझ्याविषयी काय काय बोलत असते त्याकडे आम्ही लक्षही देत नाही. यू अँड यूवर लाईफ, आम्हाला काय त्याचे? ‘नो हेट, ओन्ली फॅक्टस्’ हेच आमचे सूत्र. मग कशाला आमच्यात कडमडते आंटी!
आम्हाला गटार म्हणण्याआधी स्वत:ला एकदा रिवाइंड करून बघ की जरा. ज्या जनरेशनला तू रोस्ट करतेय त्याच जनरेशनने तुझे रील्स व्हायरल केले. मूव्हीज ट्रेंड केले. हे इतक्या लवकर कशी विसरली तू? तेव्हा तुला आमच्यातले गटारपण दिसले नाही का? याच गटारातील गॅस वापरता येऊ शकतो असे ज्ञान मागे कुणी तरी पाजळले होते. आम्हाला हे विशेषण लावण्याआधी त्या ज्ञानाची (अज्ञानाची नाही) आठवण तुला झाली नाही का? हो, आम्ही क्रींज करतो, मिम्स टाकतो, डार्क ह्युमर करतो, थेरेपीबद्दल ओपनली बोलतो, बाऊंड्रीज ठेवतो पण ते गटारपण नाही, दॅटस् कॉल्ड इन्व्हॉल्विंग! आमच्यातही प्रॉब्लेम्स आहेतच की. हंड्रेड पर्सेंट. लो अटेंशन स्पॅन? कूक्ड, ओव्हर थिंकिंग? मॅक्स लेव्हल, स्क्रीन टाइम? डोन्ट आस्क, पण म्हणून काय आम्ही आंधळे, बहिरे नाही झालो. लक्ष आहे आमचे. म्हणून तर रस्त्यावर उतरलो. हे समजून घ्यायचे असेल तर आसाममधील मंत्र्यांच्या मुलीला विचार किंवा ओडिशाच्या त्या खासदार मॅमच्या मुलीला. सांगतील त्या आमच्या भावना. मग कळेल तुला प्रश्न विचारणे काय असते ते. प्रश्न पडणे, विचारणे विसरून गेलेल्या आंटीने आम्हाला टीच करण्याची काही गरज नाही. प्रत्येक जनरेशनला पुढची जनरेशन बिघडलेली वाटते. बूमर्स पण मिलेनियल्सना हेच बोलायचे. मिलेनियल्स आता जेन झीला बोलतायत. आता आमचा टर्न आलाय. सेम ओल्ड डी एल सी, डिफ्रंट ग्राफिक्स. आम्ही शिकतो, प्रश्नही विचारतो. ब्लाइंड फॉलो करणे ही आमची डिफॉल्ट सेटिंग नाही. स्पर्धा परीक्षा देणे किती हार्ड असते हे तरी ठाऊक आहे का तुला? चालली आम्हाला गटारछाप ठरवायला. पुन्हा असे बोलली तर शट अप म्हणू आंटी.’ इन्स्टावर हे वेगाने व्हायरल झाल्यावर संतापलेल्या कंगूने स्वत:चे अकाऊंट बंद करून टाकले.
