‘राहुल गांधींना बघताच आम्हा महिलांना असुरक्षित वाटते. ते टपोरीसारखे वागतात’ या वक्तव्याने देशभर खळबळ उडाल्याने कंगणा खुशीत होती. पक्षाने दिलेली जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडल्याचे समाधानही तिच्या चेहर्यावर होते. चला, आपली खासदारकी आता सार्थकी लागली. त्या स्मृतीताईची जागा आपल्याला मिळण्यापासून आता कोणी रोखू शकत नाही असा विचार करत ती बंगल्यावर परतली तेव्हा सायंकाळ झाली होती. हा पप्पू संसदेच्या आवारात टीशर्टवर फिरून वाहिन्यांचे फुटेज वाया घालवत असतो. आपल्या वक्तव्याने याची चांगलीच कोंडी होईल आता. खास ठेवणीतले महिलास्त्र काढल्यामुळे गप्प बसण्याशिवाय पर्यायच नाही त्याच्याकडे, असा विचार करत तिने टीव्ही सुरू केला.
आता मस्तपैकी एखादा सिनेमा बघायचा असे ठरवत तिने एक चॅनल लावले तर त्यावर ‘अग्निपथ’ सुरू. त्यात हृतिक रोशनला बघताक्षणी तिला दरदरून घाम फुटला. लगेच टीव्ही बंद करत ती बंगल्याच्या बाहेर आली. नको त्या जुन्या आठवणी, असुरक्षित करणार्या असे स्वत:ला समजावत कंगणाने हिरवळीवर शतपावली सुरू केली. सहज म्हणून तिची नजर कुंपणभिंतीकडे गेली तर पलीकडून हृतिक डोकावून बघत असल्याचा भास तिला झाला. त्यामुळे तिचे अंग थरथरू लागले. चालता चालता दोनदा तिने भिंतीकडे बघितले तर पुन्हा हृतिकच. नक्कीच काहीतरी गडबड आहे. मला घाबरवण्यासाठी या पप्पूने हृतिकला बोलावले तर नसेल अशी शंका मनात येताच ती पुन्हा बंगल्यात शिरली. तिने थेट पक्ष मुख्यालयात फोन केला. पलीकडून उत्तर आले. ‘काळजी करू नका. आता यापुढचे काही दिवस तुम्हाला राहुलपासूनच असुरक्षित वाटायला हवे हे लक्षात असू द्या. तरीही तपासणीसाठी आम्ही पोलीस पाठवतो.’ मग पोलीस आले, त्यांनी सभोवताल पाहणी केली पण काहीच संशयास्पद आढळले नाही. थोडे हायसे वाटल्याने कंगणा शयनकक्षात गेली. विचार करता करता तिचा डोळा लागला.
पहाटे अचानक आवाज झाल्याने जाग आली तेव्हा तिला दोन घारे डोळे खिडकीतून बघत असल्याचे जाणवले. मांजर तर आपल्या बंगल्यावर नाही मग हे डोळे नेमके कुणाचे, या प्रश्नासरशी तिला आदित्य पांचोली आठवला. हो, हे त्याचेच डोळे, हा इथे काय करतो, यालाही त्या पप्पूने पाठवले काय? तिने लगेच डोक्यावरून पांघरूण घेतले, हे डोळे आदित्यचे की अरमानचे यावरून तिचा गोंधळ उडाला. जवळच असलेला फोन वापरून तिने ‘स्टाफ’ला आत बोलावले. निरोप मिळताच सगळेच धावत आले. पुन्हा एकदा खिडक्यांची आतून बाहेरून तपासणी करण्यात आली. त्यावरचे पडदे नीट करण्यात आले. डोकावण्यासाठी कुणी येऊन गेल्याच्या पाऊलखुणासुद्धा बंगल्याच्या आवारात आढळल्या नाहीत. मॅडमना भुताने तर झपाटले नसेल अशी शंका नोकरांना आली पण ती बोलून दाखवण्याचे धाडस कुणाला झाले नाही.
सकाळी ती उठली तेव्हाही तिचे अंग थरथरत होते. त्याच अवस्थेत तिने पुन्हा पक्ष मुख्यालयात फोन लावला. माझ्याविरद्ध कट शिजतोय अशी तक्रार केली. पलीकडून उत्तर आले. ‘मॅडम, तुम्ही भूतकाळ विसरा, वर्तमानकाळात जगायला शिका. तुमचा खरा शत्रू राहुल गांधीच आहे. इतरांमुळे असुरक्षित होऊ नका.’ घडलेला हा किस्सा नोकरांकरवी सर्वच खासदारांच्या वर्तुळात चर्चिला जाऊ लागला. राहुलच्या कानावर तो जाताच ते खळखळून हसले व साहाय्यकांना स्वत:चा फोन देत म्हणाले. ‘त्या हृतिक व आदित्यला धन्यवादाचे संदेश तातडीने पाठवा.’
