किन्नरी नेरुरकर
आपल्या आत्मिक आनंदासाठी आपण सतत बाह्य जगातील घडामोडींवर का अवलंबून असतो? आपल्या विचारांवर आपलं किती नियंत्रण आहे? आपलं दैनंदिन जगणं आणि बाह्यजग यापलीकडे आपलं ‘स्वत्व’ नेमकं काय आहे? तंत्रज्ञानाच्या युगात सजगपणे जगणं, विचार करणं म्हणजे काय? असे अनेक प्रश्न कर्तार सिंग यांचं ‘द मिस्ट्री ऑफ लाइफ : ह्युमन्स टर्निंग इन्टू मशिन्स’ हे पुस्तक वाचकांसमोर ठेवतं. आपण स्वत:ला स्वतंत्रपणे जगणारे, निर्णय घेणारे आणि विचार करणारे मानत असलो तरी प्रत्यक्षात आपण सभोवतालचं जग, सामाजिक चौकटी, मनातील भीती, आपल्या सवयी, संस्कार, आठवणी यांच्याच प्रभावाखाली जगत असतो. ‘माणसाचं यंत्रवत होत जाणं’ ही संकल्पना या पुस्तकाचा केंद्रबिंदू ठरते. तत्त्वज्ञान आणि चिंतनपरंपरेचा आधार घेत लेखक माणसाच्या आधुनिक जगण्यातील हा महत्त्वाचा विरोधाभास अधोरेखित करतात.
माणूस अधिकाधिक कार्यक्षम होत असताना तो स्वत:विषयी सजग होत आहे का, की फक्त अधिक ‘यांत्रिक’ होत चालला आहे, हा या पुस्तकाचा खरा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर हे पुस्तक वाचकांवर सोपवतं. असं असलं तरी ही उत्तरं शोधायला हवीत, धकाधकीच्या आयुष्यात क्षणभर थांबून स्वत्वाचा शोध घेण्यासाठी विचार करायला हवा, हे वाचकांच्या मनात रुजवतं. स्वत:कडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची, विचार करण्याची क्षमता, जीवनाचा उद्देश व अंतर्मनाचा विकास यांचं महत्त्व काय याचा शोध घेण्याची प्रेरणा हे पुस्तक वाचकांना देतं. अध्यात्म आणि आजच्या आधुनिक जगातील वास्तव यांची सांगड घालण्याचा प्रयत्न या पुस्तकातून लेखकाने केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाविषयीची चर्चा केवळ यांत्रिकीकरणापुरती मर्यादित राहत नाही; उलट, त्यातून माणूस आपल्या अंतर्मनातील जाणीव आणि चेतनेपासून किती सहज दूर जाऊ शकतो, याचं व्यापक चिंतन या पुस्तकातून समोर येतं. आनंद ही बाह्य जगात सतत शोधत राहण्याची गोष्ट नसून, त्याचं मूळ आपल्या अंतर्मनातच आहे, याची जाणीव पुस्तकातून करून दिली आहे.
पुस्तकाची मांडणी तीन संक्षिप्त भागांत केली आहे. पहिल्या भागात लेखक ‘मानवी स्व’ विषयीची संकल्पना समजावून सांगतात. शांतता, आनंद किंवा समाधान या गोष्टी बाह्य जगावर अवलंबून राहत मिळवायच्या किंवा आयुष्यातील एखादं ध्येय गाठल्यानंतर प्राप्त करायच्या नसून त्या माणसाच्या अंतर्मनातच अंतर्भूत आहेत, मात्र या विलक्षण अनुभूतीपासून आपण दूर जातो ते आपल्या बाह्य धावपळीमुळे आणि यंत्रवत झालेल्या दैनंदिन जगण्यामुळे असा लेखकाचा मूलभूत विचार आहे. याच भागात देवाने माणसाची निर्मिती कशी केली या ‘बायबल’मधील ‘इडन गार्डन’विषयीच्या कथेचं उदाहरण देत माणसाच्या ‘मी’पणाचा जन्म कसा झाला आणि त्यामुळे माणूस विश्वापासून कसा वेगळा झाला, याचा आध्यात्मिक अर्थ मांडला आहे.
दुसर्या भागात लेखकाने विचार मांडला आहे तो ‘आभासी मना’विषयी. बाहेरच्या जगात घडणार्या असंख्य गोष्टींमध्ये आपलं मन इतकं गुंतून जातं, की स्वत:च्या अस्तित्वाची जाणीवच मागे पडते. आजच्या डिजिटल युगात समाजमाध्यमे, माहितीचा ओघ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांसारख्या तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरातून स्वत:च्या भावनांकडे, विचारांकडे दुर्लक्ष करणे या पार्श्वभूमीवर हा विचार अधिकच समकालीन वाटतो. ‘आभासी मन’ या संकल्पनेत आपल्या मनात साचलेले विचार, आठवणी, भीती, अपेक्षा, आसक्ती, सवयी आणि सतत सुरू असलेली मानसिक धावपळ याविषयीचा ऊहापोह आहे.
तिसर्या भागात लघुकथा, विविध आध्यात्मिक परंपरांमधील उदाहरणे सांगत चैतन्यरहित जगण्यापासून आत्मजाणिवेकडे जाण्याचा प्रवास लेखकाने मांडला आहे. आपल्या विचारांकडे कसे पाहावे, वर्तमानात राहणे किती महत्त्वाचे, मनाची ऊर्जा अनावश्यक गोष्टींमध्ये खर्च न करणे आणि अहंभावापलीकडे जाण्याचा प्रयत्न करणे, या संकल्पना पुस्तकात वारंवार समोर येतात.
सोपी भाषा, लहान परिच्छेदात सहज समजावून सांगितलेली संकल्पना, आध्यात्मिक विषय मांडताना क्लिष्ट भाषेचा आधार न घेता दैनंदिन अनुभवांच्या माध्यमातून मांडलेले विचार यामुळे हे पुस्तक वाचण्यास फारसा वेळ लागत नाही. त्यामुळे आध्यात्मिक साहित्याशी फारसा परिचय नसलेल्या वाचकालाही पुस्तक सहज समजते. ध्यान, शारीरिक व्यायाम, सकारात्मक संकल्प, एकाग्रता आणि स्वत:च्या विचारांचे सजगपणे निरीक्षण अशा काही कृतींच्या माध्यमातून जागरूकता वाढवण्याच्या सूचना लेखक देतात. त्या समजण्यास सोप्या आहेत. आधुनिक जीवनातील वेग, स्पर्धा आणि उत्तेजनांमध्ये आपण स्वत:पासून किती दूर गेलो आहोत, हा प्रश्न पुस्तक वाचकासमोर ठेवते.
तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव, माहितीची अफाट उपलब्धता, सभोवतालच्या बदलत्या जगाविषयी सततची उत्सुकता आणि अखंड कार्यक्षम राहण्याच्या दबावाच्या काळात माणूस खरोखरच किती ‘माणूस’ राहिला आहे, हा प्रश्न उपस्थित करणारे हे पुस्तक आहे. आधुनिक जीवनशैलीकडे आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहणारे हे पुस्तक माणसाच्या बाह्य प्रगतीपेक्षा त्याच्या अंतर्मनाशी असलेल्या नात्याचा शोध घेते. ज्यांना अध्यात्म आणि जीवनाचा सखोल अर्थ यांसारख्या विषयांवर वाचायला आवडते, त्यांच्यासाठी हे पुस्तक एक अर्थपूर्ण आणि अंतर्मुख करणारा वाचनप्रवास ठरू शकते.
किन्नरी नेरुरकर
kinnari.nerurkar@expressindia.com
