संकल्प गुर्जर, पुणेस्थित अभ्यास
ट्रम्प यांच्या आजूबाजूला अतिशय स्वार्थी, संधिसाधू, विधिनिषेधशून्य, चक्रम, विक्षिप्त म्हणता येतील अशा व्यक्तींचे कोंडाळे आहे. हा गट कसा विचार करतो हे समजून घ्यायचे असेल, तर वाचावे असे पुस्तक…
अमेरिकी राजकारण गेली दहा वर्षे डोनाल्ड ट्रम्प यांच्याभोवती फिरत आहे. ट्रम्प यांच्या कृती, त्यांची विधाने, त्यांच्या समाजमाध्यमांवरील पोस्ट इ. गोष्टी सतत चर्चेत असतात. या माणसाने त्याच्या वर्तनाने सार्या जगाला वेठीस धरले. ट्रम्प यांच्यावर माध्यमांचे इतके जास्त लक्ष केंद्रित झाले आहे की त्यामुळे त्यांच्याविषयी लिहिणे किंवा बोलणे याचेही अजीर्ण होऊ लागले आहे. असे असले तरीही ट्रम्प अजून पुढील दोन वर्षे सत्तेत राहणार आहेत. त्यांनी आणलेली माणसे अमेरिकेत भल्या-बुर्या पद्धतीने सत्ता राबवणार आहेत. त्यामुळे ट्रम्प यांच्या आजूबाजूच्या माणसांविषयी माहिती करून घेणे, त्यांची विचार प्रक्रिया काय आहे याचा अंदाज येणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने पाहिल्यास ट्रम्प यांनी अमेरिकेच्या ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ (एफबीआय) या तपास यंत्रणेच्या प्रमुखपदी बसवलेल्या काश पटेल यांचे ‘गव्हर्नमेंट गँगस्टर्स: द डीप स्टेट, द ट्रुथ अँड द बॅटल फॉर अवर डेमोक्रसी’ हे पुस्तक उपयुक्त आहे.
ट्रम्प यांच्या आजूबाजूला अतिशय स्वार्थी, संधिसाधू, विधिनिषेधशून्य, चक्रम, विक्षिप्त आणि अतिशहाणे म्हणता येतील अशा व्यक्तींचे कोंडाळे आहे. या लोकांना सरकारात किंवा राजकारणात काम करण्याचा फारसा अनुभव नाही. ट्रम्प यांच्यावर निष्ठा असणे हेच या लोकांचे प्रमुख भांडवल आहे. ट्रम्प नसते तर अमेरिकेच्या राजकारणात या माणसांना काहीही स्थान मिळाले नसते. अशा लोकांमध्ये अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ, ट्रम्प यांचे जावई जॅरेड कुशनर, मूळचे बिल्डर असलेले व सध्या ट्रम्प यांचे खास दूत असलेले स्टीव्ह विटकॉफ इ. चा समावेश होतो. ४६-वर्षीय काश पटेल या लोकांपेक्षा थोडे (फार
नव्हे) वेगळे आहेत. मूळचे वकील असलेले पटेल २०१६ पासून टप्प्याटप्प्याने ट्रम्प यांच्या जवळ गेले आहेत. ट्रम्प यांचा ‘ॲक्सेस’ मिळणे ही त्यांना आयुष्यातील एक ‘अचिव्हमेंट’ वाटते.
ट्रम्प आणि त्यांचे भक्तगण यांचा एक आवडता मुद्दा आह. अमेरिकेतील राजकीय, प्रशासकीय, वैचारिक, उद्योग-व्यवसाय, माध्यमे आणि मनोरंजन या क्षेत्रांत कार्यरत असणार्या वरिष्ठ वर्गाला या देशाशी देणे-घेणे नाही, ते फक्त स्वत:चे हितसंबंध सांभाळतात. त्यांना या देशातल्या सामान्य जनतेच्या हिताची पर्वा नसते, हे वरिष्ठ वर्गीय लोक जनतेने निवडून दिलेल्या राजकीय नेत्यांना काम करू देत नाहीत, जनतेच्या प्रतिनिधींना काम करता येऊ नये यासाठी अमेरिकेत एक ‘डीप स्टेट’ कार्यरत आहे, या ‘डीप स्टेट’ने सत्तेची सर्व सूत्रे आपल्या हाती ठेवली आहेत. यात अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्ष आणि पत्रकार, कार्यकर्ते, उद्योगपती, प्रशासनातील अधिकारी इ. चा समावेश होतो. ट्रम्प यांनी ‘डीप स्टेट’ला अंगावर घेतले आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात आरोप, खोट्या चौकशा, घरावर धाड इ. चा ससेमिरा या ‘डीप स्टेट’ने लावला. अशा या ‘डीप स्टेट’ने सत्याचा अपलाप केला असून अमेरिकी लोकशाहीला गुंडाळून ठेवले आहे. त्यांच्याकडे सत्तेच्या चाव्या असल्याने ते सरकारी गुंड वाटावेत अशा रीतीने वागतात, असे पटेल यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच त्यांनी पुस्तकाचे नाव ‘गव्हर्नमेंट गँगस्टर्स’ असे ठेवले आहे. आपण या पुस्तकातून ‘डीप स्टेट’चा खरा चेहरा समोर आणत असून त्यांची कार्यपद्धतीदेखील समजावून सांगत आहोत असा पटेल यांचा दावा आहे.
पुस्तकात पटेल यांनी कोणते विषय हाताळले आहेत? एका वाक्यात सांगायचे तर ट्रम्प यांच्या पहिल्या अध्यक्षीय कारकीर्दीत जे जे वादग्रस्त मुद्दे होते ते या पुस्तकात आहेत. जर विवेकी पद्धतीने विचार केला तर यातल्या प्रत्येक मुद्द्यावरून इतर कोणत्याही नेत्याला त्याचे पद गमवावे लागले असते. (१९७० च्या दशकात अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचे वर्तन ट्रम्प यांच्यापेक्षा किती तरी सौम्य असूनही त्यांच्यावर राजीनामा द्यायची वेळ आली होती.) मात्र ट्रम्प यांच्याबाबत असे काही झाले नाही. ट्रम्प यांनी २०१६ ची निवडणूक जिंकण्यासाठी रशियाशी संधान साधले असा आरोप होता. त्याची चौकशी करणार्या समितीत पटेल होते. त्यानंतर ट्रम्प यांनी २०१९मध्ये जो बायडेन यांच्या मुलाचे युक्रेनमध्ये काय उद्योग चालतात याची माहिती दिली नाही तर युक्रेनची मदत बंद करू अशी धमकी झेलेन्स्की यांना दिली होती. त्याबद्दल ट्रम्प यांच्यावर महाभियोगदेखील चालवला गेला. पटेल त्यालाही हात घालतात व रशियाच्या चौकशीप्रमाणेच इथेही ट्रम्प यांना ‘क्लीन चिट’ देतात. २०२० मध्ये पटेल यांना काही महिने अमेरिकेच्या गुप्तहेर यंत्रणा, संरक्षण विभाग इ.शी संबंधित काम करता आले. त्यानिमित्ताने आपल्याला ‘डीप स्टेट’ ची कार्यपद्धती जवळून पाहता आली असे त्यांना वाटते आणि त्यावरून पटेल काही ठोस निष्कर्ष काढू पाहतात.
ट्रम्प यांनी ६ जानेवारी २०२१ ला आपल्या समर्थकांना चिथावणी देऊन अमेरिकेच्या ‘कॅपिटॉल हिल’वर सोडले होते. हा अमेरिकेच्या लोकशाहीवर आणि मानबिंदूवर केलेला थेट हल्ला होता. त्या दिवसाविषयीदेखील पटेल लिहितात. ट्रम्प यांच्या समर्थकांमध्ये असलेल्या गौरवर्णीय, वंशश्रेष्ठत्व मानणार्या गटांपासून अमेरिकेला धोका नाही असे त्यांना वाटते. पटेल यांचा असा ठाम समज आहे की हे सगळे मुद्दे पुढे आणणे व ट्रम्प यांना काम करू न देणे हा ‘डीप स्टेट’चा डाव होता. जसे विरोधकांना प्रत्येक ठिकाणी ट्रम्प दिसतात तसेच पटेल यांना वर नमूद केलेल्या प्रत्येक घटनेत ट्रम्प यांना उलथवून टाकण्याचा कट दिसतो.
पुढे जाण्याआधी इथे हेही नोंदवायला हवे की जगभरात सर्वत्रच ‘डीप स्टेट’ नावाचे एक भूत उभे केले जात आहे. जगाला चालवणारे एक ‘ग्लोबल डीप स्टेट’ असून ते देशोदेशी सत्ताबदल घडवून आणते, जनतेच्या चळवळी उभ्या करते आणि ‘लोकप्रिय’ नेते सत्तेपासून बाजूला करते असे अनेकांना वाटते. आपल्याकडेही अशांची संख्या कमी नाही. बाहेरून कोणी तरी हस्तक्षेप करत आहे आणि सरकारच्या विरोधात जनमत संघटित करत आहे, असे म्हटले की सरकारच्या अपयशावर पांघरूण घालणे फारच सोपे होते. जगभर हे सुरू आहे.
पटेल यांच्या या पुस्तकाविषयी दोन दृष्टिकोन असू शकतात. एक, पटेल हे ट्रम्प यांचे निष्ठावान सहकारी असून ट्रम्प यांच्या समर्थकांचा एक गट कसा विचार करतो हे समजून घ्यायचे असेल (आणि हाताशी बराच वेळ असेल) तर हे पुस्तक वाचावे. अमेरिकी राजकारणाला वळण देणार्या एका प्रवाहाचे प्रतिनिधी म्हणून ट्रम्प यांच्याकडे पाहिले तर हे पुस्तक काही प्रमाणात तरी उपयुक्त वाटू शकेल.
दोन, पटेल हे एक अतिशय हुशार असे वकील असून ट्रम्प यांची बाजू आपण का घेतो या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी त्यांनी हे पुस्तक लिहिले असावे. ट्रम्प नसते तर पटेल यांना ‘एफबीआय’चे प्रमुखपद कधीही मिळाले नसते. त्यामुळे ट्रम्प निवडून येऊ शकतील असे दिसताच आपली निष्ठा व्यक्त करणे आणि त्यांच्या सरकारात आपल्याला काही तरी मोठे पद मिळावे यासाठी पटेल यांनी हे पुस्तक लिहिले असावे. पटेल यांची एपस्टीन फाइल्सच्या निमित्ताने उडालेली तारांबळ पाहता ते हुशार असावेत या निष्कर्षाला आव्हान देता येऊ शकते. तसेच ट्रम्प यांची दोलायमान मानसिक स्थिती पाहता पटेल इथून पुढे किती काळ एफबीआयच्या प्रमुखपदी राहणार याचीही चर्चा सुरू आहे. क्रिस्टी नोएम आणि पॅम बॉण्डी यांच्यानंतर आता काश पटेल यांची गच्छंती होणार, असे भाकीत वर्तवले जात आहे.
या पुस्तकाच्या निमित्ताने आणखी दोन मुद्द्यांवर चर्चा होणे गरजेचे आहे- पटेल हे भारतीय वंशाचे असल्याने आजकाल अशा लोकांना डोक्यावर घेण्याची सवय आपल्याकडे अनेकांना लागली आहे. ट्रम्प यांच्या अवतीभोवती असे भारतीय दिसून येतात. त्यामध्ये पटेल यांच्याशिवाय विवेक रामास्वामी, श्रीराम कृष्णन आणि उषा व्हान्स यांचाही समावेश करता येईल. असे हे भारतीय वंशाचे लोक अमेरिकेत वरिष्ठ पदावर गेले तर त्याचा नेमका भारताला काय फायदा होतो? आपले पंतप्रधान हे ट्रम्प यांचे ‘खास मित्र’ असूनही अमेरिकेने जेव्हा भारतावर ५० टक्के आयात शुल्क लादले तेव्हा या भारतीय वंशाच्या माणसांचा काय उपयोग झाला?
दुसरा मुद्दा लोकशाही राजकारण आणि प्रशासन यांच्याशी संबंधित आहे. ट्रम्प हे लोकशाही मार्गाने निवडून आलेले नेते आहेत. त्यांनी जाणीवपूर्वक ‘प्रोफेशनल’ नोकरशाहीचा गळा घोटणे, सरकारी अधिकार्यांना नोकरीतून काढून टाकणे आणि आपले निष्ठावान त्या पदांवर भरणे असे उद्योग सुरू केले आहेत. याकडे कसे पाहावे? नेता सत्ता राबवण्यासाठी देशातील प्रशासन, न्याययंत्रणा आणि राज्यघटना यांची पायमल्ली करत असेल तर त्याकडे कसे पाहावे? पारंपरिक आणि विवेकी दृष्टिकोन असे सांगतो की, राज्यघटना ही सार्वभौम आहे. त्या चौकटीतच कारभार केला गेला पाहिजे. मात्र सध्या आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक नेत्यांना व त्यांच्या भक्तांना असे वाटते की, हा मुद्दा मान्य केल्यास जनतेच्या मतांची किंमत कमी होते. मग अंतिम सत्ता कोणाची? राज्यघटनेची, निवडून आलेल्या नेत्याची की जनतेची? आजच्या संदर्भात या प्रश्नाची पुन्हा एकदा चर्चा करणे आवश्यक झाले आहे.
ट्रम्प यांचे गेल्या दीड वर्षांतील वर्तन पाहता, खरे ‘गव्हर्नमेंट गँगस्टर्स’ तर ट्रम्प आणि त्यांचे सहकारीच आहेत असे कोणी म्हणाले तर ते पटेल यांच्यासारखे भक्त खोडून काढू शकतील का?
गव्हर्नमेंट गँगस्टर्स : द डीप स्टेट, द ट्रुथ अँड द बॅटल फॉर अवर डेमोक्रसी
लेखक : काश पटेल
प्रकाशक : विस्डम ट्री
पृष्ठे : ३०४, किंमत : ५१० रु.
