मुलींचे शिक्षण आणि आरोग्य यासाठी एकेकाळी झटलेल्या माधानच्या ‘कस्तुरबा सर्वोदय मंडळा’ला आता उतरती कळा लागली आहे. स्वावलंबन हेच गांधीवादाचे मुख्य सूत्र. ते न पाळता सरकारवर अवलंबून राहण्याची चूक या संस्थेच्या पडझडीला कारणीभूत ठरल्याचे दिसते…
‘शून थाय छे कस्तूर?’ (काय होतेय कस्तूर) कातर स्वरात गांधींनी कस्तुरबाचा हातात हात घेत विचारले. त्यावर क्षीण व थरथरत्या आवाजात ‘बा’ म्हणाल्या, ‘शून थाय छे समझतू नथी. मारे जावा नो वखत थाय गयो (काय होतेय हे कळत नाही पण माझ्या जाण्याची वेळ आलीय). हे ऐकताच गांधी तिच्याजवळ बसले. १९४४ च्या २१ फेब्रुवारीचा हा प्रसंग. त्यांनी सर्वांना खोलीतून बाहेर जायला सांगितले. रात्रभर दोघेच होते. बापू आणि बा. २२ फेब्रुवारीला सकाळी साडेसातला ‘बां’नी प्राण सोडला. बापूंच्या मांडीवर. हा प्रसंग नोंदवला गेलाय अलीकडे प्रकाशित झालेल्या तुषार गांधींच्या ‘द लॉस्ट डायरी ऑफ कस्तुरबा’मध्ये. मात्र तो घराघरांत पोहचला १९४४ सालीच. त्याने कस्तुरबांच्या कार्याला पुन्हा एकदा उजाळा मिळाला व त्यापासून प्रेरणा घेत अनेक महिलांनी घरदार सोडले, संसाराकडे पाठ फिरवली. त्यातल्या काही स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्या तर काही समाजोत्थानात. त्यातल्या शांताबाई अत्रे एक. त्यांचे यजमान विष्णुपंत. जर्मनीतून अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन परतलेले. देवनागरी टाइपरायटरचा शोध यांच्या नावावर. तर शांताबाई मुलांना नातेवाईकांकडे सोपवून थेट गेल्या अमरावतीजवळच्या माधानला. तिथे प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांचा मठ सक्रिय होता. तिथे राहून त्या महिलांमध्ये जागृतीचे काम करायच्या. याच सुमारास कस्तुरबांनी सुरू केलेल्या समाजसेवेला संस्थात्मक बळ मिळावे म्हणून गांधींच्या पुढाकारातून अखिल भारतीय ‘कस्तुरबा स्मृती ट्रस्ट’ची स्थापना करण्यात आली. या ट्रस्टचे काम अकोल्याच्या ताराबेन मश्रूवालांनी बघावे अशी गळ खुद्द गांधींनी घातली. ताराबेन गांधींची सून असलेल्या सुशीलाबेनच्या सख्ख्या भगिनी. लहानपणापासून दम्याच्या आजाराने ग्रस्त. तरीही त्यांनी हे आव्हान स्वीकारले व निवड केली माधानची.
ताराबेन व शांताबाईंची पहिली भेट झाली ती अशी. येथे या दोघींना येऊन मिळाल्या सुशीलाताई जोशी. ‘मातृ सेवा संघा’त काम करणार्या. या तिघींना साथ मिळाली चांदूर बाजारच्या मनकर्णिका चर्जन व पार्वतीबाई तट्टेंची. या दोघी परिचारिका. यातून तयार झाले ‘पंचकन्ये’चे सूत्र. याच नावाने आताही ओळखली जाणारी ही माधानची संस्था आता पडझडीच्या उंबरठ्यावर आहे. गांधीवाद्यांच्या बहुतेक संस्थांमध्ये जे घडते ते इथेही घडले. १९४६ ला गुलाबराव जवंजाळाच्या वाड्यात सुरू झालेल्या या संस्थेची धुरा ताराबेनकडे होती तोवर देशभर तिचे नाव होते. १९९९ ला त्या गेल्या. आणि उतरंडीला सुरुवात झाली. आपल्या हयातीत एखाद्या कार्यकर्त्याकडे संस्थेची सूत्रे सोपवण्याऐवजी त्यांनी प्राधान्य दिले त्यांच्या मानसपुत्राला. बाळासाहेब पटवर्धन त्यांचे नाव. आता तेही हयात नाहीत. त्यांचा मुलगा कुणाल संस्था चालवतो. म्हणजे काय करतो तर जे आहे ते तशाच स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करतो. एकेकाळी या संस्थेचा पूर्ण वर्हाडात दबदबा होता. माता बाल संगोपन हा शब्दही जेव्हा समाजाला ठाऊक नव्हता तेव्हा या पंचकन्यांनी माधानसारख्या छोट्याशा गावात सूतिकागृह सुरू केले. बाल संगोपन केंद्र, पाळणाघर, अनाथ मुलींसाठी वसतिगृह, महिलांसाठी आरोग्य शिबिरे असे अनेक उपक्रम हाती घेतले. स्वातंत्र्यानंतर देशातील सार्वजनिक आरोग्य सेवेत सुधारणा करण्याच्या कार्यक्रम सरकारने हाती घेतला तेव्हा अधिकार्यांसमोर आदर्श होता तो याच संस्थेच्या कार्याचा. अमरावती व अकोल्यातील आरोग्य सुविधांनाही लाजवेल अशा सोयी या संस्थेत होत्या. त्यामुळे महिलांची येथे रीघ असे. या संस्थेच्या माध्यमातून देशभरातील कार्याकडे लक्ष देणे शक्य नाही हे लक्षात आल्यावर ताराबेननी ट्रस्टपासून स्वत:ला वेगळे केले व ‘कस्तुरबा सर्वोदय मंडळा’ची स्थापना करून सेवेचा अखंड झरा कायम ठेवला.
या संस्थेत आयोजित होणार्या मुलींच्या निवासी शिबिराला एकेकाळी तुफान गर्दी असे. अनाथ मुलींना वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर संस्थेत ठेवता येत नाही असा कायदा. त्यावर उपाय म्हणून ताराबेननी त्यांचे पालकत्व स्वीकारले. त्या काळात त्यांनी ७८ मुलींची लग्ने लावली. त्यांचे माहेरपण केले. बाळंतपणाची जबाबदारी जिवंत असेपर्यंत पार पाडली. अरुण गांधींच्या प्रयत्नातून ही संस्था परदेशातील देणगीदारांशी जोडली गेली. जर्मनी व स्वीडनच्या संस्थांनी मुलींच्या शिक्षणाचा, कार्यकर्त्यांच्या मानधनाचा खर्च स्वीकारला. २००३ नंतर हा मदतीचा ओघ बंद झाला. ताराबेन गेल्या व संस्थेच्या प्रसारासाठी आवश्यक असलेली दूरदृष्टीच हरवली. स्वातंत्र्यानंतर सरकारने दिलेली पहिली ते दहावीपर्यंतची शाळा वगळता आता सर्व प्रकल्प व इमारती कुलूपबंद झाल्या आहेत. इमारतींच्या एकेक विटा ढासळत असल्या तरी संपूर्ण परिसर मात्र हिरव्यागार झाडींनी बहरलेला. ही झाडे लावली प्रवीणभाई मश्रूवालांनी. ते ताराबेनचे भाचे. त्यांच्या पत्नी मालती. त्या मृणाल गोरेंच्या चुलत बहीण. काही काळ त्याही येथे सेवा देत होत्या. तेव्हा प्रमिला दंडवते, मृणालताई, एस. एम. जोशी नियमितपणे हजेरी लावायचे अशी आठवण शाळेचे मुख्याध्यापक मल्हार गावंडे सांगतात. जुन्या सुवर्णक्षणाचे ते उरलेले एकमेव साक्षीदार. त्यांचे वडील ताराबेनबरोबर काम करत. तेही शाळेचे मुख्याध्यापक होते. मल्हार गावंडे आजही या संस्थेतील एका पडक्या इमारतीत राहतात. एकेकाळी संस्थेची शाळा पंचक्रोशीत नावाजलेली होती. सहाशे विद्यार्थी दरवर्षी असायचे. आता ही संख्या १९० वर आली आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घ्यायची कुणाची तयारी नाही. आता माध्यमिक शाळेत चारच शिक्षक उरले आहेत आणि वर्ग सहा. मग शिक्षकांनीच पदरमोड करून दोन शिक्षणसेवक ठेवलेत.
मल्हार गावंडेंनी येथे स्वखर्चातून मुलांसाठीही वसतिगृह सुरू केले. ते आदिवासीबहुल भागातली मुले गोळा करून आणतात, त्यांना शिकवतात. वसतिगृहाला शासनाची मान्यता आहे. त्यातून मुलांचा खर्च थोडाफार भागतो. संस्थेची शेती भाड्याने दिली. त्यातून वर्षाला दीड लाख मिळतात. ते इमारतींची डागडुजी व वीजदेयक भरण्यात जातात. ‘‘एकेकाळी येथे मान्यवरांचा राबता असे. एकदा मणीलाल गांधी येऊन गेले. नेल्सन मंडेलांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या इला गांधी आल्या. आता कुणी येत नाही. संस्थेचे स्वत:चे उत्पन्न नाही. त्यामुळे पैसे नाहीत. मग पूर्णवेळ कार्यकर्ते तरी कसे थांबणार? एकेक करून तेही सोडून गेले. लहानपणी खूप गौरवशाली काळ बघितला. आता हताश, निराश वाटते असे गावंडे सहज बोलून जातात. ताराबेन खूपच प्रतिभाशाली व धीराच्या होत्या. त्या असताना अनेक संकटे आली पण न डगमगता त्यांनी त्यावर मात केली. दमा असूनही त्या गावोगाव फिरायच्या. त्यांच्या मदतीला पंचकन्येतल्या चौघी असायच्या. बाळंतपणाच्या आधी अवघडलेल्या अवस्थेतल्या अनेक ्त्रिरयांना या पाच जणी गाडीतून घेऊन यायच्या. अनेक जणी नकार द्यायच्या. त्यावर उपाय म्हणून ‘सुईण/ दाईण’चे प्रशिक्षण या पंचकन्यांनी संस्थेत सुरू केले. यातून शेकडो मुली प्रशिक्षित झाल्या व गावागावांत सेवा देऊ लागल्या. आता काळ बदलला. गावात आरोग्य केंद्रे सुरू झाली. त्याला अनुसरून संस्थेचे सूतिकागृहही अद्ययावत व्हायला हवे होते. ताराबेन त्यासाठी प्रयत्नात होत्या, पण शेवटच्या काळात त्यांना इतरांची साथ मिळू शकली नाही. पंचकन्येतील एकेक धागा तुटत गेला. मग त्यांना एकाकीपणाने ग्रासले. यात काम करणारे आम्ही सर्व गांधीवादी. स्वावलंबन हेच मुख्य सूत्र. त्याकडे लक्ष न देता सरकारवर अवलंबून राहण्याची चूक आम्ही केली. ती लक्षात आली तोवर काळ बदलला होता. उशीरही झाला होता. अशा स्वयंसेवी संस्थांना मदत करण्याची वृत्ती व निकषही बदलले. त्यामुळे आम्ही मागे पडत गेलो. सरकार काही तरी करेल ही भाबडी आशा बाळगणेच चूक ठरले,’’ अशा शब्दांत गावंडे व्यक्त होतात.
या पंचकन्यांनी तेव्हा माधान निवडले ते गुलाबराव महाराजांमुळे. हे गाव तेव्हा खूप चर्चेत असे. आता गुलाबराव महाराजांच्या मठाचा विशाल विस्तार झाला आहे. त्यांच्या अनुयायांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. सेवेचा वारसा सांगणारी ही संस्था मात्र मागे पडली. संस्थेच्या पंचकन्या पंचत्वात विलीन झाल्यावर आता ही संस्था मरणकळा अनुभवत आहे. ती केव्हाही बंद पडेल अशी सध्याची परिस्थिती आहे.
