गोष्ट १९७८ची. मेळघाटातील धारणीच्या काष्ठ भांडारात नेहमीप्रमाणे लाकडांचा लिलाव सुरू होता. आगारात मोक्याच्या जागेवर ठेवलेल्या एका लाकडाच्या उंच ‘लॉट’वर उभे राहून २२ वर्षांची एक तरुणी जोरजोरात ओरडत होती. महिला व मुलांच्या शिक्षणासाठी हा ‘लॉट’ जास्त किमतीत विकत घ्या व आम्हाला मदत करा. जमलेले ५०० व्यापारी या मुलीकडे कौतुकाने बघत होते. त्यातल्या कल्याणच्या व्यापार्याने मूळ किमतीपेक्षा २५ हजार रुपये जास्त मोजत हा लॉट विकत घेतला व कस्तुरबा ट्रस्टच्या धारणीतील प्रकल्पासाठी इमारत बांधण्याचा मार्ग प्रशस्त झाला. पुरुषांच्या गर्दीत लाकडाची बोली लावणार्या या तरुणीचे नाव होते शेवंता चव्हाण.
शेवंता मूळच्या कोकणातल्या. कस्तुरबांच्या निधनानंतर देशभरातील शेकडो महिला या ट्रस्टच्या माध्यमातून समाजसेवा करण्यासाठी महिला, बाल, आरोग्यसेविका म्हणून ठिकठिकाणी गेल्या, शेवंताबाई त्यापैकी एक. शंकरराव देव, प्रेमा कंटक यांच्या पुढाकाराने सासवडला स्थापन झालेल्या केंद्रात काही काळ काम केल्यावर त्यांना पाठवले गेले थेट धारणीत. ताराबेन मश्रूवालांनी गोंडवाडीत सुरू केलेली बालवाडी सांभाळायला. तूच पैसे जमव, तूच या सेवा प्रकल्पाचा विस्तार कर असे स्पष्टपणे बजावून. त्या धारणीत आल्या तेव्हा नाना व इंदू भिसे एका झोपडीत बालवाडी चालवत होते. इमारत उभी करायची तर पैसा हवा. या लहानशा गावात तो कोण देणार? मग शेवंताचे लक्ष गेले तिथे लाकूड खरेदीसाठी येणार्या व्यापार्यांकडे. तेही दाद देईनात. शेवटी त्या थेट चिखलदर्याला गेल्या व तेव्हा वनाधिकारी असलेल्या धर्माधिकारींसमोर जाऊन उभ्या राहिल्या. अडचण सांगितली. त्यांनी एका लॉटची बोली शेवंता लावेल असे पत्रच काढले. यातून मिळालेल्या २५ हजारांतून बालवाडीची इमारत उभी झाली. मेळघाटात तेव्हा काम करणार्या सेविकांसाठी एक घरही तयार झाले. नंतर सरकारने या प्रकल्पाला चार एकर जागा दिली. ती मिळाल्यावर ट्रस्ट व नाना भिसेंमध्ये वाद सुरू झाले. ही महसुली लढाई अनेक वर्षे चालली. शेवंताबाई त्यासाठी अमरावतीला चकरा मारायच्या.
एकदा रात्री धारणीला परतताना बसमध्ये त्या एकट्याच. चालक व वाहक दोघेही मद्यधुंद. किर्र जंगलात अचानक बस थांबली तशा त्या दार उघडून रस्त्यावरून पळत सुटल्या. मागून येणार्या एका जीपला त्यांनी हात दाखवला. ती थांबताच त्या आत बसल्या. धारणी एवढे बोलून त्यांनी गच्च डोळे मिटले. गावात उतरल्यावर त्यांनी जीपचालकाचे आभार मानत नाव विचारले. ते धारणीचे एसडीओ होते. महसुली खटल्याचा निकाल ट्रस्टच्या बाजूने लागला. मग शेवंताबाईंनी मागे वळून बघितले नाही. सरकारने दिलेल्या जागेवर त्यांनी शाळा सुरू केली. त्याला आता ३५ वर्षे झाली. दरवर्षी शंभर टक्के निकाल हे शाळेचे वैशिष्ट्य आजही कायम आहे. २००२ मध्ये त्यांना आदेश मिळाला, सासवडला जा व ट्रस्टच्या महाराष्ट्र शाखेचे कामकाज सांभाळ. तेव्हापासून त्या इथे आहेत. दर महिन्यातले आठ ते दहा दिवस त्या धारणीला जातात, तेही वयाने पंचाहत्तरी गाठली तरी बसचा प्रवास करून. त्यांना भेटायला पुण्याहून सासवडला गेलो. नारायणगाव मार्गावरच्या ट्रस्टच्या मुख्य इमारतीजवळ आलो तेव्हा पर्यटकांच्या दोन बसेस तिथे उभ्या. बघून बरे वाटले. नंतर आत गेल्यावर कळले की पर्यटक या ट्रस्टला नाही तर त्याला अगदी खेटून असलेल्या मंदिरात दर्शनासाठी आलेत. खुद्द शेवंताबाईंच्या तोंडून हे ऐकून मन खट्टू झाले. ट्रस्टची स्थापना झाल्यावर महाराष्ट्राच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी सासवडला इमारत बांधायचे ठरले. १९५४ ला राजेंद्रप्रसाद इथे भेटीसाठी आले. त्यांनी केंद्रीय समाजकल्याण मंडळाला विनंती केली. त्यांनी इमारत बांधून दिली. आता ती पार मोडकळीला आली आहे. एकेकाळी इथे मोठे अनाथालय, महिलाश्रम होता. एका इमारतीत बालसदन होते. एकाच वेळी चारशे मुली शिकायच्या. इथल्या अनाथाश्रमात राहून पाचशेच्या वर मुलांनी शिक्षण घेतले. त्यातील कित्येक आज उच्चपदावर आहेत. दरवर्षी दिवाळीला सारे इथे येतात. सहकुटुंब.
या ट्रस्टच्या जागेचीही कथा वेगळी. सासवडमधील पुरंदरे नावाच्या दानशूर व्यक्तीने शेजारच्या मंदिरासाठी ही जागा दान दिली. त्याचे व्यवस्थापन सांभाळणार्यांनी पन्नासच्या दशकात त्यातली ११ एकर ट्रस्टला दान केली. तेव्हा दान करणार्या सर्वांचे आता निधन झाले आहे. त्यांची नवी पिढी ही जागा परत द्या म्हणू लागली आहे. तसेही हे ट्रस्टचे कार्यालय ओस पडलेले असते. मग कशाला हवी एवढी जागा हा त्यांचा सवाल. असेल आज वाईट स्थिती पण कधीतरी चांगले दिवस येतीलच की गांधीविचारांना, असा आशावाद जोपासणार्या शेवंताबाई काहीही झाले तरी जागा सोडणार नाही यावर ठाम असतात. प्रेमाताई कंटक या १९५५ ते ८२ असा दीर्घकाळ ट्रस्टच्या सर्वेसर्वा होत्या. गांधींच्या ब्रह्मचर्यावर टीका करूनसुद्धा अखेरपर्यंत गांधीवादी राहिलेल्या कंटक वारल्यानंतर अनेकांकडे ही जबाबदारी फिरत राहिली. शोभना रानडे हे त्यातील एक प्रमुख नाव. त्यांनी निधी उभारून एक भव्य इमारत अगदी बाजूलाच उभारली. यात ज्यांनी गांधीवादाला सर्वस्व अर्पण केले अशा सात सेविका सध्या राहतात. यातील काहींची कुटुंबे आहेत, पण कुणालाही घरी परतावेसे वाटत नाही. येथे राहणार्या सेविकांचे वय ८०च्या पार आहे. या सार्यांचा सांभाळ शेवंताबाई करतात. ट्रस्टच्या जागेत त्यांनी शेती फुलवली आहे. त्यातील उत्पन्नावर सर्वांची गुजराण चालते. देणग्या मिळतात पण फारच थोड्या.
एकेकाळी संपूर्ण राज्यात या ट्रस्टचा दबदबा होता. २६ जिल्ह्यांत एकूण ५६ केंद्रे होती. त्यात महिला सक्षमीकरणाचे उपक्रम चालत. बालवाडी, शिवणकला प्रशिक्षण इत्यादी. मध्यंतरी उषा शिलाई मशीन तयार करणार्या कंपनीने ट्रस्टशी करार केला. त्यातून शेकडो महिलांना स्वयंरोजगार मिळाला. नंतर एकेक करून ही केंद्रे बंद पडत गेली. अनेक ठिकाणच्या जागा तिथल्या तिथल्या मातबरांनी हडपल्या. त्यासाठी संघर्ष करणारे कार्यकर्तेच ट्रस्टकडे उरले नाहीत. आता राज्यात केवळ पाच केंद्रे सुरू आहेत. विदर्भातील चिमूरला ट्रस्टची जागा आहे. तेथील केंद्र बंद पडले आहे. हीच संधी साधून प्रशासनाने जागा सरकारजमा करण्याची नोटीस काढली. अखेर शेवंताबाईंनी धावाधाव केली. चिमूरला गेल्या. जागा सरकारने दिलेली नाही तर खरेदी केलेली आहे अशी कागदपत्रे दाखवली. आता तिथे शिवणकला केंद्र सुरू होत आहे.
‘अलीकडे पूर्णवेळ कार्यकर्त्या मिळत नाहीत. अल्प मोबदल्यात काम करण्यास कोणी तयार होत नाही. गांधी-विनोबांच्या आदेशाने आम्ही तेव्हा समाजाच्या सेवेसाठी स्वत:ला झोकून दिले. काबाडकष्ट करून प्रकल्प सुरू केले. मात्र सरकारशी जुळवून कसे घ्यायचे, संस्था चालवताना लागणारी राजकीय दृष्टी कशी असावी याकडे कधी लक्षच दिले नाही. त्याचा फटका आता आम्हाला सहन करावा लागतो. ट्रस्टच्या बालवाडीत अजूनही मुली शिकायला येतात. त्यांचा चिवचिवाट जोवर सुरू असतो तोवर बरे वाटते. एकदा का मुली घरी गेल्या की एकाकीपण खायला उठते. मग करायचे काय तर भूतकाळात रमायचे. जुन्या आठवणींना उजाळा दिला की आजही मन प्रसन्न होते,’ शेवंताबाई शून्यात नजर लावून बोलत असतात. ऐकून आतून ढवळायला होते. ट्रस्टच्या जुन्या इमारती असलेल्या आवारात डॉ. सुशीला नायर यांचा अर्धाकृती पुतळा बसवलेला आहे. संध्याकाळी तिथे सध्या निवृत्तीचे जीवन जगत असलेल्या सेविका जमतात. भजन, गाणी म्हणतात. येथे मैफील जमली की ट्रस्टचे काम उभे करणार्या शांताबाई कोटेचा, शांता कर्णिक, दुर्गाबाई देशमुख, शोभना रानडे यांच्या आठवणी निघतात.
पन्नासच्या दशकात निर्मला देशपांडेंनी तेव्हा सक्रिय असलेल्या सर्व सेविकांना ट्रस्टचे मुख्यालय असलेल्या इंदोरमध्ये नेऊन कसे सैनिकी प्रशिक्षण दिले होते याचीही आठवण निघते. जिवंत आहोत तोवर हा संस्थात्मक व्याप सांभाळायचा. नंतर काय होईल ते देवालाच ठाऊक असे शेवंताबाई निरोप घेताना म्हणतात. त्यांच्यासोबत सध्या निवासी असलेल्या वृद्ध सेविकाही असतात. त्यातील प्रत्येकीच्या हाती लाल गुलाब असतो. अलीकडे विचारपूस करणारेसुद्धा दुर्मीळ झालेले. म्हणून ही गुलाबाची भेट असे त्या बोलून दाखवतात. त्यांचे हे शब्द मनाला दीर्घकाळ अस्वस्थ करत राहतात.
