डॉ. सतीश करंडे, मिलिंद मुरुगकर , कृषी प्रश्नाचे अभ्यासक
लोक शेतीतून बिगरशेती क्षेत्रात स्थलांतरित होतात, हे स्वाभाविक आणि स्वागतार्ह मानले जाते. शेतीला एवढ्या लोकांचा भार सहन होत नाही. म्हणजे एवढ्या लोकसंख्येला चांगले उत्पन्न देण्याची क्षमता शेतीत नाही असेही मांडले जाते. त्यात तथ्य आहेच. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की शेती सोडून असंघटित स्वरूपाच्या औद्योगिक क्षेत्रात जाणार्या बहुतांश लोकांच्या जीवनात या स्थलांतराने फारसा फरक पडत नाही. देशातील बहुतांश श्रमिक दोन क्षेत्रांत आहेत. असंघटित औद्योगिक क्षेत्र आणि शेती क्षेत्र. आणि या दोन्ही क्षेत्रांतील श्रमिकांच्या मिळकतीत फारसा फरक नाही. यातही अतिशय दुर्दैवाची गोष्ट अशी की अत्यंत कमी सार्वजनिक गुंतवणुकीतून शेतकरी-शेतमजुरांच्या जीवनात क्रांतिकारी बदलाच्या शक्यता समोर दिसत असतानाही तशा गुंतवणुकीचा आग्रह आपल्या कृषिधोरणाच्या चर्चेत केंद्रस्थानी असत नाही. शेवट सुखांत आणि आश्वासक असलेल्या पण खूप अनावश्यक संघर्ष आणि दु:ख असलेल्या लिंगा हुबालेंचे उदाहरण समजून घेण्यासारखे आहे.
लिंगा हुबाले, ३५ वर्षांचा हा तरुण वसई विरार भागात बांधकाम मजूर म्हणून काम करत होता. आता गावाकडे (कटफळ, जिल्हा सोलापूर) येऊन शेती करतो. ‘‘ बहुतेकांचा खेड्यातून शहराकडे प्रवास सुरू असताना, तुम्ही शहराकडून गावाकडे येऊन शेती करत आहात. असे का?’’ या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले ‘‘शहरात मी अशा ठिकाणी राहात होतो जिथे जेवण करत असताना घमेल्यामध्ये धूर केल्याशिवाय जेवता येत नव्हते. कारण डासांचा प्रचंड त्रास. तुम्ही दोन ताससुद्धा राहू शकला नसता अशा ठिकाणी २० वर्षे काढली. पाल ठोकून त्यामध्ये राहत होतो. अगदी उकिरड्यावरचे जीवन. मजुरी बरी होती, परंतु त्यासाठी किडा मुंगीसारखे जीवन जगावे लागत होते.’’
घरी शेती होती, परंतु ती पूर्णत: पावसावर अवलंबून. पाऊस पडला की, मूग- मटकी- बाजरीसारखी पिके पेरायची. पुढे पावसाने साथ दिली तर ती येत. नाही तर सर्व मेहनत वाया जात असे. अशी परिस्थिती दहा वर्षातून किमान दोन-तीन वेळा हमखास असायची. त्यामुळे गाव सोडले. आज गावी परत आलो कारण मी बागायती शेती करू शकतो आणि माझ्या शेतातील मिरची मला वसई विरारमधील मजुरीच्या जीवनापेक्षा खूपच चांगले पैसे मिळवून देते.’’
मग बिरुदेव हांडे यांनी त्यांची गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. ‘‘दिवाळी झाली की जनावरांना चारा नसे. गावापासून पाच-सात किलोमीटरवर परिसरात कालव्याच्या पाण्याची बागायत असल्यामुळे, त्या ठिकाणी गवत आणण्यासाठी आम्ही जात असू. घरातील बायका पोरांसहित अगदी भल्या सकाळी शेतात जायचे. मजुरी म्हणून आम्हाला शेतातले गवत मिळे. कधीकधी तो शेतमालक त्यातलाही वाटा मागे.’’
लक्ष्मण हुबाले हे अपंग शेतकरी. दोन्ही पाय निकामी. शेतमजुरी करणे अशक्य. त्यामुळे त्यांनी उदरनिर्वाहासाठी गावात किराणा दुकान सुरू केले. उधारीमुळे त्यात मोठा तोटा झाला. जगायचे कसे हाच प्रश्न. त्यांना विचारले, ‘‘आता कसे चाललेय आहे?’’ त्यांनी उत्तर दिले, ‘‘अगदी मजेत’’ कशामुळे तर सिमला मिरचीमुळे. त्यांचे मित्र प्रमोद बंडगर चर्चेत सहभागी होत म्हणाले, ‘‘लक्ष्मणचे ‘रूप’ पालटले याचे कारण म्हणजे ‘स्वरूप’’. स्वरूप हे सिमला मिरचीच्या एका वाणाचे नाव.
दिवाळीनंतर गाव ओसच पडत होते. त्याबाबत आरोग्यसेवक म्हणून निवृत्त झालेले आणि गावात राहत असणारे मारुती पुजारी सांगू लागले. ‘‘ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव आहे. पाऊसमान चांगले झाले की तो भरे. त्यातून ओढ्याला पाणी सोडले जात. पुढे पाऊसमानही कमी झाले आणि वरच्या भागात आंधळी नावाचे धरण झाले. त्यामुळे शिवारात पडणार्या पावसावर तो तलाव काही भरेना. कधी तरी दहापाच वर्षांतून एक-दोन वेळा तलाव भरत असे. गावाला शिवार मोठे. छोट्या टेकड्या, उतार-माळरानाच्या जमिनी. गावशिवारात हजार एकरापेक्षा जास्त वन खात्याची जमीन. पूर्वीच्या दुष्काळी कामात अनेक पाझर तलाव झालेले. परंतु सध्या ते सर्व नादुरुस्त, मोडकळीस आलेले. १५-२० वर्षांच्या काळामध्ये पाणी साठून राहील अशा पद्धतीची काही कामेच झाली नाहीत. आणि नेमका त्यादरम्यानच्या काळातील पाच-दहा वर्षांचा काळ कमी पावसाचा. मागील १५-२० वर्षे मोठी कठीण गेली. अहो, गावातील ८० टक्के लोकांना ऊसतोडणी कामगार, बांधकाम मजूर आणि मेंढपाळ म्हणून स्थलांतर करणे अपरिहार्य होते. गावात राहिलेली माणसेसुद्धा शेजारच्या गावात मजुरी करत.’’
ही परिस्थिती बदलण्यासाठी पुढाकार घेतलेले दत्ता खरात सविस्तर सांगू लागले. ‘‘गावशिवारात जलसंधारणाची कामेच नाहीत. वरच्या बाजूला धरण आणि कमी पाऊस यामुळे बागायती शेती फार कमी. यावर विचार केला आणि गावातील मोठा ओढा, ज्याला कासाळगंगा नदी असे म्हटले जाते. त्यावर बंधारे बांधू या! असे ठरले. जवळपास सहा बंधारे लोकवर्गणीतून बांधायचे ठरले. खर्च मोठा वाटू लागला. मदतीसाठी अनेक संस्था पुढे आल्या आणि कामे सुरू झाली. लोकवर्गणीसुद्धा खूप चांगली जमू लागली. अनेक वर्षे कोरडे पात्र त्यामुळे त्यात आजूबाजूच्या शेतकर्यांनी अतिक्रमण केलेले होते. ते काढणे मोठे आव्हान वाटत होते. परंतु एकदा काम सुरू झाल्यावर त्या शेतकर्यांनीही सहकार्य केले.’’ ओढा खोलीकरण, रुंदीकरण करताना निघालेला गाळ यामुळे जवळपास ३००-४०० एकर शेती सुपीक बनली. लोकसहभाग, लोकवर्गणी, लोकतळमळ आणि त्याला मिळालेली लोककल्याणकारी संस्थांची साथ यामुळे हे शक्य झाले. परंतु आपल्याला हे कसे सुचले यावर दत्ता म्हणाले, ‘‘पोलीस म्हणून नोकरी करताना छोटे बंधारे, नाला रुंदीकरण, पाणलोट क्षेत्र विकास यामुळे बागायती झालेली अनेक गावे पाहिली होती. त्यामुळे आपल्या शिवारातील पाणी अडवले पाहिजे हे लक्षात आले होतेच. ते प्रत्यक्षात उतरले लोकांच्या साथीने आणि संस्थांच्या मदतीने.’’
या सर्व कामाला अंदाजे किती खर्च आला, यावर त्यांनी उत्तर दिले, ‘‘बराच मोठा. दीड कोटीच्या घरात.’’ त्यांना दीड कोटींचा आकडा खूप मोठा वाटत होता. कारण त्या गावाच्या लोकांनी तो पैसा स्वत: उभा केला. पण यात शासन असते तर शासनाच्या दृष्टीने तो आकडा अत्यंत किरकोळ ठरला असता. किरकोळ अशासाठी की, या गुंतवणुकीतून येणारा परतावा किती तरी मोठा आणि किती तरी जलद होता.
भारतासारख्या गरीब देशाकडील सार्वजनिक निधी कमी कालावधीत जास्त परतावा देणार्या ठिकाणी गेला पाहिजे. आणि परतावादेखील जास्तीत जास्त लोकांमध्ये वाटला जाणारा असला पाहिजे. समजा हा दीड कोटींचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला असता तर त्याच्या परताव्याचा दर (रेट ऑफ रिटर्न ) किती असला असता ? या आकड्याचा ढोबळ मानाने अंदाज निश्चितच करता येतो. कटफळ या गावी पाणी येण्यापूर्वी खरीप हंगामामध्ये मुख्य पीक हे बाजरी होते. बाजरीची उत्पादकता एकरी सात ते दहा क्विंटल असायची, सरासरी तीन हजार रुपये असा बाजरीचा दर धरला तरी त्यापासून २१ ते ३० हजार रुपये होत होते. रब्बी हंगामामधील मुख्य पिक ज्वारी असायची त्याचीसुद्धा उत्पादकता आणि उत्पन्न बाजरीइतकेच असायचे. मात्र कडब्याचे उत्पादन जास्तीचे मिळायचे. चांगला पाऊस होईल त्या वर्षी रब्बी हंगामात गहू हे पीक घेतले जाई. एक एकर बाजरीसाठी पेरणी ते काढणी मळणीपर्यंत ४० ते ४५ मजूर दिवस पुरेसे होत होते. पाणी आल्यावर शेतकर्यांनी निवड केली ढोबळी मिरचीची. आज गावांत ढोबळी मिरची खालील क्षेत्र अंदाजे २५० ते ३०० एकर असते. ढोबळी मिरचीचा एक एकरातून निव्वळ नफा हा चार ते पाच लाख असतो. काही जणांचा नफा चांगला भाव असेल त्यावर्षी दहा लाखांपर्यंत जातो. कुठे बाजरीचे ३० हजार रुपये आणि कुठे हे चार लाख ते दहा लाखाचे मोठे आकडे. शिवाय या समृद्धीचे वाटपदेखील किती तरी जास्त लोकांमध्ये होते. ( कारण सिमला मिरचीच्या रोपांची नर्सरी, लावणी आणि तोडणी असे मिळून एकरी अंदाजे १५० पेक्षा जास्त मजूर लागतात ) आणि हे सर्व घडले ते ही दीड कोटींची गुंतवणूक घडल्यानंतर केवळ सहा-सात वर्षाच्या काळात.
कटफळच्या या समृद्धीमागे संसाधनांच्या अत्यंत कार्यक्षम वापराचे तत्त्व आहे. पाणी हा त्यातील सर्वात महत्त्वाचा घटक. तो कटफळच्या लोकांनी मागणी असलेल्या पिकासाठी वापरला.
आपल्या देशाच्या शेतीतील एक मोठी समस्या अशी की बहुतांश शेती आणि शेतकरी अजूनही अन्नधान्याच्या उत्पादनात अडकले आहेत. अडकले असा शब्द वापरण्याचे कारण अन्नधान्याची मागणी आता मंदावली आहे. वाढती मागणी आहे ती भाजीपाला आणि फळांना. भाजीपाला हे तर कमी काळात उत्पन्न देणारे पीक. त्यामुळे लहान शेतकर्यांसाठी ही एक मोठी संधी आहे. पण दुर्दैवाने अगदी कमी गुंतवणूक करणेही शक्य नसल्याने अनेक शेतकरी, शेतमजूर या समृद्धीपासून वंचित राहत आहेत. लिंगा हुबालेंसारखे तरुण आपली उमेदीची वर्षे शहरात अत्यंत कष्टप्रद फारशी आशा नसलेले जीवन जगत वाया घालवत आहेत.
