‘कवडी’मोल वाढवायचे असेल, तर त्याची पुनर्मांडणी करण्यास काय हरकत आहे? परंपरांना नवे अर्थ दिले, तर नवे मार्ग सापडतील. परंपरा टिकवायच्या असतील, तर त्यात काळानुरूप बदल करावे लागतील. ज्या दिवशी आपल्या देशात पुरुष संतती नियमनाच्या शस्त्रक्रियेचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत जाईल, तेव्हा कवडीमोल वाढेल…
जगण्यासाठी परंपरेचे दुकान थाटावे लागते, हे लक्ष्मी सावंत यांना आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर वाटले माहीत नाही. तुळजापूरच्या दशावतार मठाजवळ असलेल्या कवड्यांच्या माळेच्या दुकानाने त्यांच्या संसाराला हातभार लागला. कवडी हे कधी तरी चलन होते, हे त्यांना माहीत नाही. निव्वळ कवडीचे मोल ते काय? आफ्रिका खंडातील या चलनाचे मोल कमी झाले आणि नुसते वजन वाढले. आपल्याकडे आता डिजिटल व्यवहारामुळे चिल्लर जशी बँकेच्या टाकसाळीत पडून असते, तसेच काहीसे कवडीचे. देवाच्या दारातील कवडी हे खरे तर सुफलनाचे प्रतीक.

धर्म आणि परंपरा यांमध्ये परंपरा जपल्याने धर्म अधिक उजळून निघतो का वगैरे प्रश्न कोणाला फारसे पडत नाहीत. रूढी कशी पाळली जाते, ती का पाळायची, त्याचे अर्थ काय, असले प्रश्न भारतीय मनात जन्माला आले, की त्यांचे उजवे-डावे अर्थ काढण्याचे उद्योग सुरू होतात. लक्ष्मी सावंतांसारख्या व्यक्तींना त्यातील अर्थकारण समजलेले असते. पोट असते त्यावर त्यांचे.

PM Narendra Modi Speech
Narendra Modi : आणीबाणी ते कलाकारांवर बंदी! नरेंद्र मोदींनी ‘हे’ पाच मुद्दे उपस्थित करत काँग्रेसला करुन दिली संविधानाची आठवण
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Finance Ministry
Finance Ministry : वित्तमंत्रालयातील कर्मचाऱ्यांना चॅट जीपीटी, डीपसीक आदी AI च्या वापरास मज्जाव, कारण काय?
VIDEO: तेल गेले, तूपही गेले..! चोरट्यांनी एटीएमला चक्क दोरीने बांधून…
Shocking video of snake attacks frog but frog saves himself animal hunting video viral on social media
जिथे भीती संपते तिथे आयुष्य सुरू होतं! सापाने बेडकाला तोंडात धरलं अन् पुढच्याच क्षणी डाव पलटला, पाहा थरारक VIDEO
Puneri poster marketing poster for recruitment went viral on social media
पुणेकरांच्या मार्केटिंगचा नाद नाय! अशा ठिकाणी लावली नोकरीची जाहिरात की…, VIDEO पाहून म्हणाल मानलं पठ्ठ्याला
Viral video of young girl dancing in cemetery vulgar dance video viral on social media
“हिने तर लाजच सोडली”, चक्क स्मशानात केला अश्लील डान्स! तरुणीचा संतापजनक VIDEO व्हायरल
Funny puneri pati goes viral puneri pati in temple goes viral on social media
PHOTO: “हे फक्त पुणेकरच करु शकतात” पुणेकरांनी देवाच्या बाजूला लावली अशी पाटी की वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल

‘धर्म म्हणजे पारलौकिक कल्याणाची हमी आणि नीतितत्त्वांचा पुरस्कार एवढेच असते असे नाही. धर्माला समाजरचनाही लागते. त्यात विषमताही असते. अशी विषमता दूर करण्यासाठी परंपरेतील एखादी रूढ बाजूला केली, की धर्मसुधारणा होते का, धर्म अधिक उजळून निघतो का,’ असे प्रश्न विचारणारे नरहर कुरुंदकरांसारखे विचारवंत आता महाराष्ट्राला आवडतील का, असा प्रश्न विचारणेही धारिष्ट्यच असेल. आणि असे प्रश्न कवडी विक्री करणाऱ्या महिलेला पडण्याचे कारण नाही. पण सुधारकी महाराष्ट्रात परंपरांचे अर्थ शोधून त्यांचा अर्थ प्रवाही झाला नाही, हेही तेवढेच खरे. इतिहासात कवडी देवीच्या देवळासमोर कधी आली काय माहीत? परंपरा गरीब झाली की तीही रस्त्यावर येत असेल का?

हेही वाचा >>> व्यक्तिवेध : डॉ. व्ही. नारायणन

सुतावर लाल दोरा गुंडाळून कवड्याची माळ बनवणे हे तसे अवघड काम. कवडीच्या खाचेत कागद किंवा कापूस ओला करून खुपसायचा. कवडी उलटी ठेवायची आणि मग त्याची माळ बनवायची. तुळजाभवानीची कवडी निराळी. जराशा पांढऱ्या रंगावरील या कवडीस अंबुकी म्हणतात. येडाई, यमाई, मातंगीची कवडी काहीशी काळसर. परंपरा समाजरचनेशी अशी जाेडलेली असते. येडाईला अगदी तृतीयपंथीही येतात. तुळजाभवानीची यात्रा आणि येडाईचा खेटा अशी शब्दरचनाही परंपरेमधील विषमतादर्शक म्हणावा लागेल. पण देवीला सर्वोच्च स्थानी मानणे म्हणजे काय? ‘आईला राजा उदो, उदो’चा अर्थही असाच. स्त्री राज्याची कल्पना तशी खूप पूर्वीची असेल का? कदीलबन म्हणजे आताचे श्रीशैल्यम हे स्त्री राज्य हाेते. तिथे गाेरक्षनाथ अडकले होते, हा संदर्भ रा. चिं. ढेरे यांच्या ‘नाथ संप्रदायाचा इतिहास’ या पुस्तकात आहे.

मंदिराच्या पायऱ्या चढता आणि उतरताना तसे जाणवतच नव्हते. आपली परंपरा महिलांचा सन्मान करणारी आहे. किल्ल्यासारख्या रचना असणाऱ्या देवळांना कोल्हापूर, तुळजापूर, माहूरसारख्या ठिकाणी देवीची ठाणी असा शब्दप्रयोग का असेल? सर्वसाधारणपणे पोलिसांच्या समोर आपण ठाणे असा शब्दप्रयोग करतो. म्हणजे संरक्षक ही भूमिका असणार. देवी, कॉलरा, पटकी, साथीचे आजार, हिंस्र श्वापदे यातून सुटका होण्यासाठी देवीची आराधना हा जगण्याचा मुख्य भाग असण्याचा काळ असणाऱ्या परंपरांमध्ये कवडी कधी आली असेल माहीत नाही; पण कवडी हे सर्जनशीलतचे प्रतीक. कवडीची खरी किंमत करायची असेल तर काय करावे? – गूगल करून बघा. दर मिनिटाला होणारे बलात्कार, कौटुंबिक हिंसाचाराचे आकडे, नात्यातील पुरुषांकडून होणारे अत्याचार असे किती तरी आकडे एका क्लिकवर सापडतील. थांबवता येईल का हे सारे? माहीत नाही. पण, परंपरा जपणाऱ्या माणसांना परंपरेचे अर्थ कळत नाहीत. कवड्याची माळ हे महिला सन्मानाचे प्रतीक. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाटकात किंवा सिनेमात कठीण प्रसंगी राजा कवड्यांच्या माळेतील एक कवडी भाळी लावतात. जगदंब असा उच्चार करतात, तेव्हा तुळजाभवानीपासून कामाख्या देवीपर्यंतची सारी ठाणी संरक्षक कडे करून आपल्याभोवती उभी राहतील, अशी श्रद्धा आपल्याकडे आहे.

लज्जागौरीच्या मूर्ती आणि कवडी यांचा सहसंबंध बहुतांश अभ्यासकांना माहीत आहे. तेर, भोकरदनसह देशभरातील लज्जागौरीच्या मूर्ती आणि देवीपूजकांचा समस्त वर्ग सर्जनशीलतेची पूजा बांधत असतो तेव्हा उत्सुकता असते ती मनुष्य जन्म होतो कसा याची. चराचराला जन्म देणाऱ्या या देवीची कवडी हे एका अर्थाने देवीपूजन. कामाख्यातील योनीपूजक आणि लज्जागौरीचे प्रतीकात्मक पूजन कवडीमध्ये होते. याचा अर्थ आई ही राजास्थानी आहे. सत्तेमध्ये सर्वाेच्च स्थान मान्य केल्यानंतर तिचा उदोकार करणारी जमात तशी दक्षिणेत अधिक. त्यामुळे आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ या भागांतील व्यक्ती देवीभक्तीमध्ये लीन झालेल्या. पण श्रद्धा नेहमीच रुळलेल्या पाऊलवाटेप्रमाणे तपशील गाळत पुढे जाते. त्यामुळे परंपरा पाळायच्या असतील, तर त्यातील बोधकथांचा भाग कमी केला पाहिजे. पुराणकथा रचणाऱ्यांचा सध्या सुळसुळाट आहे. धर्माच्या नावाने खऱ्या-खोट्या संदर्भाचे भरताड कसे रुजवले जाईल हेही सांगता येत नाही. पण काही परंपरा टिकवायच्या असतील, तर त्यात काळानुरूप बदल करावे लागतात. फुलांच्या हाराऐवजी कवड्यांची माळ जर येणाऱ्या पाहुण्याच्या गळ्यात घातली, तर पाहुण्यांना स्त्रीप्रधानता आम्ही पाळत होतो; पण पुढे त्यावर पुरुषी वृत्तीने मात केली, हे सांगावे लागेल. पण आता ही परंपरा पाळण्यासाठी आम्ही नवे निकष बनवले आहेत. नव्या जाणिवा निर्माण करणारे कार्यक्रम आखतो आहोत, हेही सत्ताधाऱ्यांना सांगावे लागेल. परंपरांची फेररचना करावी लागणार आहे. पण जगण्याचा हा पैलू कवडीविक्री करणाऱ्या बाईपर्यंत पोहोचवणे, हे खरे आव्हान आहे.

स्टॉकहोम हा जलक्षेत्रातील जागतिक पुरस्कार डेन्मार्कमध्ये दिला जातो. ज्या व्यक्तीला हा पुरस्कार मिळतो त्याच्या देशाचा झेंडा आणि डेन्मार्कचा ध्वज त्या दिवशी एकाच उंचीवर लावला जातो. या देशातील वाहतूक जलमार्गे होते. त्यामुळे नावाडी अधिक आहेत. हे नावाडी त्या जलतज्ज्ञाचे कौतुक सांगतात. एवढी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्याच पद्धतीने आपल्याकडे महिलांच्या क्षेत्रात उच्चतम काम करणारीस पुरस्कार देऊन तिची माहिती सांगणाऱ्या व्यक्ती जर कवडी विक्री करणाऱ्या लक्ष्मी सावंतसारख्या अनेकजणी असतील तर कोणाला आवडणार नाही. पंतप्रधानांनी त्या दिवशी कवड्यांची माळ गळ्यात घालून येणाऱ्या पाहुण्याचे जरूर स्वागत करावे. ‘कवडी’मोल वाढवायचे असेल, तर त्याची पुनर्मांडणी अशी करण्यास काय हरकत आहे? परंपरांना असे नवे अर्थ दिले, तर नवे मार्ग सापडतील. नवी जाणीव असणाऱ्यांना थोडेसे पुढचे पाऊल टाकण्यासाठी मात्र काही नवे विचार स्वीकारावे लागतील. ज्या दिवशी आपल्या देशात पुरुष संतती नियमनाच्या शस्त्रक्रियेचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत जाईल ना, तेव्हा कवडीमोल वाढेल. अन्यथा भाषणांमध्ये आपला हात कोणी धरू शकत नाही. संस्कृती तर महान असतेच. फक्त लोकसंस्कृतीचे नवे बदल स्वीकारायचे कसे, हा खरा मुद्दा आहे.

suhas.sardeshmukh@expressindia.com

Story img Loader