जपानी कादंबर्यांचे अनुवाद वाचणार्यांना केवळ मुराकामी यांच्या खूपविक्या कादंबर्या माहीत नसतात, तर कियागो हिगाशीनो यांच्यासारखे तिथले रहस्यकथाकारदेखील आवडलेले असतात. १०० हून अधिक पुस्तके असलेल्या या लेखकाच्या डझनभर तरी कादंबर्यांचे अनुवाद भारतीय पुस्तक बाजारांत सहज मिळतात. ‘द डिवोशन ऑफ सस्पेक्ट एक्स’, ‘जर्नी अण्डर द मिडनाइट सन’ आणि कितीतरी रहस्य कादंबर्यांचे वाचक मुंबई-पुणे आणि देशातील शहरी भागांत सापडतील. हत्यासत्रांच्या मागावर डिटेक्टिव्हांसह वाचकांनादेखील नेणारा आणि त्यांच्या डोक्याला कथानकातून सतत चकवे देणारा हा लेखक. त्याच्या नुकत्याच झालेल्या मृत्यूची जपानपासून भारतीय माध्यमांनी दखल घेतली. त्याचे चिनी अनुवाद तैवानमध्ये किती लोकप्रिय आहेत, हे सांगणारा लेख. त्यासह हा लेखक आत्ता माहिती झालेल्यांसाठी पूरक दुवे.
– https://tinyurl.com/mvbh9b7m
– https://tinyurl.com/2r3wh4d4
– https://tinyurl.com/3mu2hy7j
बुकरची लांबोडकी यादी…
समुद्रकिनार्यावरच्या उन्हाळ वाचनयाद्या वेगात पसरत असताना नव्या कथनात्मक पुस्तकांची यादी बुकरच्या ‘लाँगलिस्ट’ने या आठवड्यात जाहीर केली. मार्लन जेम्स, डग्लस स्टुअर्ट या दोन बुकर विजेत्या लेखकांच्या आणि तीन वेळा नामांकन मिळालेल्या एलिझाबेथ स्टुअर्ट या आजीबाईंच्या कादंबर्या यंदाच्या यादीत आहेत. तब्बल १६३ कादंबर्यांतून निवडलेल्या या कादंबर्या. त्यात आयर्लंडमधील २८ वर्षीय जमेल व्हाइट याची तिथल्या गुन्हेगारी विश्वावर लिहिलेली ‘ऑल देम डॉग्ज’ आधीपासूनच भरपूर चर्चेत आहे. संपूर्ण यादीतील पुस्तकांविषयीचा तपशील आणि जमेल व्हाइट याच्या कादंबरीतील एक प्रकरण. त्याचबरोबर या लेखकाविषयी माहिती.
– https://tinyurl.com/58uyj4z2
– https://tinyurl.com/uhpvhk2f
– https://tinyurl.com/4f8ja4es
अनुवादातून घडलेली लेखिका…
दोन दशकापूर्वी दक्षिण कोरियातून एकाच वेळी संगीत, सिनेमा आणि साहित्य निर्यात होऊ लागले. पण जगभर लोकप्रिय असलेल्या बुलेटप्रूफ बॉय स्काऊट्स ऊर्फ ‘बीटीएस’ या संगीतसमूहाइतपत देशाच्या सकल उत्पन्नात इतर दोन माध्यमांनी फारशी भर पाडली नाही. मग हान कांग यांना साहित्याचे नोबेल मिळाल्यानंतर परिस्थिती बदलली. लिझी ब्युलर ही लेखिका-अनुवादक टेक्सासमध्ये वाढली. हार्वर्डमध्ये शिकली. त्यानंतर सोलमध्ये काही वर्षे राहत कोरियाई भाषा अवगत करून २५व्या वर्षी तिथल्या पुस्तकांचा अनुवाद करू लागली. या आठवड्यात तिची ‘ऑबसेस्ड’ ही स्वतंत्र कादंबरी प्रकाशित झाली. जपानी लेखक हारुकी मुराकामी यांनी बर्याच अमेरिकी अभिजात कादंबर्या आपल्या भाषेत अनुुवादित केल्या. मेंदूला चालना देण्यासाठी अनुवादाची महत्ता त्यांनी वेळोवेळी सांगितली. ब्युलर यांनी कोरियाई कादंबर्यांच्या अनुवादामुळे सापडलेले स्वत:चे लेखन यावर चर्चा केली आहे. ब्युलर आणि कोरियन समांतर साहित्याचे जग याविषयी माहिती देणारे दुवे.
