कोणताही ‘मीडिया’ तुम्हांस हे सांगणार नाही, परंतु समस्त आर्यावर्तात आता शांतता आणि समाधानाचा दीपोत्सव सुरू होणार आहे. अं हं, तुम्हांस वाटते तसे फटाकाबंदी हे काही याचे कारण नाही. कोणा विद्यानंदांनी कितीही नाट लावली तरी त्या धूम्राग्नीकांड्या फुटणारच. येथे आपण बोलतो आहोत, ते वेगळ्याच शांततेबद्दल. गत काही दिवसांपासून आपण पाहतो आहोत, की त्या जेन-झी पोट्ट्यांनी समग्रांस वात आणलेला आहे. ही पोट्टी म्हणजे चालतेबोलते सांस्कृतिक धक्के. तसे त्या धक्क्यांचे आपणांस काही नाही. आपल्या परम सुसंस्कृत नेत्यांच्या सभा, बाइट-साइट यातून आपणांस त्या सांस्कृतिक धक्क्यांची सवय झालेली आहे. सवाल आहे तो आंदोलनांचा. पोट्टी आंदोलने करतात. धरणी धरतात. ठिय्या देतात. डफल्या वाजवून गाणी म्हणतात. वर त्याच्या रिळा बनवतात. हे तर हे, देशातील नागरिक, विरोधी पक्ष हेसुद्धा त्यांच्या वरताण आंदोलने करतात. विरोधी पक्ष बोलून-चालून देशद्रोही. त्यांस काय मतदार यादीतूनही हरवता येते. पण नागरिकांचे काय? आपले रूपांतर केव्हाच लाभार्थ्यांमध्ये झाले आहे. तेव्हा आपण वाट पाहायची ती बँकेत पडणार्या सरकारी मदतीची हे का ते विसरून गेले? काय साध्य होते त्यांच्या त्या आंदोलनांतून? धादांत अराजक तेवढे पसरते.
ते दिसते कसे आननी हे कोणी विचारू नये आणि कोणी ते सांगू नये. पण आधीच आपल्या लोकशाहीची प्रकृती अशी तोळामासा. त्यात हे असे अराजक म्हणजे, उपासमारीत ढाळच. पण आता हे होणे नाही. कारण की त्या अराजकाच्या मुळावरच केरळातील एका महामहीम न्यायासनाने हल्ला चढवलेला आहे. स्पष्टच बोलले ते, की या संसदीय लोकशाही देशी तुमच्या त्या धरण्यांस व उपोषणांस व सत्याग्रहांस स्थान नाही. शैक्षणिक संस्थांमध्ये तर असे करणे अजिबात नच्छ! किती हा उदात्त विचार! किती ते लोकशाहीवादी तत्त्व! भलेही या देशातील एका सामान्य महात्म्याने जगास हे सत्याग्रहाचे अस्त्र दिले. सत्यासाठी धरणे धरा, निदर्शने करा, लाठ्या खा, असे सांगितले. त्याबद्दल फार फार तर आपण त्यास प्रात:स्मरणीय मानू. प्रतिमेस वंदन करू. पण हार घातले म्हणजे विचार मानायचे असतात असे कोण ग्रंथी लिहिले आहे? आणि तसेही त्या ‘एमजी रोड’ वरून चालणे आपण केव्हाच सोडून दिलेले आहे. बरे आजच्या काळात सत्याचा आग्रह कोण धरतो? परवडणार आहे का तो कोणास? तेव्हा सत्याग्रह, आंदोलने वगैरेंस स्थानबद्ध करणे हेच बरे. असतील काही मागण्या तर त्या फेसबुकी मांडाव्यात. प्रशासनांस कळवाव्यात व गप्प बसावे. अन्याय झाला तर न्यायालयी जावे. कधी ना कधी तेथे तारीख मिळेलच की. धरणे-उपोषणे करून अराजक कशास बरे पसरावे? अत्यंत रास्त सवाल. आमचे (आंदोलन न करता) मागणे असे, की प्रिय सरकारने या न्यायासनाचे ऐकून एके दिवशी आठ वाजता थेटच नि:सत्याग्रहीकरण करून टाकावे. म्हणजे मग देश कसा लोकशाहीच्या मार्गावर कदम ताल करणेस मोकळा. आम्हांस खात्री आहे की लवकरच आर्यावर्ती अराजक हटून शांत-सुशांत राजक सुरू होईल. आमेन.
