जच्या सत्ताधाऱ्यांना असंतोषाची भीती वाटते आणि म्हणूनच ते प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज योजनाबद्ध रीतीने दाबण्याचा प्रयत्न करतात, अशी टीका अभिनेते प्रकाश राज यांनी केली. कोझिकोडच्या समुद्रकिनारी सध्या सुरू असलेल्या ‘केरळ लिटफेस्टमध्ये ते सहभागी झाले होते. ‘असंतोषाचे गुन्हेगारीकरण’ या चर्चासत्रात सहभागी होत त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीकास्त्र सोडले. सोनम वांगचुक, उमर खालिद यांचा तुरुंगवास आणि न्यायालयीन स्वातंत्र्याचा ऱ्हास या विषयांवरही त्यांनी मतप्रदर्शन केले. ‘मला देशद्रोही, हिंदूद्रोही अशी लेबले लावली जातात. खटले भरले जातात. हे सारे केवळ तुम्ही लढून थकून जावे आणि विरोध करणे थांबवावे यासाठी आहे. पण आम्ही थकणाऱ्यांपैकी नाही…’ असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

महोत्सवाला गुरुवारी (२२ जानेवारी) प्रारंभ झाला असून २५ जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. महोत्सवाचे हे नववे वर्ष आहे. ४०० हून अधिक वक्ते सहभागी होणार असून सात सत्रांमध्ये २५० चर्चासत्रे होतील. सायंकाळी सांगीतिक कार्यक्रम आणि रात्री उशिरा समुद्राकाठी शेकोटीजवळच्या गप्पाही रंगतील. या वर्षी जर्मनीला ‘अतिथी राष्ट्र’ घोषित करण्यात आले आहे, त्यामुळे समकालीन जर्मन लेखक हे भारतीय लेखकांशी संवाद साधणार आहेत.

अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची उपस्थिती हे यंदाच्या पर्वाचे विशेष आकर्षण आहे. ‘भारताच्या अंतराळ मोहिमेविषयी मला प्रचंड उत्सुकता आहे. कल्पना आता प्रत्यक्षात उतरू लागल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मोहिमांतील भारताचा सहभाग वाढत असून त्याच वेळी ते त्यांच्या स्वत:च्या मोहिमांवरही लक्ष केंद्रित करत आहेत. भारत या क्षेत्रात लवकरात लवकर स्वत:च्या पायांवर उभा राहील आणि स्वत:चे लक्ष्य साध्य करेल…’ अशी भारताच्या अंतराळ कार्यक्रमाविषयी सकारात्मक मते त्यांनी मांडली. या महोत्सवात साहित्यिक, कलाकार आणि अंतराळवीर एकत्र आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

नोबेल पारितोषिक विजेते अब्दुलरझाक गुरनाह, ओल्गा टोकार्जुक, अभिजीत बॅनर्जी यांच्यासह इंद्रा नूयी, पिको अय्यर, पर्यावरण कार्यकर्त्या वंदना शिवा, इतिहासकार रोमिला थापर, कादंबरीकार अनिता नायर यांच्यासह अनेकांचे विचार जाणून घेण्याची संधी या महोत्सवाच्या निमित्ताने मिळणार आहे.