केरळम  लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष तसेच सदस्यांना पदावरून दूर करण्यासाठी मावळत्या राज्यपालांनी पदभार सोडण्याआधी राष्ट्रपतींना केलेल्या शिफारसीवरून वादंग निर्माण झाला आहे. लोकसेवा आयोग ही किती महत्त्वाची आस्थापना हे वेगळे सांगायला नको. सरकारमधील नोकर भरतीसाठी सर्वच राज्यांमध्ये लोकसेवा आयोग नेमण्याची राज्यघटनेतच तरतूद आहे. पारदर्शकपणे स्पर्धा परीक्षा आयोजित करणे, त्यात उत्तीर्ण होणार्‍यांच्या मुलाखती घेऊन ही पदे भरणे हे केंद्र व राज्य लोकसेवा आयोगांचे कर्तव्य. पण सध्या या कर्तव्यात लोकसेवा आयोगाकडून कसूर होत असल्याचे विविध राज्यांमध्ये अनुभवास येते.

महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ अशा विविध लोकसेवा आयोगांच्या अध्यक्षांच्या कारभारांवर असेच आरोप झाले. केंद्रीय किंवा राज्य लोकसेवा आयोगांचे अध्यक्ष वा सदस्यांना पदावरून दूर करण्यासाठी प्रक्रिया कशी राबवावी यासाठी राज्यघटनेच्या ३१७ व्या कलमामध्ये स्पष्ट तरतूद आहे. अध्यक्ष किंवा सदस्यांच्या विरोधात गैरव्यवहारांचे आरोप झाल्यास राज्यपाल मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राष्ट्रपतींकडे कारवाईसाठी शिफारस करू शकतात. राष्ट्रपती हे प्रकरण सरन्यायाधीशांकडे पाठवितात. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडून गैरव्यवहारांच्या आरोपांची सखोल चौकशी केली जाते. अध्यक्ष किंवा सदस्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाते. आरोप सिद्ध झाल्यास न्यायालयाकडून राष्ट्रपतींना तसे कळविले जाते. मग बडतर्फीची कारवाई करता येते.

अध्यक्ष किंवा सदस्यांच्या विरोधातील गैरव्यवहारांच्या आरोपांची चौकशी पूर्ण होईपर्यंत राज्यपाल त्यांना निलंबित करू शकतात. अशाच पद्धतीने ऑगस्ट महिन्यात कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना मंत्रिमंडळाच्या शिफारसीवरून राज्यपालांनी निलंबित केले होते. तसेच घटनेच्या ३१७ (१) अन्वये चौकशीची शिफारस राष्ट्रपतींकडे करण्यात आली. ही झाली कायदेशीर प्रक्रिया. पण केरळममध्ये मावळत्या राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांना पदावरून दूर करण्याची शिफारस केली आहे. लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची सध्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी सुरू आहे. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.

मंत्रिमंडळाची शिफारस नसतानाही मावळते राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी पदभार सोडण्याच्या एक दिवस आधी थेट राष्ट्रपतींकडे लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष तसेच सदस्यांना पदावरून हटविण्याची शिफारस केली, असा आक्षेप माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते पिनरायी विजयन यांनी घेतला आहे. केरळमच्या महसूलमंत्र्यांनीही सरकारने अशी काही शिफारस केलेली नसल्याचे स्पष्ट केल्याने राज्यपालांच्या कृतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यात अलीकडेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटीवरून पुण्यात परीक्षार्थ्यांचे ११ दिवसांचे आंदोलन झाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या हकालपट्टीची मागणी आमदार रोहित पवार व आंदोलनकर्त्यांनी केली होती.

आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा केली. चौकशी पूर्ण होईपर्यंत भीमनवार हे सुट्टीवर गेले. लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या विरोधातील आरोपांची आधी चौकशी करावी लागते. महाराष्ट्र सरकारने ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. शेजारील कर्नाटकमध्ये मंत्रिमंडळाच्या शिफारसीवरून राज्यपालांनी लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना निलंबित केले होते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील घोटाळ्यात तत्कालीन सदस्या सायली जोशी यांच्या अटकेनंतर राज्यपालांनी त्यांना निलंबित केले होते. त्यासाठी त्यांना झालेली अटक हे कारण देण्यात आले होते. म्हणजेच मंत्रिमंडळाची शिफारस किंवा कायदेशीर कारवाई हे कारण त्यासाठी उपयुक्त ठरले होते. परंतु केरळममध्ये राज्यपालांनी लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष तसेच सदस्यांना हटविण्यासाठी परस्पर शिफारस करणे हे वादग्रस्त ठरले आहे. केरळम लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या नियोजन आयोगाच्या परीक्षांमध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी सुरूअसल्याची माहिती राज्य सरकारने केरळम उच्च न्यायालयात दिली आहे. म्हणजे चौकशी पूर्ण झालेली नसतानाही राज्यपालांनी कारवाईचे पाऊल उचलले.

केरळममध्ये अलीकडेच काँग्रेस पक्ष सत्तेत आला. आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती आधीच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सरकारच्या काळात झाली होती. राज्यपालांच्या कृतीवरून काँग्रेस व डाव्या पक्षांमध्ये वादाला निमित्तच मिळाले आहे. भाजपला हेच अपेक्षित असावे. पण राजकीय असो वा कायदेशीर, परस्पर शिफारस करण्याच्या राज्यपालांच्या कृतीने अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत.