‘प्रिय दीपकजी’, तुमची बदनामीची नोटीस मिळाली. वाचून आश्चर्यचकित झालो. आपण एकाच पक्षात असूनही तुम्ही मला नोटीस पाठवण्याचे धारिष्ट्य दाखवले याचे नवल वाटले ते वेगळेच. कदाचित मालेगावच्या मातीचाच तो गुण असावा. तसेही असल्या नोटिसा विरोधकांना देण्याचे काम माझे. ते मी इमानेइतबारे पार पाडून पक्षश्रेष्ठींची वाहवा नेहमी मिळवत असतो. पण तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप पडणार नाही. अहो, तुम्ही कुठे, मी कुठे? तुमचा जन्मदाखला रद्द झाला तो प्रशासकीय चुकीचा भाग म्हणून. याची कल्पना मला आहे. पण मी तशी जाहीर कबुली देऊ शकत नाही. कारण एकच, परिवाराने माझ्यावर मोठ्या विश्वासाने सोपवलेली जबाबदारी. त्याचाच भाग म्हणून मी राज्याच्या अल्पसंख्यबहुल भागात नित्यनेमाने फिरतो व बोगस जन्मदाखले शोधून बांगलादेशी, रोहिंगे व अतिरेक्यांना लक्ष्य करत असतो. कुणाच्या मनात भीती निर्माण करायची आहे व कुणाच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करून त्यांच्यात एकजूट घडवून आणायची आहे याची तुम्हाला कल्पना हवी. नसेल तर परिवाराच्या ‘कोअर कमेटी’च्या बैठकांना जरा हजेरी लावत जा म्हणजे या मोहिमेमागचा खरा हेतू समजेल तुम्हाला.
अशा मोहिमा राबवताना ओल्याबरोबर सुकेही जळते. ते सहन करावे लागते. नोटीस देऊन लढण्याचा पवित्रा घेत मोहिमेत बाधा आणायची नसते हे तुम्हाला कळत नाही का? युद्धात शत्रूचे नुकसान करताना कधी कधी आपलेही नुकसान होते. त्याचा इतका बागुलबुवा करण्याची गरज काय? शहरातले लोक तुम्हाला बांगलादेशी म्हणून चिडवत आहेत, यामुळे तुमची मानहानी झाली असे तुम्ही म्हणता. अहो, धर्मरक्षणासाठी या सार्या हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. तुमचा दाखला तहसीलदाराने न देता नायब तहसीलदाराने दिला. या प्रशासकीय चुकीचा उल्लेख मी माध्यमासमोर करून माझ्याच मोहिमेला छिद्र पाडू इच्छित नाही. मी जर असे केले तर आज प्रशासनात जो मान मला मिळतो, बसायला अधिकारी स्वत:ची खुर्ची देतात तीही मिळणार नाही. शिवाय मोहीम थंडावेल, अल्पसंख्य घाबरणार नाहीत ते वेगळेच. तुम्ही आधीच चार पक्ष फिरून आलेले. तुम्हाला या पक्षाची ध्येयधोरणे व परंपरा अजून पूर्णपणे ठाऊक नाहीत. इथे व्यापक हितासाठी केवळ विरोधकांचाच नाही तर स्वपक्षीयांचासुद्धा बळी दिला जातो. त्यामुळे तुम्ही कितीही ओरडलात तरी तुमच्या बाजूने उघडपणे कुणीही पक्षनेता बोलणार नाही. या पक्षात राहून भविष्यात तुम्हाला प्रगती साधायची असेल तर आता शांत राहा व व्यापक दृष्टिकोन लक्षात घेऊन या मोहिमेला पाठिंबा द्या. मी पुन्हा जन्मदाखला मिळवेन पण बोगस दाखले शोधलेच गेले पाहिजेत व बांगलादेशींची हकालपट्टी झालीच पाहिजे अशी जाहीर भूमिका घेऊन पुढच्या मालेगाव भेटीत माझ्यासोबत राहा. आजवर किती बांगलादेशी शोधले हे विरोधकांसाठी राखीव प्रश्न विचारण्याच्या भानगडीत पडू नका. मला दिलेली नोटीस मागे घ्या व मोहिमेला खीळ घातली म्हणून जाहीर पश्चात्ताप व्यक्त करा. एवढेच सांगणे.’
खाली नाव नसलेले हे पत्र अचानक समाजमाध्यमावर व्हायरल झाल्याने नाशिक, मालेगाव व मुंबईत एकच खळबळ उडाली. माध्यमांनी किरीट सोमय्यांना याबाबत विचारले तर त्यांनी कानावर हात ठेवले. तिकडे मालेगावात दीपक भोसलेंनीही असे काही पत्र मिळाल्याचा इन्कार केला. मग हे पत्र तयार केले कुणी यावर परिवाराला अपेक्षित असलेली कुजबूज मोहीम दीर्घकाळ रंगली व मोहिमेला पुन्हा बळ मिळाले.
