केरळमधील ‘कोची-मुझिरिस बिएनाले’ सध्या ३१ मार्चपर्यंत सुरू आहे. बहुतेकांना ‘कोची-एर्नाकुलम’ हे जोडनाव माहीत असते. मग, २०१२ पासून सुरू झालेल्या, दर दोन वर्षांनी भरणार्या दृश्यकला महाप्रदर्शनाच्या नावात ‘मुझिरिस’ कुठून आले? – याचे उत्तर के. एन. पणिक्करांना टाळून देताच येणार नाही. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून इतिहासाच्या प्राध्यापकपदावरून निवृत्ती घेतल्यावर पणिक्कर केरळमध्ये परतले, तिथे ‘केरला कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रीसर्च’ या संस्थेच्या कामाला त्यांनी गती दिली आणि कोची बेटाजवळील मुझिरिस येथे उत्खननाची सुरुवात पुरातत्त्व खात्याच्या परवानगीने केली. प्रा. पणिक्करांचे नाव इतके मोठे की, त्यांचे मार्गदर्शन मिळणार म्हणून अनेक जण या कामाशी जुळले. मुझिरिस हे व्यापारी केंद्र होते, हा तोवर केवळ कयास होता आणि तोही (सध्या व्हिएन्ना येथील संग्रहालयात असलेल्या) ‘मुझिरिस पपायरस’ या एका रोमन दस्तावेजावर आधारलेला. पण २००७ ते ०९ या दोन वर्षांत या कयासाला अक्षरश: ‘ग्राउण्ड रिॲलिटी’चा पुरावा मिळाला. या पणिक्कर यांचे निधन सोमवारी (९ मार्च) झाले, तेव्हा मात्र सुमारे तीन हजार वर्षांपूर्वीचे शहर शोधण्याच्या या प्रकल्पाला चालना देणारे म्हणून पणिक्कर यांची आठवण फार कमी जणांनी काढली.
याचे कारण, विशेषत: उत्तरेकडल्या अभ्यासकांना के. एन. पणिक्कर माहीत आहेत ते मोपल्यांच्या बंडाचा अभ्यास करणारे म्हणून. इतिहासकार हा इहवादी आणि धर्मनिरपेक्षही असायला हवा, अशा मताच्या पणिक्करांवर ‘डावे’ असा शिक्का मारण्यास दोन्ही बाजूचे हितसंबंधी उत्सुकच होते, तो शिक्काही अखेर याच अभ्यासाने पक्का झाला. मोपल्यांचे बंड हा वर्गलढाच होता, त्यात हिंदूंचा सहभाग नगण्य असल्याची कारणेही वर्गलढ्यास हिंदू कितपत तयार होते यात शोधावी लागतील, अशी मांडणी पणिक्करांनी केली होती. त्यावर वादही झाले, पण या वादांतून त्या बंडाचा वा ‘मलबार क्रांती’चा अधिकाधिक सखोल अभ्यास करण्याच्या दिशा पणिक्करांनी शोधल्या. ‘हिस्टरी ऑफ आयडियाज’ हा अभ्यासक्रम त्यांनी तयार केला, त्यात साहजिकच स्वातंत्र्य, समता, बंधुता, वसाहतवाद आणि उत्तरवसाहतवाद यांसह वर्ग, वर्गजाणीव अशा संकल्पना होत्या. त्यामुळे तर त्यांना ‘मार्क्सवादी इतिहासकार’च ठरवले गेले. त्यात ते साधे. छानछोकी न करणारे, कुणाशीही सहजपणे बोलणारे… तेवढ्यावरून ‘हे डावेच’ असे लोकांनी ठरवून टाकले. पणिक्करही त्याचा प्रतिवाद करण्याच्या फंदात कधी पडले नाहीत. त्याऐवजी ते निवृत्तीनंतर केरळला परतले.
अभ्यासूपणा हाच पणिक्करांचा स्वभावधर्म होता. त्यावर कोणत्याही रंगाचे, डाव्या/उजव्या बाजूचे शिक्के मारता येत नाहीत, ही बाजू निवृत्तीनंतरच्या कार्याने झळाळून उठली. मुळात ते वसाहतवादाला विरोध करणारे. तो का, तर मानवी समानता आणि स्वातंत्र्य या मूल्यांवर विश्वास म्हणून. या संकल्पना ‘युरोपीय’ किंवा ‘डाव्या’ म्हणून फेकून देता येत नाहीत, कारण तीन हजार वर्षांपूर्वी आपले पूर्वज समतावादी आणि स्वातंत्र्यवादी नसते तर समुद्रापार व्यापार झालाच नसता, हे त्यांनी निवृत्तीनंतरच्या अभ्यासातून दाखवून दिले!
